अध्यायसत्र आठवे

श्री गणेशाय नमः ॥ नमो नमो हरिहरा । हा यादवांचा मंत्र खरा । आपण त्यास उच्चारा । मिळे विचारा पे्ररणा ॥१॥ विष्णुसहस्त्रनाम । हे सर्वची पूर्णकाम । मुखी घेता विराम । मिळे आराम देहासी ॥२॥ भगवंताचे नाम घेता । कार्यासी पाऊल टाकता । शुभ फल येई हाता । सांगते गीता कृष्णाची ॥३॥ त्यासी कार्यारंभी स्मरा । शुभशकुन हाची खरा । कोणतेही कार्य करा । फल पदरा सहजची ॥४॥ म्हणून नामाचा महिमा । संत सांगती आम्हा । आला बहुतांच्या कामा । नका रामा विसरू हो ॥ ५॥ हा अध्याय असे आठवा । त्या यादवासी आठवा । रूप हृदयी साठवा । ज्ञानाचा ठेवा समाधीत ॥६॥ आजही नाथ इथे आहे । तो आपुल्या भक्ता पाहे । जरी तुमची भक्ती राहे । त्याचे पाहे सुखदुःख ॥७॥ नाथाचा महानिधी । ओळंगती अष्टमहासिद्धी । ज्याने मिळे प्रसिद्धी । मिळे उपाधी गौरवाची ॥८॥ वाटे नावे लिहावी येथ । उगा वाढेल ग्रंथ । भक्ता कळावा हा हेत । केला बेत लिहिण्याचा ॥९॥ आणमा आणि लघिमा । गरिमा तथा महिमा । इशिता, वशिता, प्राकाम्या । शेवटी प्राप्या क्रमा येती ॥१०॥ भक्ता नसे काम ह्यांचे । परी लक्ष वेधती साधकांचे । सामर्थ्य खूप त्यांचे । बोल बोलत्याचे खरे होती ॥११॥ येई त्यासी दूरदृष्टी । जाणे शुद्ध वा कपटी । काही येती दुःखीकष्टी । हा परमेष्ठी सुख देई ॥१२॥ नाथांचे कृपाछत्र गेले । बहीण भाऊ पोरके केले । पाहुणे लोक आले गेले । आता उरले अभागी ॥१३॥ एक आप्त सुजाण शहाणा । हितकर्ता होता पाहुणा । बोलावून बहिणभावांना । म्हणे संपवा भावना दुःखाच्या ॥१४॥ आता संसारी रमा । त्यागा शोक, दुःख, तमा । सांभाळील विष्णू-रमा । लागा कामा आपुलाल्या ॥१५॥ बहीण गेली सासरी । रमली अपुल्या संसारी । महादेव मशीनकाम करी । शिलाई करी नाथ माझा ॥१६॥ एक स्वातंत्र्यसेनानी । जनार्दन आंबोरे गुणी । डॉक्टर झाला असोनी । औषधी कोणी घेईना ॥१७॥ जनार्दन होता मातंग । वैद्यकी शिकला यथासांग । अस्पृश्याचा नको संग । बाटेल अंग खेटता ॥१८॥ राहणी अगदी साधी । कापड स्वदेशी, शुद्ध खादी । दुकानात येत कधी । बैसत मधी सर्वांच्या ॥१९॥ बसायचा सतरंजीवरी । जाय न कोणी शेजारी । स्पृशास्पृश नाथांघरी । भेद दुरी पळतसे ॥२०॥ श्रीमंत लोकांच्या घरी । श्रावण लागला जरी । पोथी चाले आपल्यापरी । बसती दुरी अस्पृश्य ॥२१॥ माणसाने माणूस बाटे । कुत्रा येऊन पाय चाटे । आज जनां नवल वाटे । काय उफराटे वागणे ॥२२॥ बाबा वाचत कुठे पोथी । कथा ऐकण्या लोक जाती । गोड आवाज अर्थ सांगती । आकर्षित होती भाविक ॥२३॥ शेवटी होय समाप्ती । वाचकास बहू प्राप्ती । श्रोते धान्य, नारळ देती । काही आर्पती दक्षिणा ॥२४॥ तांदुळ, गहू, डाळ, ज्वारी । वाचकास मिळकत भारी । विड्याची पाने, सुपारी । मानाने सारी पूजा होत ॥२५॥ महादेव झाला बुवा । विसर पडला जुन्यानावा । कोणी म्हणे नाथबाबा । अपभ्रंश व्हावा शब्दाचा ॥२६॥ आता बुवा झाला ज्ञानी । कोणी पुसे पाउᆬसपाणी । दुःख घेऊन येई कोणी । बुवा गुणी वाटे लोका ॥२७॥ मुंगळा धावे देखता गूळ । न पाठविता कुणी मूळ । मुंगी येई साखरेजवळ । तैसे सकळ जन येती ॥२८॥ बुवा झाला अवघा गोड । सज्जनाचे पुरवी कोड । उपमेस यापरी जोड । लागले वेड भक्तीचे ॥२९॥ घरी ज्याची भार्या । मदत करी भक्तीकार्या । अथवा रणावर जाया । त्याच्या शौर्या काय वाणू ॥३०॥ पत्नी आणि पती । दोघे समान वागती । त्या घराची प्रगती । सदा श्रीपती नांदे तेथे ॥३१॥ आता बुवाचा झाला बाबा । इंद्रियांवर मिळवी ताबा । तुम्हापुढे मांडीन बाबा । केले काय बा नाथांनी ॥३२॥ बाबा होते महान योगी । म्हणती मी आहे प्रयोगी । ही भाषा ऐकण्याजोगी । जे खरे जागी जाणता ॥३३॥ धन्य महाराज जन्मले संसारी । नामयाची ही वैखरी । सदा नारायण हरी । मुखी करी उच्चार जो ॥३४॥ प्रसवली जया धन्य ते माय । अंतरी ध्याय राम नाम ॥ नाम जपे वाणी । ध्यान रामनामी । असा रामनामी सदा ॥३५॥ गोप गोपींचे ध्यान । रूप हे सदा सगुण । उद्धव सांगे जपा निर्गुण । मनात आण असेना ॥३६॥ बहीण गेली आपल्या घरी । अंजनाची स्थिती बरी । जगदीश शाळकरी । सुधाकर करी आईच्या ॥३७॥ पंडितजी गाव पुढारी । संयोजक असती भारी । एकदा गावचे गावकरी । मिळाले सारे एकत्र ॥३८॥ भारतदेश स्वतंत्र झाला । आनंद झाला ज्याला त्याला । चळवळीत ज्यांनी दिला । सहयोग त्याला मान देती ॥३९॥ पंडितजी महादेव । पुढे आले यांचे नाव । गावकरी करिती गौरव । वातावरण सर्व आनंदाचे ॥४०॥ गावातील थोर लोक । बाळकृष्ण पाटील एक । पंडितजीचे कौतुक । करती अनेक बडे बडे ॥४१॥ चिंचोलीत वर्ग चार । पाचव्याचा करिती विचार । मानला सर्वा सुविचार । कायद्यानुसार सारे करु ॥४२॥ कागदपत्रे तयार केली । शासन दरबारी पाठविली । मंजुरी होऊन आली । अवघी झाली कामे पूर्ण ॥४३॥ नागरीक चिंचोली छोटेसे गांव । सर्व गोष्टींचा अभाव । मांडला पंचांनी प्रस्ताव । त्यास सहमती सर्वांची ॥४४॥ आता येईल पंधरा ऑगस्ट । एकमत झाले स्पष्ट । आपण घेऊ सारे कष्ट । एकनिष्ठ रहा सारे ॥४५॥ स्वतंत्र भारताचे वैभव । डॉक्टर पंजाबराव । उपाख्य भाऊसाहेब नाव । केली गावोगाव विद्यापीठे ॥४६॥ डॉ़ पंजाबराव देशमुख । शिवाजी संस्था प्रमुख । शिक्षणमहर्षी देख । नावलौकिक जयाचे ॥४७॥ महाराष्ट्राचा मुकुटमणी । शिक्षणमहर्षी प्रचंड ज्ञानी । भाऊसाहेब या ठिकाणी । आणू त्याक्षणी ठरले ॥४८॥ काही थोर विचारवंत । महादेवनाथ पंडित । गावातील कोणी श्रीमंत । बुद्धिवंत आणिकही ॥४९॥ गेले भाऊसाहेबांपासी । तेही होकार देत त्यासी । आनंदे येऊन घरासी । लागले कामासी आपापल्या ॥५०॥ ते कृषिमंत्री भारताचे । खाते अतिमहत्वाचे । खेड्यात पाय लागती ज्याचे । काय त्या भाग्याचे वर्णन ॥५१॥ आनंदी सारी मंडळी । सडे टाकले रांगोळी । तिरंगी पताकांच्या ओळी । सर्व सांभाळी पंडितजी ॥५२॥ स्वातंत्र्यास चार वर्षे झाली । घटना ही एकावन्न साली । पंधरा ऑगस्ट तारीख आली । पूर्ण न झाली आकांक्षा ॥५३॥ पंजाबराव येणार । गाव पुनीत होणार । वंदेमातरम्‌ गाणार । फडकणार तिरंगा ॥५४॥ आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना । आठवला अभंग जुना । अनुभव याक्षणा आला पा ॥५५॥ अवघे आनंदात दंग । झाला पहा मनोभंग । पंडितजीच्या होते संग । त्यांना वाटला रंग निराळा ॥५६॥ बाळकृष्ण पाटील एक । त्यास पाठक देत हाक । बाकीचेही आले अनेक । डोळ्यावरी झाक पंडिताच्या ॥५७॥ पंधरा ऑगस्ट एकावन्न । हा भारतीयांचा सण । पंजाबराव येती म्हणून । सडा सारवण घरोघरी ॥५८॥ स्वतंत्र भारताचे । भरते आले आनंदाचे । जो तो तिरंगा घेऊन नाचे । भान कशाचे उरले ना ॥५९॥ पाचवा वर्ग होईल सुरू । भाऊसाहेबांचा सत्कार करू । महादेवचा गौरव करू । गुणी लेकरू नाथाचे ॥६०॥ क्षणात विपरीत घडले । पंडितजी खाली पडले । काम सारे बंद पडले । काय दडले काळापोटी ॥६१॥ सारी झाली धावाधाव । गोळा झाले सारे गाव । वर्मी बसला अचूक घाव । संपली हाव जगण्याची ॥६२॥ स्वातंत्र्यसंग्राम शिपाई । वैद्यकीचा व्यवसायी । अकल्पित निघून जाई। याहुनी नवाई कोणती ॥६३॥ दुसर्‍यासी देई दवा । आराम दिला किती जीवा । स्वतः उपयोग न व्हावा । काय दैवा म्हणावे ॥६४॥ चिंचोली ते अमरावती । निरोप पोहचला शीघ्रगती । शोककळा गावावरती । सारी स्थगिती सोहळ्याला ॥६५॥ हातरूणला आला गडी । नदी वाहे दोहीथडी । जाणे लागे पैलथडी । आली घडी संकटाची ॥६६॥ ऐकले भाऊसाहेबांनी । चिंतीत झाले मनी । गेला एक स्वातंत्र्यसेनानी । दुःख मनी वाटले ॥६७॥ हातरूणला त्याकाळी । पोहणारी खूप मंडळी । भोपळ्याच्या बांधून सांगडी । उतरे जळी पोहणारा ॥६८॥ काही तसेच पोहती । लागत होत्या शर्यती । प्रथमास नारळ देती । अनेक पोहती स्वछंदे ॥६९॥ सांगडीने आईस नेले । बाबा अमुचे पोहत गेले । अवधूतनाथासी घेतले । सर्व पातले चिंचोलीसी ॥७०॥ नाथानुजा अंजनाबाई । तरणी दोन मुलांची आई । रडू लागे धाई धाई । दुःख होई इतरांना ॥७१॥ हिंमतराव, ढोरे गुरुजी । प्रयत्न झाले सहजासहजी । पदरात पडली नाराजी । गेले आजरोजी पंडित ॥७२॥ जिथे होणार होता सोहळा । नवीन उघडण्या शाळा । तेथे उदासी अवकळा । काय काळा म्हणावे ॥७३॥ आता स्वर्गासनाची तयारी । तिरंगा आला अर्ध्यावरी । शोकाकुल जनता सारी । संकट भारी कोसळले ॥७४॥ गेला गावचा म्होरका । आम्हा झाला परका । दिवस साधला नेमका । सडे, कमानी का याचसाठी ॥७५॥ आज स्वातंत्र्याचा क्षण । भारताचे भाग्य विलक्षण । सेनानीचे चिरस्मरण । नसे मरण चिरशांती ॥७६॥ आनंद दुःखाचा काला । पंडितजीचा शेवट झाला । दुःखसागरी गाव बुडाला । सोहळा झाला समाधीचा ॥७७॥ उत्तरक्रिया झाली । माणसे आपापल्या घरी गेली । जे लिहिले होते भाली । पूर्तता झाली प्रसंगाची ॥७८॥ बहीण झाली विधवा । हे दुःख वाटे भावा । कोण सांभाळी तीन जीवा । दिसे ना जीवाभावाचा ॥७९॥ बाबांच्या मामांना दुःख झाले । भाच्याचे कैसे चाले । काय दिवस वाईट आले । दोघे बसले एकेठायी ॥८०॥ आपण वाटू आता शेती । काही देऊ बहिणीप्रती । विचार केला ऐशारीती । वाटा देती शेतीचा ॥८१॥ भाऊ खातो तुपाशी । बहीण राहे उपाशी । विसंगती मनासी । पटेनासी झाली असे ॥८२॥ अशी होती परंपरा । कन्या दिली ज्याचेघरा । माहेरी मालकी नसे जरा । दिवाळी करा आनंदाची ॥८३॥ एका आईबापापोटी । जन्मती बेटा आणि बेटी । मुलासाठी तूपरोटी । उपाशीपोटी मुलगी ॥८४॥ भाचा होता भूमिहीन । मामा वाटे करी तीन । त्यांची जी होती जमीन । दिली त्यातून काही भाग ॥८५॥ आज शांतिमंदिर आहे । वहिती नाममात्र राहे । हर्रास झाले होते पाहे । मालकीचे हे पेढीच्या ॥८६॥ नारायणराव नकासकर । होते बॅंकेचे मॅनेजर । पे्रम त्यांचे बाबांवर । भाऊ बरोबर सरोदे ॥८७॥ सरोदे तुळशीराम । पाहती बाबांचे काम । कुशल व्यवहारी उत्तम । विश्र्वास ठाम यांच्यावरी ॥८८॥ नकासकर येती वर्षाकाठी । शेती लागवडीसाठी । जो देईल रक्कम मोठी । वहिवाटी त्याची होय ॥८९॥ पण आखराची बोली । हर्रास कधी न केली । बॅंकेची नियमावली । पदरची दिली रक्कम ॥९०॥ मित्र हा उदारमनाचा । लोभ नाही धनाचा । हा गौरव त्याच्या गुणाचा । न मानाचा भुकेला ॥९१॥ पूर्वी पेढी, आज बॅंक । नकासकर कर्मचारी एक । माक्यामते सच्चासेवक । वागणूक सचोटीची ॥९२॥ आता बाबा शेतकरी । अकरा एकर शेती घरी । दूर, लांब होती जरी । नावावरी आली त्यांच्या ॥९३॥ शिलाईचा जोडधंदा । थोडासा होई फायदा । उधारी होई सदाकदा । दुखवेना कदा कुणासी ॥९४॥ अखेर दुरची शेती विकली । गावाजवळ विकत घेतली । आखरावर मालकी झाली । केले हवाली पेढीने ॥९५॥ काही गेली काही आहे । संचिताचे कौतुक पाहे । संसारी आलप्त राहे । त्याचा भार वाहे नारायण ॥९६॥ गेले वर्ष, सहामास । लागली बहिणीची आस । जीव होई कासावीस । सांगे आईस हितगुज ॥९७॥ शेजारी काका अवधूत । त्यांचेही घेतले मत । बाईस आणावे हा हेत । मनोगत सर्वांचे ॥९८॥ पाठक होते महान । दोन्ही मुलं लहान । कोण जाणेल भूकतहान । देईल का ध्यान कोणी ।।९९॥ अंजनास आणू घरी । सर्व सांभाळील हरी । तो ठेवील जैशापरी । त्याचेवरी भार सारा ॥१००॥ मग अमुची गंगामाता । सवे घेई नाथ अवधूता । चिंचोली ग्रामा जाता । अंजना आता रडू लागे ॥१०१॥ काका म्हणे ऐक पोरी । दुःख सारे आवरी । अमुच्या आता चाल घरी । उद्या तयारी जाण्याची ॥१०२॥ ती म्हणे माझे दोन बाळ । शिक्षणाची होई आबाळ । होईल कसा सांभाळ । कठीण काळ दिसताहे ॥१०३॥ आग्रहे वदे आई । इथे राहू नको बाई । गेला कर्ता जावई । अर्थ नाही राहण्यास ॥१०४॥ अखेर येण्याचे ठरले । थोडेसे सामान भरले । काही थोडेसे उरले । तसेच पडले घरात ॥१०५॥ हातरूणला बाई आली । द्विगुणित संख्या झाली । कामावर मंदी आली । चंदी संपली जवळची ॥१०६॥ दुष्काळात तेरावा मास । म्हण जुनी असे खास । झाले या समयास । असा भास होऊ लागे ॥१०७॥ दोस्त एक जिवलग । झाला त्यासी क्षयरोग । चुकेना कर्माचा भोग । भोगणे भाग येतसे ॥१०८॥ दोस्त शब्दाचा अर्थ । दोघे समरस, नसे स्वार्थ । एक झटे परार्थ । त्याचे सार्थ व्हावे वाटे ॥१०९॥ महादेव कांगुलकर । त्यास कोणी म्हणती टेलर । आजार झाला दुर्धर । दुःख फार बाबांना ॥११०॥ मोरखडे एक शंकर । त्र्यंबक नामे भिलकर । हे शिकाऊ उमेदवार । झाला आधार बाबांना ॥१११॥ एक बशीर नावाचा । मुसलमान धर्माचा । छंद त्यासी शिकण्याचा । मशिनीचा कारागीर ॥११२॥ बाबांकडे काम शिकती । काही देती, काही नेती । व्यवहार चाले या रीती । कैची हाती बाबांच्या ॥११३॥ काही देती पैसे नगदी। कोणाचे लिहावे कागदी । निकडीची गरज अगदी । कुणा न कधी दुखविले ॥११४॥ घरी सदा निपूर पडे । उधार शिवती कपडे । कोण पाहतो साधूकडे । जिकडेतिकडे हीच स्थिती ॥११५॥ कामात देती गहू, ज्वारी । हरबरे देती तुरी । फेडती अशी उधारी । खेद न करी नाथ माझा ॥११६॥ मी बाबास म्हणालो साधू । यात आहे अर्थबोधू । काही असती संधिसाधू । गारेत हिरा बांधू नका ॥११७॥ वरी साधू झाला नामे । अंतरी वश केला कामे । अनेकांचे कारनामे । कळती समागमे राहता ॥११८॥ मी राहिलो बाबांसंगे । सुखदुःख पाहिली प्रसंगे । अनुभव आला अंगे । तोच सांगे जनांसी ॥११९॥ हा साधू नव्हता रिकामा । नित्य करी उद्यमा । शेतमजुरी, शिवणकामा । कामात लक्ष रामाकडे ॥१२०॥ दाढी नाही, जटा नाही । अंगरखा अर्धीबाही । लाल रुमाल खांदी राही । कामात गाई हरिनामा ॥१२१॥ तबलापेटी होती घरी । गाणे गाई मधुर स्वरी । काही असती साथकरी । ठेका धरी तबल्याचा ॥१२२॥ विठ्ठल नामे सुतार । पेटीचे काढी स्वर । गोपाळबापू निंबेकर । एक सोनार श्रीकृष्ण ॥१२३॥ सुतार आणि सोनार । एकेरी नावाचा उच्चार । वाडी, कोळी, धनगर । बोलभाषा प्रकार हा सदा ॥१२४॥ आप्पा देशमुख, मी ही साथी । केशव सालफळे गाती । चाल, ठेका, गायनरीती । मी त्याप्रति अनभिज्ञ ॥१२५॥ यादवबाबा संगीतकार । नाट्यसंगीत प्रकार । बाबांस आवडी फार । गाती सुस्वर भजनात ॥१२६॥ प्रथम भजनी आवडी । त्यात संगीताची गोडी । स्वरचित गाणी थोडी । गातसे जोडी भजनात ॥१२७॥ मज नावडे हा प्रकार । लगेच दिला नकार । एक आहे नाटककार । संगीतकार जाणता ॥१२८॥ बसवा वर्‍हाडचा पाटील । सर्वा आनंद वाटेल । साधा सोपा ना जटील । सगळ्यांना पटेल असा जो ॥१२९॥ त्यात माझे पात्र आठवते । पाटीलपुत्र सर्वानुमते । तालमीत अवघे येत होते । गात होते गायन ॥१३०॥ बाबा झाले सखारामपंत । काही कलाकार गुणवंत । काय त्या तालमीची रंगत । सोबत संगीत गाण्याची ॥१३१॥ नाटक राहिले जागी । एक निघून गेला अभागी । कोणी न आला त्याचेजागी । जागचेजागी सारे थंड ॥१३२॥ बाबांस गाण्याचे अंग । स्वरचित काही अभंग । भजनात होती दंग । आत्मरंग खुलतसे ॥१३३॥ सा, षडज्‌ शब्द मयुराचा । ध्वनी नाभी स्थानाचा । रि, ऋषभ शब्द गायीचा । नासिकाचा स्वर हा ॥१३४॥ ग, गांधार शब्द शेळीचा । संबंध येतो गालाचा । म, मध्यम शब्द क्रौंचपक्षाचा । हृदयस्थानाचा आवाज ॥१३५॥ प, पंचम शब्द कोकिळेचा । कंठस्थान वसंतकाळाचा । ध, धैवत शब्द अश्र्वाचा । स्थान ललाट भुवईचे ॥१३६॥ नि, निषाध शब्द हत्तीचा । उमटे टाळूस्थानाचा । संगीत जाणे त्याचा । विजय साचा असे हा ॥१३७॥ मी अजाण एरव्ही । गातो बाबांची थोरवी । ऋणानुबंध असेल पूर्वी । तोच स्मरवी कथा त्यांची ॥१३८॥ ही नव्हे कहाणीकथा । महापुरुषाची जीवनगाथा । निश्चित आवडे त्यांच्या भक्ता । अभक्ता काय चवी ॥१३९॥ गाढवा लेपले चंदन । वेड्यास केले वंदन । मोळीविक्या नंदनवन । तैसे जाण इतरांसी ॥१४०॥ ज्यांना बाबा कळले । ते या मार्गी वळले । त्यांचेच भाग्य फळले । बाकी गळले त्यातून ॥१४१॥ एकनिष्ठ भाव धरा । नित्य नेमे काम करा । दूर लोटा अहंकारा । अंधकारा नाश होई ॥१४२॥ आठवू त्या महादेवा । शांतिमंदिरी देऊसेवा । ज्ञानाचा अखंड ठेवा । चाखू मेवा भक्तीचा ॥१४३॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । स्वानुभवे केले कथन । हे महिमान नाथांचे ॥१४४॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र आठवे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्‌गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment