अध्यायसत्र सतरावे

श्री गणेशाय नमः॥ नमो ब्रह्मा, विष्णू, महेशा । अनंतनामा, अनंतवेषा । गरुडवाहना विश्र्वेशा । हंसारूढेशा तुज नमो॥१॥ वृषभपाळा, गंगाधरा । चंद्रमौळी भक्तवरा । लक्ष्मीकांता, चक्रधरा । सावित्रीवरा, चतुर्मुखा ॥२॥ चतुर्भुजा, एकानना । त्रिशूळधरा, पंचवदना । दास हा वंदी चरणा । योगीजना मार्गदर्शका ॥३॥ एकारूपे सृष्टीकर्ता । तूच झाला पालनकर्ता । विलया नेसी तूच तत्त्वतः । तिन्ही देवता एक तुम्ही ॥४॥ देव तेच असती गुरू । गुरू सुखाचे सागरू । गुरू असती कल्पतरू । महामेरू ज्ञानाचे ॥५॥ संत त्या माळेतील मणी । मोक्षसुखाचे दाते धनी । संतसंगाविन तरला कोणी । असा प्राणी आहे कोठे ॥६॥ सत्संग लाभे ज्याला । बद्ध मुमुक्षू होत भला । मुमुक्षू लागे साधनेला । साधक झाला पुढे तो ॥७॥ साधक तोची झाला सिद्ध । हे गुरुवाक्य प्रसिद्ध । अहं ब्रह्मास्मि तत्त्वबोध । घेती शोध शाश्र्वताचा ॥८॥ सत्पुरुष जन्मता दिव्य विभूती । देही विदेह स्थिती । अनुभवती आत्मानुभूती । दिसती जनांसारखे ॥९॥ मी मागील अध्यायात । चक्रे सांगितली सात । शरीरात कोठे स्थित । ठिकाण सांगत साधकांसी ॥१०॥ आत्मा असे नाभिस्थानी । अष्ट पाकोळिका तयाची खेळणी । त्या घेईजे हिरोनी । योगबळे ॥११॥ संत झाले ज्ञानेश्वर । ओवी सांगती गुरुवर । साधके केला अंगीकार । पाहिजे तत्पर ज्ञानासी ॥१२॥ तें कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तींची शोभा । जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥ १३॥ मूलाधारी हे का कुंडलिनी । दिव्य तेज जैसी नागिणी । साडेतीन वेढे घेऊनी । निवांत जाऊनी बैसली ॥१४॥ करिता चक्रभेदन । जागे होय ती स्वामीन । तेजःपुंज असे कंकण । दैदिप्यमान तेज ते ॥१५॥ कुंडलिनीचे उद्बोधन । इष्टमूर्तीचे घडते दर्शन । स्वयंप्रकाश ज्योती पूर्ण । होती प्रसन्न महासिद्धी ॥१६॥ आणमा, लघिमा, महिमा । प्राप्ति, प्राकाम्य याची सीमा । साधके न बाळगावी तमा । वरच्या क्रमा जागावे ॥१७॥ वशित्व आणि ईशित्व । तसेच कामावसायित्व । यांसी द्यावे गौणत्व । पुढे खरे तत्त्व सापडे ॥१८॥ मूळाधार गुदस्थानामागे । रंग तांबडा दिसू लागे । चार दळे पाकळ्या त्याजागे । भासती वेगे साधका ॥१९॥ दुसरे स्वाधिष्ठान । या चक्राचे लिंगस्थान । सहा पाकळ्या असून । रंग जाण पिवळा तो ॥२०॥ तिसरे नाभीस्थानी । मणीपूर नीळवर्णी । दहा दले त्याठिकाणी । ही निशाणी त्याची असे ॥२१॥ चवथे चक्र अनाहत । हृदयस्थानी वसत । रौप्य रंग दिसे तेथ । पाकळ्या असत बारा त्या ॥२२॥ विशुद्धचक्र कंठस्थानी । धूम्रवर्ण दिसे नयनी । सोळा दळे त्याठिकाणी । जाणता जाणी सत्य हे ॥२३॥ आज्ञाचक्र हे सहावे । भ्रूमध्यात असे बरवे । दोन पाकळ्या स्फटिक आघवे । ते पहावे साधके ॥२४॥ ब्रह्मरंध्र शीर्षस्थानी । सहस्त्रदळ त्याठिकाणी । भ्रमरगुंफा म्हणे कोणी । दिव्यवर्णी चिन्मय ती ॥२५॥ या चक्रांच्या अनुक्रमे देवता । गणेश, ब्रह्मा, विष्णू तत्त्वतः । शिवा-जीवाची एकात्मता । तो परमात्मा होता मुळी ॥२६॥ या योगशास्त्रानुसार । अमोल मानवी शरीर । ज्ञानखजिना भांडार । मेरुदंड त्यावर श्रेष्ठ की ॥२७॥ कमरे खाले एक टोक । वर मानेपर्यंत एक । तोल सावरी बहुतेक । महत्त्व आधक याचे हे ॥२८॥ डाव्या व उजव्या भागी । नाड्या वाहती प्राप्तमार्गी । इडा, पिंगळा यालागी । मध्यभागी सुषुम्ना ॥२९॥ एक चंद्र, दुजी सूर्यनाडी । सुषुम्ना ब्रह्मनाडी । पोकळी असे मेरुदंडी । वर चढी तिथे ही ॥३०॥ गंगा, यमुना, सरस्वती । भृकुटीस्थानी मिळती । प्रयाग काशी म्हणती । मेरुदंडातून होती संवेदना ॥३१॥ प्रवाह मेंदूपर्यंत । सहा चक्रे ओलांडत । जव पहुचे तेथ । होय जागृत कुंडलिनी ॥३२॥ ध्येय, ध्याता आणि ध्यान । ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान । द्रष्टा, दृश्य, दर्शन । त्रिपुटी आण उरेना ॥३३॥ भ्रमरानंद अभंगार्थ । यावर चिंतन यथार्थ । मालपे काढती अर्थ । अशी सार्थ टीका ही ॥३४॥ आणखी लिहीन थोडे । ज्ञानाचे उलगडे कोडे । आता वळू कथेकडे । गाऊ पवाडे नाथांचे ॥३५॥ नलिनी झाली आता मोठी । लग्न शब्द येई ओठी । सोयरे करती त्या गोठी । बाबा म्हणती पाहू या ॥३६॥ पारळ्याचे वाडेकर । साधारण कास्तकार । योग्य वाटले हे घर । बाईचे माहेर नात्याचे ॥३७॥ मुलगा त्यांचा प्रकाश । इथेच शाळा शिकावयास । जाहला बराच सहवास । नेहमी वास मंदिरी॥३८॥ यांचे नाते होते जुने । जुने ते म्हणती सोने । मग काय लागे बोलणे । आले पाहुणे या घरी ॥३९॥ बाबा न सोडती मंदिर । आम्हा या म्हणती वाडेकर । तेथे गेलो तीन चार । लोकाचार सांभाळिला ॥४०॥ लग्नाची ठरली तिथी । पत्रिका कुणास नव्हती । तशीच होत माहिती । उल्हास आत लोकांचा ॥४१॥ अंगणात घातला मंडप । सोयरे आले आपोआप । तेल्हारा येथील अमाप ।गर्र्दी खूप झाली असे ॥४२॥ बाबा मंदिरी निंबाखाली । लग्नाची वेळ झाली । मान्यवरांनी विनंती केली । परी माउली शेतात ॥ ४३॥ साध्या पद्धतीचे लग्न । बाबा सोडून सारे संलग्न । कार्यात जो तो दिसे मग्न । निर्विघ्न सारे होत ॥४४॥ मंगलाष्टके गोड गाती । अक्षता सारे उधळती । दोन जीवांची जडली नाती । हार आर्पती एकमेका ॥४५॥ मग त्या भव्य मंडपात । दोघे घेती हातात हात । नलिनी-प्रकाश उभे राहत । वर-वधू शोभत दोघेही॥४६॥ नंतर महापंगत । अवघे चाले सुसंगत । जो तो दिसे कार्यरत । गणेश साक्षात आला वाटे ॥४७॥ दोघे गेले देव्हार्‍यासी । देवदर्शन घ्यावयासी । आईचा फोटो दिसे तियेसी । पाणी डोळ्यासी आणतसे ॥४८॥ बाबाही मग घरी आले । दोघांचे दर्शन झाले । डोळ्यांवाटे अश्रू चाले । चिंब झाले तिघेही ॥४९॥ मुलीस म्हणती नलुबाई । सुखे अपुल्या घरा जाई । मीच झालो बाप-आई । गुण गाई ईश्वराचे ॥५०॥ जाय वो कन्यके अपुल्याघरी । सुख मिळेल संसारी । खेद न मानी अंतरी । भाग्य पदरी आहे तुक्या ॥५१॥ दोघांच्या डोक्यावर हात । तेही करिती प्रणिपात । वर्‍हाडी दृश्य पाहत । नेत्री वाहत अश्रुधारा॥५२॥ बाळे भारतीय नारी । आमची परंपरा न्यारी । सौख्य नांदे घरीदारी । सांभाळ पोरी सार्‍यांना ॥५३॥ सासू अधिक सासरे । नणंद, दीर, भासरे । न मानी परके दुसरे । प्रसन्न हसरे असावे ॥५४॥ वडिलांची राखी मर्यादा । दुखवू नको त्यासी कदा । कार्यरत राही सदा । ऐश्र्वर्य संपदा घरी नांदे ॥५५॥ एकटे न जावे बाहेरी । कुण्या नातलगाच्या घरी । तिला म्हणती बोहरी । आज्ञेविन माहेरी जातसे ॥५६॥ जनात होत ज्याची निंदा । दूर त्यागावा तो फंदा । चांगुलपणा धरी छंदा । सासू, नणंदा आवडीच्या ॥५७॥ जप माहेरचा वारसा । सासरी उमटे ठसा । निर्मळ जीवन आरसा । ठेव भरवसा शब्दांवरी ॥५८॥ फिरायला जाता दोघे । जी इकडेतिकडे बघे । कोण्याही ठिकाणी रिघे । हे अवघे वाईट ॥५९॥ शालीनतेने सदा वागे । हळू चाले पुरुषामागे । सुलक्षणा म्हणावे लागे । कधी वाऊगे वागेना ॥६०॥ पतीवरी निष्ठा भारी । घरची कामे करी सारी । बोलणे वागणे सुविचारी । सदाचारी सहयोगिनी ॥६१॥ नलूस केला उपदेश । अवघे ऐकती सावकाश । ही बोधवचने सर्वांस । ठेवा विश्र्वास मम बोला ॥६२॥ शब्द नव्हते एकटीशी । कळून चुकले सर्वांसी । ह्या उपकाराच्या राशी । जाणत्यासी कळो आले ॥६३॥ आता दोघे वधूवर । आणले जानवस्यावर । गुलाल लावून केले सार । तेल्हारेकर उरले हो ॥६४॥ रामसिंगभाऊ बलोदे । परिवारात मोठे धंदे । राजकारणी मुत्सद्दी खंदे । कुटुंब समदे भाविक ॥६५॥ मारोडे पाटील तुकाराम । त्यांचा होता इथे मुक्काम । बाबांपायी विश्वास ठाम । सुतराम शंका नसे ॥६६॥ तोताराम पाटील एक । शत्रुघ्न मोरे सेवक । श्रद्धाळू तसेच भाविक । भक्त अनेक बाबांचे ॥६७॥ ठाकुरदास तापडिया । तेही कार्यास आले या । तसे चंदासिंग मलीया । काही बाया सोबतीला ॥६८॥ बाबुराव पाटील खारोडे । कुटुंब येई बाबांकडे । मुलगा सुभाष घेत धडे । येणे पडे पायी त्यासी ॥६९॥ उगीच घेतील कुणी शंका । लग्नात एवढेच होते का । मोठ्यास लाविला टिका । बाकीचे का वगळले ॥७०॥ लढे शिपाई, नाम सरदारका । शब्द नाही खोटा फुका । ओळखती मुख्यनायका । कोण्याएका यश मिळे ॥७१॥ समाज येई पाठीमागे । हे घडतसे दैवयोगे । प्रेमाचे जुळती धागे । काही वाऊगे यात ना ॥७२॥ भलेही गावात असो भेद । कुठे हर्ष, कुठे खेद । बाबांबद्दल नाही वाद । कार्या प्रतिसाद सर्वांचा ॥७३॥ लगेच ठरला नेम । येथे करावे काही काम । नित्य चाले रामनाम । प्रवचनधाम बांधावे ॥७४॥ थोर थोर अग्रगणी । फिरून करावी वर्गणी । स्वयं देईल जरी कुणी । करू बांधणी इथे काही ॥७५॥ कमलाबाई जळगांवकर । हे कलावंताचे माहेर । लोकनाट्य महाराष्ट्रभर । महत्त्व फार त्याकाळी ॥७६॥ ही आधुनिक महानंदा । कमलकला तमाशा धंदा । तेल्हारा येथे येई सदा । दुखवी न कदा कुणासी ॥७७॥ ही मनमिळाऊ भाविक । आराध्य संत पुंडलिक । देवधर्मात खर्च आधक । वागणूक अतिनम्र ॥७८॥ तालुका मुर्तिजापूर । तेथे पुंडलिकनगर । उभारिले भव्य मंदिर । त्यात हातभार बाईंचा ॥७९॥ पुंडलिकाची करी भक्ती । त्यांच्याशेजारी केली वस्ती । तेथेच घेतली शेती । कुटुंब राहती काही तेथे ॥८०॥ हे पुंडलिक संस्थान । तीर्थ झाले असे महान । अनेकांचे श्रद्धास्थान । दूरदुरून भक्त येती ॥८१॥ या संस्थेचे संचालक । नारायणराव होते एक । बाबांचे बंधू पातोंड देख । करती देखरेख संस्थेची ॥८२॥ प्रथम असता गोरेगावी । नाथ गेले त्या गावी । दर्शने सांगता व्हावी । ध्यास जीवी दोघांच्या ॥८३॥ एकदा या शांतिमंदिरी । आली पुंडलिकांची फेरी । नारायणराव बरोबरी । सुख अंतरी सर्वांच्या ॥८४॥ एक साधू, एक संत । परमहंस एक महंत । एक विदेही गुणवंत । मूर्तिमंत देव दोघे ॥८५॥ बाबा मग पूजा करिती । दीप लावून आरती । दक्षिणाही समर्पिती । नारळ देती नारायणा ॥८६॥ पातोंड वदती काय । माझे कसे वळले पाय । झाला भाग्याचा उदय । नच जाय वर्णिल्या ॥८७॥ ही महानभक्त कमला । नाटक तमाशा कमलकला । चौधरी मॅनेजर भला । पाहे आपला कारभार ॥८८॥ अशी ही कमलाबाई । चित्त जडले नाथांपायी । दर्शनासी येई-जाई । झाली अनुयायी बाबांची ॥८९॥ या बाईचा फड जलसा । तेल्हार्‍यात येई सहसा । प्रेक्षक वर्ग बरा तसा । मिळे पैसा भरपूर ॥९०॥ तेथील बरेच मान्यवर । बाईचा करती आदर । बहिणीचे नाते जपणार । निर्मळ, उदार प्रेमाचे ॥९१॥ आली जरी का दिवाळी । रामसिंगभाऊस ओवाळी । ते ही घेत साडीचोळी । भेद मुळी नसे की ॥९२॥ बाई म्हणे तिकिटे विका । मी जलसा करते फुका । मिळेल जेवढा पैका । देऊ नका मला काही ॥९३॥ तेल्हारा माझे माहेर । तुमची श्रद्धा बाबांवर । नाथ माझे गुरूवर । त्या चरणांवर प्रेम माझे ॥९४॥ फडात जे का कलावंत । नाथ त्यांचे असे दैवत । मुली त्यांना देव मानतात । मंदिरी जात दर्शना ॥९५॥ तिथे गातात सुरेल गाणी । भारूड किंवा गौळणी । शुद्ध भाव, मंजुळ वाणी । फक्त लावणी तमाशात ॥९६॥ नरेंद्र माझा कलाकार । बाबांची आवडी फार । शुद्ध आचार-विचार। जाय वारंवार मंदिरी ॥९७॥ कितीही झाल्यास प्राप्ती । दान देऊ मंदिराप्रति । माझे कलावंत न घेती । सर्वांप्रति आनंद ॥९८॥ एकाने काढली युक्ती न्यारी । तिकीट दर ठेवा भारी । तमाशा पाहती नारी । कुतूहल भारी मनात ॥९९॥ घरंदाज बाया कुलीन । तमाशा ओंगळ मलीन । पाहती न बाया शालीन । वाटेल हीन कृत्य हे ॥१००॥ काही गुंड हरामजादे । फाडती तंबूचे पडदे । ज्यांच्यापुढे झूठ कायदे । हेच धंदे नेहमीचे ॥१०१॥ मग बोले कमलाबाई । विचार करा नको घाई । माझा भरवसा नाथांपायी । प्रयोग होई यशस्वी ॥१०२॥ भाऊ माझे सर्व ऐका । मी करीन सुंदर नाटिका । पाहण्यास येती बायका । डोलतील ठेका ऐकुनी ॥१०३॥ मुली गातील सुरेल गाणी । मधुर आवाज, गोड वाणी । शब्द न येती ओंगळवाणी । सुगृहिणी रिझतील ॥१०४॥ झाली न ऐकिली मात । नाही कुठे ऐकिवात । ते घडले तेल्हार्‍यात । शंका मनात नको की ॥१०५॥ घेतले सिनेमा थिएटर । मालकही झाले उदार । तिकिटांची विक्री फार । पैसा जाणार धर्मकार्या ॥१०६॥ प्रथम थोडा संकोच । बायांनी पहावा नाच । छोट्या शहरी हे धाडस । शंका उगीच येतसे ॥१०७॥ रामचंद्र निर्मळे । दरारा होता सगळीकडे । व्यवस्थापन यांचेकडे । दृष्टी न पडे माणूस॥१०८॥ जिकडेतिकडे बाया । जागा न मुळी बसाया । तिकिटे न जावी वाया । म्हणुनिया शंका मनी ॥१०९॥ गच्च भरली टॉकीज । नाटिका आईचं काळीज । नव्हता श्रृंगारसाज । बोलणे सहज विनोदी ॥११०॥ आई म्हणजेच आई । खरी कणव तिचे ठायी । मुलगा जरी कसाई । दूर न जाई मनातुनी ॥१११॥ हा करुणामय प्रसंग । आसवांनी भिजले अंग । मायेची चढे उमंग । वासना, अनंग दूर पळे ॥११२॥ पुन्हा मग दुसरे दिवशी । गर्दी सारखीच अशी । ज्याच्या त्याच्या मनात खुशी । घटना कशी घडली ही ॥११३॥ सुंदर वठविली नाटिका । नरेंद्राची प्रमुख भूमिका । गोड गळ्याच्या गायिका । गाती माईका सामोरे ॥११४॥ घटना घडे अल्पावधी । बराच गोळा झाला निधी । जिकडे तिकडे प्रसिद्धी । ऐसे कधी घडले ना ॥११५॥ मित्रास म्हणती रामसिंगभाऊ । चला हातरूणला जाऊ । कमलाबाईस सोबत घेऊ । पैसे नेऊ शांतिमंदिरी ॥११६॥ येण्याची केली तयारी । अंगणात उभ्या मोटारी । मंडळी थोर थोर सारी । रामपारी निघती हे ॥११७॥ न सांगता बाबांस कळले । त्यांनी प्रांगण स्वतः झाडले । पाचोळ्यासी सावडले । स्वच्छ केले पटांगण ॥११८॥ आले बडे बडे लोक । थैली सोबत बहुतेक । साथी कलावंत अनेक । होती एक कमलाबाई ॥११९॥ बाबांस करून विनंती । ही थैली घ्या म्हणती । ते मग उत्तर देती । मला रेती बिछायत ॥१२०॥ मला याचे काय काम । सुखे येथे करी आराम । मुखे जपतो रामनाम । नको छदाम मजपाशी ॥१२१॥ तुम्ही भाऊ, बहीण कमला । यासाठी समाज श्रमला । सर्वांमिळून निधी जमला । मी अपुला आलप्त ॥१२२॥ माझे म्हणणे ऐका ऐसे । तुम्हापासी ठेवा पैसे । खर्च करा योग्यतैसे । वाटले हायसे सर्वांना ॥१२३॥ पुढे काही दिवसांनी । झाली कामाची आखणी । माल आला पैशातुनी । लागला कारणी असा तो ॥१२४॥ श्यामरावजी सावळे । विजयकुमार तुंबडे । त्यांना कामाची वार्ता कळे । दान आगळे त्यांचेही ॥१२५॥ अकोल्याचे एक भक्त । उदार दानी विरक्त । बाबांकडे येत-जात । श्रद्धा नितांत बाबांपायी ॥१२६॥ अकोल्याचे नागेश पाली । यांची ही देणगी आली । त्यांचेकडे तयार झाली । खिडक्या-दारे भली मंदिरासी ॥१२७॥ एकदा आले मंदिरावर । डोईवरी ठेविला कर । असा केला अंगीकार । झाले न दूर जन्मभरी ॥१२८॥ नाथांवर जडले प्रेम । मंदिरी यावयाचा नेम । विचारती कुशलक्षेम । आनंद परम दोघांसी ॥१२९॥ बाबा वदले एकवार । दैवत राजराजेश्र्वर । जावे त्या मंदिरावर । करा निर्धार असा की ॥१३०॥ मग ते तेथे जाती । करिती पूजा आरती । नियम चाले ऐशारीती । अंगी विरक्ती बाणतसे ॥१३१॥ शांतिमंदिरी खिडक्या-दारे । यांचेच हे दान सारे । दाम वेची उदास विचारे । तेच खरे एकनिष्ठ ॥१३२॥ झाली प्रवचनधाम बांधणी । व्यासांची छबी आणे कुणी । व्यासपीठ आले त्याचदिनी । योग जुळुनी आला हा ॥१३३॥ बाबा बोलती प्रास्ताविक । दूरदुरून येती लोक । त्यात वक्तेही अनेक । श्रद्धाळू भाविक ऐकती ॥१३४॥ एक गजानन पाथ्रीकर । रमेश गतमने कास्तकार । मनब्दा येथे राहणार । असती हजर प्रवचना ॥१३५॥ आणखी खेट्टे दशरथ । रविवारी येती येथ । शेवटी एक भजन गात । शेवट होत प्रवचनाचा ॥१३६॥ महादेवराव पळसखेड । लागून मडाखेड । येथील जगन्नाथ कड । दोघा आवड दर्शनाची ॥१३७॥ येथे येती पेरणी आधी । काय पेरावे शेतामधी । आईविना न पेरती कधी । श्रद्धा समदी बाबांवरी ॥१३८॥ एकदा पैशाची अडचण । पेरणे राही खोळंबून । गार्‍हाणे सांगती येउᆬन । उपाय आण सुचेना ॥१३९॥ बाबा वदले तुमच्याघरी । उद्या दुसर्‍याप्रहरी । येईल जा कुणीतरी । पैसे बरोबरी घेऊन ॥१४०॥ अनेकांचे सुटे कोडे । येवो कोणते साकडे । प्रेमाने जग झाले वेडे । मंदिराकडे धाव घेती ॥१४१॥ दर्यापूरचे भारसाकळे । मन अध्यात्माकडे वळे । कन्या शकुंतला इंगळे । हिला कळे ज्ञानचर्चा ॥१४२॥ हातरूणची पायी वारी । सोबत बाया मुले सारी । प्रवचनास रविवारी । कधी करी स्वयंपाक ॥१४३॥ चतरकार दादाराव येत । शांतिमंदिरी धाव घेत । कधीमधी मुक्काम करीत । सेवारत बाबांपायी ॥१४४॥ एक आला बेरोजगार । शिकला होता थोडा फार । बाबांना पाही कामावर । लाजून चूर झाला तो ॥१४५॥ माक्याघरी असून शेती । काम न केले शेतावरती । पाहून पालटली मती । झाली उपरती त्यालाही ॥१४६॥ पोटासाठी साधू झाला । जन महात्मा म्हणती त्याला । दक्षिणेवर जगू लागला । मठ बांधला राहावया ॥१४७॥ बाबास नावडती रिकामे । सरळ सांगती करा कामे । कामातची मन रमे । मज न गमे कामाविना ॥१४८॥ बाबांचा नित्य संग । डोळ्यांनी पाहिले प्रसंग । कष्टाने झिजविले अंग । अंतरंग जाणू लागे ॥१४९॥ आम्ही सोबत काम केले । डवर्‍याचे बैल हाकले । नेहमी माझे मन राखले । मज न कळले देवपण ॥१५०॥ असा साधू होणे नाही । फिरतसे दिशा दाही । अंतर्बाह्य निर्मल राही । सदा सर्वही निष्काम ॥१५१॥ भाकर खाई हातावर । शेंगदाणे कधी गाजर । उपाशी कधी निराहार । कुणा भार नाही कधी ॥१५२॥ उणीवेची करी पूर्तता । ही जाणीव सार्‍या भक्ता । अनेक लागले सत्पथा । सुटला गुंता प्रपंचाचा ॥१५३॥ आता अध्याय करू पूर्ण । सद्गुरूस जाऊ शरण । जो चुकवी जन्म मरण । घेऊ लोटांगण त्याचेपायी ॥१५४॥ कर्मयोगाचे तत्त्वज्ञान । नाथ दावी स्वये आचरून । महादेवदासाचे आत्मनिवेदन । लेखणीतून पाझरे ॥१५५॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र सतरावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ ॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment