अध्यायसत्र चोविसावे

श्रीगणेशाय नमः॥ नमो नमो श्री गुरुनाथा । पदकमळी ठेवी माथा । तुज कळे हे सर्वथा । काय ग्रंथानिमित्त ॥१॥ माझा नव्हता अट्टाहास । तूच लाविले लिहावयास । तरी नेई पूर्णत्वास । माझे साहस कमी पडे ॥२॥ नाही देहाचा भरवसा । दिवस जातो कसाबसा । तुझे भक्त देती दिलासा । प्रेमात असा बांधलो मी ॥३॥ अनमोल अशी ही काया । जाऊ नये उगीच वाया । शरण जात असे गुरुपाया । सांभाळा या देहालागी ॥४॥ तरण्या भवसागरू । तुझे चरण नौकातारू । आम्ही प्रवासी उतारू । नेशील गुरू पैलतीरा ॥५॥ हा विश्र्वास ठाम मनी । मोक्षसुखाचा तू धनी । इतरास मी न मानी । शरण म्हणोनी आलो असे ॥६॥ विवेक, वैराग्य दोन्ही । भोपळे दोहीबाजुंनी । भवसिंधू तराया लागुनी । झालो मनी निर्भय ॥७॥ लाज, भीती आणि शंका । दूर गेली आता देखा । तारील तव चरणनौका । निर्धार पक्का हा एक ॥८॥ तेल्हारा तालुक्यात । वांगेश्र्वर संस्थान प्रख्यात । कित्येक संत-महंत । वास्तव्य पुनीत त्यांचे इथे ॥९॥ ही पुरातन असे संस्था । गाई राखण्याची व्यवस्था । ज्यांना गाईंबद्दल आस्था । त्या गृहस्था नमीत मी ॥१०॥ घरोघरी गाई पाळा । हे आवडे गोपाळा । संत-सज्जनांचा निर्वाळा । म्हणे सांभाळा गाईंसी ॥११॥ जेथे असे गोरक्षण । तिथेच तो गोपाळकृष्ण । उद्धवा सांगे भगवान । ठिकाण अन्य नव्हे माझे ॥१२॥ गाईपासून पंचगव्य । वैद्यक शास्त्र सांगे सेव्य । रसायन महा दिव्य । आरोग्यमय होण्यासाठी ॥१३॥ दूध, दही, ताक, लोणी । गोमूत्र बहुलक्षणी । औषधी म्हणून घेती कोणी । अवघे गुणी हितकारी ॥१४॥ गाईचे होय संरक्षण । हे भाग्याचे लक्षण । खत होईल निर्माण । असे हे शेण मोलाचे ॥१५॥ गाईपासून बैल निपजे । नांगर, वखर, वाही बोजे । प्रवासाच्या येई काजे । आपुल्या गरजेसाठी हे ॥१६॥ काही महाभाग निर्दयी । कसायास देती गाई । मांस विकती कसाई । हानी होई अपरिमित ॥१७॥ एक गाय कमी झाली । पुढे वासरे न जन्मा आली । चुकांचे फळ भोगू लागली । नष्ट झाली गोधने ॥१८॥ जवळच एक तळेगाव । तेथे जन्मले भक्तराव । संपत जयाचे नाव । मच्छिंद्र देव मानी जो ॥१९॥ हरिश्र्चंद्र अमरावते । यांचे हे वडील होते । नाथसंप्रदाय प्रिय ज्याते । भजनाते रमती जे ॥२०॥ मुलगा-मुलगी, सून घरी । प्रपंच हा सुखे करी । भजनात गोडी तरी । कधी न विसरी देवासी ॥२१॥ आदिनाथ गुरू शिव । मच्छिंद्रा लाभे ज्ञान ठेव । गोरक्ष शिष्य एकमेव । ज्ञानाची ठेव त्यास मिळे ॥२२॥ पुढे वाढल्या अनेक शाखा । हा सांप्रदाय वाढे सारखा । यातील एक भक्तसखा । ज्याच्या उल्लेखा करतो मी ॥२३॥ त्यांची एक कन्यका । नाव जियेचे अलका । सून कानपुरेची देखा । नाथसेविका जी असे ॥२४॥ संपतबुवा झाले नाथ । दैवत त्यांचे मच्छिंद्रनाथ । परंपरेने दीक्षा घेत । नित्य येत बाबांकडे ॥२५॥ एकत्र होती दोन्ही नाथ । चर्चा चाले एकसाथ । भाऊ मानी माझा नाथ । हातात हात घेवोनी ॥२६॥ नमस्काराची रीत खास । मुखे म्हणती बुवा आदेश। नित्य असा सहवास । आनंदास पार नाही ॥२७॥ पूर्णेत करावे स्नान । नंतर देवपूजन । काही शिष्यत्व पत्करून । देती मान संपतनाथा ॥२८॥ असा बराच काळ गेला । शिष्य परिवार गोळा झाला । जरा-मृत्यू न सोडी कुणाला । असो भला पंडित-ज्ञानी ॥२९॥ संपतनाथांचे काही भक्त । हातरूणला नित्य येत । गंगानाथ प्रमुख त्यात । येऊन भेटत बाबांना ॥३०॥ बाबांपाशी समभाव । भेदभावा नाही वाव । रंक असो अथवा राव । आदरभाव सारखा ॥३१॥ बौद्ध असो मुसलमान । ख्रिश्र्चनासी तोच मान । फक्त हे एकच ठिकाण । दिसे न आन मजलागी ॥३२॥ गंगानाथ तायडे । शिक्षण घेऊन झाले बडे । कष्ट घेतले केवढे । गेले पुढे विद्येमुळे ॥३३॥ विद्यार्थीदशा अभ्यासक । पुढे झाले अध्यापक । बुद्धी सर्वसमावेशक । नाथांचे पाईक त्यातही ॥३४॥ येउᆬन नाथ दरबारी । कधी प्रवचनाची बारी । बोलणे मधुर भारी । अंगीकारी लीनता ॥३५॥ नित्य नाथांचा मनी ध्यास । काही योगाचा अभ्यास । एकदा पूजा समयास । समोर प्रकाश दिसू लागे ॥३६॥ शरीर झाले पुलकित । रोमांच अंगी उभे राहत । मी हे काय पाहत । अश्रू वाहत डोळ्यातुनी ॥३७॥ लगेच आले नाथांभेटी । जे साठवले होते पोटी । निवेदन केले शेवटी । होत संतुष्टी दोघेही ॥३८॥ नाथांवरी भारी प्रेम । दर्शनाचा नित्यनेम । अजुनी चाले हा क्रम । कार्य उत्तम चालले ॥३९॥ साधक असावा उदास । गळो बंधने-मोहफास । गुरुघरी सहवास । अलभ्य त्यास लाभ होय ॥४०॥ विहित कर्म करणे लागे । चित्तशुद्धी तयायोगे । चित्त शुद्ध झाल्यामागे । ज्ञान उमगे त्या पाठी ॥४१॥ म्हणुनी कर्मप्रधान । ज्ञानप्राप्तीचे कारण । मल, विक्षेप, आवरण । जाय निघून सहजची ॥४२॥ ज्ञान प्राप्त झाल्याविना । गुरुमहात्म्य कळेना । गुरुविन मार्ग आकळेना । कर्मही फळेना, वंचना ही ॥४३॥ जरी होय ज्ञानप्राप्ती । अधर्मकर्म आचरती । इहपरसौख्याप्रती । झाली अधोगती निश्र्िचत ॥४४॥ जोवरी अज्ञान प्रवृत्ती । तोवरी संसारी आसक्ती । आत्मज्ञान लाभल्यावरती । झाली निवृत्ती विषयसुखा ॥४५॥ अहंभाव निघून गेला । धर्माधर्म कळे त्याला । शुभाशुभविरहित झाला । संसारी राहिला आलप्त ॥४६॥ शत्रूसही मानी मित्र । सगे असो वा सावत्र । एकची भाव सर्वत्र । इहपरत्र सुखी तो ॥४७॥ कनक आधक कांता । मनी आवडे ज्या भ्रांता । लोभ वसे सदा चित्ता । तो खर्‍या हिता आचवला ॥४८॥ होण्यालागी आत्मबुद्धी । प्रथम पाहिजे चित्तशुद्धी । दूर साराव्या उपाधी । गुरूस आधी शरण ॥४९॥ असो काही दिवसांनी । देह सोडला संपतनाथांनी । पावननदी पयोष्णी । त्याठिकाणी समाधी असे ॥५०॥ मग शिष्यपरिवार । मुलांसह करती विचार । बांधावे समाधिमंदिर । प्रतीक सुंदर मूर्तीचे ॥५१॥ मूर्ती बसवू संपतनाथांची । गुरुवर्य मच्छिंद्रनाथांची । प्रार्थना करू महादेवनाथांची । पूजा त्यांचे हाताची प्रथम ॥५२॥ मग त्यांचा भक्तपरिवार । गोळा झाला एकवार । खर्चास झाले तयार । होते आखर स्वतःचे ॥५३॥ आडसूळ-वांगेश्र्वर । रस्ता पूर्वीचा तयार । तळेगाव या रस्त्यावर । झाले मंदिर द्वयनाथांचे ॥५४॥ पूर्णेचा पावन परिसर । जवळ मठ वांगेश्र्वर । उभारले भव्य मंदिर । भक्त उदार लोकांनी ॥५५॥ गंगानाथजी तायडे । नित्य लक्ष बाबांकडे । भक्तिरसाने झाले वेडे । अनेक जोडे सहकारी ॥५६॥ झाली मंदिराची बांधणी । मूर्ती आणल्या त्याठिकाणी । मच्छिंद्र-संपत नाथ दोन्ही । आनंद मनी भाविकांच्या ॥५७॥ मग भक्त गंगानाथ । निघून आले पहा येथ । आजारी महादेवनाथ । दर्शन घेत प्रेमभावे ॥५८॥ वंदुनी ते पूज्य चरण । पायांसी केले निवेदन । अपुल्या करकमले जाण । मूर्ती स्थापन करावी ॥५९॥ मनात धरून आलो आस्था । परी पाहिली ही अवस्था । आता काय करावी व्यवस्था । बुद्धिदाता तुम्हीच की ॥६०॥ आपुली आज्ञा असेल जरी । सोनोनेस नेऊ मंदिरी । पूजाविधी त्यांचे करी । मूर्ती मंदिरी स्थापण्या ॥६१॥ उंचावून दोन्ही हात । बाबा वदती मनोगत । जा, पूर्ण होईल मनोरथ । मीच तेथ समजा की ॥६२॥ बाबांची होय जरी आज्ञा । त्या शब्दाची नव्हे अवज्ञा ।त्यांच्यापुढे कुणाची प्राज्ञा । ठावे सुज्ञा सकळांसी ॥६३॥ औटघटका बाबा झालो । बाबा हे शब्द ऐकू लागलो । बाबांपरी जरी वागलो । मात्र लाजलो मनात ॥६४॥ आले शंकर महाराज । खरे साधू तेजःपुंज । साधुबुवा डामरे महाराज । झालो सहज एकेठाई ॥६५॥ गोळा झाले भक्तभाविक । गावातील सारे लोक । गावात निघे मिरवणूक । भजने अनेक पुढे गाती ॥६६॥ आले महाराज आमले । कीर्तन त्यांचे खूप रंगले । माझे थोडे प्रवचन झाले । एकतारीवाले गोड गाती ॥६७॥ केला काही यज्ञयाग । मंत्रोच्चार यथासांग । समिधा समर्पिती चांग । वाटती मग पायस ॥६८॥ सकाळी माक्या हस्ते आधी । सारिला पूर्ण पूजाविधी । पहा त्या तळघरामधी । बसे निरवधी संपतनाथ ॥६९॥ नंतर महाराज मच्छिंद्र । पुनवेचा पूर्णचंद्र । खरा ज्ञानी योगींद्र । गमन स्वच्छंद जयाचे ॥७०॥ मंदिरी झाले विराजमान । आनंदले भक्तगण । गंगानाथाचे व्यवस्थापन । प्रेमीजन सहकारी ॥७१॥ नंतर व्यासपीठावर । बसले महाराज शंकर । तसेच काही मान्यवर । मीही बरोबर होतो की ॥७२॥ त्यांचे सुबोध प्रवचन झाले । बोधामृत श्रोते प्याले । आनंदासी उधाण आले । माझे ऐकले भाविकांनी ॥७३॥ मागाहून महाप्रसाद । धावणारे घालती साद । हर्षोल्हास मनमुराद । काय प्रमोद वर्णावा ॥७४॥ महादेव पोरटकर एक । श्रद्धाळू, अत्यंत भाविक । बाबांचे निष्ठावंत सेवक । गुणग्राहक भक्तीचे ॥७५॥ हातरूणची करिती वारी । चिंता मनात एक भारी । चार कन्या ज्याच्याघरी । विचार करी मनात ॥७६॥ नाथबोलाचा भरवसा । देती नेहमी दिलासा । जन्मास येई जीव जसा । राही ना सहसा कुंवारा ॥७७॥ मुलगा असो अथवा मुली । जोडी त्यासी लिहिलेली । आपणा पडे उगी भुली । वेळ नेमिली विधात्याने ॥७८॥ वधू अथवा असो वर । जरी झाले उपवर । वर शोधत येई घर । निमित्त तर कोणीही ॥७९॥ पानझाडे नामदेव । बाबांवरी नित्य भाव । हातरूणा येती सदैव । चरणी ठाव बाबांच्या ॥८०॥ मुले-मुली दोघांकडे । अकल्पित गाठ पडे । पोरटकर घाली साकडे । नवल घडे सांगा कसे ॥८१॥ दोघेही नाथांचे भक्त । खरे श्रद्धाळू, निष्ठावंत । नाथ दोघांकडे पाहत । काय वदत ऐका ते ॥८२॥ दोघे व्हा व्याही-व्याही । विचार करू नका काही । विश्वासू मात्र दोघेही । बोलणे नाही मुळीच ॥८३॥ पाहुण्यांची व्हाया सोय । एकच घ्या कार्यालय । खर्च अर्धा-अर्धा होय । शेवटास जाय लग्न हे ॥८४॥ पोरटकरांनी ऐकले । पानझाडेची दोन्ही मुले । जावई केले अपुले । लग्न झाले अमृतवाडीत ॥८५॥ जेथे असे सद्विचार । खर्च एक, लग्न चार । नाथ सांगती आचार । तसाच विचार आचरती॥८६॥ ना मुहूर्त, ना तिथी । वधूवर होती साथी । ही नाथांची सोपी पद्धती । जन ठेविती भरवसा ॥८७॥ जे या शांतिमंदिरी आले । मुलगा अथवा मुलीवाले । अनेकांचे शुभमंगल झाले । खर्च वाचले कित्येकांचे ॥८८॥ वर-वधूची पाहणी नाही । बाबांसमोर येता पाही । झाले जावई, कोणी व्याही । विश्र्वास राही बाबांवरी ॥८९॥ घडले इथे प्रत्यक्ष । भक्त एकमेकां साक्ष । जे व्यवहारी, चतुरदक्ष । त्यांचे लक्ष बाबांकडे ॥९०॥ आता सांगतो एक कथा । जे त्यागिती वर्णव्यवस्था । पिढ्यान्‌पिढ्यांची जुनी प्रथा । फक्त आस्था नाथांवरी ॥९१॥ एक सुविद्य कुमारी । मिळाली सहज नोकरी । रुग्णांची सुश्रृषा करी । सेवाभाव अंतरी नित्यची ॥९२॥ कवयित्री होती वंदना । भावभक्तीची कल्पना । करी नाथांच्या कवणा । छंद मना आवडीचा ॥९३॥ एक नाथभक्त गजानन । डामरे कुलभूषण । यास कवित्वाचे व्यसन । लाभे निधान नाथराय ॥९४॥ शिक्षण झालियावरी । लगेच मिळाली नोकरी । आरोग्य विभाग सरकारी । काम करी नित्यनेमे ॥९५॥ भाविक वडील आई । त्यासी लागे काही पुण्याई ।देह आर्पला नाथांपायी।सोबत येई सानुला ॥९६॥ बालपणीचे संस्कार । बिंबले होते मनावर । जातीचे बंधन दूर । गुरुवर नाथ झुगारती ॥९७॥ गजानन-वंदना भक्त । बाबांपायी अनुरक्त । हे एकच दैवत फक्त । स्थिर चित्त होय इथे ॥९८॥ नाथ माझे चित्तस्वरूप । दोघा पाहती सुखरूप । आनंदित झाले खूप । वाटती अनुरूप एकमेका ॥९९॥ जाणे मुंगीच्या मनोगता । त्यास काय अनभिज्ञता । पाहून या उभयता । म्हणे आता ऐका माझे ॥१००॥ एक वधू, एक वर । दोघांचे व्हावे एक घर । यादवांचे शांतिमंदिर । घाला हार एकमेका ॥१०१॥ नको घोडा, नको गाडी । नको व्याही, नको वर्‍हाडी । संसारात लाभो गोडी । मज आवडी इतुकीच ॥१०२॥ मान नको, पान नको । जातीचा आभमान नको । मनावरी ताण नको । शान नको वायफळ ॥१०३॥ काळाची गरज ओळखा । नको जातीचा विळखा । उच्चनीचतेचा पुळका । विचार सडका दूर फेका ॥१०४॥ भिन्न दोघांची जाती । एक देश, एक माती । आम्ही आहोत भारती । हीच ज्ञाती आमची ॥१०५॥ सद्गुरुनाथांसमोर । गळ्यात घातले हार । भेटवस्तू ना आहेर । करती स्वीकार एकमेका ॥१०६॥ पानझाडे परिवार । दैवत बाबा हेच सार । अन्य नाही काही विचार । श्रद्धा निरंतर बाबांवरी ॥१०७॥ साधू झाले नामदेव । प्रपंचाची सुटली हाव । सांभाळील नाथदेव । एकमेव साधना ॥१०८॥ येथे येती बुधवारी । चुकेना कधीही वारी । कमी झाली दुकानदारी । तिळभरी खंत नाही ॥१०९॥ भाऊ पुंडलिकराव येती । घर, दुकान पाहती । तेच सारे सांभाळती । लक्ष देती सर्वांवरी ॥११०॥ लहानभाउᆬ विठ्ठले । कष्टाने शिक्षण घेतले । कुटुंब मानी आपुले । सुख झाले परिवारा ॥१११॥ अकोला शहरात । एका छोट्याशा घरात । अवघे मिळून राहत । दुकान स्थित पुलापाशी ॥११२॥ लहानशी दुकानदारी । सुखे मिळे मीठभाकरी । सारे जीवन सदाचारी । घरीदारी आनंद ॥११३॥ मग विठ्ठल पानझाडे । नोकरीनिमित्त जाणे पडे । लांब गेले दुसरीकडे । चित्त जडे नाथांपायी ॥११४॥ आता मुले मोठी झाली । नोकरीही करू लागली । सुंदर छान जागा मिळाली । बांधून झाली सहमते ॥११५॥ कुटुंब सारे संलग्न । परिवारात काही लग्न । बाबांच्या कृपेने निर्विघ्न । राहती मग्न संसारी ॥११६॥ योग जुळला चांगला । घराऐवजी छोटा बंगला । नामदेव भक्तीत रंगला । साधुत्व जयाला लाभले ॥११७॥ ठायीच बसुनी एकचित्त । आत्मानुभाव साधू घेत । जागीच बसले निवांत । नच येत हातरूणा ॥११८॥ मग त्यांचे मोठेभाऊ । पुंडलिक लागले येऊ । रात्री मुक्कामी लागले राहू । उदय झाल्या जाऊलागती ॥११९॥ नामदेव येती प्रथमतः । मोठे भाऊ उभयता । घराण्यात चालू प्रथा । सोडती न नाथा कधीही ॥१२०॥ विठ्ठल राही गुजराथ । इष्ट महादेवनाथ । विसंबेना दिवसरात । दर्शना येत दुरुनी ॥१२१॥ असे सर्व पानझाडे । नाथांचे ममत्व जडे । मुले, नातू येती इकडे । खंड न पडे भक्तीलागी ॥१२२॥ सेवाभावी मन जुळे । असे गुलाबराव इंगळे । गोविंदराव चोपडे । तेल्हार्‍याचे सगळे भक्त हे ॥१२३॥ पहा गुलाबराव इंगळेंनी । सेवा केली निशिदिनी । मंदिर काढी झाडुनी । घरची न आणी याद कधी ॥१२४॥ असे अनेक भाविकभक्त । इथे राहून सेवा देत । गृह-गृहिणी विसरत । विसरत मुलेबाळे ॥१२५॥ एकदा बाबास आजार । ताप तो चढला फार । काही सेवक तत्पर । विसरले घर आपले ॥१२६॥ श्रीकृष्ण नवलकार । सेवा केली यांनी फार । जवळ राही दिवसभर । करी जागर रात्रीही ॥१२७॥ सोडुनी पत्नी आणि मूल । सेवा करी बहुमोल । अंतरी भक्तीची ओल । सावरती तोल नाथांचा ॥१२८॥ घरावरी तुळशीपत्र । सेवा करी दिवस-रात्र । असा सेवक एकमात्र । कृपापात्र श्री गुरूंचा ॥१२९॥ योग्य वेळी पथ्यपाणी । औषधी देती हातांनी । भक्ता सांगती समजावुनी । त्रास झणी होऊ नये ॥१३०॥ जो असा गुरूचा झाला । खरा बोध घडे त्याला । मी-तू भेद मावळला । आणि उरला उपकारा ॥१३१॥ साधके असावे सावध । इष्णेचे लाभेल मध । आपला आप करी वध । होय बोध गुरुनाथांचा ॥१३२॥ पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा । नागविती क्षणोक्षणा । जागृती असावी जाणा । हे न आणा मनालागी ॥१३३॥ कनकाचा होई न त्याग । विषय सारे मागोमाग । मान, बढाई जिवलग । नाडिती मग महाभागा ॥१३४॥ अल्पज्ञान झाल्यापाठी । अहंकार बांधी गाठी । तो पाश झोंबे कंठी । त्याचसाठी सावधान ॥१३५॥ मानासाठी हपापला । सकामभक्ती म्हणती याला । संतसंग वाया गेला । होय भुकेला बुभुक्षित ॥१३६॥ नाथ माझा सदा सावध । प्रगटला आत्मबोध । शाश्र्वतसुखाचा शोध । अवरोध विषयांसी ॥१३७॥ जागला, जागविला समाज । प्रबोधन घडे सहज । भवसागरीचे जहाज । तारले मजसम कितीतरी ॥१३८॥ माक्या हृदयी आठवण । केली असे साठवण । पशुसमान चर्वण । काही उलगण तुम्हा पुढे ॥१३९॥ माझे घराचे जवळपास । आहे भक्त वसंतनिवास । दहा-अकराचे समयास । बसावयास बाबा आले ॥१४०॥ गृहस्थ एक भक्तवर । बाबारावजी डिक्कर । सदा सेवेसी तत्पर । रौंदळेकर सज्जन हे ॥१४१॥ सत्संगी दोघे उभयता । सेवा आर्पती गुरुनाथा। जेवण आणती स्वतः । बाबा जेवता वाढती ॥१४२॥ एकदा आणला डबा । परी न घेती नाथबाबा । काय असेल मनसुबा । म्हणे थांबा आज न जेवी ॥१४३॥ मी उभा होतो जवळ । म्हणे आण भाकर केवळ । चटणी आणि पापड । आण तत्काळ मजलागी ॥१४४॥ मी तेथून आवाज दिला । सून आणी भाकर-काला । पापडाचा खुडा केला । बसे जेवायाला नाथ हा ॥१४५॥ आठव होतो, किती आठवू । हृदयात किती साठवू । तुम्ही-आम्ही गुरुभाऊ । भाव ठेऊ नाथांपायी ॥१४६॥ मी तुमचा चरणरज । तुम्हासवे हे हितगुज । लाभले भाग्य सहज । धन्य आज जाहलो मी ॥१४७॥ मन करुनी प्रसन्न । करा ग्रंथाचे वाचन । बोबडे जरी हे वचन । मान्य कवण करा माझे ॥१४८॥ पुढील अध्याया अंतर्गत । नाथांची लीला अद्भूत । वर्णन करू सांप्रत । आनंदरत होऊ या ॥१४९॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । केले असे हे कथन । तुमचे चरण वंदुनी ॥१५०॥ श्री महादेवनाथ चरित्र ।ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र चोविसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment