१.अनाथांचा नाथ
अनाथांचा नाथ । नाथ महादेव ।
ठेवू भक्तिभाव । पायी त्यांच्या ॥धृ ॥
लेकराला माय । धरिते पोटाशी ।
करी माया तैशी । बाप माझा ॥१॥
नर असो नारी । सान असो थोर ।
सारखी नजर । करूणेची ॥२॥
बोलणे सहज । वागणे सहज ।
जगणे सहज । केले आम्हा ॥३॥
अगा कृपावंता । अगा मायबापा ।
चुकविल्या खेपा । चौर्यांशीच्या ॥४॥
गायक : सुरेश वाडकऱ
***
२.घेतात दुःखितांचा
घेतात दुःखितांचा कैवार नाथबाबा;
देतात दुर्बलांना आधार नाथबाबा़ ॥धृ॥
नाकारले जगाने आहे सदैव ज्यांना;
करतात त्या जिवांचा उद्धार नाथबाबा़ ॥१॥
ज्यांच्या पिढ्यापिढ्यांनी सूर्यास पाहिले ना;
करतात दूर त्यांचा अंधार नाथबाबा़ ॥२॥
आकार देत गेले मातीस आमच्या जे;
आयुष्य घडविणारे कुंभार नाथबाबा़ ॥३॥
आनंद वाटताना जनताजनार्दनाला;
अवघा करा सुखाचा संसार नाथबाबा़ ॥४॥
गायक : सुरेश वाडकऱ
***
३.कृष्णसख्याची झाली बाधा
कृष्णसख्याची झाली बाधा;
नाथ माउली झाली राधा़ ॥धृ॥
कंकण-कुंकू लेणे ल्याले;
अलंकार ते गळा घातले;
प्रियतमेचे रूप घेतले;
हरी हरी जप चाले साधा, हो साधा
नाथ माउली झाली राधा़ ॥१॥
परब्रह्माची प्रतिमा चित्ती;
चिंतन चाले दिवसा-राती;
जीवलगाशी जडली प्रीती;
काय म्हणावे असल्या नादा, हो नादा
नाथ माउली झाली राधा़ ॥२॥
जीवाशिवाचे नाते जुळले;
पक्वफलासम मीपण गळले;
नावालाही द्वैत न उरले;
कोण कृष्ण अन् कुठली राधा, हो राधा
नाथ माउली झाली राधा़ ॥३॥
गायक : उत्तरा केळकऱ
***
४.नव्या युगाचे नव्या जगाचे
नव्या युगाचे नव्या जगाचे नित्य ठेविले भान
नाथ हा झाला संत महान ॥धृ॥
नाही गंडा, नाही दोरा,
ना अंगारा, ना धुपारा;
भोंदूपणाला नाही थारा;
सोंग-ढोंग ते दूर सारण्या
करी जीवाचे रान ॥१॥
साधी सोपी वचने ओठी,
अध्यात्माच्या करिती गोठी,
जणू घेतली हाती पाटी;
कसे करावे जगणे सुंदर
हेच शिकविले ज्ञान ॥२॥
नाथांच्या स्पर्शाने झाली,
कडुनिंबाची गोड सावली,
भवतापाची हरे काहिली;
वार्यासोबत देशोदेशी
पोचविते गुणगान ॥३॥
गायक : सुरेश वाडकर, उत्तरा केळकऱ
***
५.शांती शांती शोधत फिरतो
शांती शांती शोधत फिरतो का तू दारोदारी;
सदा खुले हे शांतिमंदिर पहा तुझ्या शेजारी ॥धृ॥
आपुलकीचा ना ओलावा, प्रेम कोरडे झाले;
झरा आटला जिव्हाळ्याचा, काय दिवस हे आले;
मैत्र जिवाचे उरले नाही स्वार्थाच्या बाजारी ॥१॥
माणूस झाला येथे आता माणूसकीचा प्यासा;
चहू दिशांनी ऐकू येते सैतानाची भाषा ;
आज मनाच्या देव्हार्यातून झाला देव फरारी ॥२॥
शोध सुखाचा घेता घेता दुःखे पदरी आली;
नाव मनाची गोते खाता-खाता त्यात बुडाली;
सद्गुरूवाचून भल्यामाणसा लावी कोण किनारी ॥३॥
गायक व संगीतकार : कुंदन भालेराव
***
No comments:
Post a Comment