अध्यायसत्र सोळावे

श्री गणेशाय नमः॥ श्री नवनाथाय नमः । नवनाथांचा महिमा । प्रसिद्धीची झाली परिसीमा । महेशउमा ज्ञानदाते ॥१॥ आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र शिष्य झाला तयाचा । गोरक्ष लाभला भक्त साचा । गहिनीनाथांचा गुरू झाला ॥२॥ गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । शिष्य झाला ज्ञानेश्र्वर । विठ्ठलभक्त महाथोर । वारकर्‍यांचे माहेर पंढरी ॥३॥ भागवतधर्म पताका । चालवी जनार्दन एका । वैष्णवाग्रणी झाला तुका । पांडुरंग सखा नामयाचा ॥४॥ राष्ट्रसंत तुकडोजी । वंदनीय झाले समाजी । त्यांची भजने गाती रोजी । संत आडकोजी गुरू त्यांचे ॥५॥ हे सारे नाथसांप्रदायी । मूळ शिवाचे अनुयायी । शिव-विष्णू अन्य नाही । परंपरा ही जुनी असे ॥६॥ प्रमुख झाले नवनाथ । त्यांच्या शाखा वेगळ्या होत । वर तीन आले प्रख्यात । जालंदरनाथ, कानीफ असे ॥७॥ चरपटी, नागनाथ । भर्तृहरी, रेवणनाथ । हे तो जगद्विख्यात । हाच पंथ मम नाथांचा ॥८॥ हे नाथांचे योगी घराणे । हिंदीत नाथ जोगी म्हणे । मात्र एकच अर्थ शहाणे । जो का जाणे भाषा ही ॥९॥ जे जे दिसे या विश्र्वात । ते ते अपुल्या शरीरात । संतसंगाने कळे मात । शोधिती आत आपुल्या ते ॥१०॥ नाथ अपुल्या भक्तां सांगत । चक्र आहेत शरीरात । त्यांची संख्या अवघी सात । अनुभव घेत भक्तही ॥११॥ त्यांचे क्रमाने करा छेदन । योगाच्या क्रिया साधून । व्यान वाहे नाडीतून । अवरोधून श्र्वास वर जात ॥१२॥ प्रथमचक्र मूलाधार । स्वाधिष्ठान त्याच्यावर । मग लागे मणीपूर । अनाहत त्यावर चक्र ते ॥१३॥ विशुद्ध तसेच आज्ञा । जव जागी होईल प्राज्ञा । गुरूची झाल्यावर आज्ञा । ही संज्ञा प्राप्त होतसे ॥१४॥ मुख्य चक्र सहस्त्रार । सुषुम्नामार्गे जाता वर । तेथे अमृताचा पाझर । हीच धार सत्रावीची ॥१५॥ साधक असावा त्यागी । तपाचे तेज असावे अंगी । उपाधीविरहित महाभागी । त्याने यालागी अंगीकारावी ॥१६॥ एकदा आले रामनाथ । पळसोदचे सद्गृहस्थ । माक्या मुलीस धाडतो येथ । होईल साथ या बाईची ॥१७॥ तुमच्या घरात नाही बाई । सांभाळते अंजनाबाई । काही मदत करील तीही । असा जाई काहीवेळ ॥१८॥ बाबा वदले असे करा । ती या घराची मालकीण करा । सून म्हणून येईल घरा । सांभाळ सारा करील ती ॥१९॥ बाबा तिचे वय कमी । झेपेल का ही हमी । तुमचा शब्द पाळतो मी । आज्ञा तुम्ही कराल ती ॥२०॥ भाऊ महादेव आहेत घरी । आई माझी वडीलधारी । टाकतो मी कानांवरी । भेटतो माघारी परत ॥२१॥ अवघ्यांचे झाले एकमत । जालंदर करावा जामात । कन्या समर्पावी सालंकृत । पुण्य पदरात हे घ्यावे ॥२२॥ नव्या नात्यात उजाळा । परत जुना जिव्हाळा । परस्परात प्रेमाचा लळा । हा सोहळा आनंदाचा ॥२३॥ पंडित गिरिधरनाथ । निमकर्दा येथे राहत । बोलाविले त्यांना येथ । लग्न निश्चित कराया ॥२४॥ लग्न ठरले शांतिमंदिरी । विठ्ठलमंदिरासमोरी । स्थळमहात्म्य सर्वांतरी । प्रेम अंतरी सर्वांच्या ॥२५॥ भव्य दिधला शामियाना । शोभेच्या वस्तू नाना । पाहुणे येती पत्रिकेविना । हा मोठेपणा संताचा ॥२६॥ बाबा न थांबले येथ । निंबाखाली बैसले निवांत । सुरंसे महादेवनाथ । जोडुनी हात विनविती ॥२७॥ प्रथम मंगलस्मरण । यथाविधी पाणिग्रहण । मंगलाष्टके वदती ब्राह्मण । हारार्पण होत मग ॥२८॥ सविता आणि जालंदर । दोघे शोभती वधूवर । बाबाही आले नंतर । अक्षता डोईवर घातल्या ॥२९॥ एवढ्या मोठ्या मंडपात । बसली महापंगत । सुरंसे बंधू खर्च करीत । उणीव किंचित असेना ॥३०॥ सालंकृत कन्यादान । हे पुण्य बोलले महान । केले असे रामनाथे शब्दा जागून । केली बोळवण वधूची ॥३१॥ आता घरी आली सविता । दोन लेकरांची झाली माता । नलिनी आणि श्याम होता । नवराच्या हाता झोंबती ॥३२॥ बाबा म्हणती सविताबाई । मला मिळाली माझी आई । उणीव भरून सारी जाई । मालकीण होई घराची ॥३३॥ जालंदर झाला मालक । कुटुंबाचा कर्ता चालक । नलिनी, श्याम बालक । हा झाला पालक सार्‍यांचा ॥३४॥ बाबांकडे भक्त येती । नावे सांगावी ती किती । सत्संगाच्या चर्चा होती । भजने गाती काही भक्त ॥३५॥ पुंजाजी डांगे नावाचा । हा प्रसाद यादवांचा । भक्त होता अनुभवाचा । आवडीचा बाबांच्या ॥३६॥ चर्चेत रंगून जाई । डोळ्यांमधुनी पाणी येई । तुका-नामाचे अभंग गाई । खरा सांप्रदायी वारकरी ॥३७॥ एक पाटील मोतीराम । शेळके हे उपनाम । कंचनपूर हेच ग्राम । करीत मुक्काम बाबांकडे ॥३८॥ जवळ मालवाडा गाव । तेथील ठाकरे अमृतराव । ओठीपोटी पे्रमभाव । मनात हाव ज्ञानाची ॥३९॥ बाबास एकच छंद । वाचे जपावा गोविंद । आल्या गेल्या देत आनंद । दुसरा फंद नाही मुळी ॥४०॥ भेद नव्हता बाबांपासी । अपुला परका कोणासी । जन्मभर सांभाळिले त्यासी । हे इतरांसी साधेना ॥४१॥ पार्वती इंगळे नावाची । गुरुबहीण बाबांची । देखभाल केली तियेची । जोपासना नात्याची केली असे ॥४२॥ बाईचे होते माहेर । लग्नात बाबांचा आहेर । कर्तव्यास ना आप-पर । कर्तव्य पार पाडी आधी ॥४३॥ देवराव पाटील सुकळी । गाव दहीहांड्याजवळी । दर्शना येती वेळोवेळी । भाव पदकमळी बाबांच्या ॥ ४४॥ सुपुत्र गजानन दाळू । तेही लागले प्रथा पाळू । वडिलांचे नाते सांभाळू । पायी वारी हळू केली असे ॥४५॥ लोतवाड्याचे खोरगडे । येत होते बाबांकडे । देवकाला घेऊन कडे । आले इकडे दोघेही ॥४६॥ सोबत देवकाची आई । चालत आले पायीपायी । कानटोपी बांधली डोई । हावभाव काही वेगळे ॥४७॥ म्हणती बाबा हिला सांभाळा । देवधर्माचा हिला लळा । इष्ट मानी गोपाळा । नेहमी सगळा पूजापाठ ॥४८॥ बाबा म्हणाले राहू द्या । कशी वागते पाहू द्या । मुक्काम करा, जा उद्या । सुखे असू द्या मंदिरी ॥४९॥ बाबांच्या या बोला । सगळ्यांनी होकार दिला । रात्रीचा मुक्काम झाला । दिवस उगवला दुसरा ॥५०॥ सारे गेले अपुल्या घरी । बाई थांबली मंदिरी । मूर्ती कृष्णाची जवळ धरी । प्रेम करी त्याचेवर ॥५१॥ घरधनीण सविताबाई । कामाची सदाच घाई । भक्तांची गर्दी होई । वाटे नवाई आजघडी ॥५२॥ काय सांगू बाबांची थोरी । नलिनी लहान खांद्यावरी । देवकाचे बोट धरी । चिखलात मंदिरी जाताती ॥५३॥ घरी गोळा झाले फार । सवितास कष्ट अपार । एवढा कामाचा भार । करणार ती एकटी ॥५४॥ शेजारी घरात एका । राहती अवधूत काका । श्यामला रोज देत हाका । हा तर बोका टपलेला ॥५५॥ त्यांचेकडे दुभती गाय । यास मिळे वरची साय । आजी झाली त्याची माय । नेहमी जाय दूध पिण्या ॥५६॥ एकाने पोपट आणला । पिंजरा मंदिरात टांगला । बाबांनी सोडले त्याला । मोकळा झाला रावा तो ॥५७॥ मंदिरात खेळेबागडे । मुक्त संचार इकडेतिकडे । रामनामाचे घेत धडे । तो आवडे सर्वांना ॥५८॥ बाईसंगे स्नानास जाई । परतून मंदिरी येई । पेरूची फोड हळूच खाई । कौतुक होई सर्व त्याचे ॥५९॥ बाबा, मी जाता शेताकडे । सोबत येई फिरे उडे । परत येई आम्हाकडे । कुणीकडे कधी जाईना ॥६०॥ कुणाची आली दमणी, गाडी । त्यावर बसे, मारे उडी । जाय नाला पैलथडी । परी गोडी मंदिराची ॥६१॥ मी जाता मंदिरात । समोर येई धावत । खांद्यावरी येऊन बसत । असे स्वागत नित्याचे ॥६२ ॥ एक घडला प्रसंग । लिहितो तेवढा सांग । मंदिरात सुरू सत्संग । आला सुयोग कसा हा ॥६३॥ बाबा बसले बाहेरी । कडब्याचा मांडव वरी । भक्त बैसले शेजारी । एकजण काहीतरी सांगा म्हणे ॥६४॥ काय बोलती नाथबाबा । शांत बसा, थोडे थांबा । तुम्हा वाटेल अचंबा । प्रसादा आंबा येत आहे ॥६५॥ साधुबुवा पंढरीनाथ । येतील भजने गात गात । बायांची सोबत साथ । पहा प्रचित आता ही ॥६६॥ ते करतील प्रवचन । गुरुगजाननस्तवन । गोड गोड तंबाखू वाटून । देतील ज्ञान आपणासी ॥६७॥ खरेच आले साधुबुवा । सोबत भक्तांचा थवा । बाबांचे बोल अनुभवा । दिसे देखावा समोर ॥६८॥ दिवस होता रविवार । येत बाबांच्या समोर । करण्यालागी नमस्कार । घेती पायावर लोटांगण ॥६९॥ बाबा म्हणती साधुबुवा । काही सांगा श्रमल्या जीवा । भक्तीचा मार्ग दाखवा । सुलभ व्हावा प्रपंच ॥७०॥ प्रवचन झाले सुरू । जय जय गजाननगुरू । सारे भजन लागले करू । ईश्वरास स्मरू लागले ॥७१॥ पांडुरंग गव्हाळे भक्त । साधाभोळा अनासक्त । नेहमीची सोबत । सेवारत सर्वस्वी ॥७२॥ ही प्रवचनाची परंपरा । सांभाळिती गावंडे तेल्हारा । रविवारी येरझारा । ज्ञानाचा झरा अखंड ॥७३॥ तुळशीराम डामरे । नाथांचे सेवक बनले खरे । संग्रही प्रवचन सारे । हे लिहिणारे चित्रगुप्त ॥७४॥ अंदुरा येथून येती पायी । ऊन-पाऊस पर्वा नाही । अद्याप वारी चुकली नाही । हजर राही रविवारी ॥७५॥ टोलमारे मुख्याध्यापक । बनले बाबांचे सेवक । प्रवचने केली अनेक । सदा भूक अध्यात्माची ॥७६॥ साथीस एक पाथ्रीकर । रामभाऊ मनब्देकर । दोघे येती बरोबर । कार्य निरंतर त्यांचे हे ॥७७॥ कळसकर महादेव । उरळ येथे असे ठाव । दर्शनास येती जव । म्हणती गुरुराव बोला थोडे ॥७८॥ नारायणराव तायडे । मुलांना शिकविती धडे । येत सदा हातरूणकडे । लाभ घडे दर्शनाचा ॥७९॥ नाथांची कृपा झाली । व्यसना देत तिलांजली । भाग्यरेषा फळा आली । सापडे गुरुकिल्ली ज्ञानाची ॥८०॥ श्रोत्यांची गर्दी होत आत । माप चाले वार्‍याहाती । नावांची न करवे गणती । ही महती स्थानाची ॥८१॥ प्रत्येकाची येत शिदोरी । पोळीभाजी, साधी भाकरी । कुणाचे लाडू आणि पुरी । चटणी, कोथिंबिरी कुणाची ॥८२॥ सारे करून एकाजागी । अन्न ठेवीत मध्यभागी । बाबांची खिचडी मनाजोगी । सेविती महाभागी भक्त ते ॥८३॥ असा हा गोपालकाला । भाग्य लाभे खावयाला । गोकुळीचा कृष्ण आला । जेवायाला भक्तांसवे ॥८४॥ एक डॉक्टर कृष्णमूर्ती । कविरत्न ज्ञान आत । शांतिमंदिरी सदा असती । प्रवचने होती त्यांचीही ॥८५॥ आवडे बाबांचा सहवास । बोलण्याची तर्‍हा खास । उभे राहता प्रवचनास । मनी उल्हास श्रोत्यांच्या ॥८६॥ प्रगाढ पंडित, महाज्ञानी । कणखर ओजस्वी वाणी । बोल निघती मुखातुनी । ऐकणारांनी तृप्त व्हावे ॥८७॥ मी भाळलो भाषेवरी । मला सांगती परोपरी । चुका माक्या दुरुस्त करी । सुख अंतरी वाटे मला ॥८८॥ सोबत पाटील बाजीराव । विनोदी लेखक चिखलगांव । बाबांपासी सदा ठाव । जडला भाव नाथांपायी ॥८९॥ बोलणे सदा विनोदी । अर्थ सांगती मर्मभेदी । चेहरा नेहमी आनंदी । प्रवचनात बोधी श्रोत्यांना ॥९०॥ बाबांसंगे फिरे जोडी । अध्यात्माची लागली गोडी । संतचरित्राची आवडी । बदलली घडी जीवनाची ॥९१॥ परमार्थाचा लागला ध्यास । त्यात संताचा सहवास । पूर्वसुकृत आले उदयास । लागली आस वेगळी ॥९२॥ जीवन संपेपर्यंत । धरली नाथांची संगत। रविवारी प्रवचन होत । गुण गात ईश्र्वराचे ॥९३॥ एक भक्त महानुभाव । सत्संगाची मनात हाव । मोरखडे बापूराव । मोरझाडी गाव शेजारी ॥९४॥ महानुभाव सांप्रदायी । निष्ठा चक्रधर स्वामींपायी । आहंसाव्रताचे अनुयायी । निष्ठा पायी बाबांच्या ॥९५॥ विजयादशमीआधी । अष्टमी-नवमीच्या मधी । रेडा-बकर्‍याचा पूजाविधी । नंतर त्यासी वधी देवीभक्त ॥९६॥ अशी होती जुनी रूढी । चालत आली पिढ्यान्‌पिढी । त्यात दारुची धुंदी चढी । सांगा केवढी ही दुर्बुद्धी ॥९७॥ गावात सगळा धिंगाणा । गाती, नाचती अंगणा । दांडगट करती मूर्खपणा । हे पाहवेना शहाण्यांसी ॥९८॥ काही फिरती मर्द बाकडे । दारास मांसाचे तुकडे । गाती वेडे वाकडे । जिकडेतिकडे अनर्थ ॥९९॥ शांतीप्रिय महानुभाव । या दिवशी सोडती गाव । विजनवास या नाव । दूर जावं कुठेतरी ॥१००॥ हे जाती निर्जन स्थळी । पाहती विहीर अथवा तळी । गोळा होत सारी मंडळी । पूजा सगळी सोबत ॥१०१॥ बाबांस तेथे घेऊन जाती । पोथी-पूजा, करती आरती । स्वयंपाक त्या जागेवरती । नैवेद्य समर्पिती चक्रधरा ॥१०२॥ लीळाचरित्र गौरव । आहंसा ही सत्यमेव । संबोधिती बापूराव । हे वैभव त्या काळचे ॥१०३॥ बाबांवरी प्रेम आत । येत दिवसा कधी राती । आनंदाने भजने गाती । साथ देती बाबाही ॥१०४॥ शिंगोलीचे सदाशिव । पाटील भाऊ महादेव । बाबांस मानिती देव । पे्रम अतीव दोघांचे ॥१०५॥ बाबाच त्यांचे खरे इष्ट । हे मेहनती करिती कष्ट । पिकाचे साधून उद्दिष्ट । सदा संतुष्ट राहती ॥१०६॥ विधवा केशरबाई । प्रेम सदाच बाबांचेठायी । डबा बाबांस आणत जाई । चवीने खाई महात्मा ॥१०७॥ एक नाथांचे परममित्र । दत्तू पाटील कृपापात्र । जिवलग खेळती एकत्र । भेद अणुमात्र असेना ॥१०८॥ यांचे दत्तकपुत्र गोविंद । त्यांना दर्शनाचा छंद । अनुभविले कष्ट, खेद । आज आनंद याघरी ॥१०९॥ हाच पूर्वीचा प्रल्हाद । घरात झाला वितंडवाद । मामास मागण्या गेले दाद । दिला न प्रतिसाद मामांनी ॥११०॥ संसार दुःखे दुखावला । त्रिविध तापाने पोळला । मनात वाईट विचार आला । आता जगण्याला अर्थ नाही ॥१११॥ पोटात वाढली भूक । पाण्याविना सुकले मुख । किती सोसावे हे दुःख । संपवू रुखरुख मनाची ॥११२॥ आत पेटे धगधग । पाठ सोडीना कर्मभोग । करावा वाटे देहाचा त्याग । सोडावे जग स्वार्थी हे ॥११३॥ निर्जन पाहिले स्थळ । कुणी दिसेना जवळ । तापले रेल्वेचे रूळ । झोपले सरळ त्यांवरी ॥११४॥ लगेच आला एक म्हातारा । रागे म्हणे उठ पोरा । आवाज गाडीचा ऐक जरा । ओढे फरफरा गोविंदासी ॥११५॥ चार पावले सोबत आला । मधेच कोठे अदृश्य झाला । सदरा घामाने होत ओला । आले दर्शनाला नाथांच्या ॥११६॥ नाथ माझा अंतर्ज्ञानी । न सांगता सर्व जाणी । रागावून बोलती त्याक्षणी । करशी करणी विचित्र ॥११७॥ पाटील कापे थरथरा । डोळ्यातून वाहती धारा । चुकलो बाबा माफ करा । घ्या पदरा बालकासी ॥११८॥ हातात घेउᆬन हात । नेउᆬन बसविले घरात । करू नये आत्मघात । सांगती मात हिताची ॥११९॥ देह देवाचे देउᆬळ । आत्माराम वसे अढळ । त्याची करू नये आबाळ । व्हावा सांभाळ योग्यरीती ॥१२०॥ अनंत जन्माचे फेरे फिरता । नरदेह लाभला हाता । कळावी त्याची महत्ता । अपुल्या हिता वर्तावे ॥१२१॥ देहाने घडती साधना । ईश्र्वरभक्ती आराधना । देह ओळखी नारायणा । हे कळेना अज्ञ जीवा ॥१२२॥ हे छोटेसे खेडे शिंगोली । साधी भाषा, विनम्र बोली । मधे मढीची एक खोली । सायंकाळी जमती सारे ॥१२३॥ कथा, भजन, आरती । तालस्वराने सारे गाती । श्रद्धा रामायणावरती । कधी करती नाटक ॥१२४॥ व्यवसाय एकच शेती । कष्टकरी सारे मेहनती । गाव नांदे ऐशारीती । उणीव कोणती नसे हो ॥१२५॥ वतनदार जानराव । साधुबुवा म्हणती गाव । ईश्वरावर ठेऊन भाव । नेहमी असाव निश्चिंत ॥१२६॥ जरेने जर्जर झाले अंग । सोडावा वाटे देहसंग । ध्यानी मनी पांडुरंग । अंतरंग भक्तिमय॥१२७॥ बाबांलागी निरोप आला । यावे मला भेटायाला । हे निघाले शिंगोलीला । घेतले मला बरोबर ॥१२८॥ साधुबुवांच्या कंठी प्राण । अंगी नव्हते काही त्राण । म्हणती बाबा हे दक्षिणायन । अधोगती होईल जाण वाटते ॥१२९॥ काय बोलती पुण्यराशी । गुरू गजानन शेगाववासी । निघून गेले याचमासी । ऋषिपंचमीसी अवलिया ॥१३०॥ बाबांचे ऐकले बोल । ते शब्द खरे अनमोल । विचार करुनी सखोल । सावरती तोल साधुबुवा ॥१३१॥ म्हणे आपुले चरणरज । मजला भेटले सहज । उद्धरलो खरा आज । संपली गरज, काही नको ॥१३२॥ तुटले सारे आशापाश । जवळ बोलाविले मुलास । पंचमी ठरविला दिवस । जाणार खास याचदिनी ॥१३३॥ खरेच गेले त्यादिवशी । झाले तपस्वी ऋषी । समाधी दिली गावापाशी । भूषण गावासी आज हे ॥१३४॥ साधुबुवांची मुले-सुना । ओळखती त्या पाऊलखुणा । येती नाथांच्या दर्शना । किती ललना शिंगोलीच्या ॥१३५॥ रामराव ठोकणे उभयता । चालू ठेवती ही प्रथा । विसरती न कधी नाथा । चालले आतापर्यंत ॥१३६॥ पूर्णाजी चोपडे, आसरू लाखे । गुरुवारी येती सारखे । त्रास कितीही झाले वाखे । परी न पारखे दर्शना ॥१३७॥ येत नेहमी गुरुवारी । अखंड चाले सदा वारी । असे दिवस कितीतरी । होय फेरी भक्तांची ॥१३८॥ लाखे झाले कीर्तनकार । जनसेवेचा अंगीकार । हरिपाठ जनजागर । चाले व्यवहार नामाचा ॥१३९॥ जनसेवेचे घेतले व्रत । हरिपायी जडले चित्त । प्रभुनामी झाले रत । साधले हित जीवनाचे ॥१४०॥ शिक्षक झाले चोपडे । परमार्थाचे घेती धडे । नेहमी येती बाबांकडे । जवळ खेडे नोकरीचे ॥१४१॥ आवडे नाथांचा सहवास । मंदिरी करती वास । पुढे आले हातरूणास । राहण्यास घर बांधले ॥१४२॥ हे मनमिळाऊ शिक्षक । श्रद्धाळू अत्यंत भाविक । बाबांचे होऊन पाईक । झाले स्थायिक येथेची ॥१४३॥ श्यामची आई पूर्वी गेली । आजी आता आजारी झाली । ती अकोला येथे नेली । निराशा आली पदरात ॥१४४॥ तेथे पुरुषोत्तम सालफळे । म्हातारीस बघून कळवळे । डॉक्टरांना भेटे वेळोवेळे । होणारे न टळे सहसा ॥१४५॥ जगण्याची सुटली आशा । पदरी आली निराशा । अखेर गुंडाळला गाशा । झाली मोहपाशानिराळी ॥१४६॥ अवधूतबुवा विधूर । परत नाथांचे घर । शिक्षणास श्याम गेला दूर । झाले समांतर सारखे ॥१४७॥ हा नागपुरास जाता । यासी मिळती मातापिता । सनाथ झालासे आता । नुरे चिंता कशाची ॥१४८॥ सौभाग्यवती मालपेबाई । झाली श्यामची आई । मालपे सर पित्याठायी । शिक्षण घेई तेथे हा ॥१४९॥ करुनी नाथांचे स्तवन । अध्याय करू हा पूर्ण । ते घेती जे जे लिहून । तेच निवेदन तुम्हापुढे ॥१५०॥ मी कळसूत्री बाहुली । वदवून घेई नाथमाउली । कल्पतरू देत सावली । चिंता निमाली अवघीच ॥१५१॥ हे नाथांचे पे्ररण । महादेवदास आत्मनिवेदन । नाथ घेती वदवून । भक्ती पारखून माक्या मुखे ॥१५२॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र सोळावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment