आरत्या

श्री यादवनाथ महाराजांची आरती

( या आरतीची रचना श्री ज्ञानदेव सुखदेव सरोदे यांची आहे़ श्री सरोदे हे आपल्या नित्याचा व्यवहार सांभाळून शांतिमंदिराच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करीत आहेत़ काव्य साहित्याचा विशेष अभ्यास नसतांनाही सदर्हू रचनेत फुलवलेला भाव-फुलोर व आकर्षक शब्द मांडणी मनोवेधक झालेली आहे़ )

धन्य आहे तव गुण गाथा । श्री यादवनाथा ।
आरती ओवाळितो । पदी ठेवुनी माथा ॥धृ॥

हातरूणगावी अवतरुनी त्वा । तिर्थक्षेत्र केले ।
संतपणाचे भूषण अंगी सहजपणे फुलले ॥१॥

अतर्क्य आहे तुझी भक्ती । कळे न आम्हासी ।
सर्व देव हे मिळुनी येती । अपुल्या सहवासी ॥२॥

समर्थाचिये दर्शन घेण्या । भक्त बहु येती ।
देशी त्यांना अखंडीत तू । शक्ति, भक्ति, स्फूर्र्ति ॥३॥

संताचे संतपण हे । निमाल्यावरी कळते ।
खरे भक्त जे असती त्यांचे । कार्य करीती नेटे ॥४॥

ज्ञान भक्तीचे दान देईजे ।दास ज्ञानदेवा ।
समाधी स्थानी पुष्पांजली ही । आर्पतसे भावा ॥५॥

श्री यादवनाथ महाराजांची आरती

( या आरतीचे रचनाकार श्री़ महादेवराव जाणूजी सोनोने़ हे पूज्य बाबांचे अनन्यभक्त म्हणून सुपरिचित आहेत़ शालेय शिक्षणाच्या अपुर्‍या शिदोरीतुनही, गुरुभक्तीच्या बळावर त्यांनी विविध प्रकारचे काव्य-मिष्टान्न निर्माण केलेले आहे़ त्यातलाच हा एक नमुना त्यांची वाणी प्रासादिक, मधुर आणि अध्यात्मिक अर्थाने युक्त अशी आहे़ )

जयदेव जयदेव जय यादवनाथा । जय श्री यादवनाथा ॥ मोद होई चित्ती तव गुण गाता ॥धृ॥

श्रीमंताच्या कुळी जन्मुनी भोगी ऐश्वर्या । वैभव सारे विलया जाता तिच दिनचर्या ।
खेद नाही खंत नाही तुम्ही गुरुवर्या । उन्मनीचे सुख भोगुनी आधष्ठान तुर्या ॥१॥

निपुत्रिकावर कृपा करोनी दिधले त्या पुत्र । वंशवेल हा वृद्धि पावला वाढे कुळ गोत्र ।
उदारतेचे भूषण अंगी शील हे पवित्र । हातरूणगावी अवतरुनिया केले तीर्थक्षेत्र ॥२॥

रात्री झोपता जवळ होती गाई सर्व गोळा । भोजनसमयी ताटाभवती श्वानांचा मेळा ।
सर्वांठायी समता कितीतरी स्नेहाळा ॥ दृश्य पाहूनी निववे दृष्टी अनुपम सोहळा ॥३॥

भाग्यहीनासी भाग्य देऊनी धनवान केले । दीनदलितांसी जवळ घेउᆬनि केलेस अपुले ।
महारोग्यांची सेवा करता मन नाही विटले । जनी जनार्दन भाव ठेवूनी सर्वां तोषविले ॥४॥

भाविकांसी उद्धारिले दावुनिया भक्ती । बद्ध , मुमुक्षू , साधक सिद्धा होय इष्टप्राप्ती ।
मंगल गुण गाता तुमचे सर्व कार्यपूर्ति । महादेवदासा अनुभव हाची होत काव्यस्फूर्ति ॥५॥

परमपूज्य महादेवनाथ महाराजांची आरती

आरती करू समर्थाची, दयाघन सद्गुरू नाथाची ॥धृ॥

निर्मलगोत्रा, परमपवित्रा, यादव नि गंगा ।
अवतरलासी कुशी तयांच्या नाथ पांडुरंगा ॥
दीनालागी देह झिजविला, तमा न स्वार्थाची ॥
दयाघन सद्गुरू नाथाची ॥१॥

वात्सल्याची वत्सलमूर्ति माय ही वत्सला ।
देव-गुरूंच्या साक्षीत्वाने पर्णीयली चित्कला ॥
ईश्र्वरमानून केली सेवा किती अनाथांची ॥
दयाघन सद्गुरू नाथाची ॥२॥

नामदेवे नाम देऊनी भेटवी श्रीरामा ।
स्वये स्थापिली शांतीमंदिरी विठ्ठल अन्‌ रखुमा ॥
भ्रमरानंदे केली निर्मिती अभंगगाथांची ॥
दयाघन सद्गुरू नाथाची ॥३॥

जाण ठेवूनी घेशी देवा राधेच्या वेषा ।
अगम्य लीला तुम्हा शोभते भाग्यवंत पुरूषा ॥
पदस्पर्शाने पावन भूमी, महती तीर्थाची ।
दयाघन सद्गुरू नाथाची ॥४॥

हातरूणच्या नंदादीपा, नाथ महादेवा ।
भाविकांना भक्ती, मुक्ती द्या ज्ञानाचा ठेवा ॥
आस लागली दास महादेवा परमार्थाची ॥
दयाघन सद्गुरू नाथाची ॥५॥

रचना : श्री महादेवदास सोनोने़
गायिका : उत्तरा केळकऱ


ओम श्री महादेवनाथा, स्वामी सद्‌गुरूनाथा ।
शरणागत भवतारक योगांबर सविता ॥धृ॥

हीन दिन उद्धारक चरण तुझे देवा ।
स्वामी चरण तुझे देवा ।
अंतरपट मलक्षालक भाव मनी यावा ॥१॥

तू करुणागर मंगल चिन्मय दीपकळा ।
स्वामी चिन्मय दीपकळा ॥
सुधाधार रसदाता संजीवन सकळा ॥२॥

पंचरत्न मेळातून नटला आत्ममणी ।
स्वामी नटला आत्ममणी ॥
परब्रह्म तनुधारी तू अंतर्यामी ॥३॥ ओम

कृपासिंधू, दुखहंता, संता, भगवंता ।
स्वामी संता, भगवंता ॥
निजानंद मनधामी अभयदान वरदा ॥४॥


रचना : स्व़ वसंत मालपे़
गायक : सुरेश वाडकऱ


श्री महादेवनाथ महाराजांची आरती

आरती नाथदेवा । केली अपूर्व सेवा ।
ब्रह्मानंदी डोलविले । पूर्ण करी भक्तभावा ॥धृ॥

महादेव नाम साजे । किर्ती त्रिभुवनी साजे ।
शांतिमंदिर उभारिले । शुद्ध भक्तीचा ठेवा ॥१॥

हातरूण पावनभूमी । थोर तुक्यानावे झाली ।
भक्तीची ज्ञानगंगा । वाहतसे या गावा ॥२॥

भेदाभेदा नच थारा । निर्मळ विचारधारा ।
आचरुनी दावियली । पे्रमे केली जनसेवा ॥३॥

आदर्श मानवतेचा । अंधश्रद्धा दूर सारी ।
पे्रम, शांती, ज्ञान देई । तारी अज्ञान जीवा ॥४॥

ज्ञानदेवा ज्ञान देशी । सहवासी धन्य झालो ।
पूर्ण करी मनोरथ । घडो तुझी चरणसेवा ॥५॥

रचना : श्री ज्ञानदेव सरोदे़

श्रीराम महाराजांची आरती


आरती ओवाळीतो तुम्हा बाबा श्रीरामा ।
अज्ञ जीवांना उद्धरसी तू पूर्ण मेघशामा ॥धृ॥

वरुडा येथे प्रगटोनी तुम्ही वंशा भुषविले ।
कुलवंशाचा त्याग करोनी प्रभुला तोषविले ॥१॥

वरद मिळाला संतकृपेचा ताराया जगता ।
सखारामाने दिधला ठेवा भाग्य तुझे संता ॥२॥

मुक्ताईने मुक्त केले प्रगटोनि अव्यक्ता ।
विराट शक्ति मुक्ताबाई शोभे तव माता ॥३॥

वैराग्याचे तेज तळपले तव चरणावरती ।
तव रजःकणे पावन ही झाली सर्व क्षिती ॥४॥

तुम्हीच अमुचे त्राता धाता अवघा भव हरता ।
भ्रमरनाथ हा ठेवी माथा तव चरणावरता ॥५॥

रचना : भ्रमरनाथ पू़ महादेवनाथ महाराज़

श्री नामदेव महाराज भाजीपाले यांची आरती

करु आरती सद्भावाने संत नामदेवा ।
ज्ञानभक्तिचे दान देऊनी केली जनसेवा ॥धृ॥

मौजे बाबा आनंदीनाथ हे तापी तीरवासी ।
अनुग्रह त्यांनी देऊनी तुम्हा केले सहवासी ॥
आज्ञा त्यांची प्रमाण मानुनी लागले कार्यासी ।
हातरूणगावी प्रथम दीक्षा महादेवनाथासी ॥१॥

नेति धौति आसनमुद्रा देती मुमुक्षूला ।
बीज मंत्र सोहं देऊनी मार्ग दाखविला ।
आत्मदर्शन अनेक भक्ता घडविले तुम्ही ।
प्रपंच भाना विसरुनि त्यांची नष्ट झाली उर्मी ॥२॥

शांतिमंदिरी महादेवनाथ करिती अनुष्ठान ।
असंख्य भक्त येती त्यांचे करिती समाधान ॥
आदितवारी करिती वारी आणि प्रवचन ।
ज्ञानलाभ हा होतो लोका ऐसे महिमान ॥३॥

बंधू तुमचा बळीराम हा विनवितो लोका ।
भक्तिभावे भजन करा हो कधी विसरू नका ॥
भवसागर तरून जाण्या आधार भक्तीचा ।
भक्तीवाचून उद्धार नाही जगी या कोणाचा ॥४॥

रचना : स्व़ बळीरामजी भाजीपाले़

पुष्पांजली

पुष्पांजली ही तुम्हा आर्पली श्री सद्गुरू सदया ।
तव गुण चिंतन करण्या द्यावी वाणी या हृदया ॥

भाव-भक्तीची फुले, बेल अन्‌ तुळशी श्रद्धेची ।
अज्ञानाच्या समर्पणाची संपत्ती माझी ॥

तव चरणांशी केली अर्पण गुरुवर परमेशा ।
स्वीकार अथवा नकार नेणून हृदयाची भाषा ॥

दीनदयाळा भक्तवत्सला मंगल शिवनाथा ।
पदकमलांचा तुक्या जडू दे सुवास या माथा ॥

शरणागत-तारका परेशा, ब्रीद तुझे स्मरुनी ।
सुमनांजली ही अल्प वाहतो आज तुम्हां चरणी ॥

हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

No comments:

Post a Comment