अध्यायसत्र पंधरावे

श्री गणेशाय नमः॥ नमो नाथ योगीराणा । भक्ताची घ्या करुणा । निर्विकारा सगुणा । गुणनिधाना पांडुरंगा ॥१॥ योगीजनांचा निजधर्म । आचरावे षट्कर्म । कैसे आहे खरे मर्म । भक्तीचे वर्म निजगुह्य ॥२॥ ज्ञानसिंधू सच्चिदानंदा । त्रिकालज्ञा आनंदकंदा । अगाधशक्ती अमर्यादा । सत्याधारसदा स्वयंभू ॥३॥ सुखदुःखाच्या कर्मबंधनी । जीव फिरतो नाना योनी । आत्मसुखाचा अनुभव कोणी । जन्मायेऊनी घेईना ॥४॥ यासी जप, तप अनुष्ठान । सांगितले हे साधन । परमार्थरुपी धन । मोक्षसाधन मिळवावे ॥५॥ याचे मार्ग असती चार । ज्ञान, कर्मादी आचार । भक्ती हा तिसरा प्रकार । योगाधिकार चवथा ॥६॥ यातील मार्ग असो कोणता । मात्र मोक्ष येईल हाता । नाना दिशांनी वाहती सरिता । सागरी मिळता राहील का ॥७॥ श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदाभेद । अलीकडे वितंडवाद । ज्ञानी न देती साद । चाखती स्वाद भक्तीचा ॥८॥ नौली, नेती आणि धौती । बस्ती, त्राटक, कपालभाती । साधकाची साधनपद्धती । पाहू आचरती कैसे ते ॥९॥ ज्याने होतो प्राणायाम । ते नाक स्वच्छ असावे उत्तम । करिता नेतीचे काम । नासिका उत्तम शुद्ध हवी ॥१०॥ काही करती जलनेती । नाकावाटे पाणी घेती । मात्र हे अवघड आत । सूत्रनेती सुलभ असे ॥११॥ ज्यासी माहिती असेल बरी । त्याकरवी करावी सूत्रदोरी । साधारण असावी फुटभरी । एकटोक जरी निमुळते ॥१२॥ छोट्या भांड्यात घ्यावे मेण । अग्नीस्पर्शे वितळवून । दोरी काढावी त्यातून । साफ पूर्ण करावी ॥१३॥ ती किंचित होईल ताठ । आसनी बसावे नीट । नेती धरून हातात । हळू नाकात घालावी ॥१४॥ गळ्यापर्यंत आली जरी । दोन बोटांच्या आधारी । हळूच काढावी बाहेरी । मुखातून वरी धरावी ॥१५॥ घुसळण करी सुगृहिणी । तसी दोरीची टोके दोन्ही । दोन्ही हातात धरुनी । नाकातोंडातुनी फिरवावी ॥१६॥ प्रथम घेता बाजू डावी । तशीच घ्यावी मग उजवी । हळूवार अशी क्रिया करावी । नंतर घ्यावी बाहेर ॥१७॥ फेरास पाहिजे मर्यादा । आधाशी असेल एखादा । करू नये नेहमी सदा । व्यर्थ आपदा येईल ॥१८॥ याने सुधारे आरोग्य । दूर होतील नेत्ररोग । शुद्ध होईल शिरोभाग । सुंदर हा योग साधता ॥१९॥ दुसरी क्रिया असे धौती । हिची फार महती । बाबा कैसे आचरती । वर्णन करू ती थोडक्यात ॥२०॥ स्वच्छ मलमल, मऊ कपडा । बारीक किनार गोट न जाडा । दोन इंची, पाच फूट तुकडा । सरळ फाडा कात्रीविना ॥२१॥ थोडे घेऊन साखरदूध । पट्टी भिजवावी सबंध । जिव्हाग्री ठेवून मधोमध । हळूहळू सावध गिळावी॥२२॥ हाती राहील एक टोक । सगळी गिळावी बहुतेक । थुंकी थुंकणे आवश्यक । स्वच्छ मुख असावे ॥२३॥ क्रमाक्रमाने धौती आत गेली । हळूवार बाहेर काढली । दाबली ना दाताखाली । योग्य झाली अशी क्रिया ॥२४॥ ही क्रिया केल्यानंतर । ताजे दूध घेणे जरूर । आरोग्य राहील सुंदर । मावळती विकार देहाचे ॥२५॥ मोकळा चाले श्वास । खोकल्याचा मिटेल त्रास । आम्लपित्तविकारास । दूर करी खास ही क्रिया ॥२६॥ पोटातील जाईल वाफ । पट्टीस लागून येई कफ । तो स्वच्छ धुवावा साफ । उन्हात माफक वाळवावी ॥२७॥ नौली क्रिया योगी साधी । संपण्या देहाची उपाधी । अंतःकरणाची होय शुद्धी । म्हणून आधी महत्त्वाची ॥२८॥ प्रथम शौच, मुखमार्जन । वाटल्यास स्नान, ध्यान । घालून सहज आसन । हात ठेवून गुडघ्यांवरी ॥२९॥ आसनावर बसावे निःशंक । श्वास बाहेर बहिर्कुंभक । पोट रिकामे आवश्यक । मार्गदर्शक हवा यासी ॥३०॥ गुडघ्यांवर ठेवा हात । थोडे अंतर दोन पायात । गुडघे वाकले सांप्रत । क्रिया करीत नौलीची ॥३१॥ असा करावा नौलीयोग । नाभीस्थानी पोटाचा वाम भाग । उचलावा किंचित झुकून मागं । विरुद्धअंग आत घ्यावे ॥३२॥ मग पहिल्याविरुद्ध । क्रिया करावी अशी शुद्ध । श्वास घेऊन शिस्तबद्ध । साधेल सिद्ध नौली ही ॥३३॥ पोट फिरवावे चक्राकार । आतडीस न द्यावा जोर । घुसळता श्रमही नको फार । मोजके फेर असावे ॥३४॥ बाल, वृद्ध अथवा रोगी । स्त्रियांनी काही प्रसंगी । नौली नसे करण्याजोगी । इतरांनी अंगीकारावी ॥३५॥ बस्तीचा करण्या अभ्यास । अंगठ्यासम पोकळ बास । प्लॅस्टिकची नळी चालेल खास । सहा इंच बस लांबीची ॥३६॥ खोल पाण्याच्या जागी । उभे राहावे मध्यभागी । गुदात नळी घालती योगी । एकांत लागी यासाठी ॥३७॥ किंवा पाणी घेऊन टबात । एक टोक बुडवावे त्यात । दुसरे गुदस्थानात । पाणी पोटात ओढावे ॥३८॥ नंतर शौचाचे पाहून स्थान । टाकावी पाण्यासोबत घाण । नंतर नौली करून । नळी धुऊन ठेवावी ॥३९॥ काही वेळाने थोडी । मूगडाळीची घ्यावी खिचडी । तूप लागे त्याचे जोडी । तिखटाची आवडी नसावी ॥४०॥ पालक, चाकवत भाजीपाला । चालेल दुधीभोपळा । त्रास न होय आतडीला । असा आहार झाला पाहिजे ॥४१॥ आता एक कपालभाती । शरीरशुद्धतेची पद्धती । नाकावाटे श्र्वास गती । ठरावीक आत प्रमाणात ॥४२॥ नाक, फुफ्फुसे, ओटीपोट । तिन्ही अवयवास लागे नेट । साधनात मन पाहिजे नीट । अन्यथा खटपट वाया सारी ॥४३॥ अंतःकरण करून शुद्ध । श्र्वास घ्यावा तालबद्ध । ओटीपोटाचा विशेष संबंध । असावे सावध सदाची ॥४४॥ श्र्वास सोडता नेमस्त । आकुंचित व्हावे गुद, उपस्थ । नाभी खालील पोट आत । ऐसी यथास्थित क्रिया व्हावी ॥४५॥ पोटातील निघे अशुद्ध वायू । मजबूत होतील स्नायू । शरीर बने दीर्घायू । अक्षय टिकाऊ शांती मिळे ॥४६॥ मात्र श्र्वास नको एकदम । छाती दुखेल एवढे श्रम । अंगातून निघे घाम । हा साहसी क्रम नसावा ॥४७॥ तसेच जेवण झाल्यावर । अंदाजे तास तीन-चार । पचनक्रियेस लागणार । न करावी तोवर क्रिया ही ॥४८॥ आता एक असे त्राटक । ठिकाण शोधा निवांत एक । तेथे बसावे निःशंक । पाहावे टक लावुनी ॥४९॥ किंवा एखादी तसबीर । ठेवावी दृष्टीसमोर । तिजकडे पहा निरंतर । मनासी स्थिर करुनी ॥५०॥ जरी दुखू लागती डोळे । शिंपावित स्वच्छ जळे । दृष्टी काजळाने उजळे । मग चिपडे दूर होती ॥५१॥ कदाचित वाढला त्रास । गायीचे तूप आणा खास । ते आणा उपयोगास । लावा दीपास समोर ॥५२॥ त्याचाच जाळावा दिवा । वर थोडे झाकण ठेवा । काजळ धरता काढून घ्यावा । त्यास मेळवा तुपात ॥५३॥ डोळ्यात घालून झोपा रात्री । दृष्टी सुधारेल ही खात्री । साधक हवा कृपापात्री । येथे भाडोत्री चालेना ॥५४॥ जरी साधे ही युक्ती । दूरचे पाहण्या येत शक्ती । वासना क्षीण होती निश्चिती । आध्यात्मप्राप्ती सहज ॥५५॥ असा नाथांचा महिमा । आला बहुतांच्या कामा । आणमा आणि लघिमा । ओलांडिल्या सीमा सिद्धींच्या ॥५६॥ अशी आहे नाथमूर्ती । दूरवर गेली कीर्ती । आध्यात्माचे चक्रवर्ती । थोर विभूती शुकदास ॥५७॥ श्री विवेकानंद आश्रम । निर्मियेला करुनी श्रम । नैतिकतेचे पाठ उत्तम । नित्य उपक्रम सेवेचा ॥५८॥ अकोल्यात एक शाखा । कर्तव्याची उमटे रेखा। भवरोग्यासी भेटे सखा । एकसारखा झटतसे ॥५९॥ वार्ता गेली त्यांचे कानी । धावत आले या ठिकाणी । एक साधू, दुसरा मुनी । आम्हा दोन्ही पूजनीय ॥६०॥ ज्ञानदेव, तुकाराम । दोहोंचे एकची काम । शिणल्या-भागल्या विश्राम । पंथ सुगम दाखवाया ॥६१॥ दोघांची होतसे भेटी । आनंद न समाये पोटी । प्रवचन झाले शेवटी । अंगणीच्या ओटी नाथांच्या ॥६२॥ हा सोहळा असे अपूर्व । ज्ञान, भक्ती, वैराग्यपर्व । ऐकण्यास गाव सर्व । अहंकार, गर्व दूर पळे ॥६३॥ दर्शनाने मन निवाले । श्रवणे कान तृप्त झाले । नाथांमुळे शक्य झाले । दिवस आले भाग्या्चे ॥६४॥ बाबुजी महाराज । राहीतला फडके ध्वज । येऊन भेटती सहज । संतांचे राज संत जाणे ॥६५॥ बाबा अमुचे वैरागी । तशीच माउली अर्धांगी । बाया मिळवून एकाजागी । भजनालागी समरसे ॥६६॥ दोघांची एकमेकां साथ । वत्सला महादेवनाथ । दिवस चालले सुखात । अहोरात्र आनंदची ॥६७॥ दृष्ट लागली प्रपंचासी । आजार जडला आईसी । सांगती न बाबांसी । चेहर्‍यावर खुशी सारखी ॥६८॥ परी कृश झाले शरीर । वाढत गेला आजार । आता देह झाला जर्जर । उपचार बहू केला ॥६९॥ प्रथम इलाज घरगुती । मग काही वैद्य येती । आसवे काढा देती । काही न होती फलदायी ॥७०॥ एकदा घडले नेमके । दर्शनास डॉक्टर पतके । त्यांना हे कळून चुके । परत आले एके दिवशी ॥७१॥ केले रोगाचे निदान । दिली औषधी, इंजेक्शन । थोडासा आला गुण । येत अधून मधून पुन्हा ते॥७२॥ म्हणती चला बाळापुरा । तेथे उपचार होईल बरा । आई म्हणे मी न सोडी घरा । गेले माघारा डॉक्टर ॥७३॥ माय न सोडी कधी घर । सुदृढ होते जरी शरीर । सांभाळिला घरसंसार । जन्मभर हेच केले ॥७४॥ बाबांस भक्त गावी नेती । आईस आग्रह करती । विनोदाने काय वदती । ह्या गंमती नवलाईच्या ॥७५॥ महाराज ब्रह्म, मी माया । ते प्रकाश, मी छाया । उगीच मागे फिरू कासया । आग्रह वाया नको हा ॥७६॥ भाग्याने लाभले घर । हेच माझे पंढरपूर । येणारे भक्त ईश्वर । सेवा करणार त्यांची मी ॥७७॥ मी राहीन अर्ध्यापोटी । भुकेल्यास देईन रोटी । उगीच नको आटाआटी । सौख्य शेवटी यात वाटे ॥७८॥ मागील येते आठवण । हृदयात केली साठवण । बाबांची पाठराखण । ही असे खूण सतीची ॥७९॥ एक नर्मदाबाई गावंडे । येत होती बाबांकडे । छोटा बाळ घेऊन कडे । यावे इकडे दर्शनासी ॥८०॥ मुलगा एकुलता एक । फिरत्या जोश्याने घातला धाक । यास धोका खतरनाक । घडे भयानक कधीही ॥८१॥ घाबरली ती भोळी बाई । माक्या मुलाचे होणार काही । अन्न सोडले त्या पायी । नागोबुढा येई सवे तिच्या ॥८२॥ बाबा देत होते दिलासा । तिचाही बसे भरवसा । मुलास बाधा न सहसा । निश्चित असा मनात ॥८३॥ मुलाची बाधा टळली । बाईची भक्ती जुळली । बाबांची महती कळली । ती वळली भक्तिमार्गा ॥८४॥ आईचा आजार वाढला । लोक येती दर्शनाला । सांभाळावे लागे मुलीमुला । आकांत झाला असा हा ॥८५॥ मग ती नर्मदाबाई । मुलास घेऊन येथेच राही । सांभाळिले सर्व काही । राहिली पाही आईपाशी ॥८६॥ अनसूयाबाई निर्मळे । आईच्या दुःखाची वार्ता कळे । सेवेलागी मन वळे । कुटुंब सगळे राही इथे ॥८७॥ या बाईचे घरधनी । रामचंद्र निर्मळे गुणी । हाती घेऊन करणी । मंदिराची बांधणी केली असे ॥८८॥ सार्‍यांचा इथे मुक्काम । बाई करी घरकाम । आईस देत आराम । सेवा उत्तम होती यांची ॥८९॥ वासुदेव रोहणकार । हातरूणचा राहणार । काम करी मंदिरावर । विश्र्वासू फार बाबांचा ॥९०॥ सेवा केली आईची । त्या वत्सला माईची । पर्वा नसे कमाईची । त्या पुण्याईची काय कथा ॥९१॥ दिवसा आणि रात्रीसी । राहे सदा आईपाशी । तिघेही सदा सहवासी । जाती न घरासी आपुल्या ॥९२॥ झिजू लागली सुदृढ काया । भेटण्या येती आयाबाया । आई धीर देत तया। म्हणे वाया खेद नको ॥९३॥ ईशकृपेने देह मिळाला । त्यानेच त्याचा सांभाळिला । एक दिवस बोलावी त्याला । उगीच गलबला कासया ॥९४॥ आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना । ही प्रचिती पुन्हा पुन्हा । येतसे जना नेहमीच ॥९५॥ अखेर वेळ संपत आली । देहास घेतले खाली । बाया जमती भवताली । नाथ माउली शेजारी ॥९६॥ सारे असती जवळपास । बोलण्याचे न साहस । एकदा पाहून सर्वांस । घेतला श्र्वास अखेरचा ॥९७॥ ज्योतीत ज्योत मिळाली । गंगा जाय सागराजवळी । आत्म्याने सोडली कुडी । बिंदू मिळे सिंधूलागी ॥९८॥ नलिनी, श्याम लहान । जालंदर थोडा सुजाण । रडती धाय मोकलून । अवघ्यांचे मन गहिवरे ॥९९॥ गावकरी गोळा झाले । काही दुरूनही आले । आईस अंगणी बैसविले । जोडवे घातले पायात ॥१००॥ हिरवी साडी, हिरवा चुडा । मळवट लाविले कपाळा । सौभाग्य लेणे गळा । हा सोहळा अखेरचा ॥१०१॥ भाद्रपद शुक्ल एकादशी । जी आवडते देवाशी । सोमवारी त्यादिवशी । या माउलीसी चिरनिद्रा ॥१०२॥ एकोणीसशे एकोणसत्तर । दिनांक बावीस सप्टेंबर । झाली जीवनाची अखेर । सोडले घर त्यादिवशी ॥१०३॥ रस्त्याने चिखल होता । समाधीत मिठाची प्रथा । न्यावे कसे ठिकाणी आता । रस्त्याने जाता येईना ॥१०४॥ एक शंकरसा करोडदे । मोठे बैल त्यांच्याकडे । गाडीत मिठाचे पोतडे । मंदिराकडे नेती ते ॥१०५॥ धावून आल्या दोघी बहिणी । दमयंती आणि रजनी । जालंदर यासी धरुनी । धाय मोकलुनी रडती ॥१०६॥ श्यामची गेली आई । पोरकी झाली नलूताई । लेकरा सांभाळी अंजनाबाई । आकांत होई सगळीकडे ॥१०७॥ आईची निघाली पालखी । पुढे पुढे जाय सारखी । आम्हा होऊन पारखी । चालली सखी नाथांची ॥१०८॥ मंदिराच्या प्रांगणात । पांडुरंगाच्या पायरीलगत । माउली चिरविश्रांती घेत । बसे समाधीत जाउᆬनी ॥१०९॥ आता घर झाले सुने । आले अन्‌ गेले पाहुणे । बाबास काय समजावणे । हे शहाणे मुळातच ॥११०॥ असे जे ज्ञानी लोक । त्यांना जरी झाला शोक । नियतीचे कवतिक । फक्त निःशंक पाहती ॥१११॥ ज्याने देव गडी केला । सुखदुःख वाही त्याला । हे न साधे इतराला । आपणाला काय कळे ॥११२॥ दगडूनाथ चिलवंत । भाउᆬ प्रल्हाद येत सोबत । भाच्यांकडे पाहून रडत । दुःख होत बहिणीचे ॥११३॥ हा आहे मृत्युलोक । आले गेले किती एक । कितीही केला जरी शोक । नाही फरक पडणार ॥११४॥ जो नरजन्मासी आला । स्त्री-पुरुष भेद कशाला । आत्मा-आत्मी न म्हणती त्याला । भोग सर्वांला सारखे ॥११५॥ बैसविले समाधीस्थानी । मीठ घातले बाबांनी । बुजविले मातीलावुनी । आज त्याठिकाणी मंदिर ॥११६॥ गेली घराची मालकीण । मुले सांभाळील कोण । प्रश्न झाला निर्माण । होता निर्वाण आईचे ॥११७॥ ही आई नव्हती एकाची । लेकीची ना लेकाची । ती होती भक्तलोकांची । स्तुती फुकाची न केली मी ॥११८॥ सान्निध्यात जे जे आले । त्यांनी सुख अनुभवले । मी माझे आयुष्य वेचले । धैर्य खचले माझेही ॥११९॥ बाबांपासी बसलो निवांत । सोमवारचे मौनव्रत । अश्रू आले डोळ्यात । चित्र उभे राहत माउलीचे ॥१२०॥ नेम माझा सोमवारी । उपवासी बसावे मंदिरी । फराळाचे आई करी । भरविले जन्मभरी अखंड ॥१२१॥ अशा खिन्न सोमवारी । आतील शब्द आले बाहेरी । लिहिले एका कागदावरी । खेद अंतरी होतसे ॥१२२॥ डोळ्यात येती आसवे । एकांती कोणी पुसावे । स्वतः सावरून बसावे । चित्त असावे चिंतनात ॥१२३॥ आज आई सामावली । अनेकांची ती मावली । पोळल्या जीवाची सावली । श्रद्धांजली वाहिली मी ॥१२४॥ स्वभाव प्रेमळ, निर्मळ । सौख्याचे तेज तरळ । सेवाव्रत पाडी भुरळ । भाव अढळ पतिसेवा ॥१२५॥ लिहिता गळा होई रुद्ध । बाहेर उमटेना शब्द । इंद्रियेही होती स्तब्ध । अवरोध श्र्वासांसी ॥१२६॥ बोलणे मितभाष्य । हसणे स्मित हास्य। वागणे नित दास्य । सावकाश चालणे ॥१२७॥ योगिनी दिव्यव्रत । गृहिणी कार्यरत । संतसंगची सतत । दर्शने दुरित दूर जाती ॥१२८॥ शब्द मना लावी वेड । वैखरी ही गोड गोड । स्वानुभवाची त्यास जोड । अखंड हेच सदा ॥१२९॥ वत्सल माय वत्सला । वात्सल्याचा कळस झाला । आला कसा अवचित घाला । भांबावला जीव माझा ॥१३०॥ ध्यान करावे पतीचे । काम करावे गतीचे । हेच व्रत पतिव्रतेचे । शालीनतेचे वागणे ॥१३१॥ काय आली होती गार्गी । अनेका लावी ज्ञानमार्गी । निघून गेली सहज स्वर्गी । जे भागी त्यांनी पाहिली ॥१३२॥ पंचतत्त्वी तत्त्व मिसळले । शोकाचे डोंब उसळले । अनेक मातृछायेस मुकले । किती सुकले छायेविना ॥१३३॥ परमपूज्य माउली । नमन तिचे पावली । महादेवदास अपुली । श्रद्धांजली वाहतसे ॥१३४॥ मी कागदावरी लिहिले । बाबांनी ते पाहिले । थोडा वेळ स्तब्ध राहिले । उठून गेले बाजूला ॥१३५॥ पुढे काय लिहू आता । अध्याय करू पुरता । पुढे येईल जी कथा । वर्णन करता येईल ॥१३६॥ शब्दसुमनांजली वाहून । जडावले अंतःकरण । महादेवदास करी आत्मनिवेदन । थोर महिमान माउलीचे ॥१३७॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र पंधरावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ ॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment