अध्यायसत्र एकोणिसावे

श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरुनाथाय नमः। कुलदेवताय नमः । नमो नमः आदिरूपा ॥१॥ जगी झाले किती संत । ऋषी-मुनी थोर महंत । ज्ञानदाते कृपावंत । होऊ नत त्यांच्यापायी ॥२॥ वाणीभूषण विद्यावाचस्पती । कीर्तनकार भागवती । महाराष्ट्रात सार्‍या ख्याती । गावी महती किती त्यांची ॥३॥ प्रज्ञाशील, ज्ञानसूर्य । मठाधिपती आचार्य । महानुभावी गुरुवर्य । ओळखती सर्व वारकरी ॥४॥ महाराज श्रीधरस्वामी । चित्त जडले हरिनामी । देह समर्पिला याचकामी । चाले नेहमी भागवत ॥५॥ पंचगव्हाण व्यासपीठ । आप्पास्वामींचा मठ । कथा-कीर्तन, हरिपाठ । असा परिपाठ नित्याचा ॥६॥ एकदा हातरूणवासी । गेले त्यांच्या दर्शनासी । भागवत व्हावे गावासी । इच्छा मानसी उदेली ॥७॥ स्वामींनी दिला होकार । आनंदी मावळे मधुकर । गावकरी करती विचार । सोईस्कर कार्य व्हावे ॥८॥ डॉक्टर हरिराम सिंघल । सुभाषसेठ अग्रवाल । एक राधेश्याम पाटील । काही गावातील मान्यवर ॥९॥ हेलगे, श्रीधर सागळे । नेमाडे, मधुकर नागळे । दिनकर भारसाकळे । मिळती सगळे एकेठायी ॥१०॥ रामकृष्ण सोनोने, पाठक । भाऊ शिंदे मुख्याध्यापक । तुळशीराम ठाकरे एक । असे अनेक ग्रामस्थ ॥११॥ जाधव तुळशीराम । खडके, खरप मोतीराम । स्वामींवरी नितांत प्रेम । चालविती क्रम वारीचा ॥१२॥ झाले सार्‍यांचे एकमत । पाच वर्षे करावे भागवत । खर्च होईल कार्यात । करावी गावात वर्गणी ॥१३॥ गावालगत काही खेडे । त्यांनी दिले थोडे थोडे । सत्कार्यात राशी पडे। पुण्य घडे सहजची ॥१४॥ येथील काही प्रमुख । निश्चित झाली तारीख । सर्वास झाला हरीख । आखणी देख करिती ॥१५॥ सकाळी बारापर्यंत । कथा चालेल भागवत । दुपारी फराळाचा बेत । असा हेत ठरविला ॥१६॥ दुपारी दोन वाजता । परत भागवत कथा । सायंकाळी पाच होता । आरतीची प्रथा नित्याची ॥१७॥ नंतर श्रोत्यास जेवण । कोणीही करी अन्नदान । हरिपाठ नेमे भजन । रात्री कीर्तन रोजचे ॥१८॥ पहाटे काकडाआरती । भगवंताचे भक्त करिती । स्नान करून चहा घेती । ऐसी रीती ठरविली ॥१९॥ अखंड वाजू लागे वीणा । ब्राह्मण बसती पारायणा । स्वामीजींचे आज्ञेविना । वागणे मना सर्वांसी ॥२०॥ शाळेसमोर पटांगणात । विस्तीर्ण मंडप अत्यंत । बांधला सुरेख शोभिवंत । हजारो ज्यात बसतील ॥२१॥ महाराज स्वामी श्रीधर । आले ठरल्या वेळेवर । नाथ बसती निरंतर । ते शांतिमंदिर शेजारी ॥२२॥ रात्रीचा करून आराम । सकाळचा नित्य नियम । स्मरून सारे निजक्रम । घ्यावे नाम विठ्ठलाचे ॥२३॥ सद्गुरू महादेवनाथ । वडिलांची समाधी जेथ । नित्य राहती तेथ । कधी न जात कुठेही ॥२४॥ यादवांची जेथे समाधी । स्वामी जाती तिथे आधी । चुकले नाही नेमा कधी । दोघांमधी हितगुज ॥२५॥ लागती एकमेकां पाया । वारकर्‍यांची किमया । अहं जातसे विलया । नम्रता या देहासी ॥२६॥ मग येऊन मंडपात । आसनावरी होत स्थित । शुक सांगे भागवत । राजा ऐकत परीक्षित ॥२७॥ नंतर ठरल्याप्रमाणे । मध्ये थोडा विराम देणे । ऐकती सुविद्य शहाणे । मर्म जाणे विरळा तो ॥२८॥ भूतो न्‌ भविष्यती । गर्दी होत रोज आत । किती वर्णावी महती । असे चालती वर्षे पाच ॥२९॥ माणिकराव पाळोदीकर । महंत स्वामी श्रीधर । सख्यत्व दोघांचे अपार । न पडे विसर सर्वथा ॥३०॥ पाटील नाथांचे भक्त । सांप्रदायी ज्ञानी विरक्त । हातरूणास नेहमी येत । नाथ जात पाळोदीला ॥३१॥ भागवत संपेपर्यंत । राहती स्वामींच्या सान्निध्यात । स्वामीसेवा स्वये करीत । दिवसरात येथेची ॥३२॥ तसेच बाळकृष्ण तराळे । दोहोंचा स्वभाव जुळे । एकेठायी नाथप्रेमामुळे । हे वेगळे सांगणे नको ॥३३॥ हे ज्ञानसत्र पाच वर्ष । प्रत्येकाच्या मना हर्ष । साधे जीवनात उत्कर्ष । सहर्ष दिवस जाती ॥३४॥ भागवतकथा हरिलीला । नाथ न येती ऐकायला । महाप्रसाद गोपालकाला । जाय बाबाला मंदिरी ॥३५॥ विचार करिती गावकरी । कथा करावी शांतिमंदिरी । सारे मिळून बरोबरी । पूर्ती सारी करू या ॥३६॥ जेथे संताची समाधी । काम-क्रोध तिथे न बाधी । वातावरणात सदा शुद्धी । पालटे बुद्धी खळांची ॥३७॥ दोन महात्म्यांचा संग । कथा होईल यथासांग । बहुमोलाचा सत्संग । फिटतील पांग श्रोत्यांचे ॥३८॥ स्वामींची मिळाली संमती । कार्यकर्त्यात उत्साह आत । कामास आली खूप गती । सारे राबती गावलोक ॥३९॥ श्रेष्ठ ग्रंथ महाभारत । विदूर नीती सांगे त्यात । ती कळावी इतरांप्रत । कथा सांगत स्वामीजी ॥४०॥ भक्त वसंत निवास । स्वामी येथे सात दिवस । नित्य त्यांचा सहवास । माणिकरावास आवडे ॥४१॥ शेगोकार लक्ष्मण । मोरगाव सादीजन । शांतिमंदिरी राहून । श्रमदान करीतसे ॥४२॥ पांडुरंग सावंत । कोठीघर सांभाळीत । दिवस असो की रात । मंदिरात हजेरी ॥४३॥ बाबांचे अनेक भक्त । थांबती सप्ताहानिमित्त । नावे वर्णावया येथ । शेष अनंत पुरेना ॥४४॥ सातवे दिवशी गोपाळकाला । अलोट जनसमुदाय आला । महाप्रसाद मिळे सर्वांला । कुणी न राहिला वंचित ॥४५॥ ज्ञानयज्ञाची सांगता । महती न ये सांगता । श्रीधरस्वामी स्वये वक्ता । भाग्य भक्तांचे आगळे ॥४६॥ आता काही स्वयंसेवक । म्हणती काढू मिरवणूक । दोन महात्म्यांचे कौतुक । पाहती लोक आदराने ॥४७॥ तयार सुशोभित रथ । श्रीधरस्वामी समर्थ । बाजूस महादेवनाथ । भागवतग्रंथ असे पुढे ॥४८॥ ज्या मार्गाने चाले रथ । पुनीत होतसे तो पथ । भाविक जोडती हात । भजने गात टाळकरी ॥४९॥ हा अनुपम सोहळा । भाग्याने दिसे भक्तांडोळा । श्रद्धाळू भाविक गोळा । मार्ग मोकळा ज्ञानाचा ॥५०॥ दायमा लक्ष्मीनारायण । संस्था त्यांची गोरक्षण । श्यामसुंदर नाम जाण । सदा संरक्षण गाईंचे ॥५१॥ दायमा महाराज संत । कथा करिती भागवत । कीर्तने लोका जागवित । कार्य आवरत चालतसे ॥५२॥ कधी येत शांतिमंदिरी । जिव्हाळा बाबांच्या अंतरी । बसून व्यासपीठावरी । प्रवचन करी महात्मा ॥५३॥ एकदा श्रीधरस्वामी । यांचेकडे होते मुक्कामी । भागवत ऐकती प्रेमी । रामनामी चित्त जडे ॥५४॥ नाथांचे वाढते वय । भक्तांचे बाजूस वलय । केला विचारविनिमय । ठरविले काय ऐका ते ॥५५॥ वय झाले पंचाहत्तर । बाबांस तितके हजार । थैली ठेवून तयार । समर्पू सादर बाबांसी ॥५६॥ आम्ही गेलो स्वामींकडे । त्यांना घातले साकडे । आमचे आभनव कोडे । उलगडे कैशारीती ॥५७॥ बाबा अमुचे निःस्पृह । व्रत ज्यांचे अपरिग्रह । आपण करू या आग्रह । त्यांना संग्रह नावडे ॥५८॥ समर्थ स्वामींचे बोल । अभ्यासपूर्ण सखोल । होणार कसे विफल । दिला न कौल बाबांनी ॥५९॥ भले असोत द्रव्यराशी । लोभ नाही संतापाशी । प्रचिती आली सर्वांसी । बोध घ्यावा अशी गोष्ट ही ॥६०॥ हातरूणचे नंदादीप । त्यात स्नेहाचे तेल तूप । मालपेसरांचा प्रताप । वाढला व्याप प्रकाशाचा ॥६१॥ किर्ती जाय दिगंतरा । प्रेमभक्तीचा हा झरा । जणू लेक येई माहेरा । शांतवी लेकरा माउली ॥६२॥ पाटील पुरुषोत्तम । गजानन संस्था श्रेष्ठतम । कार्यकुशल उत्तम । राहती ग्राम शेगावी ॥६३॥ संत अवलिया गजानन । झाले सद्गुरू महान । भव्य असे देवस्थान । पाहती जाण पाटील ॥६४॥ शिंगोलीचे वैभव । साधुबुवा जानराव । गावचे उज्ज्वल केले नाव । किती गौरव सांगावा ॥६५॥ पाटलांना होती व्याधी । उपाय काही केले आधी । साधुबुवा देती औषधी । सांगती कधी-कधी कुणा ॥६६॥ पाटलांच्या आले मना । भेटू त्या साधुबुवांना । कळवू ह्या वेदना । विचारू त्यांना औषधी ॥६७॥ घरची मोटारगाडी । सोबत दिवाणजी, गडी । निघाले लगेच तातडी । आले या खेडी शिंगोलीला ॥६८॥ ज्यांचे अंगी मोठेपण । नम्रता त्यांचे भूषण । त्यांचे करिता अनुकरण । येई शहाणपण मानवा ॥६९॥ साधुबुवांची होता भेटी । आनंद झाला दोघांपोटी । औषधीची पुडी छोटी । दिली शेवटी हातात ॥७०॥ इथले पाटील महादेव । साधुबुवांचे चिरंजीव । नेहमी जाती शेगाव । मानिती देव गजानन ॥७१॥ भाऊंचा त्यांचा परिचय । अधूनमधून भेटी होय । करिती विचारविनिमय । कुठे देवालय नाथांचे ॥७२॥ त्यांची ऐकिली महती । शेगावचेही भक्त जाती । येथून लांब आहे किती । वाटे मजप्रती भेटावे ॥७३॥ मग महादेव पाटलांनी । भाऊस आणले या स्थानी । मंदिर पाहता दुरुनी । कर दोन्ही जोडियले ॥७४॥ येता पावन परिसरात । बाबाच करिती स्वागत । हार घेऊन हातात । टाकला गळ्यात भाऊंच्या ॥७५॥ पुरुषोत्तमभाऊ व्रतधारी । पाण्याची सोबत झारी । कुठे न घेती पानसुपारी । निर्विकारी भक्त ते ॥७६॥ घेतले विठ्ठलाचे दर्शन । नाथांचे स्पर्शून चरण । वाटे शांती, समाधान । दिले निमंत्रण बाबांना ॥७७॥ गजाननांच्या दर्शनाशी । आपण यावे पुण्यराशी । हर्ष वाटेल मनाशी । विनंती खासी मान्य करा ॥७८॥ एकदा शेगावग्रामी । गेले पहा नाथस्वामी । सोबत होतो आम्ही । ही पुण्यभूमी पवित्र ॥७९॥ त्या गजाननमंदिरात । बाबांसह दर्शन होत । नाथांचे केले स्वागत । प्रसाद देत सार्‍यांना ॥८०॥ पुरुषोत्तमभाऊ स्वतः । येऊन भेटले गुरुनाथा । हातात घेउᆬन हाता । कक्ष दाखविता झाले की ॥८१॥ पुरुषोत्तम पाटलांप्रती । काही करिती विनंती । बाबांची व्हाया इच्छापूर्ती । मार्गावरती पालखी यावी ॥८२॥ आले भाऊंच्याही मना । या मार्गे नेउᆬ गजानना । आनंद वाटेल भक्तजना । नाथांच्या दर्शना होय तृप्ती ॥८३॥ येण्याचा मार्ग ठरला । उत्साह अंगी संचरला । हर्ष होई ज्याला, त्याला । गजाननाला पाहण्या ॥८४॥ सुहासिनींडोई कलश । काहींच्या वृंदावनतुळस । भजने गाती सावकाश । सुखद प्रवास आवडीचा ॥८५॥ वीणा, टाळ, मृदंग । भक्त भजनात सारे दंग । तालावर नाचती तुरंग । यथासांग गीत गाती ॥८६॥ गण गण गणात बोते । हे गीत आवडीचे होते । साथ देती एकमेकाते । रंगले ते भजनात ॥८७॥ मागे मागे चाले हत्ती । माहूत बसे त्याच्यावरती । पालखी चाले ऐशारीती । भाविक येती दर्शना ॥८८॥ मागे चालती मोटारी । काही सामान त्यात भारी । गुरू गजाननांची स्वारी । किती उद्धारी भक्तांसी ॥८९॥ सहभक्तांचा मेळा । अवघा सुखमय सोहळा । पारणे फेडीतसे डोळा । पोटी उमाळा सुखाचा ॥९०॥ जाय जाय तू पंढरी । होय होय वारकरी । तुका सांगे परोपरी । वदे वैखरी सत्य त्याची ॥९१॥ पायी तीर्थयात्रा घडे । मुखी विठ्ठलाचे पवाडे । पुण्य खरे पदरी पडे । येई न साकडे त्याघरी ॥९२॥ लोहारा मार्गे शिंगोली । गावकर्‍यांनी सोय केली । फराळाची व्यवस्था झाली । पालखी निघाली आता पुढे ॥९३॥ विद्यालय महात्मा गांधी । तेथे व्यवस्था होती आधी । पालखी थांबण्या अवधी । मग साधी जेवणावळी ॥९४॥ संगे भाऊ पुरुषोत्तम । थोडासा झाला आराम । हलविला पहा मुक्काम । मंदिरासम येती भाविक ॥९५॥ पुढे चालती चोपदार । शिस्तीचे पालन फार । भगव्या पताका समोर । रस्ता पार करती हे ॥९६॥ हत्ती चाले हळू पुढे । थयथय नाचती घोडे । अंतर कापती थोडे । सनई चौघडे वाजती ॥९७॥ एकोणीसशे ऐंशीसाली । मंदिरावर पालखी आली । भाविकांची गर्दी झाली । नाथमाउली निमित्त ॥९८॥ पालखी आली मंदिरापाशी । नाथ उभे पायरीशी । सारे स्पर्श करिती पायांशी । बुका कपाळासी नाथ लावी ॥९९॥ मंदिराच्या गाभार्‍यात । एक एक भक्त जात । विठ्ठलाचे दर्शन घेत । भावे नमीत राधाकृष्ण ॥१००॥ बाबांनी मग पूजा केली । काही दक्षिणा समर्पिली । गजाननांची आरती झाली । फेरी मारली मंदिरा ॥१०१॥ मंदिरात येता पालखी । गर्दी वाढली सारखी । खर्‍या हिर्‍याचा पारखी । तो निरखी दृश्य हे ॥१०२॥ गोमाजी संस्थान आधपती । आत्माराम पाटील म्हणती । कारभारी कुशलआत । सेवा करिती गोमाजींची ॥१०३॥ वारकरी शिक्षणसंस्था । ज्ञानेश्वरी सांप्रदाय गाथा । जुनीच असे ही प्रथा । हरिपाठ संथा ज्ञानाची ॥१०४॥ पुरातन असे मंदिर । आत छोटे तळघर । तळघरात अंधार । सदा उंदीर खेळती ॥१०५॥ आले पाटलांचे मनी । खिडक्या करू दो बाजुंनी । प्रकाश येईल त्यातुनी । अडचणी दूर होतील ॥१०६॥ हा करावा खटाटोप । गोमाजींचा न व्हावा कोप । कार्य नव्हे अगदी सोपं । साधुबाप बुद्धिदाता ॥१०७॥ नाथांची ऐकली महती । थोर आहे ही विभूती । जाउᆬ भेटू त्यांच्याप्रती । ते सांगतील तसे ऐकू ॥१०८॥ मग ते आले हातरूणा । सद्गुरूंच्या दर्शना । आनंद झाला द्विगुणा । शांती मना वाटतसे ॥१०९॥ काय बोलले पाटील । समस्या एक जटील । आपणास जे वाटेल । तेच पटेल मजलागी ॥११०॥ गोमाजींचे भुयार प्रत्यक्ष । त्यासी पाडावे गवाक्ष । सुंदर दिसेल कक्ष । ही साक्ष मम मनी ॥१११॥ बोलले आमुचे नाथ । जनताची जगन्नाथ । त्यांची सेवा परमार्थ । आवडे समर्थ गोमाजींसी ॥११२॥ जो करी संतसेवा । आवडे देवाधिदेवा । तेथे सद्गुण ठेवा । चाखे मेवा भक्तीचा ॥११३॥ गणेश कुळ भाविक । गजाननाचे सेवक । आचार, विचार, विवेक । जपणूक सत्याची ॥११४॥ हे संस्थान नागझरीचे । महत्त्व येथील झिर्‍याचे । गोमुखातील झर्‍याचे । वारकर्‍यांचे श्रद्धास्थान ॥११५॥ बाबा एकदा जाऊन आले । थोर संताचे दर्शन झाले । ज्ञानयज्ञ जेथे चाले । भाष्य ऐकिले वक्त्याचे ॥११६॥ सद्गुरुनाथांची सहमती । कार्यास दिली गती । बदल झाला ऐशारीती । आज पाहती जनलोक ॥११७॥ विदर्भातील पंढरी । शेगाव पुण्यनगरी । बसला भक्तांचा कैवारी । पहा मंदिरी गजानन ॥११८॥ विदर्भात मोठे संस्थान । कार्यही चाले महान । सद्भक्तांचे श्रद्धास्थान । दूरदुरून लोक येती ॥११९॥ या संस्थेचा कारभार । आला परंपरेनुसार । पाटील शिवशंकर । सारा व्यवहार पाहती ॥१२०॥ एकदा आले यांच्या मना । जाऊ चला हातरूणा । घेऊ नाथांच्या दर्शना । पाहू जाणा या संतासी ॥१२१॥ संत सारे एकरूप । सत्‌चितआनंदस्वरूप । सत्य जाणती यथानुरूप । सुखरूप नांदती हे ॥१२२॥ सद्गुरूंची होता भेटी । आनंद न समाये पोटी । चरणांवरी पडता मिठी । लाभची शेवटी पदरात ॥१२३॥ त्यांना मग दृष्टांत झाला । परत भेटीचा योग आला । भाग्य न लाभे असे कुणाला । संतसंगाला पुण्य हवे ॥१२४॥ स्वामी गजानन योगेश्र्वर । नाथ जालंदरांचे अवतार । नाथनंगे गुरुवर । डव्हा साचार सांगती ॥१२५॥ मुक्ताईंचा संदेश । लिंगनाथा कार्यादेश । परंपरेने उपदेश । ओमप्रकाश कार्य करी ॥१२६॥ हे नाथ ओमप्रकाश । गजाननांचे परमदास । जैसे स्वामींचे निर्देश । जनकार्यास तत्पर ते ॥१२७॥ दुसरे-तिसरे नसती कुणी । हे संसारीचे ऋषिमुनी । पाटील शिवशंकर म्हणोनी । सामान्यजनी वर्तती ॥१२८॥ पुढे गेलो संग्रामपूर । मारोतीचे एक मंदिर । दासबोध चाले निरंतर । शिष्यपरिवार नाथांचा ॥१२९॥ गुणवंतराव देशमुख । वानखडे चोपडे प्रमुख । अध्यात्माची सदा भूक । महत्त्व देख योगाचे ॥१३०॥ उकडगाव मनार्डी असे । विनायकराव पाटील भिसे । रामनामाचे लागले पिसे । हे भाग्य नसे सर्वांठायी ॥१३१॥ गुरू मानिती महादेवनाथा । प्रपंचासी हाणल्या लाथा । देह लाविला परमार्था । यशोगाथा जीवनाची ॥१३२॥ श्रीधरराव देशमुख । निंब्याचे मालक प्रमुख । परी प्रसिद्धीच्या विन्मुख । गाव सुरेख केले ज्यांनी ॥१३३॥ घरी श्रीमंती असे भारी । मान सरकारदरबारी । गावात योजना सारी । उदास विचारी धन वेची ॥१३४॥ येथे येत रविवारी । तांदूळ वर्ज्य आहारी । प्रसाद म्हणून हात न वारी । जेवी बरोबरी नाथांच्या ॥१३५॥ घेउᆬन पानाचा विडा । दूर पळाली इडापीडा । अनुभव आला निधडा । गेला न तडा विश्र्वासा ॥१३६॥ खंडाळ्याचे रूपचंदलाला । ईश्र्वर मानती बाबांला । येती बाबांच्या दर्शनाला । दिवसा रात्रीला कधीही ॥१३७॥ साथीस डिवरे मोतीराम । रात्रीचा इथेच मुक्काम । नित्य चाले विठ्ठलनाम । हाच आराम संताचा ॥१३८॥ शिक्षक अवचार रामभाउᆬ । बाबांसोबत लागले राहू । प्रेमाचे नाते टिकाउᆬ । नव्हते दिखाउᆬ लटके ॥१३९॥ एक नामदेव सोनोने । दर्शनास येती नेमाने । नाथांस चहा, विडा देणे । नीतीने वागणे सदाही ॥१४०॥ पूर्वी वैभव होते आत । जुने संस्थान मारुती । दान केली काही शेती । नाव न घेती त्या कुळाचे ॥१४१॥ रामभाउᆬ ढोले यांनी । नित्य यावे या ठिकाणी । हा वारसा मुले अजुनी । ठेविती जपुनी पुत्र त्यांचे ॥१४२॥ महान भक्त जाणाबाई । फनकटेची ही आई । मंदिरावर रोज येई । गाणे गाई विठूपुढे ॥१४३॥ कुणी देवावर पूजा वाही । हार, फुले, अक्षता काही । चाले नित्य असे सदाही । काढे जाणाबाई निर्माल्य ॥१४४॥ माक्यामते ही श्रेष्ठ पूजा । स्वच्छ करी गरुडध्वजा । भाव नाही मनी दुजा । केरपुंजा दूर सारी ॥१४५॥ अंत्रीचे मधुकर डांगे । मंदिरी राहती बाबांसंगे । कष्ट करिती निजांगे । कधी प्रसंगे स्वयंपाक ॥१४६॥ तीर्थ केले मुक्ताबाई । कधी आळंदीला जाई । कधीकाळी पायी पायी । एकेठायी बैसती ना ॥१४७॥ असे गेले काही दिवस । नित्य प्रभूचा मनी ध्यास । लाभला नाथांचा सहवास । उदयास भाग्य आले ॥१४८॥ नित्य करावी पूजाअर्चा । अध्यात्मावर काही चर्चा । विसरले गोष्टी घरच्या । भगवंताच्या पायी लीन ॥१४९॥ मनब्दा उठले गाव । मंदिर राहिले एकमेव । लिंग स्थापिले सदाशिव । या महादेवनाथांनी ॥१५०॥ तेथील पाहून गरज । नाथ बोलती सहज । इथे रहा महाराज । डांगे आज त्याठायी ॥१५१॥ बोडखे पाटील विश्र्वनाथ । बाबांची धरली साथ । पूज्य त्यांना महादेवनाथ । नेहमी येथ यायचे ॥१५२॥ भाविकांनी केले श्रम । बांधला एक आश्रम । नाथांचे त्यासी दिले नाम । प्रार्थना नाम चाले तेथे ॥१५३॥ किशोर पाटील थार । बांधले छोटेसे मंदिर । नाथकृपा त्यांच्यावर । करती प्रचार नामाचा ॥१५४॥ वासुदेव, सारंगधर । संताची कृपा यांचेवर । पिवंदळचे राहणार । वतनदार पाटील हे ॥१५५॥ साधुसाध्वी आले पोटी । बाबांची घेऊन भेटी । परमार्थाची आवड मोठी । कन्या शेवटी इथे ठेवी ॥१५६॥ बाईचे नाव वंदना । तिसी वेगळा छंद ना । नियमित ध्यानप्रार्थना । करी साधना भक्तीची ॥१५७॥ कृष्णा इंगळे भक्तवर । वास्तव्य तळेगावबाजार । निष्ठा बाबांच्या पायावर । मोह दूर केला ज्यांनी ॥१५८॥ पारळ्याचे चौरंगीबुवा । बहु साधुंची केली सेवा । भाग्ये लाभला ज्ञान ठेवा । मिळे विसावा आत्म्यासी ॥१५९॥ संत सखारामांचे । निष्ठावान भक्त साचे । पुंजाजी वाघ नावाचे । वारकर्‍यांचे भूषण हे ॥१६०॥ गाथा, ज्ञानेश्र्वरी पारायण । वाचे वदे नारायण । विठ्ठलाचे जोडे चरण । अखंड स्मरण विसंबेना ॥१६१॥ हाती तुळशीची माळ । बुका, चंदन शोभे भाळ । हरिनाम सांज सकाळ । सदा सर्वकाळ हेच करी ॥१६२॥ येत जेव्हा नाथांभेटी । ग्रंथ भागवत कासोटी । भक्तिविन नाही गोष्टी । सुख संतुष्टी दोघेही ॥१६३॥ दोघात चाले ज्ञान चर्चा । विठोबाची पूजा अर्चा । नाही गोठी कधी घरच्या । रमती प्रभूच्या चिंतनी ॥१६४॥ हा अध्याय एकोणिसावा । भागल्यासी मिळे विसावा । मी ही घेत थोडा विसावा । मनी नसावा भेद काही ॥१६५॥ घडो समाजाचे उत्थान । लोककल्याण मार्गदर्शन । महादेवदास आत्मनिवेदन । करी कथन गुरुकृपे ॥१६६॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र एकोणिसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्‌गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment