अध्यायसत्र विसावे

श्री गणेशाय नमः ॥ नमो नाथा करुणाकरा । गुरुदेवा सर्वेश्र्वरा । केला संकल्प करी पुरा । ज्ञानीवरा गुरुदेवा ॥१॥ नाथांचे भक्त अगणित । थोडेच वर्णिले यात । माझा त्यांना प्रणिपात । मी सतत दर्शनाभिलाषी ॥२॥ नाथांचे शांतिमंदिर । भाविकांचे माहेर । निंबवृक्ष डौलदार । समाधीवर यादवांच्या ॥३॥ क्षण एक बसताखाली । सर्व कार्ये पूर्त झाली । पोळल्या जीवासी सावली । दूर पळाली आधी-व्याधी ॥४॥ त्रिविध तापे कुणी पोळी । त्याच्या दुष्कर्मांची होळी । नाथ माझा चंद्रमौळी । बसे यास्थळी निवांत ॥५॥ कडुनिंबाचा गारवा । लाख दुःखाची एक दवा । परिसराची शुद्ध हवा । शांत जीवा करीतसे ॥६॥ अनुभवी अनुभव घेती । नास्तिक ते आस्तिक होती । स्थळमहात्म्य स्वये गाती । पसरे ख्याती चोहीकडे ॥७॥ या हो नाथांच्या दरबारी । पवित्र या शांतिमंदिरी । ऐका नाथांची वैखरी । कळेल खरी दिशा तुम्हा ॥८॥ प्रथम करावा विचार । संयमित असा उच्चार । विषयरहित आचार । सदाचार सांगती ते ॥९॥ आईबाप जन्मदाते । सोपविले काळाचे हाते । सांभाळावे लागे नाते । मोक्षाचे उद्गाते सद्गुरू ॥१०॥ लासुरा गाव आहे एक । येथील पाटील त्र्यंबक । खुशाल यांचे कुलदीपक । महान साधक, तपस्वी ॥११॥ जाणकार सांगती येथ । आले मच्छिंद्र, गोरक्षनाथ । गुरुशिष्य एकसाथ । दैवत गावकर्‍यांचे ॥१२॥ वस्तीस मच्छिंद्रनाथ । शिष्यही गोरक्षनाथ । शेजारी कानीफनाथ । लिंगनाथ चवथे हे ॥१३॥ हेच ते पाटील टी़ के़ । मुक्ताईचे भक्त निके । अनेकांची मने जिंके । सर्वा ठाऊके लिंगनाथ ॥१४॥ आदिशक्ती मुक्ताबाई । लिंगनाथा आदेश देई । जो तिला नित्य ध्यायी । नवल काही यात नसे ॥१५॥ साधनेचे फलित साध्य । प्रसन्न होई आराध्य । इतरांसी जे असाध्य । प्रतिपाद्य ते त्यासी ॥१६॥ व्यासंग ज्याचा प्रचंड । तपस्वी जैसा मार्तंड । प्रज्ञा जागविली उदंड। सेवा अखंड मुक्ताईंची ॥१७॥ मुक्ताईंचा जसा आदेश । जगा देई तोच संदेश । असा महात्मा परमेश । लवलेश शंका नसे ॥१८॥ मी पाहिली अभंगगाथा । थोरांनी तुकवावा माथा । नमस्कार त्या लिंगनाथा । जन सुपंथा लागतील ॥१९॥ लासुरा झाले तीर्थक्षेत्र । विश्वगंगा पावन पवित्र । महामानवाचे कार्यक्षेत्र । पूज्य सर्वत्र भक्तिमय ॥२०॥ शिवनाभी याच ठिकाणी । नित्य वसे शूळपाणि । इतरत्र न ऐकिले कानी । म्हणूनी स्थलमहात्म्य ॥२१॥ शिवनाभी म्हणजे काय । शालीग्रामाची शीळा होय । गंडकीचे निर्मळ तोय । प्राप्त होय शिवकृपे ॥२२॥ एकदा मुक्ताईने दिला । आदेश या भागवताला । जाई वेगे हातरूणला । तेथे बैसला स्थितप्रज्ञ ॥२३॥ भव्य, दिव्य असे सुंदर । नाथांचे शांतिमंदिर । तेथे नांदे हा योगेश्र्वर । कृपाकर करुणामयी ॥२४॥ जाऊनी तयासी भेटी । तू गोरक्ष, तो चर्पटी । दोघे बसा एकेनेटी । तुम्ही शेवटी नाथबंधू ॥२५॥ लिंगनाथ येथे आले । भेटता एकरूप झाले । पे्रमसुखात चिंब न्हाले । काय बोलले ऐका ते ॥२६॥ तुम्ही चर्पटी, मी गोरक्ष । मुक्ताबाई सांगे प्रत्यक्ष । पांडुरंग यासी साक्ष । हे एक लक्ष असू द्या ॥२७॥ दोन संत, दोन नाथ । गोरक्ष, चर्पटीनाथ । बोलणे झाले एक साथ । हातात हात घेउᆬनी ॥२८॥ दोघांचे झाले बोलणे । परी मी काही न जाणे । मात्र बर्‍याच कालांतराने । याचा होणे उलगडा ॥ २९॥ शिवनाभीची माहिती । आणि तिची काय महती । ज्यासी होय तिची प्राप्ती । तो आधपती अग्रस्थानी ॥३०॥ टी़ के़, लिंगनाथ, त्र्यंबक । नावे तीन व्यक्ती एक । तुळशीराम गुप्ते शिक्षक । परमसेवक नाथांचे ॥३१॥ यांचे भेटीचा योग आला । सवे गेलो गिरड्याला । संतदर्शनाचा लाभ झाला । आलो लासुर्‍याला परत ॥३२॥ शिवनाभी आहे जेथे । आम्ही सारे गेलो तेथे । काही गावकरी होते । माहिती गुप्ते देते झाले ॥३३॥ ही शिवनाभी हरिहर । साक्षात विष्णू-शंकर । शालीग्राम शिळेवर । यवाकार खळगा असे ॥३४॥ यवाचा अर्धा भाग । या मधे छोटे लिंग । जो असेल महाभाग । त्यास मग प्राप्त होय ॥३५॥ या शालीग्राम शिळेवर । सात चक्रे त्यावर । क्षत्रियांस आधकार । पूजासंभार आर्पण्या ॥३६॥ याचे नाव संकर्षण । विष्णूचे रूप महान । शंख, चक्र, आयुधे जाण । कमळासन नाव ज्याचे ॥३७॥ शिवनाभी जेथे आहे । बारा कोस चौफेर पाहे । मृत्यू आल्या मोक्ष लाहे । महात्म्य राहे स्थळी या ॥३८॥ लांब कुठे मृत्यू झाला । कुंडातील पाणी देता त्याला । परत जन्मा नाही आला । मुक्ती पावला जीव तो ॥३९॥ हे लिंग असे ज्याच्यापाशी । भाग्यवान तो पुण्यराशी । फळ आले त्या तपासी । लासुर्‍यासी स्थापियले ॥४०॥ नामलगाव बीड पासी । तेथे भृशुंडी नामे ऋषी । बसले जेथे तापसी । त्रिवेणी संगमासी स्थान हे ॥४१॥ येथे गणेश आशापुरक । सकल आशेचा पे्ररक । त्याच कृपेचा परिपाक । मिळे चक्र शिवनाभी ॥४२॥ नमोनिया दोन्ही नाथा । लिहिली त्यांची ही गाथा । आदरभाव या पंथा । देती संथा ज्ञानाची ॥४३॥ मुक्ताईंचा हा आदेश । पोहचविला संदेश । सांगे हा महापुरुष । झाला संतोष दोघांना ॥४४॥ मधुकर कराळे भक्त । अकोटला झाले स्थित । हातरूणला सदा येत । दर्शन घेत बाबांचे ॥४५॥ पितृछत्रासी मुकले । आई वाढवी चिमुकले । दुःखी कष्टी शाळा शिकले । सार्थक केले जीवनाचे ॥४६॥ घरी काकाच एकटे । चिरंजीव असती छोटे । राबती शेतीत नेटे । फळ न भेटे मनाजोगे ॥४७॥ मजूर आणि शेतकरी । एकमेकांचे साथकरी । दोघे राबती शेतावरी । कोरडी भाकरी नशिबात ॥४८॥ साथ देईना सरकार । तशी पेढी सहकार । पिळून काढी सावकार । चवथा भिकार सोडीना ॥४९॥ जो जगाचा असे पोशिंदा । होय कष्टी शरमिंदा । रात्रंदिवस करी धंदा । तरी मिंधा कर्जापायी ॥५०॥ मज हा अनुभव आला । तोच मी वर्णिला। नाव बळीराजा याला । बळी गेला कर्जापायी ॥५१॥ कराळे विश्वनाथ । भाऊ गेला अकस्मात । झाला कठीण वज्राघात । वाटे जीवित संपवावे ॥५२॥ पिकेना कसदार शेती । सावकार घरी येती । थोडे फार त्यांना देती । परत घेती व्याजाने ॥५३॥ असे सारखे चालले । व्याज व्याजाने वाढले । दुष्टचक्रात सापडले । मनी बुरे भले येउᆬ लागे ॥५४॥ आले मग शांतिमंदिरी । बाबा जाणती अंतरी । तुम्ही विचार केला घरी । गोष्ट ही बरी आहे का ॥५५॥ बहुभाग्याने लाभे देह । यात नाही की संदेह । का करावा आत्मद्रोह । सोडणे गेह अनुचित ॥५६॥ उगीच करुनी संताप । आत्महत्त्येचेही पाप । आज दिसती जे व्याप । आपोआप जात उद्या ॥५७॥ सारी जमीन देवाची । कास्तकारी सेवा त्याची । ठेवा भावना मनाची । सार्‍या जनाची चिंता त्यासी ॥५८॥ पोळला जीव शांत झाला । मनात उत्साह भरला । बर्‍यापैकी लाभ आला । पालटला काळ आता ॥५९॥ शेती लागले वाहू । मुलाचा आधार बहू । पिकविती ज्वारी, गहू । सुखाने राहू लागले ॥६०॥ पुतण्या मधुकर कराळे । भाग्याचे खूप आगळे । नाथास मानिती सगळे । महत्व कळे संगाचे ॥६१॥ लग्न झाले, मुलगी झाली । दुसरी पोटात राहिली । पूर्ण वेळ भरत आली । परी भूतली येईचना ॥६२॥ वेळ जाईल उगा फुका । गर्भासह आईस धोका । म्हणे यासी काढून टाका । मत एका डॉक्टराचे ॥६३॥ रात्री हातरूणला आले । दर्शन नाथांचे घेतले । पायांशी निवेदन केले । जे का घडले सर्व काही ॥६४॥ काय बोलले नाथबाबा । काही दिवस थोडे थांबा । नको असा मनसुबा । कोवळ्या कोंभा डिवचणे ॥६५॥ बरा नव्हे गर्भपात । येणार्‍या जिवाचा घात । बाळ सुरक्षित गर्भात । नको आघात त्यावरी ॥६६॥ भांबेरीस जावे आधी । उमाळे जाणती औषधी । ती ही असे साधीसुधी । घेता व्याधी दूर पळे ॥६७॥ हे महाराज दामोदर । नित्य येती मंदिरावर । संतकृपा ज्याचेवर । यश अपार त्याठायी ॥६८॥ औषधीने आला गुण । सुखे झाले बाळंतपण । जन्मा आले कन्यारत्न । वाढे महिमान नाथांचे ॥६९॥ जवळ नाही खरी श्रद्धा । त्यास वाटे ही अंधश्रद्धा । नोळखती महासिद्धा । ऐशा बद्धा काय कळे ॥७०॥ पांडवांचा वंशज । आभमन्युचे क्षात्रतेज । गर्भात राखे सहज । गरुडध्वज सांभाळी ॥७१॥ राजनंदन परीक्षित । शुके बोधिले तयाप्रत । कथा पुराण भागवत । किती ऐकत उद्धरले ॥७२॥ कराळेची करुण कहाणी । सांगता दुःख होई मनी । परी नाथकृपेचा धनी । सतत मानी नाथांसी ॥७३॥ वडिलांचा झाला घात । बालपणीच हा आघात । छत्र कोसळले अकस्मात । वज्राघात पहिला हा ॥७४॥ तेल्हार्‍या जवळ थार । हे आईचे होते माहेर । मामांनी दिला आधार । थोडी पाखर दुखावरी ॥७५॥ पाटील वासुदेवराव । त्यांच्या घरी केला ठाव । पितृछायेचा अभाव । सोडले गाव सागद ॥७६॥ आघात गिळून सगळा । शिकू लागले शाळा । होता आजोबांचा लळा । खरा जिव्हाळा मायेचा ॥७७॥ कष्टाने झाले पदवीधर । सरकारी इंजिनियर । लागून गेले नोकरीवर । पडला विसर दुःखाचा ॥७८॥ काका-मामा दोघांनी । आणिले पहा या स्थानी । नाथ पाहिले डोळा भरुनी । नित्य भाव मनी उदेला ॥७९॥ दर्शनास आले एकदा । वंदिले त्या पूज्यपदा । गुरुमुखीच्या ऐक शब्दा । एकटे कदा फिरू नये ॥८०॥ चुकेना कधी कर्मभोग । सुख, ऐश्र्वर्य अथवा रोग । कधी कसा येईल योग । दैवभाग कळे कुणा ॥८१॥ मृत्यू-अपमृत्यू दोन । पाठीसी जन्मापासून । भगवंताचे करिता स्मरण । टळेल जाण अपमृत्यू ॥८२॥ मरण मात्र टळेना । कधी येईल कळेना । सदा सावध शहाणा । नामस्मरणा विसंबेना ॥८३॥ काय असेल ऋणानुबंध । जीवन-मरण संबंध । होईना काही अर्थबोध । ऐकती स्तब्ध कराळे ॥८४॥ एकदा दुचाकीवर । चालत गेले काही अंतर । समोरून जीपकार । आली अंगावर सरळ ॥८५॥ ठोस बसता गाडी उडे । उजव्या पायाचे तुकडे । रक्ताचे पडले सडे । सवंगडी पडे बाजुला ॥८६॥ कराळे तरी सावध । आज कळे अर्थबोध । नाही हरपली शुद्ध । झाला अवरोध रक्तासी ॥८७॥ लगेच दुसरी जीप आली । दवाखान्यात भरती झाली । डोळा दिसे नाथमाउली । पीडा गेली पायावरी ॥८८॥ डॉक्टर पाटील अविनाश । तीन वर्षे करी उपचारास । अपंगत्व आले पायास । दृढ विश्र्वास नाथांवरी ॥८९॥ नाथांच्या कृपेचे फळ । घरी खेळू लागे बाळ । मोटार राही सदा जवळ । प्रवास केवळ गाडीने ॥९०॥ बाबाराव रौंदळावासी । नित्य यायचे बाबांपाशी । उभयता दर्शनाभिलाषी । मुक्कामासी कधी कधी ॥९१॥ महाराष्ट्राचे सीमेवर । मुख्य मार्ग बर्‍हाणपूर । गाव छोटेसे इच्छापूर । मंदिर इच्छादेवीचे ॥९२॥ शोभाबाईचे माहेर । बाबाराव बापूचे सासर । स्थळ नयनमनोहर । भव्य मंदिर देवीचे ॥९३॥ एकदा यांच्या आले मना । बाबांना न्यावे त्या ठिकाणा । होकार मिळताच त्यांना । आनंद द्विगुणा जाहला ॥९४॥ करती लगेच तयारी । गाडी आली शांतिमंदिरी । बाबा, भक्तमंडळी सारी । गाडीमाझारी बसलेत ॥९५॥मधे लागले जळगांव । बाबांचे तेथे भक्तराव । तुकाराम पाटील नाव । यांचा ठाव तेथे असे ॥९६॥ बाबांच्या आज्ञेनुसार । मी गाठले त्यांचे घर । घेऊन आलो बरोबर । आनंदाचा पूर लोटला ॥९७॥ सारे गेलो इच्छापुरा । सुनील पवार यांचेघरा । शेतात मोठा भंडारा । निसर्गाचा वारा मंद वाहे ॥९८॥ भव्य अशा टेकडीवर । इच्छादेवीचे मंदिर । भव्य, दिव्य, मनोहर । निसर्गसुंदर रम्य स्थळ ॥९९॥ ही महान देवता । कामना पुरे इच्छा करिता । अनुभव दर्शने घेता । पूर्तता सर्वकार्या ॥१००॥ तेथे गर्द झाडी दाट । सावलीतून जाई वाट । पुढे मग अवघड घाट । देवीनिकट जाण्यासी ॥१०१॥ एवढ्या मोठ्या उंचीवर । नाथ चालती झरझर । विस्मय वाटे खरोखर । काकट शरीर काय यांचे॥१०२॥ झाले देवीचे दर्शन । शांत असे वातावरण । काही प्रदक्षिणा करून । मन प्रसन्न जाहले ॥१०३॥ बाबा म्हणती कराळे । वांछिले ते येथे मिळे । या माउलीच्या कृपाबळे । भाग्य फळे भाविकांचे ॥१०४॥ आहे जी मनात आस । इच्छादेवी देई त्यास । हा माझा पूर्ण विश्र्वास । पुरेल खास निश्र्िचत ॥१०५॥ असे जाता काही दिवस । भाग्य आले उदयास । फिटली मनीची हौस । पुत्र जन्मास आला की ॥१०६॥ भक्त होती सदा तृप्त । आपण मात्र आलप्त । समान सारे इष्टआप्त । यश प्राप्त म्हणुनिया ॥१०७॥ असा महात्मा होणे नाही । जातिभेद नसे काही । समानतेने सर्वां पाही । मस्त राही आत्मरंगी ॥१०८॥ पूर्वी नव्हती जटादाढी । न्हावी येऊन केस काढी । देवावर श्रद्धा गाढी । मिरवी न प्रौढी जगात ॥१०९॥ द्रपोटासाठी करती सोंग । तेथे कैचा पांडुरंग ।च्च् हा तुकयाचा अभंग । सांगे अंतरंग भक्तीचे ॥११०॥ आत पितळ, वर सोने । आकर्षित करी द्विगुणे । कसापाशी जाता नाणे । शहाणा जाणे एखादा ॥१११॥ नाव ठेविले आश्रम । अर्थ याचा अखंड श्रम । काना काढता अश्रम । उगीच भ्रम नको हा ॥११२॥ असे साधू खूप झाले । आश्रमावर घर चाले । वेषभूषेला महत्त्व आले । गळा लागले मासे किती ॥११३॥ करावा सुखाचा संसार । बांधा माडी अथवा घर । भार नसावा दुसर्‍यावर । असावा आधार कष्टाचा ॥११४॥ कष्टाशिवाय जगणे । संतासी लाजिरवाणे । सांगून गेले थोर शहाणे । तुका हाणे पाखरांसी ॥११५॥ माझा नाथ असा नाही । नागर-डवरे वाही । साक्षीस मी आहे पाही । सदाच राही आनंदी ॥११६॥ एकदा आम्ही जेवायाला । गेलो होतो पाळोदीला । माणिकरावचे घराला । छकडा आला उरळचा ॥११७॥ मुख्याध्यापक टोलमारे । पाथरीकर सवे धुरे । नाथांसहित आम्ही सारे । निघालो त्वरे जावया ॥११८॥ गावंडे गुरुजी, बाबुराव । गाठले पाळोदी गाव । जेवणे आटोपली सर्व । परत यावया निघालो ॥११९॥ मधे लोणाग्रा लागत । तेथील सोनोन नाथभक्त । ते होते वाट पाहत । येतील नाथ माक्या घरी ॥१२०॥ पण पुढे घडणार काय । जाणतसे नाथराय । छकडा पुढे निघून जाय । नाराज होय सोनोने ॥१२१॥ आम्ही थांबलो यांचे घरी । झाला चहा, पानसुपारी । ढग दाटले अंबरी । आली सरी पावसाची ॥१२२॥ झाला अवघा चिखल । चाके जाउᆬ लागली खोल । गाडी ओढेनात बैल । झाले हाल आमुचे हो ॥१२३॥ टोलमारे यशवंतराव । पोहोचले उरळ गाव । कृती नाथांची आभनव । येई अनुभव भक्तांसी ॥१२४॥ याच लोणाग्य्रात देख । होते पाटील शिक्षक । गुलाबराव नावाचे एक । भाविकभक्त जाणते ॥१२५॥ ज्योतिषाचा अभ्यास केला । कोणता ग्रह कुठे आला । नेहमी येती मंदिराला । काळ गेला कितीतरी ॥१२६॥ सोडून दिली नोकरी । झाले साधे शेतकरी । सुखे खावी मीठभाकरी । कष्ट करी शेतीचे ॥१२७॥ अध्यात्माची खूप गोडी । नाथाचा संग आवडी । गुरुकृपे असा छंद जडी । पातके बापुडी भस्म झाली ॥१२८॥ महादेवराव गाडेकर । पाटसूलचे राहणार । मुलगा उद्धव डाक्टर । करी प्रचार ग्रामगीतेचा ॥१२९॥ काय घडले एकदा । आम्ही गेलो पळसोदा । तेथील भक्त येती सदा । वंदिती पदा नाथांच्या ॥१३०॥ पाटसूलचा कार्यक्रम । ठरला होता आधी नेम । सात दिवस हरीनाम । करिती मुक्काम हरिभक्त ॥१३१॥ नंतर शेवटी काला । बाबांना निरोप आला । यावे आपण प्रसादाला । आनंद झाला सर्वांसी ॥१३२॥ पंढरी काळे घेण्याआले । चंद्रभान टवरे घेतले । भाउᆬ मधुकर पोतले । तिव्हाणे भले मोतीराम ॥१३३॥ बाबांसवे आम्ही सोबती । जाऊ लागलो गाडीवरती । बैलजोडी चपल आत । सहज गती पाटसूल ॥१३४॥ प्रसन्न झाले महादेवराव । डॉक्टर आले उद्धव । दर्शन घेती भाविक सर्व । होय गौरव नाथांचा ॥१३५॥ दर्शनार्थी जमले भारी । गर्दीचगर्दी दिसे सारी । या गाडेकरांच्या दारी । कोणी न वारी कोणासी ॥१३६॥ झाले काल्याचे कीर्तन । प्रसाद घेती भाविकजन । आज जेथे आश्रम महान । लागले चरण नाथांचे ॥१३७॥ रस्त्यालगत आश्रम आहे । तेथे ज्ञानाची गंगा वाहे । महद्भाग्य घडता हे । प्रसन्न राहे मन तेथे ॥१३८॥ ग्रामगीतेचा प्रचार । करिती महाराज गाडेकर । फिरुनिया देशभर । सेवा थोर कीर्तनाने ॥१३९॥ सर्वश्रेष्ठ ग्रामगीता । लिहिली गेली लोकहिता । तिचे पारायण करिता । भाग्यसरिता घरी नांदे ॥१४०॥ वाल्मीकी मठ सामदा । योगीवरांची संपदा । दर्शन लाभ घ्या एकदा । लोभ सदा असो द्यावा ॥१४१॥ हे तीर्थक्षेत्र महान । महर्षी वाल्मीकीचे स्थान । रामाआधी केले रामायण । पवित्र जाण ग्रंथ हा ॥१४२॥ दहिहांडा-दर्यापूर । मध्ये सामदा सडकेवर । पुरातन असे मंदिर । जीर्णोद्धार केला ज्यांनी ॥१४३॥ आज जे मठाधिपती । ऋषी म्हणुनी ओळखले जाती । गोड त्यांच्या काव्यपंक्ती । नित्य गाती घुसरकर ॥१४४॥ दर्शनास नाथांच्या येती । भजन-कीर्तन करिती । चर्चा चाले दिवसराती । आनंद देती-घेती दोघेही ॥१४५॥ हे महाराज ब्रह्मचारी । नाथ अमुचे संसारी । शुकदेव जनकापरी । मंदिरी घरी एक कार्य ॥१४६॥ जना करावा नित्यबोध । आत्मसुखाचा घेण्या शोध । चित्तासी अखंड वेध । त्यासी न बाध प्रपंचाचा ॥१४७॥ संसारी तुका, एकनाथ । जवळ त्यांच्या पंढरीनाथ । नामदेवाचे लग्नात । होता साक्षात भगवंत ॥१४८॥ रामदास, ज्ञानेश्वर । प्रपंचाच्या राहिले दूर । कसा करावा संसार । सांगती सार जीवनाचे ॥१४९॥ ब्रह्मचारी किंवा संसारी । भगवंताचे नाम उच्चारी । चित्त ज्याचे देवद्वारी । मुक्ती चारी साधील तो ॥१५०॥ मुक्ती म्हणावे कशाला । मोहपाश नाही ज्याला । जळात असुनी कमळदला । स्पर्श न झाला पाण्याचा ॥१५१॥ लोहार अग्नीसंगे खेळे । परी न त्याचे अंग पोळे । सांडशी आणि हातोडे । आपण वेगळे राहत ॥१५२॥ प्रथम भजावे निवृत्ती । सुटली प्रपंचआसक्ती । हानी लाभाची न गणती । आपण होती त्रयस्थ ॥१५३॥ भाग्यवश सुख मिळे । भोगील सुखसोहळे । दुःखही येऊन आदळे । चित्त न ढळे स्थितप्रज्ञ ॥१५४॥ निवृत्ती पुढे ज्ञानदेव । हा ईश्वर स्वयमेव । कृष्णार्जुनाची निजठेव । एकमेव यापासी ॥१५५॥ ज्ञानदेव मुखे गाता । देव ज्ञान देतो भक्ता । मगची कळेल मुक्ता । अनासक्ता शक्य हे ॥१५६॥ भक्तीने लाभे सोपान । दिशा दाविली गहन । मुक्ताचे सांगे लक्षण । निजखूण दावुनिया ॥१५७॥ तिघांची स्मरता नावे । मगची मुक्ताई पावे । मुक्तची झाला स्वभावे । किती गावे महिमान ॥१५८॥ मुक्ती मुक्ता शब्द एक । वैराग्य, ज्ञान, भक्तिजनक । तरले, तरती अनेक । मुक्ती, विवेक लाभेल ॥१५९॥ समर्थाघरचे श्र्वान । त्यासी जग हे देई मान । माझे मला ठावे ज्ञान । हे महिमान सद्गुरूचे ॥१६०॥ जे लिहून घेतील नाथ । तेच लिहितील माझे हात । नेहमी त्यांची साथ । वावगे यात काही नसे ॥१६१॥ असे हे चरित्र गहन । महादेवदास आत्मनिवेदन । तेच घेती लिहून । परमपावन ग्रंथ हा ॥१६२॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र विसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment