अध्यायसत्र एकोणतिसावे

श्री गणेशाय नमः॥ नमो नमो श्री नाथा । बुद्धीचा तूच दाता । जड-चेतनाचा रक्षिता । आधष्ठाता मनाचा ॥१॥ हा अध्याय एकोणतिसावा । नाथांचा चिरविसावा । सगुणी ध्यास असावा । निर्गुणी ठसावा ज्ञानबोध ॥२॥ प्रथम सगुणभक्ती । भाव जडे मूर्तीवरती । पूजा-अर्चा, आरती । भक्त करती पे्रमाने ॥३॥ सगुणासी असे आकार । निर्गुण ते निराकार । निराकार वा साकार । समान प्रकार भक्तीचे ॥४॥ जे पाहावे डोळेभरी । तेच ठसावे अंतरी । मग डोळे मिटले जरी । जाई न दुरी ध्यान ते ॥५॥ सूर्य शाश्वत आहे । उदकातील बिंब न राहे । जल शोषिल्यासी पाहे । भासे विलय प्रतिबिंब ॥६॥ ज्ञान, भक्ती, विरक्ती । गंगा, यमुना, सरस्वती । संगमी एकची होती । घडली मूर्ती नाथांची ॥७॥ नाथांच्या अगणित लीला । मती कुंठित वर्णायाला । लेकराच्या प्रयत्नाला । आधार दिला भक्तांनी ॥८॥ बाबांची नाजुक स्थिती । ढासळली भासे प्रकृती । इंद्रिये शिथिल आत । हालचाल ती मंदावली ॥९॥ येणार्‍यासी स्वये सांगती । ईश्वराची करा भक्ती । स्मरा त्यासी दिवसराती । येईल सांगाती शिदोरी ॥१०॥ दिवसांपाठी दिवस जात । तेजस्वीता कायेसी येत । श्रीमुख दिसे प्रफुल्लित । वलयांकित प्रभा दिसे ॥११॥ देहाचा ना झाला सापळा । दिसे न मुळी हडकुळा । नाही आली अवकळा । वर्ण पिवळा सतेज ॥१२॥ आली दशमी विजया । सांगती मंदिरी न्यावया । चालवेना मज पाया । आणा बसाया वाहन ॥१३॥ माझे प्रेम असे मंदिरी । तेथेच मी वास्तव्य करी । हा देह जाईल जरी । नित्य मंदिरी राहीन मी ॥१४॥ जडदेहाचा होय नाश । आत्मा अमर असे खास । मंदिरी राहीन माझा वास । अंतर भक्तास नेदी मी ॥१५॥ दसर्‍याचे दिवशी । बाबांस आणले मंदिरासी । लोक येती दर्शनासी । आशिष त्यासी नाथ देती ॥१६॥ मूर्ती दिसे तेजःपुंज । भक्ता सांगे हितगुज । बोलणे नितांत सहज । वाटे मज ज्ञानबोध ॥१७॥ आत्मा नामानिराळा । सांगत आलो वेळोवेळा । देह नाशिवंत सगळा । आत्मा वेगळा सुखरूप ॥१८॥ जरी जाईल हा देह । यात नाही संदेह । याचा धरू नये मोह । असावे निर्मोह त्याच्याप्रती ॥१९॥ हा देह हाडामांसाचा । भरवसा काय त्याचा । परी आतील चैतन्याचा । कायमचा ठाव असे ॥२०॥ माझे भक्त असावे सुखी । नसावे कुणी कष्टीदुःखी । शब्द येती हेच मुखी । सर्वां राखी सुखरूप ॥२१॥ पुढे आली पहा दिवाळी । गोळा झाल्या मुलीबाळी । कुटुंबाचे सहमेळी । साखरपोळी खाऊ लागे ॥२२॥ दमयंती, शीलाभारती । रजनीसवे आली कीर्ती । मुलामुलींसह नलिनी ती । दिवाळी करती आनंदाने ॥२३॥ नातू कैवल्य, हरिहर । पुत्र श्याम, जालंदर । सुनांसहित परिवार । सर्वांबरोबर दिवाळी ॥२४॥ बहीण आली अंजनाबाई । भावास ओवाळणी होई । माथ्यावरी तिलक लेई । नाथ देई साडी चोळी ॥२५॥ आग्रहाने आणले घरी । दिवाळी केली साजरी । आनंद दाटला उरी । झाला संसारी परमार्थ ॥२६॥ प्रपंच आणि परमार्थ । दोन्ही साधता पुरुषार्थ । मानवतेचा कळला अर्थ । जीवनाचे सार्थ साधले ॥२७॥ हृदय जणू मऊ लोणी । दुखविले ना कधी कुणी । मन वेधी अमृतवाणी । तसीच करणी निर्मळ ॥२८॥ पटेल आले रोहित । रुपावरी झाले मोहित । चरणी पुष्प वाहत । पे्रमे पाहत बाबांकडे ॥२९॥ लागले सगुणाचे ध्यान । विसरले देहाचे भान । तंद्री लागलीसे छान । मीपण हरपले ॥३०॥ बाबा वदती तयास । मुक्काम पाच दिवस । उरला येथील रहिवास । जाईन गावास आपुल्या ॥३१॥ तरी असेन सदा मंदिरी । जो ध्याईल त्याच्या अंतरी । जो मजवर प्रेम करी । तयावरी लोभ बहू ॥३२॥ घडल्या गोष्टीकडे वळू । संतमहात्म्य येईल कळू । दयासागर कनवाळू । कसे कृपाळू मायबाप ॥३३॥ बोध अमृताची घुटी । दोन संतांची होय भेटी । एक विष्णू, एक धूर्जटी । ब्रह्म भूतटी अवतरले ॥३४॥ परत आला जणू तुका । दुजा जनार्दनाचा एका । प्रकाशली प्रज्ञादीपिका । भक्तिसुखा पार नोहे ॥३५॥ श्रीधरस्वामी गुरुवर्य । भागवताचे आचार्य । ज्ञानदानाचे महत्कार्य । दिले स्थैर्य संस्कृतीला ॥३६॥ आम्हांवरी केली कृपा । ग्रंथराज ‘भागवत प्रपा’। मार्ग दाविला सुलभ सोपा । निजरूपा जाणाया ॥३७॥ दुसरे अमुचे नाथ । भक्तास देती सदा साथ । अनाथा करी सनाथ । दावियला पथ भक्तीचा ॥३८॥ दोन संत एकेठायी । पाहण्यासी लागे पुण्याई । ज्ञानचर्चा चालती पाही । लाभ होई भक्तांना ॥३९॥ एकदा बोलले नाथ । शरीर आता देईना साथ । एक ठेवा स्मरणात । असावे अंतसमयाला ॥४०॥ वदले श्रीधरस्वामी । सारे जाणार वैकुंठधामी । आधी-नंतरची हमी । द्याया कोण मी आहे असा? ॥४१॥ महात्म्याचे सहज बोल । अर्थ असे यात खोल । कळावे आपणा मोल । नाशिवंत फोल देह हा ॥४२॥ एक दिवस जाणार काया । रंक असो अथवा राया । लोभ धरावा कासया । फसवी माया अज्ञजना ॥४३॥ ज्यांना हे गुह्य कळले । तेच भक्तीकडे वळले । त्यांचेच भाग्य फळले । गळले येर पामर ॥४४॥ दोघांमध्ये ठरले आधी । प्रथम ज्याची होय समाधी । दुज्याने राहून तधी । आतमधी बैसवावे ॥४५॥ स्वहस्ते मूठभर माती । घालावी समाधीवरती । मिळेल तया चिरशांती । याचसाठी अंती असावे ॥४६॥ संतांनी या एकमेका । शब्द दिला तो नेटका । जाणार नाही फुका । हाच निका अनुभव ॥४७॥ कार्तिक शुक्ल सप्तमी । संवत्सर विक्रमनामी । नाथ निघाले निजधामी । कायम मुक्कामी कैलासा ॥४८॥ तारीख तीन, शुक्रवार । मास नोव्हेंबर, दोन हजार । दिवसाचा दुसरा प्रहर । सांडी कलेवर महात्मा ॥४९॥ शके एकोणीसशे बावीस साली । समाधिस्थ झाली माउली । हरपे भक्तांची सावली । पोरकी झाली लेकरे ॥५०॥ परी हा लौकिकभाव । संता नाही येवजाव । असे त्यांचा अखंड ठाव । अन्य देव नाही दुजा ॥५१॥ कापुराच्या सवे अग्नी । समरस होता नुरले दोन्ही । ज्योतीत ज्योत मिळुनी । बोळवणी झाली की ॥५२॥ महाराज स्वामी श्रीधर । होते लांब दूरवर । राजस्थानी उदयपूर । कानांवर शब्द आले ॥५३॥ ओळखीचा वाटे आवाज । ऐकती श्रीधर महाराज । मी जाणार आहे आज । आज्ञा मज झाली असे ॥५४॥ हे शब्द सद्गुरुरायाचे । होते त्यांच्या परिचयाचे । म्हणती मला जावयाचे । थांबायाचे ना क्षणभरी ॥५५॥ परी समय बिकट । मिळेना रेल्वेचे तिकीट । घेऊन मोटारगाडी थेट । आले निकट अंदुर्‍यासी ॥५६॥ फार लांबचा प्रवास । एकासनी सोळा तास । पोहचले पहाटेस । पहा शब्दांस जागले ॥५७॥ घरी जालंदर, सविता । श्याम, मुले आणि कविता । जगदीश, कमल, अनंता । आली मागुता अंजनाबाई ॥५८॥ आल्या मुली, सर्व जावई । नातू, नाती आल्या त्याही । परिवार एक होई । कुणास काही सुचेना ॥५९॥ वार्ता जाय वार्‍यासवे । धावती भक्तांचे थवे । लांब लांबून कुणी यावे । शेजारी गावे सर्वही ॥६०॥ बाबांचा भक्त एक । अमेरिकेत स्थायिक । नामे डामरे अशोक ।सूचना मूक मिळे त्यांना ॥६१॥ आले ऐन वेळेवर । विमानाने सत्वर । शिर ठेवी पायांवर । अश्रू अनावर डोळ्यात ॥६२॥ गावोगावीचे किती लोक । दूरदुरून आले अनेक । करू लागले अत्यंत शोक । पुण्यश्लोक हरवला ॥६३॥ हाय हाय रे दुर्दैवा । साधला कसा हा दावा । लुटला आमचा ठेवा । आता विसावा कोठे आम्हा? ॥६४॥ दारी सजविले स्वर्गासन । त्यात घातले आसन । फुलांच्या माळा गुंफून । आच्छादन फुलांचे ॥६५॥ टाळ-मृदंगाचा ध्वनी । ढोल-ताशे आणले कुणी । निनादती शंखध्वनी । ठेविले आसनी महाराज ॥६६॥ गावातून मिरवणूक । स्त्रिया, पुरुष, बालक । कुणी न उरला बहुतेक । गावलोक अवघेची ॥६७॥ जनसमुदाय झाला गोळा । अश्रू वाहू लागती डोळा । चिरविश्रांती सोहळा । काळासही गहिवर ॥६८॥ विसरून वर्ण-जाती । अवघेच मग एक होती । क्रमाक्रमाने खांदा देती । हळू चालती मार्गाने ॥६९॥ रस्ते अवघे झाडले । दारी सडासंमार्जन केले । रांगोळ्यांनी सजविले । गाव लोटले सोहळ्याला ॥७०॥ मिरवणूक येता दारी । आरती ओवाळती नारी । तिलक चढे माथ्यावरी । पूजा सारी समर्पिती ॥७१॥ अमरावती शहर । तेथील विद्युतनगर । भक्त लोमटे सुधाकर । घेत खांद्यावर पताका ॥७२॥ व्यवहारे शुकदेव । संग्रामपूर-तामगाव । कळताच घेतली धाव । झाला भक्तिभाव शोकाकुल ॥७३॥ येताच पायावरी पडले । धाय मोकलून रडले । घरी जाण्या पाय अडले । कोलमडले भूवरी ॥७४॥ केला इथेच मुक्काम । तेरा दिवस हरिनाम । दिसेल ते करती काम । नाही आराम तिळभरी ॥७५॥ पुढे वाजे टाळ, मृदंग । भजनात भक्त दंग । पालखी चाले मागोमाग । आले मग मंदिराशी ॥७६॥ हरिभक्त परायण । मठाधिपती पंचगव्हाण । विद्यावाचस्पती वाणीभूषण । आले जाण वेळेवरी ॥७७॥ अमुची आहे संस्कृती । साधू, महात्मा, भूपती । ती जागा न राहावी रिती । लागे आधपती नेमावा ॥७८॥ मोठा पुत्र जालंदर । त्यास मान देउᆬन थोर । दीक्षासनी केले स्थिर । बरोबर श्याम होता ॥७९॥ श्रीधर स्वामी दयानिधी । त्यांनी सारिला हा विधी । स्थळ साफ केले आधी । होते तधी पाठक ही ॥८०॥ अलोट जनसमुदाय । नावे लिहू कशी काय । वर्णविल्या नच जाय । खुंटला उपाय सुचेना ॥८१॥ भव्य असे शांतिमंदिर । उत्तराभिमुख प्रवेशद्वार । विठ्ठल-रुक्मिणी समोर । पायरीवर बैसविले ॥८२॥ प्रथम वत्सला माउली । जेथे समाधिस्थ झाली । तिच्या शेजारी जागा केली । सोबत जोडली नाथांनी ॥८३॥ मातेच्या समाधी निकट । लांब-रुंद चार फूट । खड्डा केला खोलगट । कपार नीट आत केले ॥८४॥ श्रीधरस्वामी सांगती । दोघे बंधू पूजा करिती । भक्त करिती आरती ।दर्शन घेती नरनारी ॥८५॥ आत विटांचा चौथरा । बांधला होता बरा । मिठाच्या घातले थरा ।गुरुवरा ठेवियले ॥८६॥ श्रीधरस्वामी सुचविती । पद्मासन घाला म्हणती । मग केले तैशारीती । मीठ वरती घातले ॥८७॥ तेथ गर्दी झाली आत । देण्या मूठ मूठ माती । सोहळा डोळ्यात साठवती । भक्त वाहती श्रद्धांजली ॥८८॥ मागे उरले अनंत । जड देहाचा झाला अंत । लागून गेली सार्‍या खंत । असा संत होणे नाही ॥८९॥ विठ्ठल गणपत पानझाडे । तीन दिवस सारखा रडे । आम्ही पहावे कोणाकडे । सुटले कोडे त्याचे पहा ॥९०॥ स्वप्नात दिली त्यास भेटी । म्हणे मी आहे भक्तानेटी । होऊ नको दुःखीकष्टी । ताटातुटी ना भक्तासंगे ॥९१॥ सूर्य काय कोठे गेला । तो ठायीच असे ठेला । उदय-अस्त भास झाला । ज्ञानी याला जाणती ॥९२॥ अंधार आणि प्रकाश । दृष्टीभेदाचा आभास । जाणे-येणे काय त्यास । संतांचा वास अखंड ॥९३॥ चालते-बोलते ईश्र्वर । संत भूलोकी अवतार । उद्धराया जडमूढ नर । पृथ्वीवर जन्म घेती ॥९४॥ डामरे परिवार भाविक । नाथांचे परम सेवक । लांबून आला अशोक । सूचना एक केली त्याने ॥९५॥ आम्ही भक्त पामर । नाथ अमुचे गुरुवर । भाव त्यांच्या चरणांवर । ऐका एकवार विनंती ॥९६॥ तेरा दिवसांपर्यंत । हरिनाम चालेल सतत । या पावन परिसरात । कीर्तन होत राहील ॥९७॥ वडीलबंधू तुळशीराम । केला इथेच मुक्काम । अखंड चालले हरिनाम । करिती श्रम गावकरी ॥९८॥ प्रथम गोपाळबुवा आले । रात्रीला कीर्तन झाले । टाळ, वीणा अखंड चाले । गर्दी न हाले काही केल्या ॥९९॥ मठाधिपती सामदा । नित्य वंदावे त्यापदा । कीर्तन झाले एकदा । चाले सदा क्रम असा ॥१००॥ आमलेंची वाजे खंजिरी । तबला, पेटी, मंजिरी । महाराजांची वैखरी । बोध करी जनतेला ॥१०१॥ थारचे बुवा काशिनाथ । टाळकरी देती साथ । भजनकीर्तन दिनरात । चाले नियमित रोजची ॥१०२॥ श्रीधरस्वामींचे कीर्तन । रसाळवाणी प्रवचन । श्रोते होती धन्यधन्य । सहज श्रवणभक्ती घडे ॥१०३॥ रोज होई अन्नदान । कीर्तनकाराचा सन्मान । दुमदुमले पटांगण । होय प्रसन्न पांडुरंग ॥१०४॥ हा ब्रह्मसंमीलन सोहळा । भाग्ये लाभला ज्यांचे डोळा । आनंदीआनंद सगळा । नाथची सकळांठायी दिसे ॥१०५॥ दायमा महाराज पारस । यांचे कीर्तन एक दिवस । ओथंबला भक्तिरस । करी श्रोत्यास मंत्रमुग्ध ॥१०६॥ तीर्थक्षेत्र सखारामपूर । संतांचे माहेरघर । श्रीरामबुवा गुरुवर । झाले स्थिर ज्याठायी ॥१०७॥ तेथील संत तुकाराम । सेवाव्रत ज्यांचे निष्काम । हाती वीणा, मुखी नाम । जिंकिला काम जयाने ॥१०८॥ अखेरचा गोपालकाला । बुवा आले कीर्तनाला । समुदाय गोळा झाला । कीर्तनाला रंग चढे ॥१०९॥ काल्याचे झाले कीर्तन । काला हा विषय गहन । याचे आगळे महिमान । विषद करून सांगती ॥११०॥ गोपालकृष्णाचा काला । दुर्लभ ब्रह्मादिकाला । लाभे आम्हा भक्तगणाला । या दैवाला पार नाही ॥१११॥ कीर्तनानंतर आरती । सांप्रदायाची ही पद्धती । द्रयुगे अठ्ठावीस म्हणतीच्च् । ओवाळिती विठ्ठला ॥११२॥ ज्ञानराजा, तुकाराम । एकनाथ, सखाराम । आरती गाउᆬन सुगम । देती विराम कीर्तना ॥११३॥ श्रीरामबुवा गुरुवर्य । या भूमीस लागती पाय । मारला कुदळीचा घाव । देवालय उभे झाले ॥११४॥ मूर्तीची केली स्थापना । लिहिता दुरुक्ती होय पुन्हा । पूर्वीच केले लेखना । पंढरीचा राणा उभा ठेला ॥११५॥ श्रीरामबुवांची स्मृती । अखंड राहावी जागती । नाथ लिहिती आरती । नाव धरती भ्रमरनाथ ॥११६॥ भ्रमरनाथ महादेव । भक्तांची जी निजठेव । तेच अमुचे गुरुदेव । स्वयमेव ब्रह्मरूप ॥११७॥ असा हा भ्रमरानंद । स्वये सेवी मकरंद । जगा वाटी सुख, स्वानंद । आनंदाचा कंद असा ॥११८॥ झाली श्रीरामांची आरती । नाथांनी जी लिहिली होती । कीर्तनाची होय पूर्ती । प्रसाद घेती काल्याचा ॥११९॥ मग झाला महाप्रसाद । सारे देती यासी साद । जनसागर अमर्याद । निर्विवाद कार्य झाले ॥१२०॥ देव, गुरू आणि संत । एकची असती निश्चित । वांछिले फल होय प्राप्त । आले सांगत ज्ञानी आम्हा ॥१२१॥ गुरू नव्हे देहधारी । गुरू व्यापी धरा सारी । हाक देईल त्याच्यादारी । आठही प्रहरी तिष्ठत ॥१२२॥ गुरूस कैसे मरण । नित्य करा त्याचे स्मरण । दर्शन देई नारायण । गुणावगुण दूर पळे ॥१२३॥ काष्ठात अग्नी दिसेना । घर्षण केल्या प्राप्त पुन्हा । गुप्त प्रकटे याक्षणा । हीच भावना मनी धरा ॥१२४॥ वेळ नाही, काळ नाही । मठ-मंदिर स्थळ नाही । सबळ-निर्बळ न पाही । जवळ राही भक्तांच्या ॥१२५॥ एकदा जो गुरूचा झाला । मग विसर नाही त्याला । साद देई हाकेला । सदा भुकेला पे्रमाचा ॥१२६॥ हा अध्याय एकोणतिसावा । नित्य संग्रही असावा । वाचता मिळे विसावा । नाथ दिसावा दृष्टीपुढे ॥१२७॥। या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । स्वानुभवे केले कथन । हे महिमान नाथांचे ॥१२८॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र एकोणतिसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment