
श्री गणेशाय नमः॥ सीतारामचंद्राय नमः॥ सद्गुरुनाथाय नमः ॥ नमो नमो नाथवरा । कमलापती श्रीधरा । पार्वतीपते शिवहरा । सावित्रीवरा चतुर्मुखा ॥१॥ नमन माझे योगीजना । जाणती जे आत्मखुणा । मार्ग दाविती सज्जना । बद्धजीवांना उद्धरिती ॥२॥ आज बाबा निघून गेले । जाताना वचन दिले । मी आहे साथीस अपुले । करीन भले भक्तांचे ॥३॥ जडदेहास मर्यादा । आत्मा अविनाशी सदा । निवारीन तुमची आपदा । तुम्हास कदा अव्हेरी ना ॥४॥ विश्वास ज्यांचा असा आहे । मी तेथेच सदा राहे । अनुभव घेऊन पाहे । सुखदुःख साहे त्याचे मी ॥५॥ आला ग्रंथाचा शेवट । बोल बाबांचे माझे ओठ । सांभाळ केला माझा नीट । मनास धीट केले माक्या ॥६॥ ज्यांच्यामुळे गाव प्रसिद्ध । वसती नाथबाबा सिद्ध । मुमुक्षू, साधक आणि बद्ध । पावन शुद्ध दर्शने ॥७॥ नाथचरित्र आतगहन । अल्पमते केले कथन । संतवैभव महान । महिमान उद्धारक ॥८॥ ग्रंथ हा असावा संग्रही । विनंती माझी आग्रही । नाथ चिंता वारी सर्वही । निश्चिंत राही वाचक ॥९॥ प्रेमळ, निर्मळ असो वक्ता । आनंदे डोलावा श्रोता । आभलाषा न तत्त्वतः । एकात्मता दोहीठाई ॥१०॥ निष्कामसेवा, रसाळवाणी । बोध ठसे अंतःकरणी । श्रोते आनंदती श्रवणी । तयाचरणी नमन माझे ॥११॥ पैशांसाठी करिती कथा । लोभी वृत्ती सर्वथा । ते सांगणे गेले वृथा । मिळे न संथा ज्ञानाची ॥१२॥ आशाबद्ध जरी वक्ता । धाक श्रोतियांच्या चित्ता । तेथ कशाची हरिकथा । ते श्रम वृथा गेले सारे ॥१३॥ सज्जनांचा सहवास । नाथचरणांची आस । जन्ममरणाचा त्रास । चुकेल खास निश्चित ॥१४॥ हातरूणची करा वारी । शांती मिळे शांतिमंदिरी । हा अनुभव घ्याल जरी । पावे अंतरी समाधान ॥१५॥ तुळशीराम डामरे । मनकर्णाबाईसह सारे । नाथांचे भक्त हे न्यारे । सहपरिवारे येत मंदिरी ॥१६॥ बाबांचे उपासक । ज्ञानभक्ती जोपासक । कुटुंब अवघे भाविक । सच्चे सेवक नाथांचे ॥१७॥ आईवडिलांची उपासना । पाहती गजानन-वंदना । स्फूर्ती झाली त्यांच्या मना । सिद्धस्थाना सेवा करू ॥१८॥ केला श्यामसोबत विचार । बांधावे समाधीमंदिर । असावे भव्य मनोहर । सोयीस्कर सर्वांसाठी ॥१९॥ शिल्पकार ठोंबरे मिलिंद । बांधकामात प्रसिद्ध । त्यांचेशी साधता संवाद । होय आनंद त्यांनाही ॥२०॥ अवघे आले मंदिराशी । पूज्य नाथांच्या समाधीपाशी । विनविती माउलीशी । नेई कळसाशी संकल्प ॥२१॥ आहेत चार पुरुषार्थ । धर्म, काम, मोक्ष, अर्थ । ज्यासी कळे याचा अर्थ । जीवन सार्थ झाले त्याचे ॥२२॥ मुलगा असावा आज्ञाधारी । आईवडिलांची सेवा करी । वैभव नांदे त्याच्यादारी । आन दुसरी भक्ती नाही ॥२३॥ नीतीने मिळवी अर्थ । दानात खर्ची यथार्थ । त्याने साधला परमार्थ । येर ते व्यर्थ वाया गेले ॥२४॥ अधर्मे संपत्ती लाटली । पाठीमागे बाईबाटली । यातच पूंजी आटली । पुढे वाटली लाज जनी ॥२५॥ भाग्याने झाला धनवान । सत्पात्री करी दान । संतुष्ट त्यावरी भगवान । पुण्य महान गाठी पडे ॥२६॥ ठोंबरे झाले ठेकेदार । मजूर लाविले कामावर । केला चौथरा चौफेर । पाया साकार मजबूत ॥२७॥ कामास येऊ लागे गती । डामरे श्यामसवे येती । स्वतः डोळ्याने पाहती । ऐशारीती काम चाले ॥२८॥ आकार घेई प्रासाद । पाहून वाटे आल्हाद । कारागीर देती साद । ठोंबरे मिलिंद लक्ष देती ॥२९॥ आत भला मोठा गाभारा। त्यावर चौकोनी मनोरा । कळस दुरून दिसे साजरा । शोभा मंदिरा येऊ लागे ॥३०॥ जसे धान्याविन कोठार । पुरुषाविन सुने घर । तैसे मूर्तीविन मंदिर । शून्याकार दिसतसे ॥३१॥ राजेंद्र खत्री येती दर्शना । तसेच कुकडे श्रीकृष्णा । आणि सुरेश भट्टी जाणा । कधी हरिभाऊंना आणती ॥३२॥ बजरंगलाला पुरोहित । वागचौरेही सोबत । नितीन वानेडकर येत । असे संगत अशोक शर्मा ॥३३॥ सारे नित्याचे वारकरी । वारी न चुके सोमवारी । श्रद्धा दृढ बाबांवरी । रमती मंदिरी हरिनामी ॥३४॥ खत्रीजींच्या आले मना । भट्टीस दिली कल्पना । नाथमूर्ती आणू या स्थाना । राजस्थाना जाऊ या ॥३५॥ एकदिलाने विचार । सोबतीला जालंदर । म्हणे जाऊ या जयपूर । मूर्ती मनोहर आणू या ॥३६॥ नाथबाबा-वत्सलामाता । आम्हा वंद्य उभयता । मूर्ती घडवाया देऊ आता । या सहमता सर्व येती ॥३७॥ कलाकारांचे माहेरघर । भारतात प्रसिद्ध शहर । मूर्ती घडविती मनोहर । जयपूर राजस्थानी ॥३८॥ त्रिवेणी कला निकेतन । शर्माजी सत्यनारायण । मूर्तिकार थोर महान । गेले जाण त्यांच्याकडे ॥३९॥ महादेवनाथ पिता । तसेच वत्सलामाता । छायाचित्रे सोपविता । काम आता सुरू झाले ॥४०॥ कलाकार सत्यनारायण । दगडात ओतला प्राण । निर्जीवासी सजीवपण । आले देवपण दगडासी ॥४१॥ मूर्ती घडल्या मनोहारी । पाहताची दुःख हारी । भक्तिभावे जो निहारी । अष्टौप्रहरी सुख लाभे ॥४२॥ आली चैत्र वद्य अष्टमी । सोहळ्याला मुहूर्त नामी । पहिल्या दिवशी सप्तमी । होत नेहमी कीर्तन ॥४२॥ श्रीराम महाराज यांनी । स्थापिले विठ्ठल-रुक्मिणी । राधा आणि कृष्ण दोन्ही । प्रथमदर्शनी हनुमंत ॥४३॥ मूर्तिस्थापनेचा सोहळा । वर्णन केला पूर्वी सगळा । आठवावे प्रेमळा । या वेळा सज्जन हो ॥४४॥ ह्या अमृत मुहूर्तावर । प्रतिष्ठापाव्या मूर्ती सुंदर । नाथ वत्सलामातेबरोबर । धर्मसंस्कार करूनिया ॥४५॥ बांधियले यज्ञकुंड । स्थापियले वक्रतुंड । होमद्रव्य मिळविले उदंड । यज्ञ अखंड चेतविला ॥४६॥ दिनेश व्यास पुरोहित । ब्रह्मवृंदासमवेत । यथाविधी पूजा सांगत । आहुती देत यज्ञकुंडी ॥४७॥ विजय आणि प्रबोधिनी । विवेकसह देवयानी । बैसुनिया अग्रस्थानी । समिधा हवनी समर्पिती ॥४८॥ दिनेश व्यास देती आज्ञा । होमद्रव्य टाकाया यज्ञा । समर्पिती राजेंद्र-प्रज्ञा । त्या सर्वज्ञा तोषवाया ॥४९॥ पानझाडे लक्ष्मी-अरुण । गुरुआज्ञा जाणती प्रमाण । मनोभावे चाले पूजन । करती समर्पण साकल्य ॥५०॥ अकोल्याचे वानेडकर । सखुबाई-मधुकर । बसून यज्ञवेदीसमोर । सोडिती धार तुपाची ॥५१॥ विधीयुक्त कर्म सारे । शास्त्रोक्त मंत्रोच्चारे । वंदना-गजानन डामरे । देत हर्षभरे आहुती ॥५२॥ पुरोहित गुरुजी व्यास । हव्य सांगती अर्पावयास । सोनोने उषा-गणेश । तसे सावकाश आर्पती ॥५३॥ ब्राह्मण मंत्रघोष करिती । यज्ञात पडती आहुती । मूर्तीस स्नान घालिती । पूजा करिती यथाविधी ॥५४॥ नाथांची प्रिय भगिनी । अंजनाबाई महाभागिनी । बैसविले पूजास्थानी । मान देऊनी यथायोग्य ॥५५॥ बाई मूर्तीं कडे पाहती । डोळ्यांमधुनी अश्रू वाहती । गहिवरुनिया येई आत । दर्शन घेती बंधूचे ॥५६॥ शेजारीच वत्सला माता । तिथे झुकविला माथा । आठविले यादवनाथा । कोण जाणे व्यथा अंतरीची ॥५७॥ पूजनीय बाईंचे हातांनी । मूर्ती स्थापन केल्या दोन्ही । जालंदर, श्याम त्याठिकाणी । एका बाजूनी पाठक ॥५८॥ मूर्तीसंजीवन सोहळा । प्रथमप्रहर अमृतवेळा । भाग्यवान पाहती डोळा । असा आगळा आनंद हा ॥५९॥ विक्रमनामे संवत ।दोन हजार साठात । शके एकोणीसशे सव्विसात । चैत्रात वद्य सप्तमी ॥६०॥ तारणनाम संवत्सर । दिनांक अकरा, महिना चार । इसवीसन दोनहजार चार । होता रविवार या दिवशी ॥६१॥ सप्तमीस हरिकीर्तन । ही प्रथा पूर्वीपासून । अष्टमीस काला करून । प्रसादग्रहण होय मग ॥६२॥ पूर्वी बुवा येती श्रीराम । दरवर्षीचा होता नेम । तसेच बुवा तुकाराम । चालविला क्रम मागचा ॥६३॥ अफाट जनसमुदाय झाला । गोपाळबुवा करती काला । गोडवा महाप्रसादाला । लाभे सर्वाला भाग्य असे ॥६४॥ सप्तमी आणि अष्टमी । श्रोते तल्लीन हरिनामी । गजबजली पवित्रभूमी । नाथांचे पे्रमी भक्तगण ॥६५॥ वारकर्यांचे ज्ञानपीठ । सखारामपूर वरिष्ठ । तुकाराम संतश्रेष्ठ । एकनिष्ठ भक्त जे का ॥६६॥ देवळालीचे आमदार आले । बबनराव घोलप भले । यथोचित स्वागत केले । स्थानापन्न झाले मान्यवर ॥६७॥ त्यांचे झाले भाषण । भाषण नव्हे प्रवचन । शांतिसुधा प्रकाशन । मंदिर लोकार्पण सोहळा ॥६८॥ लोक आले दूरदुरून । रात्री झाले हरिकीर्तन । सांप्रदायिक पद्धतीनं । आरती करून संपविले ॥६९॥ माझा निर्वाणीचा इशारा । मोह माया दूर सारा । व्यर्थ आहे सारा पसारा । नित्य स्मरा त्या प्रभुसी ॥७०॥ या नाथांच्या दर्शना । पुरे मनाची कामना । शांती मिळे भक्त सज्जना । कुणी जाईना रिक्त हस्ते ॥७१॥ बाबांचे अनेक भक्त । काही फलांचे वांच्छित । प्राप्त अप्राप्त झाल्या निश्चित । विसरून जात काही कोणी ॥७२॥ ज्याची असे अखंड निष्ठा । जनी वाढे मानप्रतिष्ठा । तोच करी पूर्ण उद्दिष्टा । माकडचेष्टा इतरांच्या ॥७३॥ भक्तांच्या असती तर्हा चार । वेगवेगळा तो प्रकार । निष्ठावंत थोडे फार । बोटांवर मोजू ऐसे ॥७४॥ काही वाहती नवस । काहींस बघण्याची हौस । कुणी येई फिरावयास । भक्तीचा ध्यास काहींना ॥७५॥ परी हे असो काहीही । नाथ समदृष्टीने पाही । भेदभाव मुळीच नाही । ही ग्वाही मम अंतरीची ॥७६॥ ग्रंथाचा झाला कळस । पुरली मनाची आस । जे केले होते साहस । फळ त्यास नाथ देई ॥७७॥ काही गुरुशब्द प्रचिती । काही थोडी अनुभूती । ग्रंथही चाळले किती । ऐशारीती पूर्ण केले ॥७८॥ मागील संतांचे पुरावे । भक्तांनी हेच करावे । ज्यामुळे मन स्थिरावे । नित्य स्मरावे हरिनाम ॥७९॥ ज्ञानदानाचा असा यज्ञ । संत चालविती सर्वज्ञ । जड, मूढ ताराया अज्ञ । नाथ सुज्ञ ज्ञानी एक ॥८०॥ त्यांच्या त्या पाऊलखुणा । न्याहाळू आपण पुनःपुन्हा । आनंद मिळवू द्विगुणा । ते न कुणा अव्हेरती ॥८१॥ जे कृपेचे आकांक्षी । नाथ तया सदा रक्षी । सगुण-निर्गुण दोन्ही पक्षी । सर्वसाक्षी नाथ माझा ॥८२॥ बाबा समाधिस्थ झाल्यावरी । अनुभव भक्ता कितीतरी । ते येथे लिहिले जरी । होईना पुरी संख्या ती ॥८३॥ बाबा अमुचे नाही गेले । ते ठाईच असती ठेले । अनेकांनी ऐसे अनुभवले । खरेच चेले नाथांचे ॥८४॥ झाल्यावरी निर्वाण । घडे नाथांचे दर्शन । सवे घेती भोजन । प्रकाश महाजन नाथभक्त ॥८५॥ एकदा मनोहर घेंगे । स्वतः इथे येऊन सांगे । नाथांनी मज केले जागे । जाय वेगे प्रसादाशी ॥८६॥ म्हैसांग खेड्यावर । भक्त अमोल नवलकार । झोपला लावून दार । शब्द कानांवर नाथांचे ॥८७॥ म्हणे उठ देई परीक्षा । नोकरीची नसे का अपेक्षा । सरस ठरशील सर्वांपेक्षा । उगा उपेक्षा करू नको ॥८८॥ तो परीक्षा उत्तीर्ण झाला । पुढे लागला नोकरीला । आला मंदिरी दर्शनाला । मानी नाथाला कैवारी ॥८९॥ झाली नाथांची पे्ररणा । पूर्ण झाली मनोकामना । येऊन समाधिस्थाना । करी अन्नदाना आनंदे ॥९०॥ अनेकांचा सुखी संसार । किती झाले पगारदार । फुले आली वेलीवर । नावे कुठवर लिहावी ॥९१॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण । श्री गणेश सरस्वती नमन । ग्रामदैवता वंदन । क्षेत्रवर्णन श्रीतीर्थ ॥९२॥ नाथ कुलवृत्तांत । जन्मा येती यादवनाथ । प्रथमाध्यायसत्रात । गणनाथ निवर्तती ॥९३॥ पहा अध्याय दुसरा । गंगा जाय पंढरपुरा । जन्म दिधला युधिष्ठिरा । गुरुवरा महादेवा ॥९४॥ नाथगुरूंची परंपरा । कैसी चालत आली घरा । यादवांसी बोध खरा । अध्याय दुसरा सांगतसे ॥९५॥ तिसर्या अध्यायी गुजाई । नातवांचे कौतुक पाही । महादेवापाठी येई । अंजनाबाई नाव तिचे ॥९६॥ उतरवी अलाबला । दृष्ट काढी सातवेळा । पुरविता नातवांचा लळा । मिटला डोळा गुजाईने ॥९७॥ सरे शिक्षण, सुटे शाळा । दुरंदे गुरुजींचा जिव्हाळा । अंजनाचा विवाह सोहळा । येई सगळा चतुर्थसत्री ॥९८॥ अपुला चरित्रनायक । पितृभक्त लायक । वडिलांचा झाला सेवक । आज्ञाधारक शिष्यही ॥९९॥ गृहस्थाश्रमी पदार्पण । वत्सलेचे पाणिग्रहण । त्याकाळचे विवाह वर्णन । सद्गुरू लक्षण पाचव्यात ॥१००॥ नाथ स्वतः करी कष्टा । श्रमास देई प्रतिष्ठा । सोशी नाना हाल अपेष्टा । खाई खस्ता हलाखीच्या ॥१०१॥ साधुत्व लक्षणे दिसो येती । सांगती विद्येची महती । योगक्रिया आचरती । साधनेस गती सहाव्यात ॥१०२॥ संध्यासमयी काही क्षण । यादवांचे सुटे मौन । महादेव देई अवधान । मिळे संजीवन बोधामृत ॥१०३॥ सातव्या त्या अध्यायात । सोडून जाती यादवनाथ । शेख गुलाब जोपासत । आखरात निंबवृक्ष ॥१०४॥ नाथ शिंपीकाम करी । स्वाभिमाने पोट भरी । गरिबी जरी नांदे घरी । हात न पसरी कोणापुढे ॥१०५॥ नाथांठायी सहिष्णुता । शिकवण समभाव, बंधुता । एकदिलीचा उद्गाता । नाथ त्राता दुर्बळांचा ॥१०६॥ पहा अध्याय आठवा । नाथ करी जनसेवा । बहीण होई विधवा । येई गावा परतून ॥१०७॥ अस्पृश्यता निवारण । नाथांचे पोथीवाचन । संसार नेटका करुन । उद्बोधन परमार्थाचे ॥१०८॥ तपाचरण, योगसाधना । नाथा भेटे सद्गुरुराणा । नवविधाभक्ती विवरणा । पहा सज्जना नवव्यात ॥१०९॥ ज्यासी आपंगिता नाही । त्यासी नाथ धरी हृदयी । नेसूचे धोतर फाडून देई । अर्धे भाई डोंगरेला ॥११०॥ गावकुसाबाहेर भागवत । अंत्यजाचा चहा घेत । नानास करी व्यसनमुक्त । दहाव्यात चरित्र हे ॥१११॥ नाथ एकदा वाचीत । ग्रंथ साईसच्चरित । द्रराम रामच्च् कानी येत । अचंबित श्रोतेजन ॥११२॥ शिक्षामुक्ती गंगाधरा । प्रेरणा मिळे साकरकारा । रामजन्म करू साजरा । लागे ज्ञान झरा अकराव्यात ॥११३॥ शिर्डी साईबाबांचे धाम । नाथ जावोनी करती प्रणाम । सोबत पाटील तुकाराम । माया आणि ब्रह्म चर्चा चाले ॥११४॥ बारावा हा अध्याय । सोडून जाई गंगामाय । साधनामग्न नाथराय । धरुनी पाय सद्गुरूंचे ॥११५॥ दमयंती आणि रजनी । कन्यांचा विवाह दोन्ही । पार पाडला सद्गुरूंनी । सांभाळुनी नाथांलागी ॥११६॥ राष्ट्रसंतांशी भेट घडे । शब्द हृदयी थेट भिडे । ठायीच बसूनी कार्य घडे । लेखका मिळे नामदीक्षा ॥११७॥ महाराज श्रीराम घेवोनी । येती विठ्ठल-रुक्मिणी । शांतिमंदिर पायाभरणी । समाधीस्थानी यादवांच्या ॥११८॥ एक निंबाजी रोकडे । वर्तन वेडेवाकडे । त्यांच्या मुखी अन्न पडे । मुक्ती मिळे तेराव्यात ॥११९॥ बाबा योग आचरती । योगशंका निवारती । निराधारा आश्रय देती । खारोळे येती आश्रमा ॥१२०॥ नाथांना अभंग स्फूरती । भ्रमरनाथ नाव धरती । बाजीराव-कृष्णमूर्ती । साहित्यिक राहती मंदिरी ॥१२१॥ पहा चौदाव्या अध्यायात । घडे कसे अघटित । पाण्याचे झरे लागत । कोरड्या विहिरीत चैत्रमासी ॥१२२॥ विठ्ठल आणि रुक्मिणी । कृष्ण आणि राधाराणी । मंदिरी बैसती येवोनी । श्रीरामबुवांनी प्रतिष्ठिल्या ॥१२३॥ बाबांचे व्रत चांद्रायण । समाधीयोग विवेचन । श्रेष्ठ कसे मानसपूजन । नेमे कीर्तन गोपाळाचे ॥१२४॥ पंधराव्या सत्रांतरी । वत्सलामाता आजारी । नर्मदाबाई सेवा करी । राही घरी अनसूया ॥१२५॥ देह-गेहामुक्त होई । वत्सलामाय मंदिरा येई । विठ्ठलचरणी ठाव घेई । लेखक वाही श्रद्धांजली ॥१२६॥ सोळावे सत्री कथन । प्रथा प्रारंभ प्रवचन । नरदेहाचे महिमान । जीवदान गोविंदासी ॥१२७॥ जरी असे दक्षिणायन । जानरावास इच्छामरण । गजाननांचे उदाहरण । त्यास देवून मुक्त करी ॥१२८॥ जालंदरचे लग्न होई । मालकीण सविताबाई । किल्ल्या तिचे हाती देई । नाथ पाही कौतुक ॥१२९॥ श्यामला मिळे बाप-आई । शिकण्या नागपुरा जाई । ह्या सोळाव्या अध्यायी । देवळा येई देवका ॥१३०॥ षडचक्र रूपदर्शन । कुंडलिनी जागरण । पुंडलिकबाबा आगमन । सत्री जाण सतराव्या ॥१३१॥ सासरी जात्या नलूस । नाथ करती उपदेश । वागणे कसे सासरास । सालस मुलीस असावे ॥१३२॥ जळगावकर बाईंनी । लोकनाट्य रकमेतुनी । प्रवचनधाम उभारणी । मंदिरप्रांगणी केली असे ॥१३३॥ हाती खराटा घेवून । नाथ झाडती पटांगण । पायांवरी लोटांगण । घेती जन सेवेपुढे ॥१३४॥ अठराव्या अध्यायात । नाथ काटेलासी जात । गुलाबबाबांना भेटत । आनंद मनात दोघांच्या ॥१३५॥ गुलाबबाबा गाणे गात । झाला महार पंढरीनाथ । प्रेमे आंघोळ घालीत । सर्वा वदत बाप आला ॥१३६॥ उगव्यास संतसंमेलन । जपती बाबांचे थोरपण । ओंकाराचे वेडेपण । जाय हरपून नाथांसवे ॥१३७॥ उर्दू अध्यापन विद्यार्थी । मंदिरी श्रमदान करती । मंदिरासी रस्ता जोडती । अभिनव कृती प्रेमाची ॥१३८॥ एकोणिसाव्याची महत्ता । हातरूणा भागवतकथा । नाथबाबांची निःस्पृहता । दिसे भक्तांलागुनी ॥१३९॥ आषाढीची पायी वारी । जवळ कराया पंढरी । संत गजाननांची स्वारी । येई दरबारी नाथांच्या ॥१४०॥ पालखीच्या समवेत । भाऊ पुरुषोत्तम येत । नाथ करती स्वागत । बुका लावीत सार्यांना ॥१४१॥ संत गोमाजी संस्थान। श्रीक्षेत्र नागझरी जाण । मंदिर झाले शोभायमान । मार्गदर्शन नाथांचे ॥१४२॥ पुढे विसाव्या अध्यायी । लिंगनाथा धाडी मुक्ताई । म्हणे हातरूणला जाई । अवतार पाही चर्पटींचा ॥१४३॥ कराळेची करुण कथा । कर्जमुक्ती विश्र्वनाथा । शिवनाभी लिंगनाथा । लाभे मुक्ता प्रसादे ॥१४४॥ एकविसाव्या अध्यायात । चतुरभाई भेटी येत । गृहस्थाश्रमाचे इंगित । पटेला सांगत नाथबाबा ॥१४५॥ द्रजे होते ते भल्यासाठी । बोल नेहमी बाबांओठी । उगा कशाला आटाआटी । अनुभव गाठी लेखकाच्या ॥१४६॥ मांगीलालचे नेमपालन । मदनलाला स्वप्नदर्शन । थारगावी मूर्तीस्थापन । नाथांहातून बाविसावी ॥१४७॥ वाचले मनोहर काळे । ढगादेवी दर्शन घडे । मधुसूदन वैराळे । नाथांपुढे नतमस्तक ॥१४८॥ तेविसाव्या अध्यायी । वेडा विठ्ठल मंदिरी येई । दयाभाव नाथांठायी । पे्रम देई भूतमात्रा ॥१४९॥ बाबांच्या कृपाबळे । सालफळेचे भाग्य फळे । गजू-विजूचे संकट टळे । चोरा घडे पश्र्चात्ताप ॥१५०॥ चोविसाव्या अध्यायात । नाथसाक्ष विवाह होत । आदर्श विवाह पद्धत । समाजात रुजविती ॥१५१॥ तळेगाव वांगेश्वरा । मच्छिंद्रनाथांची परंपरा । संपताची कार्यधुरा । नेई पुढारा गंगानाथ ॥१५२॥ नाथबाबांच्या आज्ञेने । मूर्ती स्थापिती सोनोने । गुरूची लीला गुरू जाणे । कार्य दासाने पूर्ण केले ॥१५३॥ पंचविसाव्या अध्यायात । भानुदास राऊत । त्यासी प्रसन्न होता नाथ । मार्ग दावीत प्रगतीचा ॥१५४॥ मेंढपाळा उपदेश । पूर्ण करावे शिक्षणास । आकार मिळे जीवनास ।उन्नतीस काय उणे ॥१५५॥ भले मोठे काळे श्र्वान । बसे बाबांपाशी येवून । चाटू लागे नाथचरण । जणू शरण बाबांपायी ॥१५६॥ लोखंडेचा परिवार । शिकले सारे सानथोर । अभ्यासाचा चमत्कार । मुलाधार नाथकृपा ॥१५७॥ सव्विसावा अध्याय । गरीब झाली द्वाड गाय। भूमीगत शिवालय । नाथराय दाखवी ॥१५८॥ रोहितासी व्यसनमुक्ती । दसर्याला दीक्षा देती । संकटातून वाचविती । पुत्र मानती पटेलासी ॥१५९॥ चांभईचे सत्पुरुष । दर्शने लागे नाथध्यास । वदे नाथ नाथ अहर्निश । तीन दिवस सारखा ॥१६०॥ सत्ताविसावी कथा ऐका । गुरुनाथांचा वाजे डंका । बोलांचा प्रत्यय अनेका । शर्माची शंका निवारती ॥१६१॥ बाबा राधारूप घेती । कात्यायनी व्रत करिती । धरिती हरीची संगती । वावरती सखीभावे ॥१६२॥ अठ्ठाविसाव्या सत्रांतरी । अंधश्रद्धा दूर सारी । वास्तवाचा बोध करी । मनोभ्रम हारी मीनाक्षीचा ॥१६३॥ वय झाले ऐंशीपार । देहास जडे आजार । सत्यनारायण डॉक्टर । करी उपचार सेवाभावे ॥१६४॥ अध्याय हा एकोणतीस । नाथ वदता रोहितास । मुक्काम फक्त पाच दिवस । सरला रहिवास येथला ॥१६५॥ गोड करा झाली सेवा । पे्रमभाव असो द्यावा । आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा घ्यावा रामराम ॥१६६॥ होय समाधी महानिर्वाण । अखंड जागर हरिकीर्तन । असंख्यात भक्तजन । ब्रह्मसंमीलन सोहळ्याला ॥१६७॥ कळसाध्याय तिसावा । शांतिमंदिरी चिरविसावा । ध्यानी मनी नित्य ध्यावा । नाथ ठेवा कैवल्याचा ॥१६८॥ समाधी मंदिर निर्माण । नाथमूर्ती संजीवन । मातेसह विराजमान । भक्तांकारण प्रकटले ॥१६९॥ नाथ गेले म्हणू नका । भेटतील भक्ताभाविका । यात नाही मुळी शंका । भक्तसखा नाथ माझे ॥१७०॥ दृष्टी ठेवा नाथचरणा । वाढेल ध्यानधारणा । एकाग्र करुनी मना । लागा चिंतना नाथांच्या ॥१७१॥ जे जे लिहिले प्रसंग । तो त्यांचाच होता संग । लिहिता मती होई दंग । अंतरंग खुलतसे ॥१७२॥ माक्या पदरीचे नसे काही । नाथ सांगती तेची लिही । सर्वसाक्षी तोच पाही । हृदयात राही लीलारूप ॥१७३॥ या ग्रंथाचे प्रयोजन। नाथ सांगे श्यामलागून । ती आज्ञा मानून प्रमाण । केले लेखन येथे मी ॥१७४॥ ही सारी त्यांची कृपा । अवघड मार्ग करी सोपा । शेंबडे मूल आवडे बापा । घेई पापा लडिवाळ ॥१७५॥ हा ग्रंथ नाथांची स्मृती । साधका दावी ज्ञानज्योती । अखंड आहे तेवती । ही महती नाथांची ॥१७६॥ ग्रंथ असे ज्याचे घरी । लक्ष्मी तेथे वास करी । सरस्वती न अव्हेरी । सिद्ध वैखरी होय तया ॥१७७॥ यातील वाचता कवण । रंकास प्राप्त होय धन । बुद्धिहीना दिव्यज्ञान । कळे महिमान गुरूंचे ॥१७८॥ विद्यार्थ्यास विद्याप्राप्ती । पुत्रहीना लाभे संतती । सत्त्वगुण वाढे सत्संगती । उर्ध्वगती जीवनाची ॥१७९॥ रोगी होईल निरोगी । पत्नी मिळे मनाजोगी । निष्कपट मित्र सहयोगी । ऐश्वर्य भोगी जीवनी ॥१८०॥ या ग्रंथाची फलश्रुती । सहज कामना पुरती । भाव लागे निश्चिती । घ्या प्रचिती भाविक हो ॥१८१॥ एकांत शोधा निवारा । गुरुनाथांचे स्मरण करा । मनी त्यांचे ध्यान धरा । पारायण करा ग्रंथाचे ॥१८२॥ भाव ठेवून पवित्रग्रंथी । श्रावणात लावा पोथी । स्नान घडे भागीरथी । वार-तिथी पूज्य सारे ॥१८३॥ येता पुरुषोत्तम मास । हा ग्रंथ वाचावा खास । सुखीसमृद्ध ते आवास । येई प्रत्ययास भाविकांच्या ॥१८४॥ चैत्र शुद्ध प्रतिपदा । शुभ मुहूर्त सर्वदा । पारायण करा एकदा । यश सदा त्याघरी ॥१८५॥ आसनी बसून शुचिर्भूत । योग गुरुपुष्यामृत । साधून असा मुहूर्त । लाभ निश्चित पारायणे ॥१८६॥ हा ग्रंथ पावनगंगा । पळवी क्रोध, अनंगा । वश करी नाथा पांडुरंगा । अंतरंगा सौख्य मिळे ॥१८७॥ शके एकोणीसशे अठ्ठावीस । शुभ माह माघ मास । व्ययनाम संवत्सरास । शुभ दिवस मंगळवार ॥१८८॥ शुक्ल वसंत पंचमी । तिथी सर्वश्रेष्ठ नामी । समोर माझे नाथस्वामी । तेथे मी ग्रंथ संपविला ॥१८९॥ इसवीसन दोनहजार सात । दिनांक तेवीस, जानेवारीत । बैसोनी शांतिमंदिरात । मनोगत पूर्ण झाले ॥१९०॥ जे जे डोळ्यांनी पाहिले । ते ते अवघे लिहिले । नाथांच्या चरणी वाहिले । काही न घातले पदरीचे ॥१९१॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । केले असे हे कथन । हृदयी स्मरण नाथांचे ॥१९२॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र तिसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ ॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति श्री महादेवनाथ चरित्र ग्रंथ ॥
No comments:
Post a Comment