श्री महादेवनाथ चरित्र ग्रंथ हे महादेवदासांचे भक्तीपर आत्मनिवेदऩ गुरूचरित्रलेखनसेवा ही त्यांची श्रेष्ठ गुरूभक्तीच़ ग्रंथकार श्री महादेव जाणूजी सोनोने हे नाथबाबांचे अनन्य भक्त़ गुरूंपायी अढळ निष्ठा; सच्चाभाव़ वयाच्या सतराव्या वर्षापासून सत्तराव्या वर्षापर्यंत त्यांना नाथांचे सांनिध्य लाभले़ सोनोनेंचे मूळ गाव हातरूण ता़ बाळापूर जि़ अकोला़ नाथबाबांचेही गाव तेच़ दि़ १-७-१९२९ रोजी त्यांच्या आजोळी, आईच्या माहेरी त्यांचा जन्म झाला़ आईचे नाव भोनाबाई़ बालपण व शालेय शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत हातरूणलाच़ त्याकाळी गावात शाळा चौथीपर्यंतच़ त्यामुळे पुढे शिक्षण थांबले़ घरी दोन एकर शेती़ वडिलांचा व्यवसाय शेतमजुरी़ मोलमजुरी केली तरच हातातोंडाची गाठ पडावी अशी परिस्थिती़ प्राथमिक शिक्षण आटोपताच त्यांना त्यांच्या धनगर समाजाच्या पारंपारिक व्यवसायाकडे वळावे लागले़ शेळ्यामेंढ्या घेवून धनगराचा पोर महादेव जंगलात चारावयास जावू लागला़ वडिलांना संसाराचा गाडा रेटण्यास मदत व्हावी ही इच्छा़ वडील लवकरच देवाघरी गेले़ मामांना एकुलती एक मुलगी़ त्यांनी महोदवासोबत तिचे लग्न लावून दिले़ सहा एकर शेती, दागदागिने सारे काही दिले़ परंतु मामांनी व त्यांची कन्या महादेवाची पत्नी यांनी लवकरच इहलोक सोडला़ पाठोपाठ महादेवाचा लहान भाऊ वारला़ ह्या आघातांनी महादेव खचला़ उदासला़ तशात लेखकाची आई आजारी पडली़ लेखकास काही सुचेनासे झाले़ नामदेव दहिकार आणि बाळकृष्ण सावजी ह्या मित्रांमुळे त्यांना धार्मिक वाचनाची आवड व भक्तीची ओढ लागली़ मनात, घरादारात औदासिन्य दाटले़ मन हळूवार आणि विचारप्रवृत्त झाले़ देहाची नश्र्वरता जाणवू लागली़ मलासुद्धा मृत्यूने गाठले तर? अशी भावना मनात घर करू लागली़ भेदरलेल्या महादेवास नामदेव दहिकार ह्या मित्राने नाथबाबांकडे आणले़ बाबांच्या सहवासाची व सेवेची ओढ लागली़ लेखक जास्तीत जास्त वेळ बाबांच्या सहवासात राहू लागले़.
स्वतःची शेती, घर आई आणि दोन लहान भावांवर सोपवून ते नाथसेवेत रमू लागले़ महाराजांची शेती सांभाळणे, येणार्या नाथभक्तांची सरबराई करणे़ नाथराय साधनामग्न असतांना समोर उभे ठाकलेले कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करणे़ नाथांसमवेतच जेवण व विश्रांती घेणे अशा सेवाकार्यात लेखकाने स्वतःला झोकून दिले़ नाथबाबांना मनोमन गुरू मानले़ महाराजांच्या परवानगीने त्यांनी दुसरा विवाह केला़ संसार सुरळीत झाला; सुखाचा ठरला़ मागील अनुभवांनी पोळलेले मन सुखापेक्षा दुःखाचाच धसका घेऊन बसले; आणि महाराजांच्या आश्रयास घट्ट धरून ठेवले़.
लेखकाची तयारी पाहून नाथबाबांनी त्यांना नामदीक्षा दिली़ प्रसंगपरत्वे सांसारिक आणि अध्यात्म मार्गावर वाटचालीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले़ महाराजांवरील विश्र्वास आणि ईश्र्वरावरील निष्ठा दृढ होत गेली़ महादेवराव अध्यात्म मार्गात तल्लीन झाले़ नाथांचा दिव्य अनुग्रह, पावन सहवास यामुळे त्यांचे जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले़.
लेखक स्वतःला महादेवनाथांचे दास म्हणवू लागले़ त्यांनी महादेवदास असे नाव धारण केले़ त्याच नावाने त्यांनी काव्य व ग्रंथरचना केली़ त्यापैकी श्री यादवनाथ योगलीलामृत ग्रंथ, स्तोत्र व काही स्फूट काव्य पूर्वप्रसिद्ध आहे़ शांतिमंदिरात डॉ़ कृष्णमूर्ती कविरत्न, बाजीराव पाटील, गो़ रा़ वैराळे, बजरंग सरोदे, वसंतराव मालपे अशा वैदर्भी साहित्यिक मंडळीसोबत त्यांची साहित्यचर्चा-संवाद अनेकदा रंगत असे़ स्वतः नाथबाबा त्यांमध्ये आनंदाने सामील होत असत़ नाथांनीच त्यांचेकडून अनेक ग्रंथाचे वाचन करून घेतले़ स्वतः योगाभ्यासाचे धडे दिलेत़ शांतिमंदिरात येणार्या मंडळीत विविध क्षेत्रातील, विविध धर्माची, समाजातील धनाच्या, मानाच्या, ज्ञानाच्या विविध स्तरातील माणसांची रीघ़ महादेवदास स्वतःचा तोल सांभाळत त्यांमधील प्रत्येकाचे पाणी जोखत विनम्रपणे स्वागत करतात़ नाथबाबांचा जीवनपट त्यांच्या डोळ्यांनी हृदयात चित्रबद्ध केला तर नाथांचा शब्द न् शब्द कानांनी गळी उतरवला़ नाथबाबांचा अखंड सहवास हेच त्यांचे तप़ बाबा करवून घेतील ते काम हीच साधना़ बाबांचा बोल हाच त्यांचा मंत्ऱ अढळ श्रद्धा, निरलस सेवा, तीव्र बुद्धिमत्ता व सहज वागणूक हे भांडवल़
आज ते महाराजांच्या शिष्यवर्गात आदर्श आहेत़ दाढी-जटा न वाढवताही साधुता अंगी बाणली आहे़ निरभिमानी वृत्तीमुळे सर्वांना प्रिय व आपलेसे वाटतात़ नाथशिष्य त्यांना आदराने सोनोनेबाबा म्हणतात़ गुरूकृपेमुळे एक बकर्या चारणारा मुलगा साहित्याचे व्यासपीठावर विराजित कसा होतो त्याचा पुरावा म्हणजे हा ग्रंथ़ ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले; इथे महादेवनाथांनी साध्याभोळ्या अजापाळ महादेवदासाच्या लेखणीतून योग, अध्यात्म, नीतीधर्म, गृहस्थधर्म, समाजधर्म व संस्कृतीचित्र उमटवले ही गुरूकृपाच नव्हे काय? अठ्ठ्याहत्तर वर्षाचे महादेवदास आज सुद्धा नियमितपणे सकाळ-संध्याकाळ शांतिमंदिरात आरतीस उपस्थित असतात़ नाथबाबांनी सोपविलेले दैनिक पोथीवाचनाचे कार्य नेमाने पार पाडतात़ दर रविवारच्या सत्संग प्रवचनास जबाबदारीने हजर असतात़ दरवर्षीचे नियत सर्व सत्संग कार्यक्रमात वाट्यास आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडतात़ नाथबाबांचे जीवनचरित्र, कार्य, तत्त्वज्ञान व समाजोपयोगी विचारधारेची गंगा त्यांनी श्री नाथ चरित्र ग्रंथरूपाने आपल्यापर्यंत आणली़ त्याबद्दल शांतिमंदिर व्यवस्थापनातर्फे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे़ त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो आणि निरंतर नाथसेवा घडो ही सद्गुरूंचरणी प्रार्थना़
- जगदिश महादेव पाठक
व्यवस्थापक,
शांतिमंदिर, हातरूण
ता़ बाळापूर जि़ अकोला
No comments:
Post a Comment