
श्री गणेशाय नमः ॥ श्री रामचंद्राय नमः॥ नमो मच्छ, कच्छ, वराहा । वामन, परशुरामा, नरसिंहा । राम, कृष्ण, बुद्ध पहा । तसा दहावा कलंकी ॥१॥ अवतार तर्हा चार । आवेश, प्रवेश दोन प्रकार । लीला विग्रह हा थोर । स्फूर्ती प्रकार चवथा असे ॥२॥ नाना अवतार नाना रीती । कार्यास अवतरती जगती । काळवेळ जैसी स्थिती । तैसे वर्तती जगती या ॥३॥ आले आणि निघून गेले । कार्य मात्र आवरत चाले । रामनाम मुखात आले । धन्य झाले तिहींलोकी ॥४॥ राम राजा राम बंधू । राम ज्ञानी कृपासिंधू । तोच सागर तोच बिंदू । परमानंदू राम माझा ॥५॥ कृष्ण झाला ज्ञानदाता । अर्जुनासी सांगे गीता । ग्रंथ जगन्मान्य ठरला आता । ज्यामुळे भारता श्रेष्ठत्व ॥६॥ ब्रह्मा, विष्णू, महेश्र्वरा । एक निर्माता सर्वेश्र्वरा । पालनकर्त्या प्रभोहरा । लया नेसी खरा तू एक ॥७॥ तू सर्वां निर्मिसी । पालन, पोषण करिसी । अंती लयाला ही नेशी । लीला अशी तुझी असे ॥८॥ तीन जरी तरी एक । एकास म्हणती चतुर्मुख । भागवत सांगे प्रमुख । शिव पंचमुख प्रसिद्ध ॥९॥ एकातून असे अनेक । अनेकातून तू एक । तुज वर्णावयाची भूक । शमेना देख काही केल्या ॥१०॥ तुकयाचा अभंग खरा । भेद नाही हरिहरा । एकमेका हृदयी त्वरा । गोडी साखराठायीची ॥११॥ यादव वदे हरिहर । तोच त्याचा परमेश्र्वर । बोले, चाले ना विसर । सारा भार त्यावरी ॥१२॥ द्रपाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती । नाही ऐशी मति अर्थ कळे ।होईल तै हो या विठोबाचे नावे । आचरले भावे जीवे धरूच्च् ॥१३॥ आठवली मज तुकोबाची उक्ती । धीर आला बहू चित्ती । चिंतामणी खडा एकाहाती । संगे श्रीपती आहे तुक्या ॥१४॥ आतील आर्तभाव । सांगू लागे नाथ महादेव । मग हा दास महादेव । स्वयमेव सुखावला ॥१५॥ तूच जगाचा नियंता । तूच की रे रक्षिता । अव्यया आवनाशा अनंता । गुणातीता तुज नमो ॥१६॥ तू व्यापिले आकाश पाताळा । सर्व व्यापून परी निराळा । वस्तुमात्री, जळी, स्थळा । हे दयाळा तुज नमो ॥१७॥ ज्ञानसिंधू, सच्चिदानंदा । त्रिकालज्ञा, आनंदकंदा । अगाध शक्ती अमर्यादा । सत्याधार सदा स्वयंभू ॥१८॥ परात्परा परमेश्र्वरा । परमपावना पुण्यवरा । पांडुरंगा परमउदारा । प्रभुवरा परमात्मा ॥१९॥ योगियाचा निजधर्म । आचरावे षडकर्म । बाळनाथ यथानुक्रम । आचरी वर्म हितकारी ॥२०॥ करू लागले नेति, धौती । नाकावाटे पाणी घेती । बस्ती, त्राटक, कपालभाती । सहज करिती नौली क्रिया ॥२१॥ क्रियानाम लिहिले येथे । आचरावे कैशा पंथे । गुरू साक्षात पाहिजे तेथे । नाहीतर भातुके रोगाचे ॥२२॥ पुढे मज मिळाली दीक्षा । माझी नसता ही अपेक्षा । मिळतसे पाठशिक्षा । यापेक्षा भाग्य कोणते ॥२३॥ मी योगी, पंडित नाही । अध्ययन नसे काही । भित्रेपणा; धाडस नाही । वागावे कसे ते ही कळेना ॥२४॥ लग्न संपले झाला हरीख । गंगा पाही सूनमुख । सुडौल काया, बांधा सुरेख । ललाटी रेख भाग्याची ॥२५॥ होते वैभव; आता नाही । जोडणी खिळखिळी पाही । नाटा, खांब धरून राही । घर सर्वही गळू लागे ॥२६॥ ही लेक श्रीमंताघरची । साय खाई दुधावरची । इथे साधी मीठमिरची । मजुरीवर खर्ची चाले सारी ॥२७॥ जेथे जळे नंदादीप । तेल अथवा घालून तूप । तेथे अडचणी असाव्या खूप । कधी सूप रिकामे ॥२८॥ स्त्री जन्मा तुझी कहाणी । मिळे जेथे अन्नपाणी । सुखदुःख मना न आणी । सद्गुणखाणी माउली ती ॥२९॥ नवी नवरी घरात आली । माय गंगा निवृत्त झाली । लेकसून नांदू लागली । आनंदे जगली पुढे ही ॥३०॥ घरात अवघेजण चार । पाचवा एक निराधार । केला लहानाचा थोर । पे्रम त्याचेवर यादवांचे ॥३१॥ तहसील मुर्तिजापूर । छोटे खेडे हिरपूर ।आईबापाविन पोर । देऊन आधार वाढविले ॥३२॥ हिरपूर या गावाचे । अवधूत या नावाचे । अत्यंत जीवाभावाचे । भाउᆬ यादवाचे म्हणती त्या॥३३॥ अवधूतबुवा मोठे झाले । लग्न केले वेगळे झाले । शेजारी घर बांधून दिले । राहू लागले पतीपत्नी ॥३४॥ वडील महात्मा विदेही । घरात मुळी लक्ष नाही । विरक्त देही-गेही । साधून राही एकांत ॥३५॥ त्यात एक नातलग आला । सोबत पेटी, कुलूप त्याला । पहाटे उठून गेला । पुन्हा कुणाला दिसला ना ॥३६॥ बाबा झाले चिंतित । काय असेल पेटीत । लोकांकानी घातली मात । उघडता आत काही नसे ॥३७॥ जगणे वाटले गौण । करू लागले मौन । असला प्रकार गहन । झाले न सहन बाबांना ॥३८॥ एक छोटे कौलारू घर । लांब रुंद नसे फार । यात शोधला आधार । जन्मभर सोडले ना ॥३९॥ सायंकाळी महादेव भेटे । जाऊन बसे बाबांनेटे । दिवसभर एकटे । वागणे नेटके चालले बा ॥४०॥ सायंकाळी बोलत । निजगुह्य खोलत । आत्मरंगी डुलत । तृप्त होत पितापुत्र ॥४१॥ छोटासा प्रसंग लिहितो आता । साक्ष माझी वत्सलामाता । विषय बोलता बोलता । निघाला आता ऐका तो ॥४२॥ मी आली नवी नवरी । लग्न होऊन नव्या घरी । देहधर्मा जाता बाहेरी । दिसे सामोरी नवलाई ॥४३॥ दुपारची वेळ होती । आसपास कोणी नसती । दृष्टीपुढे सावळी मूर्ती । एकादशी होती दिवशी त्या ॥४४॥ वाटू लागे असे मला । विठ्ठलची समोर आला । दोन्ही कर जोडी त्याला । आनंद झाला मनाशी ॥४५॥ पुढे काही दिवसा भेटी । गुपित खुलले शेवटी । हासू लागले धरून पोटी । ही गोठी ऐकता ॥४६॥ माय मालपेसरा सांगे । मज दर्शन दिले पांडुरंगे । जो फिरतो नाथांसंगे । राखी स्वये अंगे घर माझे ॥४७॥ माझे वय अवघे दहा । मामास कन्या एकटी पहा । वय तिचे फक्त सहा । संबंध केला मामानी ॥४८॥ त्यांच्याकडे थोडी शेती । भाच्यास मिळावे वाटे ती । सालंकृत कन्या देती । खर्च करती अवघा ते ॥४९॥ रेशीमकाठी धोतर । तसाच दुपट्टा त्यावर । अंगरखा, फेट्याचा जर । असा नवरदेव मी ॥५०॥ मामा माझे वारकरी । पंढरीची करिती वारी । लग्नाक्षता टाकल्या आम्हावरी । लगेच देवाघरी गेले ते ॥५१॥ माझी सुरू शाळा । त्यात वर्णही काळा । आणि हा लग्नसोहळा । बाळलीला तेव्हाच्या ॥५२॥ ऐका एक छोटी कथा । कदाचित वाटेल वृथा । चेटूक म्हणती नाथपंथा । उलटी खूण नाथाघरची ॥५३॥ घरी एक म्हैस होती । लहानाची झाली मोठी । गाभण राहून दुभती । दूध देती झाली की ॥५४॥ दुसर्याने कधी न व्याली । राहिली ती सदाच खाली । दूध देतच राहिली । अनेकांनी पाहिली म्हैस ही ॥५५॥ चुरी नाही, ढेप नाही । उष्टे धांडे, गवत खाई । गुराखी चारण्यास जाई । दूध देई थोडे थोडे ॥५६॥ पुढे देशमुखाचा गायवाडा । बैलजोड्या, उमदा घोडा । चारा नेहमी सदा पुढा । त्यातील थोडा आणावा ॥५७॥ बस झाली तिची खुराक । असे गेले दिवस अनेक । समोर मोगरी ठेविती एक । आहे ठाऊक अनेकांना ॥५८॥ कोणी म्हणती जादूटोणा । चमत्कार वाटे कोणा ।कुणी त्यास काही म्हणा।दृष्टी दिसेना दृश्य असे॥५९॥ असा लोटला काही काळ । नाथ करी सर्व सांभाळ । कधी सुगी, कधी आबाळ । चालला वेळ थांबेना ॥६०॥ एक घटना सुखद । गावात स्पर्धा वादविवाद । वाद नव्हे संवाद । केवळ विनोद गमतीचा ॥६१॥ गाव छोटे समाज तीन । दलित, हिंदू, मुसलमान। फक्त पंधराशे लोक जाण । स्त्रिया मुले संपूर्ण यांसह ॥६२॥ घटना साठ वर्षांआधी । जनता भोळी खूप साधी । तंटा नाही, काही उपाधी । सकाळी भेटता कधी राम राम ॥६३॥ आदाब-सलाम भेट होता । जोहार हाही शब्द होता । आपुलाल्या धर्मापुरता । पूर्ण नम्रता सर्वांची ॥६४॥ ऐका त्या वेळीचे । वातावरण खेळीमेळीचे । मोहरम दिवाळीचे । फराळ व्हायचे घरोघरी ॥६५॥ करंजी-लाडू इकडे । रोठ-खिरखुरमा तिकडे । आनंद वाढे दोहींकडे । मानकरी बडे बडे भेद नाही ॥६६॥ आनंदात दोन्ही सण । पोळा, दिवाळी, शिलंगण । मोहरम, ईद, रमजान । वातावरण शांत सदा ॥६७॥ एकदा घडली गंमत । विषय सर्वांसंमत । वादास चढली रंगत । देती किंमत पैशा कुणी ॥६८॥ कोणी म्हणे यास खोटे । विद्या श्रेष्ठ आम्हा वाटे । विद्या, विनय एकवटे । आम्हा न पटे धनश्री ॥६९॥ विद्येने बहुमान । विद्येने पूज्य ब्राह्मण । यश-कीर्तीचे धन । विद्या धनाहून श्रेष्ठ ॥७०॥ विद्येने सापडे मंत्र । विद्येने सापडे तंत्र । विद्येने शोधले यंत्र । झालो स्वतंत्र विद्येमुळे ॥७१॥ विद्येमुळे मिळे पैसा । मागे येई आप ऐसा । धनाचा नच भरवसा । राखणे न कैसा राखावा ॥७२॥ दुसरा म्हणे खोटे विधान । काय मिळे पैशाविन । साहित्य, पाटी, लेखन । आणाल कोठून सांगा ना ॥७३॥ धनाची किंमत मोठी । धनानेच पत मोठी । धनाविन निव्वळ गोठी । धनची गाठी असावे ॥७४॥ श्रीमंताचे वैभव । त्याचाच सदा गौरव । पैशामुळे मिळे सर्व । वाद अपूर्व रंगला ॥७५॥ सभा घ्या सायंकाळी । गावातील मंडळी । गोळा करू या सगळी । बंगल्याजवळी अवघी ॥७६॥ मस्जिद आणि मंदिर । दोहीत थोडे अंतर । छोटे मैदान रस्त्यावर । बसले सभोवार लोक सारे ॥७७॥ जमले सारे गावकरी । भेद नाही तिळभरी । बाजू मांडती आपुल्यापरी । पेच दुहेरी सुटेना ॥७८॥ सुचला एक उपाय । नाथ देतील न्याय । ऐकू ते सांगती काय । मान्य होय आम्हासी ॥७९॥ सर्वांची ही ग्रामसभा । बोलण्यास सर्वांना मुभा । सर्वांचा एक मनसुभा । राहिला उभा नाथ माझा ॥८०॥ चाके दोन परी रथ एक । एकामेका असती पुरक । ऐका यातील फरक । करा विवेक सज्जनहो ॥८१॥ धन वाटता होय कमी । राखाल याची ना हमी । खर्च करा कोण्याही कामी । कमी कमी होतसे ॥८२॥ विद्या वाटता वाढे । ज्ञानी, पंडित गाढे । शिकवा कुणास पाढे । उणे न पडे दात्याशी ॥८३॥ शिका, शिकवा किती । यासी नाही मिती । कमी व्हायची नाही भीती । ऐसी महती विद्येची ॥८४॥ विद्येचे मोल आधक । आज धनवान अनेक । श्रेष्ठ विद्येचे सेवक । सर्वाधिक मानतो मी ॥८५॥ मागून एकाने दिली टाळी । रपारप जशी गारपीट झाली । सर्वांना बाब मान्य झाली । बसले खाली बाबा मग ॥८६॥ एकोणीसशे बेचाळीस । अवर्षण झाले, ना पाउᆬस । गावकरी झाले उदास । यज्ञाचा मानस ठरला ॥८७॥ यज्ञ केल्या ग्रहशांती । पुराणात याची माहिती । सामुग्री लागे कोणती । हे जाणती यादवनाथ ॥८८॥ परंतु ते आज विदेही । कशाचे त्यांना भान नाही । महादेव सांगेल काही । तसे सर्वही करू मग ॥८९॥ गावकरी करिती सभा । बाबा जाता वाढली शोभा । झाकेना ज्ञानाची प्रभा । अध्यात्माचा गाभा अंतरंगी ॥९०॥ मग चालली चर्चा । कोणी करावी पूजाअर्चा । गोष्टी चालत वरवरच्या । पैसे लागती खर्चाकरिता ॥९१॥ बाबांचे जावई । वैद्यकीचे व्यवसायी। पंडितजी म्हणती काही । येत पाही हातरूणला ॥९२॥ नाव होते महादेव । पाठक हे उपनाव। चिंचोली हे मूळगाव । येथील ठाव ठरलेला ॥९३॥ दवाखाना करती ते । ठरल्या वेळी येत इथे । रोगी येता औषधाते । देत होते ठरल्या दिनी ॥९४॥ त्यांच्या मार्गदर्शनाखाली । यज्ञाची तयारी झाली । गावात हालचाली । वर्गणी आली न मागता ॥९५॥ यजमान केले महादेवनाथा । अर्धांगी वत्सला माता । ऐसी दोघे उभयता । सर्वानुमता ठरले हे ॥९६॥ लोकांठायी परमेश्र्वर । राखावे बहुतांचे अंतर । कराया जनमताचा आदर । नाथ सादर प्रसंगासी ॥९७॥ पुरोहित पंडित पाठक । यज्ञकुंडी ज्वलंत पावक । आहुती टाकी नायक । ज्वाला धकधक दिसताती ॥९८॥ पंडितजी मंत्र म्हणती । ही दोघे आहुती देती । वाटलेली कामे होती । सारे करिती आनंदाने ॥९९॥ ही ईश्र्वरी आराधना । आनंद सार्यांच्या मना । गुंतले यज्ञ-हवना । करती स्तवना प्रभुच्या ॥१००॥ पूर्ण होता आहुती । लोक पाहू लागले वरती । काय परमेश्र्वरी कृती । मेघ बरसती जलधारा ॥१०१॥ अवघे ओलेचिंब झाले । वाहू लागले नद्यानाले । विठ्ठल नामात सर्व न्हाले । भरते आले सुखाचे ॥१०२॥ सर्वां झाला संतोष । विठ्ठल नामाचा घोष । पावला राजा पंढरीश । प्राप्त झाले यश नाथांसी ॥१०३॥ पाऊस आला, पिके आली । दैना अवघी दूर झाली । नवान्न पौर्णिमा आली । वेळ झाली सुगीची ॥१०४॥ यज्ञाची झाली सांगता । नाथ चमकू लागले आता । सोने कसोटीसी नेता । मोल तत्त्वतः कळू लागे ॥१०५॥ नाथ मनी करी विचार । कर्मकांडाचा पुरे घोर । ह्यातून काढावे बाहेर । सान-थोर जागवावे ॥१०६॥ मी बोलता ऐकेन कोण । वय-आधकारे पडे लहान । म्हणतील यासी काय ज्ञान । म्हणून यजमान चूपचाप ॥१०७॥ आज रूढी, लोकाचार । यांचेसवे मी पाळणार । योग्य वेळ आल्यावर । सांगेन साधार तथ्य-सत्य ॥१०८॥ यज्ञयागे पाउᆬस पडे । ऐसे कुठे कधी घडे । श्रद्धा ठेवती भाबडे । द्यावे धडे वास्तवाचे ॥ १०९ ॥ नवसे कन्या पोरे होती । तरी का करणे लागे पती । तुकोबाराय सांगती । पालटू द्या मती सज्जनहो ॥११०॥ कधी कधी असे घडे । बोलाफुलाची गाठ पडे । योगायोगाचे पारडे । झुके थोडे अकस्मात ॥ १११॥ हिरा म्हणू नये गार । अंगण नव्हे पार । साधू महिमा अपार । साध्वी जार करील का ॥११२॥ जाणी जो का परपीडा । दुखवेना मुंगी-किडा । कोण उचली पैजेचा विडा । ऐसा निधडा छातीचा ॥११३॥ साधू नसावा लोभी । कामी, क्रोधी आणि दंभी । ज्ञानाधारस्तंभी । साधू स्वयंभी निरपेक्ष ॥११४॥ शुद्ध असावी वाणी। दोष कुणाचे मना न आणी । आत्मा एक हे जाणी । तो गुरुस्थानी मानावा ॥११५॥ कुणाची करीना निंदा । गण गणात गोविंदा । पाही सर्वांठायी मुकुंदा । त्याचे पाय वंदा सर्वभावे ॥११६॥ अध्यात्माच्या करी गोठी । साधी, सोपी वचने ओठी । जिव्हाळा प्रेमाच्या पोटी । आत्मोन्नतीसाठी झटे जो ॥११७॥ ध्यान, धारणा, समाधी । न उरली आधी, व्याधी । ज्ञानामृत सत्त्व बोधी । हित साधी परतत्त्व ॥११८॥ भूत, भविष्य, वर्तमान । सदा ठेवी याचे भान । ज्याचा अंदाज, अनुमान । चुकती न कदाकाळी ॥११९॥ भूतकाळाची खंत नाही । भविष्याची चिंता नाही । वर्तमानात मस्त राही । देही असुनी विदेही तो ॥१२०॥ अन्न, निवारा, प्रावरण । हे तो प्रारब्धाअधीन । चिंतेचे काय कारण । करा चिंतन दात्याचे ॥१२१॥ पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन । उद्भव एकमेकांपासून । एक एकात होता विलीन । जाणतो आपण सर्वही ॥१२२॥ रज, तम, सत्त्व गुण । तिन्हीचे केले मिश्रण । त्यातील एक प्रधान । मध्यम, कनिष्ठ जाण असे ॥१२३॥ कुणी असे तमोगुणी । रजोगुणी असे कोणी । सत्त्वगुण जया ठिकाणी । श्रेष्ठ प्राणी तो एक ॥१२४॥ गुणानुसार वागे । कुणी झोपती, कुणी जागे । कुणी सन्मार्गी लागे। आडमार्गे जात कुणी ॥१२५॥ सद्गुणांची कास धरा। सज्जनाचा सहवास बरा । नरजन्माचे सार्थक करा । काही आचरा पुण्यकर्म ॥१२६॥ पुण्य केल्या ईशप्राप्ती। पापाचारे नरका जाती । नामाचे महत्त्व गाती । आपणा सांगती संतजन ॥१२७॥ हा अध्याय सहावा । षडरिपुंचा नाश व्हावा । काम, क्रोध, मद दूर व्हावा । मत्सर, दंभ ठेवा दूर जरा ॥१२८॥ अहंकार भयानक । काही पंडित, पुराणिक । यांचे ठायी वसे आधक । वागणूक हाच पुरावा ॥१२९॥ निदिध्यास नित्य धरू । सद्गुरूचे पाय स्मरू । होऊ आम्ही पापभीरू । कधी न विसरू त्या एका ॥१३०॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । स्वानुभव केले कथन । हे महिमान नाथांचे ॥१३१॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र सहावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
No comments:
Post a Comment