
श्री गणेशाय नमः॥ नमो नाथा गुरुवरा । आधार नसे दुसरा । घेतले कार्य सिद्ध करा । देई वरा इतुक्याची ॥१॥ तुम्हीच देव आणि संत । जे देवाने केले पसंत । क्षणही नाही उसंत । कार्यरत सदोदित ॥२॥ बाबा प्रथम गुराखी । रानात जाऊन गुरे राखी । मजुरी केली सारखी । खरा पारखी ज्ञानाचा ॥३॥ लोकात मिसळे, वावरे । शेत वखरी, वाही डवरे । हंड्याने पाणी भरे । अंगणी करे बाग सारी ॥४॥ काही म्हणतील खोटे । कोहळे पिकवी, लोकां वाटे । भंडार्यात फळ मोठे । खाता वाटे गोडवा ॥५॥ काळ गेला मागे गत । बाबांची माझी सोबत । मला डवरे वाहू लागत । गोष्टी सांगत ज्ञानाच्या ॥६॥ जवळ बहीण विधवा । आईची केली सेवा । दुखविले ना कोण्या जीवा । मीच पुरावा यासाठी ॥७॥ भाग्योदयाची संधी आली । नाथबाबांची कृपा झाली । अनुग्रह करी माउली । धरी सावली दासावरी ॥८॥ सद्गुरूनाथांची । कृपा जेव्हा झाली । शेताकडे केली । खूण जाण्या ॥ गावचे दक्षिणे । होते एक शेत । वडिलोपार्जित । आले आम्हा ॥ त्यातची एक छोटे । कडुनिंब झाड । दुपारची वेळ । होती तेव्हा ॥ अंगीचा दुपट्टा । केलेसे आसन । घाल पद्मासन । वदले ते ॥ डोईवरी कर । बीजमंत्र कानी । मोक्षसुखा धनी । केले मज ॥ महादेवदासा । भाग्या नाही सरी । केलीसे बोहरी । तिन्ही तापाच्च्॥ कृपा केली गुरुनाथे । आज बदलले नाते । जे पूर्वीचे जुने होते । आर्पले ते पायापाशी ॥९॥ अनाथांचा हा नाथ । मज केले आज सनाथ । मस्तकी पडता हात । शक्तिपात या नाव ॥१०॥ होती ज्याची प्रतीक्षा । ते घडले प्रत्यक्षा । नाथांनी दिली दीक्षा । लाभली शिक्षा योगाची ॥११॥ प्रथम गुरूंच्या नामा । सुरू झाला ओनामा । जो आला माक्या कामा । काय त्या पे्रमा वर्णू मी ॥१२॥ प्रथम सांगितली खूण । मन असावे अधीन । ते भटके रानोरान । भक्तीपासून दूर जाय ॥१३॥ छंद त्यासी असती नाना । बर्या वाईट कल्पना । सदाची रिकामपणा । कधी रमेना एकेठायी ॥१४॥ गुळावरी बसे माशी । घाणेरडे चाले तिशी । मात्र खेळेना विस्तवाशी । आस्तत्व नाशी तियेचे ॥१५॥ मन पवनाचा भारा । बांधवेना सुज्ञ नरा । जाणत्यांनो विचार करा । उपाय खरा एक त्यासी ॥१६॥ त्यासी बांधा गुरुपायी । विसरेल दांडगाई । एकदा तेथे रमून जाई । फिरून येई तिथेच ते ॥१७॥ मन झालिया स्वाधीन । सापडे खरे भक्तिधन । तनास लागे वळण । ते मग भजन करू लागे ॥१८॥ मनावर मिळता विजय । मग होत आसनजय । आसन नको कष्टदेय । सहज होय ते आपले ॥१९॥ जे नेती देवाकडे । योग तीन रोकडे । ज्याचे तुम्ही घ्याल धडे । तो सापडे तिन्ही योगे ॥२०॥ एक आहे कर्मयोग । दुसरा तो भक्तियोग । आणि तिसरा ज्ञानयोग । तिन्ही मार्ग जाती तेथे ॥२१॥ गुरुभक्तांनो त्वरा करा । मार्ग कोणताही धरा । आळवा त्या प्रभुवरा । मिळवा खरा आनंद ॥२२॥ चैतन्य यावया समाजी । देह झिजविला याकाजी । राष्ट्रसंत तुकडोजी । भजनांमाजी दंग सदा ॥२३॥ गावोगावी कीर्तन होत । कीर्तनास बाबा जात । भगवी टोपी घालत । आले ध्यानात संताच्या ॥२४॥ एकदा म्हणाले का रे पोरा । मी पाहतो येरझारा । फिरण्यात नाही लाभ खरा । बस घरा निवांत ॥२५॥ बाबांस बोध त्यांचा झाला । गेले न पुढे कीर्तनाला । पंढरीनाथ घरा आला । दर्शनाला लोक येती ॥२६॥ आता भाचा मोठा झाला । व्यवहार कळे त्याला । काम करून शिकला । उत्तीर्ण झाला दहावीत ॥२७॥ घराचा सारा भार । घेतला पहा अंगावर । ज्ञानदेव सरोदे टेलर । केला भागीदार त्यासी ॥२८॥देव झाला जेव्हा राजी । राहिली नाही काळजी । सुखामागे नाराजी । घटका मोजी आई आता ॥२९॥ सेवा केली त्या आईची । जाण तिच्या पुण्याईची । काळजी वाहे आईची । तिच्या छायेची आस जया ॥३०॥ आईची करील सेवा । आवडे तोची देवा । तेथे खर्या सुखाचा ठेवा । अनुभवा येई हो ॥३१॥ आईचे झाले खूप वय । जवळ आला अंतसमय । बिंदूचा सिंधूत विलय । होणारे होय शेवटी ॥३२॥ यादवांशेजारी समाधी । सारला सारा अंत्यविधी । जे कोणी न पाहे कधी । घडले समाधीपाशी या ॥३३॥ नामदेव पानझाडे । दुकानदारी चप्पला-जोडे । अचानक आले बाबांकडे । सोबत पेढे एक किलो ॥३४॥ बाबांनी स्वीकार केला । हार समाधीवर वाहिला । पेढे वाटले सर्वांला । शेवट झाला आईचा ॥३५॥ आईच्या जिवंतपणी । समाचार घे क्षणोक्षणी । प्राण गेला कुडीतुनी । समाधान मानी साधू तोची ॥३६॥ जितेपणी न दे रोटी । रडू लागे गेल्यापाठी । ही तर जगाची रहाटी । पितळ शेवटी कळो येत ॥३७॥ पानझाडे झाले भक्त । दर बुधवारी येथे येत । रात्री झोपडीत झोपत । सकाळी जात अकोल्यासी ॥३८॥ बाबांचा लागला ध्यास । नित्याचा झाला सहवास । गेले असे काही दिवस । अनुग्रह त्यास देती बाबा ॥३९॥ कालांतरे साधू झाले । साधुबुवा म्हणू लागले । पुढे या मार्गाने गेले । काम आपुले सांभाळुनी ॥४०॥ भक्तांची होत दाटी । जागा मिळेना बसण्यासाठी । बाबांसी येऊन करीत गोष्टी । एक छोटी खोली बांधू ॥४१॥ बाबा देती त्यास नकार । आम्हा कळेना हा प्रकार । एक चतारे मधुकर । शेरीस घर असे ज्याचे ॥४२॥ रुपये आणले पन्नास । मजपासी द्यावयास । मी न स्वीकारले त्यास । आम्हा दोघास ठावे असे ॥४३॥ तेल्हारा येथून माणूस आला । काका बोलाविती तुम्हाला । अचंबा वाटला मला । गेलो भेटीला काकांच्या ॥४४॥ पळशी काकांचे गांव । पाटीलकीचे वैभव । पुतणे गुलाबराव । पाहती सर्व कारभार ॥४५॥ त्यांनी बांबू आणि लाकडे । पाठविली तेल्हार्याकडे । मला घातले साकडे । आणावे इकडे म्हणुनी ॥४६॥ मला काही सुचेना । मनालागी रुचेना । आलो परवानगीविना । ते म्हणती बसाना गाडीत ॥४७॥ पाटलांच्या दोन गाड्या । मोठमोठया बैलजोड्या । मी झालो वाटाड्या । आलो गड्यांसोबत ॥४८॥ मी वाहत नाथांची शेती । पैसे मजपाशी असती । नाना ही पुढाकार घेती । बाबांप्रती सांभाळिले ॥४९॥ बांधले साधे छोटे घर । कवेलू टाकले वर । ओसरी काढली समोर । लावला हातभार मित्रांनी ॥५०॥ या घराच्या आधी । बैठक होती एक साधी । जुनी जोडणी त्यामधी । गळे कधीमधी पावसात ॥५१॥ त्यात दोन शिलाईयंत्र । काम करती स्वतंत्र । भक्त होता एकत्र । अडचण मात्र खूप असे ॥५२॥ नाही यांना दाढी जटा । न वृत्ती भगव्याची छटा । भगवी टोपी, रुमाल छोटा । फिरे एकटा कुठेही ॥५३॥ जाय मित्रांच्या घरी । कधी मागण्या उधारी । फिरे खेडे बाजू चारी । ना अहंकारी बाबा हे ॥५४॥ हरिभक्तपरायण । श्रीराम महाराज मेहूण । यांचे एकदा कीर्तन । शेजारी जाण दुधाळ्याशी ॥५५॥ गावातील काही भक्त । मी, सरोदे, बाबांसोबत । बाबुराव, केशव येत । होती संगत खारोळेची ॥५६॥ भारसाकळे मारोती । आप्पा देशमुख येती । रस्त्याने गमतीजमती । सदाच असती आमच्या ॥५७॥ कीर्तनास चढला रंग । भजनात सारे दंग । साधूस कळे अंतरंग । घडता संग साधूचा ॥५८॥ संताच्या होता भेटी । होईना ताटातुटी । घडले असे हे शेवटी । आले बुवा नेटी आमच्या ॥५९॥ म्हणे मी हातरूणला येतो । मग नाही कोण म्हणतो । संताची खूण संत जाणतो । इतरा गुण तो असेना ॥६०॥ आम्ही सारे घरी येता । नानास कळली वार्ता । बैठक भरली आता । ठाव रिता असेना ॥६१॥ दोघांची झाली दृष्टादृष्टी । अध्यात्माच्या करिती गोष्टी । सर्व सुखाची होत वृष्टी । आनंद सृष्टी न समाये ॥६२॥ श्रीराम महाराज । नग्न झाले, नाही लाज । गजानन वाटे आले आज । ध्यान सहज लागले ॥६३॥ काढू लागले बिडीचा धूर । आनंदासी आला पूर । दोघा दिसेना अंतर । भाग्याचे नर आम्हीही ॥६४॥ पाहिला तो देखावा । शुद्ध नाही जीवाभावा । अलभ्य लाभ व्हावा । गजानन यावा मुक्कामी ॥६५॥ बुवा झाले पहा नग्न । दोघे एकमेका संलग्न । आत्मचिंतनी मग्न । विरले प्रश्र्न-उत्तरही ॥६६॥ पुढे बुवा नग्न राहती । चालले दिवस असे किती । कीर्तनास जव उभे राहती । शाल घेती अंगावरी ॥६७॥पुढे घडला एक प्रसंग । तेवढा लिहितो यथासांग । उडवू भक्तीचा रंग । असे हा संग संतांचा ॥६८॥ तेल्हार्याची ही कथा । आठवू पंढरीनाथा । लागावे या भक्तीपंथा । दुसरे अन्यथा मनी नको ॥६९॥ डामरेच्या घरी सप्ता । आम्हा कळला हा पत्ता । नाथ म्हणाले जाऊ आता । भेटू संता श्रीरामा ॥७०॥ हे महाराज महाभाग । अन्नाचा केला त्याग । भाजी कांजी खाऊन मग । राहती अलग एकांती ॥७१॥ अन्न नाही, वस्त्र नाही । निवारा फिरे सदा ही । अलमस्त सदासर्वही । पर्वा नाही कशाची ॥७२॥ दिवसा सहभोजन । जातीपातीचे ना बंधन । सायंकाळी हरिकीर्तन । केले नमन बाबांसी ॥७३॥ ज्या अभंगावर कीर्तन । तो अभंग लिहितो संपूर्ण । संत तुकोबांचा जाण । असेल आठवण कुणाशी ॥७४॥ पांडुरंगे सत्य केला अनुग्रह । निरसोनी संदेह बुद्धिभेद । जीवशिवा सेज रचिली आनंदे । आऊठावे पदी आरोहण । निजी निजरूपी निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥ निरूपणा घेतला अभंग । कीर्तनात भरला रंग । जणू ऐकतो पांडुरंग । खुले अंतरंग संताचे ॥७५॥ महाराज हातरूणला आले । कुपट्याहून भाजीपाले । तिघांचे मीलन झाले । सोबत राहिले कधीमधी ॥७६॥ तिघांचा सहवास । चालला काही दिवस । भक्तीत घेऊ लागले रस । संतची संतास जाणती ॥७७॥ अंगावर घालती कपडे । अन्न घेती थोडे थोडे । नेहमी येती बाबांकडे । वैराग्याचे धडे गिरविती ॥७८॥ ब्रह्मवेत्ता ज्ञानी शुक । शोधू पाहे प्रपंची जनक । शमली जी होती भूक । गेली रुखरुख मनाची ॥७९॥ येथे झाले त्याच परी । एक तपस्वी ब्रह्मचारी । दुसरा राहतो संसारी । मुलेमुली घरी असती की ॥८०॥ कथा होई मागे पुढे । बहू प्रसंग लिहू केवढे । काही घेता थोडे थोडे । हेच कोडे मजलागी ॥८१॥ बुवांच्या कधी येई मनात । येत होते हातरूणात । एकदा आले ध्यानात । बोलले मात ऐका ती ॥८२॥ अंगणाचा परिसर । रम्य वाटे मनोहर । बांधावे छोटे मंदिर । माहेरघर भक्तांचे ॥८३॥ बाबा म्हणाले नाही । माझी मलाच ग्वाही । घर मंदिर एकेठायी । करणे काही योग्य नसे ॥८४॥ भक्तांची होईल सोय । असे असावे देवालय । ही जागा अपुरी होय । आला प्रत्यय आज हा ॥८५॥ बाबांची दूरदृष्टी । त्यात बुवांची पुष्टी । त्यांना कळती पुढील गोष्टी । समदृष्टी दोघांची ॥८६॥ आता बाबांच्या घरी । भाजी आणि भाकरी । माय स्वयंपाक करी । आनंदे स्वीकारी महात्मा ॥८७॥ हे पहेलवान साधू प्रबळ । ब्रह्मचर्याचे अंगी बळ । तनामनाने निर्मळ । वत्सला आंघोळ घालीतसे ॥८८॥ हात आईचा पे्रमळ । माय यशोदा केवळ । म्हणे निर्मळाचा काढते मळ । हासती खळखळ सारेही ॥८९॥ शेजारी आखरामंधी । यादवबाबा समाधी । मंदिर बांधावे त्यामधी । कुदळी खांदी घेतली ॥९०॥ मुखी विठ्ठलाचे नाम । तोची मुहूर्त शकून । शब्द काढले मुखातून । आगमन आखरात ॥९१॥ पूजा वगैरे सारली । हाताने कुदळी मारली । मातीही स्वये वारली । शकले केली नारळाची ॥९२॥ सखारामांचे सेवक । श्रीरामबुवा भाविक । मारून कुदळी एक । यथार्थ सम्यक साधले ॥९३॥ संताचे पाय, भक्तांचे कर । मंदिर घेत आकार । पुढे खूप विस्तार । भक्त अपार येताती ॥९४॥ गावंडे आणि भटकर । तुळशीराम पोष्टमास्तर । तिघे झटलेत फार । हातभार अनेकांचा ॥९५॥ गावंडे वसंतराव । बाबांवरी अत्यंत भाव । कधीच नव्हती हाव । मंदिरी धाव रविवारी ॥९६॥ रामकृष्ण भटकर । व्यवहारी कुशल चतुर । तेल्हार्याची मदत अपार । निर्मळे कारागीर तेथीचे ॥९७॥ गावातील काही भक्तगण । मी ही स्वतः आपण । तनमन ओतुनी प्राण । वेळ पूर्ण त्याचसाठी ॥९८॥ मंदिराची चालली बांधणी । येऊ लागली वर्गणी । विटा-दगड आणी कोणी । बांधली घाणी चुन्याची ॥९९॥ माझी बैलजोडी जुंपती । भाऊ माझे घाणी हाकती । चुना, रेती मजूर टाकती । ऐशारीती काम चाले ॥१००॥ काकांचे एक चिरंजीव । वकिली कोर्ट जळगाव । नाव त्यांचे शेषराव । त्यांचे देव नाथबाबा ॥१०१॥ बेबी मोठी मुलगी । दमयंती म्हणती तिजलागी । बाबांची घेत परवानगी । नेली शिकण्यालागी जळगावा ॥१०२॥ वर्ग दहावा पास झाली । अकरावी पूर्ण केली । शिकून मग घरी आली । सोयरीक केली अकोल्यात ॥१०३॥ जगन्नाथजी पंडित । त्यांचा मुलगा ठरे जामात । घडले बाबांच्यापश्र्चात । राहिले आलप्त दूर ते ॥१०४॥ पळसोदचे काशिनाथ । बाबनबुवा, दशरथ । उकर्डा, नारायणनाथ । महादेव, रामनाथ सर्वही ॥१०५॥ पंढरी काळे, चंद्रभान टोहरे । बाबांचे जिवलग प्यारे । गोळा झाले आप्त सारे । सगेसोयरे इतरही ॥१०६॥ रत्नाबापू, मधुकर पोतले । मोतीराम तिव्हाणे पातले । सार्यांनी मंडप घातले । आपआपले काम घेती ॥१०७॥ नाथ बसले बाहेर । मी स्वीकारला आहेर । सोहळा झाला मनोहर । सोडी माहेर दमयंती ॥१०८॥ दुसरी मुलगी रजनी । शाळा सोडली तियेनी । तिलाही आली मागणी । जवळलागुनी उगवा ॥१०९॥ एक नामदेव सातपुते । रेलस्टेशनमास्तर होते । बाबांचे नातेगोते । जुळतेमिळते सर्वही ॥११०॥ बाळकृष्ण साकरकार । सधन प्रगत कास्तकार । उगव्याचे राहणार । शेती समोर स्टेशनाच्या ॥१११॥ हे कधी शेतात जाती । स्टेशनावरी जाऊन बसती । सहज काही गोष्टी होती । विषय काढती लग्नाचा ॥११२॥ शंकर तुमचा लहान भाऊ । त्याचेसाठी मुलगी पाहू । हातरूणला चला जाऊ । संबंध होऊ शकेल ॥११३॥ प्रथम पाहिजे नोकरी । मिळाया भाजीभाकरी । आज मी आहे जरी । पुढे कसे तरी भागेल का ॥११४॥ पुढेतर ईश्र्वर आहे । तोच सारी चिंता वाहे । निमित्तमात्र आपण पाहे । जाणतो सर्व हे तोच पै ॥११५॥ लगेच दोघे येथे आले । बोलणे ही सर्व झाले । तिथी निश्चित करून गेले । योग्य वाटले सार्यांना ॥११६॥ साकरकार यांची मध्यस्थी । लग्नाची साधी पद्धती । लग्न लागले ऐशारीती । उणीव कोणती असेना ॥११७॥ नवरी जाताच घरी । बदली झाली नागझरी । रेल्वेच्या स्टेशनावरी । थोड्या दिवसांतरी पारस ॥११८॥ शंकररावास नोकरी । योग आला लवकरी । ज्याचा भाव ईश्वरावरी । सारे करी पूर्ण तो ॥११९॥ साकरकार महान भक्त । मुलगा, नातू मंदिरी येत । असे चालले व्रत । परंपरागत हे नाते ॥१२०॥ बाबास कसे कळे अंतर । याचे येई प्रत्यंतर । कथा छोटी मनोहर । लागे विचार करणे की ॥१२१॥ साकरकार पांडुरंग । वकिली व्यवसायात दंग । भक्तीने खुले अंतरंग । आवडे संग संतांचा ॥१२२॥ संताजींची पुण्यतिथी । बाबा मुख्य आतथी । आम्हीही असावे साथी । होय त्याअर्थी अन्नदान ॥१२३॥ आले उभयतांच्या मना । जाऊ चला नाथदर्शना । नव्हती मुळी कल्पना । त्या पावन क्षणांची ॥१२४॥ सहज मंदिरी आले । जेथे नित्य कथा चाले । ऐकून मन शांत झाले । रमू लागले कथेत ॥१२५॥ इथे नित्याची प्रथा । बाबांनी सांगावी कथा । श्रोत्यांनी डोलवावा माथा । शब्द न वृथा जाय एक ॥१२६॥ ग्रंथ साईसत्चरित । गुरू-शिष्यसंबंध त्यात । मनात उदेला हेत । व्हावे नत गुरुपायी ॥१२७॥ मग झाली कथा आरती । अवघी झाली वारावार ती । आता फक्त दोघे उरती । विचार स्मरती आगळे ॥१२८॥ आता आपणही जावे । बाबांचे दर्शन घ्यावे । सहज उठले स्वभावे । परी कळून यावे नाथांना ॥१२९॥ जवळ येता अकस्मात । डोक्यावरी ठेविला हात । बोलावून नेले आत । गूज कानात सांगितले ॥१३०॥ एकोणीसशे ऐंशीसाली । सद्गुरूंची कृपा झाली । आनंदात दोघे न्हाली । दया आली महाराजा ॥१३१॥ दिनांक तीस जानेवारी । बुधवारच्या दोन प्रहरी । नाथांच्या पावन दरबारी । आनंद भारी जाहला ॥१३२॥ माघ शुद्ध त्रयोदशी । भाग्य उदेले यादिवशी । जवळ काही न द्यावयासी । नाथ मानसी हर्षयुक्त ॥१३३॥ एके दिवशी बाई आशा । मनात आली निराशा । मानाची मनी अभिलाषा । कळे मनिषा नाथांसी ॥१३४॥ लगेच मूर्ती समोर आली । म्हणे काय मानाची भुकेली । कल्पना काढ डोक्यातली । अदृश्य झाली मूर्ती मग ॥१३५॥ तुज आनुवंशिक वारसा । सेवेचा सासरी वसा । सेवाकार्याचा ठसा । उमटे सहसा जनलोकी ॥१३६॥ आशास असा उपदेश केला । सेवेचा वसा हाती दिला । लगेच अंतर्धान पावला । नाथ न दिसला दुजा क्षणी ॥१३७॥ एकदा आपुल्या भक्ता सांगे । वकीलसाहेब आहेत मार्गे । भोजन घेऊ त्यांचेसंगे । दिसू लागे गाडी त्यांची ॥१३८॥ सर्वांसह भोजन झाले । भक्तांच्या प्रत्यया आले । नेहमीच ऐसे चाले । बोल न गेले वाया कधी ॥१३९॥ असेच एका समयास । वाटले वकीलसाहेबास। जावे हातरूणास । दर्शनास बाबांच्या ॥१४०॥ गड्यास सांगे गाडी काढ आता । गाडीत चढती उभयता । पुढे येऊन पाहता । चिखल होता मार्गात ॥१४१॥ मागे जावे लागे परत । निराशा आली मनात । बाबा जाणती मनोगत । फोन येत श्यामचा ॥१४२॥ बाबांनी तुम्हा बोलविले । न सांगता कळो आले । मग त्यांचे दर्शन झाले । शांत वाटले मनासी ॥१४३॥ हे वकील सरकारी । मान कोर्टदरबारी । बाबांवर निष्ठा भारी । होय वारी हातरूणा ॥१४४॥ साकरकार यांचे भाचे । काशिरामजी गोमासे । ते ही मागे राहतील कसे । नित्य असे वारी त्यांची ॥१४५॥ साथी वासुदेव पारधी । दर्शनास येती कधीमधी । नेमास न चुकले कधी । मानिती समदी नाथकृपा ॥१४६॥ अशी झाली दोन लग्न । पार पडली निर्विघ्न । नाथ आपल्या स्थितीत मग्न । सदा संलग्न देवासी ॥१४७॥ मुद्रा, ध्यान आणि धारणा । तोच देई पे्ररणा । आठवाया राधारमणा । भक्तजना खुणा सांगती ॥१४८॥ मुद्रा करणे अवश्य । साधनेचे रहस्य । कोणतेही असो उपास्य । करणारास फलप्राप्ती ॥१४९॥ भूचरी आणि चाचरी । अगोचरी ही तिसरी । खेचरी, अलक्ष्य अवधारी । साधिल्या जरी साधका ॥१५०॥ जिकडे जिकडे दृष्टी पडे । सहजची मुद्रा घडे । साधनेचे तेल पडे । तेजवलय पुढे येतसे ॥१५१॥ जागृती, स्वप्न, सुषुप्ती । प्राणी सहज भोगती । काही तुर्येपर्यंत जाती । उन्मनी साधती सिद्ध ते ॥१५२॥ मुद्रा पाचवी अलक्ष्य । गुरूंसह करावी प्रत्यक्ष । यासी प्रमाण गुरुसाक्ष । उगीच होय भक्ष्य काळाचा ॥१५३॥ ही हठयोग साधने । करू नयेत गुरुकृपेविने । अलक्ष्य मुद्रा साधणे । प्रत्यक्ष पाहणे निजरूप ॥१५४॥ मी-तू पणाचा वाद नाही । तोच दिसे दिशा दाही । पाहणारा पाहतच राही । अन्य काही दिसेना ॥१५५॥ ओहम् सोहम् जप । चालू होई आपोआप । परी आधी पाहिजे तप । नर, नारी, रंक, भूप सर्वांसाठी ॥१५६॥ करिता हठयोग साधन । ब्रह्मचर्य करावे पालन । सांडावा मान-अपमान । अहं गिळून टाकावा ॥१५७॥ हठयोग करती संसारी । कच्ची कमान आहे जोवरी । प्रपंचास दूर सारी । सदा अंतरी सावध ते ॥१५८॥ माझे सलगीचे बोल । तुम्हा वाटती जरी फोल । विचार करता खोल । कळेल ओल अंतरीची ॥१५९॥ मिळे दीक्षा नामदान । गुर्वाज्ञे हठयोगसाधन । महादेवदास आत्मनिवेदन । साक्ष प्रमाण श्रीगुरू ॥१६०॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र बारावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
No comments:
Post a Comment