
श्री गणेशाय नमः॥ नमो नमो ज्ञानेश्वरा । पांडुरंगा रुक्मिणीवरा । योगयोगेश्र्वरा । पार्वतीवरा श्री शंभो ॥१॥ शिव हाच आदिनाथ । येथून निघाला नाथपंथ । पुढे होऊनी नवनाथ । अवतार होत विष्णूचे ॥२॥ शिवापासून मच्छिंद्रनाथ । त्यापासून गोरक्ष विख्यात । पुढे शिष्यशाखा असंख्यात । झाल्या बहुत पंथामाजी ॥३॥ काही काळ लोटल्यावरी । ह्या पंथात झाले घरभारी । त्यांचा भर योग साधनेवरी । असुनी संसारी नाथ योगी ॥४॥ इथे कुणी घेतील शंका । गृहस्था योगाचरणी धोका । नाथबाबा निवारती शंका । वदती ऐका काय ते ॥५॥ योगियांची परंपरा । आली या नाथांच्या घरा । मी ही भाग्यवान खरा । योगीवरा भजतसे ॥६॥ बाबा योग आचरती । आसन प्राणायाम पद्धती । अष्टांगयोगाची रीती । पंचमुद्रा करती सहज ॥७॥ एक माजी शिक्षक । ज्ञानदेव गोंड भाविक । क्रिया आचरती यौगिक । किती एक दिवस जाती ॥८॥ हे गृहस्थ संसारी । बाईंच्या मनात शंका न्यारी । नाथमाउली कैसे निवारी । बोलता उरी उरेना ॥९॥ घरसंसार मला आहे । मी ही प्रपंच केला पाहे । तू मनात निश्चिंत राहे । सर्वांसाठी ही पर्वणी ॥१०॥ अर्जुन नव्हता संन्यासी । किती राण्या होत्या त्यासी । कृष्णे लाविला अभ्यासी । काय त्यासी कळेना ॥११॥ कोणी संन्यासी वा संसारी । असो पुरुष अथवा नारी । आबालवृद्ध, ब्रह्मचारी । योगाधिकारी गुरुबोधे ॥१२॥ योगाने वाढे बल, बुद्धी । आयुष्य, तेज, आत्मशुद्धी । योगे मिळती रिद्धी-सिद्धी । हरती व्याधी योगाने ॥१३॥ योगाने कळे शुद्धबोध । होय चित्ताचा निरोध । विलया जाती कामक्रोध । लागतो शोध शाश्वताचा ॥१४॥ प्राणायाम म्हणजे काय । नाडीशुद्धतेचा उपाय । श्वास कोंडल्या जाय । शिरत जाय देहांतरी ॥१५॥ प्रथम करावे पद्मासन । पाठ ताठ असावी पूर्ण । अंगठ्याने नाक दाबून । डावीकडून श्वास घ्यावा ॥१६॥ पुरक म्हणती यास । अवरोध करावा त्यास । कुंभक झाला खास । करणे रेचकास उजवीतुनी ॥१७॥ आता उजवीने पुरक केला । अंगठा डाव्या नाकपुडीला । पूर्वीप्रमाणे कुंभक झाला । रेचक केला डावीने ॥१८॥ प्राणायाम झाला एक । दुसरा करणे आवश्यक । जास्त करणे बहुतेक । संख्या माफक असावी ॥१९॥ एक सेकंद पुरक केला । चार पाहिजे कुंभकाला । दोन मर्यादा रेचकाला । प्रमाण त्याला हे असे ॥२०॥ वाचून क्रिया नका करू । साधनेस पाहिजे गुरू । त्यांनी करता अंगीकारू । करावी सुरू साधना ॥२१॥ सद्गुरूचे करिता ध्यान । प्राप्त होय आत्मज्ञान । तत्स्वरूपी होता लीन । हे लक्षण समाधीचे ॥२२॥ गुरू माक्या सदा संगे । चुकल्या लगेच सांगे । करून घेई स्वये अंगे । निजांगे झटतसे ॥२३॥ एक मारोती खारोळे । दोन्ही डोळ्यांनी आंधळे । बाबांपासी एकवेळे । आले कपडे न अंगासी ॥२४॥ म्हणे मला न आसरा । नाही आप्त कोणी दुसरा । विना एका परमेश्वरा । घ्यावे पदरा महाराजा ॥२५॥ हा अनाथांचा नाथ । दुबळ्यास करी साथ । कपडे बोलाविले येथ । राही मंदिरात सदाची ॥२६॥ मंदिर उभारल्यावरी । तेथे झाडझूड करी । बाबांसोबत जेवण करी । तेथेच अखेरी सामावला ॥२७॥ मंदिराचे बांधकाम । बाबुराव, मी करी श्रम । रात्री त्यांचा मुक्काम । करती आराम तेथेची ॥२८॥ आणखी दोन निष्ठावंत । जे बाबांचे परमभक्त । रात्री मंदिरी राहत । त्यांचे सोबत जगदीश ॥२९॥ एक पांडुरंग फनकटे। ज्ञानदेव नाथपुत्र वाटे । कमी आधक कोण झटे । ठरविणे मोठे कठीण ॥३०॥ ज्ञानदेव, पांडुरंग । यांना गाण्याचे अंग । गाती भजनी अभंग । टाळ, पेटी, मृदंग मंदिरी ॥३१॥ देवालयाचे चालू काम । हे रात्री करती मुक्काम । काही साधनेचा क्रम । हा असे नेम तिघांचा ॥३२॥ सर्वप्रथम आदले । झाले जरी दादले । नियमाने वागले । पायाचे दगड दबले पायात ॥३३॥ येथे पाथरकार समाज । चोर्या करती पूर्वज । जुनाच होता रिवाज । निंद्य आज वाटतसे ॥३४॥नवे रक्त, नवी पिढी । पटेनासी झाली रूढी । बाबांवर श्रद्धा गाढी । गोष्ट काढी एक भक्त ॥३५॥ मोठा आमचा समाज । करत आले जे काज । त्यावर मी नाराज । वाटते लाज मजलागी ॥३६॥ पांडुरंग जाधव । असे होते त्याचे नाव । नाथांवर प्रेमभाव । व्हावा बदलाव यामधे ॥३७॥ तयाचा पुत्र प्रल्हाद भक्त । बाबांचे गुण गात । काही कवणे करीत । स्वतः गात मुखाने ॥३८॥ बाबांची घेतली दीक्षा । ही आहे आग्नपरीक्षा । परिवर्तनाची अपेक्षा । होवो न उपेक्षा समाजाची ॥३९॥ नारायण गायकवाड । थोडी शेती, ना कुणाची चाड । बोधाचे गवसे घबाड । उघडे कवाड भाग्याचे ॥४०॥ मग यांचेकडे लावली पोथी । कुणी वाचती, काही ऐकती । समाज बांधव एक होती । सुविचार येती मनात ॥४१॥ अधून मधून बाबा जाती । सांगती वागण्याची रीती । अवलंबिल्या नीती । परिस्थिती पालटतसे ॥४२॥ सारा समाज एक झाला । निंद्य कर्माचा त्याग केला । शिकविले मुलीमुला । प्रत्येक घराला नोकरी ॥४३॥ सारे सन्मार्गा लागले । न्यायनीतीने वागले । इमानासी खरे जागले । त्यांचे हात लागले मंदिरा ॥४४॥ मोलाविना केले काम । पाया भरला भक्कम । अत्यंत केले परिश्रम । श्रद्धा कायम बाबांवरी ॥४५॥ मी मौन करी सोमवारी । उपवासी दिवसभरी । वत्सला माय फराळ करी । देत मंदिरी पाठवून ॥४६॥ एकांती ग्रंथपठन । थोडे केलेसे लिखाण । पोथी, स्तोत्र, अभंग जाण । बाबांमुखे श्रवण केले काही ॥४७॥ डॉ़ कविरत्न कृष्णमूर्ती । बाबांची ऐकिली कीर्ती । बाजीराव पाटील सोबती । सहज येती हातरूणा ॥४८॥ दिवस किती रमले । आनंदे राहू लागले । बाबांसोबत जाऊ लागले । असे फिरले काही गावे ॥४९॥ एकदा गेलो अमरावती । काही होते अमुच्यासांगाती । जेथे चिमसाहेब वसती । कॉलनी होती सर्वोदय ॥५०॥ तेथून आलो दर्यापुरी । सर गावंडेच्या घरी । पुन्हा तेल्हारा नगरी । होते बरोबरी हे दोघे ॥५१॥ गोविंद भदे लोतवाडा । बांधला यांनी भव्य वाडा । बाजूस भिंतींचा गराडा । परिसर थोडा मोकळा ॥५२॥ वाटे करावी वास्तुशांती । प्रवचन करावे राती । आणू सद्गुरू नाथमूर्ती । कृष्णमूर्ती, बाजीराव ॥५३॥ पळसोदचा भजनी मेळा । आणू त्यांना याच वेळा । सारे करून गोळा । सुखाचा सोहळा उपभोगू ॥५४॥ प्रथम झाले जेवण । रात्री भजन, प्रवचन । सहकार्य करिती सारेजण । गाव पूर्ण आनंदी ॥५५॥ पळसोदला होय फेरी । रामनाथबुवांच्या घरी । बसणे झोपणे माडीवरी । टवरे करी व्यवस्था ॥५६॥ कारंजा रमजानपूर । येथून थोडे अंतर । मार्तंडाची मूर्ती मनोहर । आणिली दूरवर जाऊनी ॥५७॥ तेथील माजी शिक्षक । जगदेव कोगदे एक । मल्हारी देवपूजक । होते भाविक श्रद्धाळू ॥५८॥ मूर्तीची करावी स्थापना । आले असे त्यांच्या मना । मग आले हातरूणा । करिती प्रार्थना नाथांसी ॥५९॥ बाबांनी होकार दिला । सोमवार होता भला । मंदिरी ठेविले खंडोबाला । आभषेक केला नाथांनी ॥६०॥ माक्या हाते पूजा करविती । काही भक्त गाणे गाती । नंतर उठल्या पंगती । सोमवाराची समाप्ती झाली माक्या ॥६१॥ कारंज्यात झाले भक्त । वर्मा, तायडे, वसू, राऊत । कोगदे, नागे, तितरे त्यात। मेहस्त्रे, भामोद्रे येत मंदिरी ॥६२॥ कितीतरी गावातुनी । भक्त येती दूरदुरुनी । ती प्रथा चाले अजुनी । रामध्वनी निनादत ॥६३॥ रविवारी प्रवचन । श्रोते, वक्ते येती दुरून । वक्त्याचे बोधवचन । लक्ष देऊन ऐकती ॥६४॥ अंत्री, उरळ, खंडाळा । शिंगोली, अंदुरा, सोनाळा । मोरझाडी, मांजरी, मंडाळा । लोणाग्रा, मालवाडा, कंचनपूर ॥६५॥ ही गावे जवळ शेजारी । अवघे येती बाजारी । त्यानिमित्त मंगळवारी । येत दरबारी नाथांच्या ॥६६॥दर्शनाने मिळे शांती । फिटते देहाची भ्रांती । जीवनात घडे उत्क्रांती । हे जाणती ज्ञानीलोक ॥६७॥ भक्त येत बाबांकडे । बाबाही जात त्यांच्याकडे । दोघांचा सहवास घडे । दोहीकडे आनंद ॥६८॥ छकडाजोडी माक्याघरी । मीच बसे धुरीवरी । खेड्यामधे जाऊन फेरी । बैसे मंदिरी येऊनी ॥६९॥ उगव्याचे बुवा रामेश्वर । मंदिर बांधले सुंदर । दर्शनास येती वारंवार । सोबत साकरकार दादा ॥७०॥ बाबांना उगव्यास नेती । संताची घडे संगती । आनंदाचे दिवस जाती । नाथांची महती किती वाणू ॥७१॥ कात्रेगुरुजी महादेव । व्याळा हे मूळचे गाव । दर्शनाची नित्य हाव । अखंड भाव बाबांवरी ॥७२॥ एकदा बाबांचे मना आले । व्याळ्यास जाऊ भले । बैल आहेत का बांधले । मी जुंपले छकड्यासी ॥७३॥ त्यांना ही आनंद झाला । भाव पूर्ण फळासी आला । पूजा आणि नैवेद्य केला । समर्पिला बाबांसी ॥७४॥ मानापमाना देऊन फाटा । जना दाविती भक्तिवाटा । पायी चालती अवघड वाटा । भक्तांच्या भेटा घ्यावया ॥७५॥ मंदिर आकारा आले । अनेकांचे हात लागले । मुस्लिम, बौद्ध घेती घमेले । मानिती आपुले सर्वही ॥७६॥ गावातील एक धनिक शेठ । शेती व्यवसाय श्रेष्ठ । शेती असे भरमसाठ । आणले साठ रुपये ॥७७॥ म्हणे महाराज स्वीकारा । मंदिरासाठी खर्च करा । कळू नये माक्याघरा । निघाले त्वरा घरीजाण्या ॥७८॥ नाथ म्हणती मज नको । दानास बोलती बाप, बायको । असे शब्द मी ना ऐको । असाल धनको तरीही ॥७९॥ कोठून येतो पैसा । खर्च ही होतो कैसा । फक्त त्याचा भरवसा । मी सहसा लक्ष नेदी ॥८०॥ कोणी करिती धनदान । कोणाचे आहे श्रमदान । मी तर पाहतसे दुरून । कळते निदान कर्त्याचे ॥८१॥ मी जरी नाही त्यागी । परी न याचा भोगी । निमित्त केले मजलागी । बसतो जागी एकाची ॥८२॥ बांधकामा लागे पाणी । आणण्या ते नदीवरुनी । मनोहर सागळेनी । जोडी आणुनी बांधली ॥८३॥ गाडी होती एक खटारा । तिचा तुटलेला धुरा । दोरी ताणून बांधला पुरा । चालती येरझारा कोठीच्या ॥८४॥ पूर्ण बांधणी होईपर्यंत । गाडी चालली आवरत । नंतर पुरली मुदत । जसा रथ अर्जुनाचा ॥८५॥ हे मंदिर होण्याआधी । जुनी मढी होती साधी । बन्नुबुवाची समाधी । नाथ जात कधी तेथे ॥८६॥ निंबाजी पाटील रोकडे । वर्तन वेडेवाकडे । जरा, मृत्यू कोणा न सोडे । भोगणे घडे सर्वांसी ॥८७॥ स्वये करती कथन । होतो मी तगडा जवान । अंगी ताठा आभमान । कर्म हीन करीत असे ॥८८॥ सांगता जुन्या गोष्टी । दुःखित होई आत कष्टी । पश्र्चात्ताप होतो पोटी । भोगतो शेवटी आज हे ॥८९॥ करू नये ते कर्म करी । होतो गड्या मी व्यवहारी । जुगारात पैसे हारी । हारल्यावरी तया नेदी ॥९०॥ जिंकलेले घेऊन जाई । हारल्यावर दांडगाई । नागवले किती पाही । राम नाही मनात ॥९१॥ गायी, बैल किती विकले । जुगारात जबरीने जिंकले । डोक्यावरचे केस पिकले । जीवन एकले जगतो मी ॥९२॥ न्याय आहे त्याच्यापाशी । शिक्षा बक्षीस देतो त्यासी । बरे वाईट वागणारासी । कळे मजसी आता हे ॥९३॥ म्हणून बापा सावध असा । सात्त्विकतेचा घ्या वसा । त्यावर ठेवा भरवसा । जशास तसा आहे तो ॥९४॥ गलितगात्र झाल्यावरी । कराल मग हरी हरी । पश्चात्ताप होय जरी । काय तोवरी स्वस्थ बससी ॥९५॥ नाथ किती होते सावध । यावरुन घ्यावा बोध । आत्मसुखाचा घ्याया शोध । चित्तनिरोध केला ज्यांनी ॥९६॥ मढीपुढे थोडे दूर । एक शिवाचे मंदिर । मोर्णा नदीकाठावर । देखावा सुंदर दिसतसे ॥९७॥ एकदा गावच्या लोकांनी । जमा केली काही वर्गणी । भंडारा केला त्या स्थानी । घाई मनातुनी सर्वांच्या ॥९८॥ तिकडे उठती पंगती । जाणारे-येणारे किती । मढीत रोकडे ओरडती । पाणी न देती कोणी तया ॥९९॥ शब्द ऐकला नाथांनी । लगेच गेले त्या स्थानी । आणून पाजले पाणी । भंडार्यातुनी आणी अन्न ॥१००॥ तो म्हणे गड्या महादेवा । तुझा जयजयकार व्हावा । शांत केले माक्या जीवा । प्रसाद देवा घेतो मी ॥१०१॥ दुसर्याच दिवशी । निंबाजी झाले स्वर्गवासी । गावकरी पुरती त्यासी । होता उपासी कोणी न पाहे ॥१०२॥ प्रज्ञा आणि करुणा । ज्याचे ठायी असती जाणा । तोच ज्ञानी खरा शहाणा । बाकी बहाणा सोंगाचा ॥१०३॥ जागेश्र्वरमंदिरात । नाथ दर्शनासी जात । काही अभंग लिहित । भ्रमर घेत म्हणवूनी ॥१०४॥ स्वतःची नाही छाप । अभंग लिहिले खूप । वाचनीय आनंदरूप । स्वानंद स्वरूप प्राप्त होय ॥१०५॥ अभंग किती लिहिले पाही । त्यावर स्वतःचे नाव नाही । प्रसिद्ध न केले काही । आलप्त राही दूर सदा ॥१०६॥ मालपेसर महान भक्त । मराठी विद्याविभूषित । कळले अभंगाचे गुपित । झाले आकर्षित त्यांकडे ॥१०७॥ नाथअभंगांचे मुक्तचिंतन । नंदादीपात स्नेह ओतून । प्रकाश साधकांलागून । गेले देऊन आज ते ॥१०८॥ यातील काही भाग । कथिला असे यथासांग । ज्ञानाचा असे हा याग । अनुराग वैराग्याचा ॥१०९॥ प्रथम गुरूचे स्मरण । आठवून ते चरण । मी जे केले ग्रहण । यथामती वर्णन केले मी ॥११०॥ भ्रमरानंद अभंगार्थ । कळावा यातील गुह्यार्थ । भाव जरी कळे यथार्थ । जीवन सार्थ होय त्याचे ॥१११॥ ज्यासी म्हणती अभंग । हे काव्य प्रकाराचे अंग । तीन षडाक्षरी चरण भाग । अर्धचरण मग चाराचे ॥११२॥ चवथ्यात अक्षरे चार । कडव्यात बावीस अक्षर । रागरागिणीचे स्वर । गाती मधुर गायक ॥११३॥ ज्याची असे गोड वाणी । आळविती रागरागिणी । गूढ समजे कोणी । असा प्राणी विरळाच ॥११४॥ चार वाणी नरवरा । वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा । ध्वनी उठे कोठून खरा । पाहणे जरा अगत्य ॥ ११५ ॥ अभंग गायिले संतांनी । नामा, तुका, सावतोबांनी । एकनाथ, ज्ञानेश्र्वरांनी । जगालागुनी बोध केला ॥११६॥ तुकडोजी महाराज । जागविला सारा समाज । भजने गायिली सहज । गीते गातो आज आम्ही ती ॥११७॥ अशी ही अभंगवाणी । आत्मसुख शोधून आणी । मुखाने गाता गाणी । मानवा आणी देवपण ॥११८॥ नाथ माझा झाला भ्रमर । रुंजी घाली कमळावर । पोटीचे उकले बाहेर । भक्त निर्भर व्हावया ॥११९॥ भ्रमराचे हे अभंग । शोधू पाहती अंतरंग । दृष्कृत्याचा होय भंग । भवाचे ढग वितळती ॥१२०॥ जे जे दिसते ब्रह्मांडी । ते ते सारे आहे पिंडी । तेजोवलय मेरुदंडी । लगत दडी आत्मप्रभा ॥१२१॥ मेरुदंड बहुमोल । सांभाळी शरीराचा तोल । कार्य त्याचे अनमोल । खाली ज्वाल अग्नीची ॥१२२॥ हे पंचमहाभूत । बाहेर तसेच आत । कार्य करती आवरत । प्राण देहात तोवरी ॥१२३॥ एकापासून एक झाले । एकात एक सामावले । हे तत्त्व अनुभवले । धाले, निवाले मुक्त ते ॥१२४॥ इडा, पिंगळा, सुषुम्ना म्हणती । त्या गंगा, यमुना, सरस्वती । आपुलाली कार्ये करिती । मेंदूस देती संवेदना ॥१२५॥ ज्ञानेश्र्वरी अध्याय सहावा । साधकांनी अवश्य पहावा । स्मरणात सदा रहावा । शोध घ्यावा आत्म्याचा ॥१२६॥ शरीरबले देहानंद । बुद्धी जाणे ज्ञानानंद । भावनेसी कलानंद । सच्चिदानंद आत्मबले ॥१२७॥ संचित, कर्म, क्रियमाण । प्रारब्ध होय यांपासून । हरिकृपा झाल्या जाण । नाश संपूर्ण तिन्हींचा ॥१२८॥ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध । यावरी घातला प्रतिबंध । इंद्रिये आवरली सबंध । चित्तनिरोध सहजची ॥१२९॥ लागे आत्मानुसंधान । हरपे त्रिपुटीचे भान । ध्येय, ध्याता, ध्यान । मीपण मग मावळे ॥१३०॥ आता पुढील अध्यायात । मांडेल माझे मनोगत । नाथदर्शने झालो तृप्त । आवरला हात आता हा ॥१३१॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । स्वानुभवे करी कथन । गुरूचे चरण स्मरूनिया ॥१३२॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र तेरावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
No comments:
Post a Comment