
श्री गणेशाय नमः॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ लिहितांना नाथचरित्र । पुलकित होती गात्र । निदिध्यास अहोरात्र । तो सर्वत्र दिसू लागे ॥१॥ मना लागला हा छंद । डोळे उघडे वा बंद । हृदयी खेळे गोविंद । आगळा नाद कानी येई ॥२॥ नाथ शाळेत जाऊ लागे । मुले असती पुढे मागे । जाण्याआधी खाऊ मागे । माय लगबगे देतसे ॥३॥ प्रथम शाळेत जाता । पाटीलेखणी घेत हाता । नमनाचे गीत गाता । शारदेस आता वंदन ॥४॥ पहा त्या महादेवा । ज्याच्या खिशात सुकामेवा । थोडा थोडा मुलास द्यावा । नंतर खावा आपण ॥५॥ आठवती आमचे गुरुजी । दुरंदे तुकाराम आप्पाजी । प्रिय विद्यार्थ्यांमाजी । जनी-समाजी मान मोठा ॥६॥ इमानदार शिक्षक । खर्या गुणांचे परीक्षक । जुन्या संस्कृतीचे रक्षक । संरक्षक सानुल्यांचे ॥७॥ लांब कोट, काळी टोपी । भाषा सरळ साधीसोपी । चूक झाल्या शीघ्रकोपी । सपासप वोपी छडीने ॥८॥ मुलांवरी पे्रम भारी । पाठ रामाच्या प्रहरी । कित्येक झोपती शेजारी । भेटे आजारी मुलांसी ॥९॥ आज पालटले चित्र । तुम्हा वाटेल विचित्र । ज्या नाथाचे लिहितो चरित्र । वडिलांचे मित्र होते हे ॥१०॥ असे शिक्षक दुरापास्त । शिकवण्यात नेहमी व्यस्त । दाम कमी काम जास्त । माझे बोल रास्त मी जाणे ॥११॥ उगीच नाही केली स्तुती । आठवती त्या जुन्या स्मृती । तो काळ; आजची कृती । विसंगती वाटे तुम्हा ॥१२॥ एक तप वर्षे बारा । कुटुंबासह निवारा । सुटीच्या दिवशी भारा । आणी जो घरा सरपणाचा ॥१३॥ पिण्यास नदीचे पाणी । स्वतः डोक्यावर आणी । आठवती त्या आठवणी । त्या शिकवणी वर्गाच्या ॥१४॥ दप्तर-पाटी घेता हाता । नाथास पाहती येता जाता । वर्षे गेली पाहता पाहता । वर्ग चवथा पास होई ॥१५॥ असदगड किल्ल्यापाशी । नाथांची एक मावशी । महादेवास तिच्यापाशी । शिक्षणासी ठेवियले ॥१६॥ इंगळे हे उपनाव । अकोला हे मूळ गाव । पिढ्यान्पिढ्यांचा ठाव । असे वैभव या घरी ॥१७॥ अंगणी मंदिर शेजारी । देवीभक्त हे पुजारी । हक्काची ही वारसदारी । जबाबदारी यांची ही ॥१८॥ इथे मानाचा गणपती । बाराभाई ज्यासी म्हणती । अग्रस्थानी त्याची गणती । जनांप्रती अत्यादर ॥१९॥ पंढरी, एकनाथ भाउᆬ । यांच्याजवळ लागले राहू । तिघांमिळून खाती खाउᆬ । शाळेत जाउᆬ लागले ॥२०॥ परी तेथे करमेना । काही केल्या मन रमेना । आईवाचून गमेना । चित्त लागेना काही केल्या ॥२१॥ राजेश्र्वरा दर्शना जाई । किल्ला चढे घाई घाई । हिंडू लागे पायी पायी । देवालयी फिरतसे ॥२२॥ आठवू लागे बाप माय । रडू लागे धाय धाय । भाउᆬ म्हणती घरी जाय । खुंटला उपाय आमचा ॥२३॥ नाथ आता आला घरी । इकडे अवघी बरोबरी । शाळा सोडली जरी । परी अंतरी समाधान ॥२४॥ बाबांजवळ येऊन बसे । काही ज्ञानाच्या गोष्टी पुसे । प्रसंगानुरूप हसे । जाऊ लागले असे दिवस पुढे ॥२५॥ अहो हे पिता-पुत्र । भासती ते मित्र-मित्र । संकोच नाही तिळमात्र । अणुमात्र लटके ना ॥२६॥ आज पाहू जाता स्थिति । वाटे वेगळीच रीती । बाप सांगे बिडी आणती । मुलांहाती तंबाखू ॥२७॥ यांच्यापासून काही शिका । ज्ञानभरे होऊ नका । वेळ जातो घटका घटका । आयुष्य फुका जातसे ॥२८॥ पूर्वभाग्याची साथ । पाहिले मी दोन्ही नाथ । जरी अज्ञानी अनाथ । हातात हात घेती ते ॥२९॥ अंजना झाली आता मोठी । हुरहुर आईच्या पोटी। हळूच संबंधाच्या गोठी । सांगे एकांती यादवा ॥३०॥ तुम्ही भक्तीत निमग्न । कन्येचे व्हावे वाटे लग्न।कार्य तडीस जाय निर्विघ्न । स्थळ संलग्न शोधा ऐसे ॥३१॥ रहीमापूरनजिक । चिंचोली गाव असे एक । येथे सुविद्य भाविक । घराणे एक नाथपंथी ॥३२॥ स्वातंत्र्यसंग्राम सैनिक । महादेव मल्लूजी पाठक । आचार-विचारादिक । बहुतेक समसाम्य ॥३३॥ वैद्यकीचा व्यवसाय । नाडीपरीक्षेची सोय । रोगनिदान, उपाय । औषधालय त्यांच्या घरी ॥३४॥ वधूवराची पसंती । दोन्हीकडची संमती । समोर बाब नाही कोणती । पद्धती नव्हती हुंड्याची ॥३५॥ लग्नाची ठरली तिथी । साधी सोपी पद्धती । सायंकाळी सूर्यास्ती । गोरज म्हणती मुहूर्त ॥३६॥ लग्नाच्या पद्धती आठ । ब्राह्मी ब्राह्मण पाडी गाठ । यज्ञवेदी मंत्रपाठ । असा परिपाठ असे हा ॥३७॥ गांधर्वासहित सात । चालत आला हा प्रघात । ब्राह्मी श्रेष्ठ अवघ्यात । कन्यादान यात होत असे ॥३८॥ वर्हाडी पाहुणे आले । सुघटिका मंगल झाले । पंगतीत आग्रह चाले । आनंदात न्हाले सर्वही ॥३९॥ वरवधू उभयता । जोडा शोभे राम-सीता । कन्यादान करी पिता । मांडव रिता होऊ लागे ॥४०॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन । ते सर्वही सदा सज्जन । सोयरे होतु ॥४१॥ ही ओवी ज्ञानेश्वरांची । बहू पुरातन काळाची । परी सख्यासोयर्यांची । उणीव साची भासतसे ॥४२॥ लग्नात असावी शांतता । मानापानाचा नको गुंता । समान गरीब श्रीमंता । आदरातिथ्या करावे ॥४३॥ असो लग्न पार पडले । मुलीस सासरी धाडले । दोन कुळाचे नाते जडले । पुढे काय घडले पाहू आता ॥४४॥ अंजना रमली संसारी । वैद्य पाठक कारभारी । सुख अवघे घरीदारी । व्यवहारी कुशलता ॥४५॥ असो मागे राहिली कथा । ज्ञानबोध महादेवनाथा । देऊ लागले यादव पिता । अखंड संथापाठ तो ॥४६॥ उठावे लागे सकाळी । शौच मुखमार्जन त्यावेळी । लगेच व्हावी आंघोळी । सायंकाळी संध्या-जप ॥४७॥ संध्यासमयी वाचणे गीता । समोर बैसे यादव पिता । लेक वक्ता, बाप श्रोता । असा योग आता दिसेल का ॥४८॥ एक शिष्य, एक गुरू । योगाभ्यास झाला सुरू । यथासांग वर्णन करू । धीर धरू थोडासा ॥४९॥ आता चरित्रनायक । पितृभक्त लायक । वडिलांचा झाला सेवक । आज्ञाधारक शिष्यही ॥५०॥ कर्जासह होती शेती । देणे घेणे ऐशारीती । महादेव स्वतः राबती । कठीण स्थिती ती असे ॥५१॥ अवघड शेतीकाम । क्षणभर नसे आराम । कास्तकारीचा उद्यम । असा नेम चालला ॥५२॥ गौर वर्ण कोमल काया । कठोर कर्म केले कासया । भगवंताची ही माया । बैल हाकी नांगराचे ॥५३॥ प्रसंग असा एक दिवस । शेतात कडब्याचे धस । फन कोणी म्हणती त्यास । लागले पायास अवचित ॥५४॥ धारदार असे टोक । कृषकां ठावे बहुतेक । चालणे ज्यासी ठाऊक । बिनधोक चालती ॥५५॥ फन लागले बहुभारी । रक्ताळली भूमी सारी । ते ही उन्हात दुपारी । होता बरोबरी गडी एक ॥५६॥ नाव त्यांचे चिनकाजी । यादव त्याचेवरी राजी । आली शेती मान समाजी । गृहकाजी असती ते ॥५७॥ त्यांनी फाडला डोईचा फेटा । बीचवापाला, तरोटा । जखमेवर बांधून लपेटा । आवळला पट्टा मजबूत ॥५८॥ बाळनाथ घरी आले । डोळ्यामध्ये पाणी चाले । दुःखाचे दिवस आले।हाल झाले असे किती ॥५९॥ औषधी होती नाथांघरी । दुखणे कोणते असो जरी । मलमपट्टी बांधल्यावरी । जखम बरी झाली असे ॥६०॥ तो पायावरचा व्रण । सहज दिसे घेता दर्शन । पाहिली ज्याने ही खूण । त्यास कारण कळेल हे ॥६१॥ एक दिवस सकाळी । यादव गाती भूपाळी । तिलक लावून कपाळी । महादेवाजवळी येती ते ॥६२॥ रम्य अशी निवांत वेळ । प्रश्न करी नाथ बाळ । कुणा दुःख तळमळ । कुणी सुखात लोळताती ॥६३॥ हे असे का हो घडे । कुणा आनंद, कुणी रडे । कुणा बासुंदी, वडे । अन्न न पडे कुणापोटी ॥६४॥ कुणा महाल बंगला । रंगमंदिरी रंगला । कुण्या घराचा भाग भंगला । न जाय बांधला त्याच्याने ॥६५॥ प्रश्र्न असा ऐकता । आनंद होत नाथचित्ता । यास म्हणती आत्मीयता । सहृदयता कोणी म्हणे ॥६६॥ हा संसाररूपी गाडा । सत्याअसत्याचा निवाडा । आचारविचारांचा धडा । देत रोकडा आपणांसी ॥६७॥ शिकवण नाही एकासी । गुणी जाणत्या लेकासी । हा बोध करा एकमेकांशी । कळे सर्वांसी आत्मबोध ॥६८॥ यास म्हणती कर्मयोग। दुसरे नाव दैवभोग।सत्कर्म विनियोग।फळत्याग या नाव ॥६९॥ विवेकाची कास धरा । फळइच्छा न मनी धरा । फलाशारहित कर्म करा । परमेश्र्वरा समर्पण ॥७०॥ फळ देणे त्याच्या हाती । चुकणार नाही कल्पांती । हिशेब चाले दिनराती । कर्माची गती तो जाणे ॥७१॥ कर्माचे प्रकार दोन । सत्य असत्य प्रमाण । फल देई भगवान । ही शिकवण गीतेची ॥७२॥ कर्म करिता लाभे भक्ती । कर्म करिता द्रव्य प्राप्ती । कर्माने होय प्रगती । कर्मे नेती ईशाकडे ॥७३॥ कर्माचे दुसरे अंग । कर्म करी भणंग । कर्माने कठीण प्रसंग । पोळवी अंग कर्म हे ॥७४॥ सत्कर्म करिता पुण्य वाढे । न मागता फळ गाढे । वैभव शिखरा चढे । मागे पुढे सेवकही ॥७५॥ घडता असत्य कर्म । चुकला तो सारे वर्म । न्यायनिवाडा नीतीधर्म । बुद्धीसी भ्रम पडतसे ॥७६॥ होय त्याचे अधःपतन । विषयी गुंते मन । आपत्ती वाढे चहुकडून । चुकले निदान वागण्याचे ॥७७॥ ईश्र्वराचा कोप घडे । संकट येऊन अंगी पडे । अभागी अर्धांगी रडे । सदा साकडे त्याघरी ॥७८॥ हा देवाघरचा न्याय । पेरिले ते उगवून जाय । जरी ह्यावरी शोधणे उपाय । धरा पाय सद्गुरूचे ॥७९॥ म्हणुनी सत्कर्म करा । मागे कीर्ती ठेउᆬन मरा । सत्संग नेमेच बरा । यावे शांतिमंदिरा यासाठी ॥८०॥ सज्जनाचा धरा संग । करा दूर तो कुसंग । लुटा आनंद भक्तिरंग । काम अनंग दूर पळे ॥८१॥ कर्माचे भोगती भोग । सौख्य, आनंद अथवा रोग । भोगणे लागे भाग । असो मग कोणीही ॥८२॥ कर्मधर्मयोगे आता । भोग गरीब- श्रीमंता । तो प्रभू कर्ताकरविता । अवघी सत्ता हाती त्याच्या ॥८३॥ म्हणून विषमता भासते । रडे कोणी, कोणी हासते । कारण याचे खास ते । परमेश्वरास ते ठावे असे ॥८४॥ यांचे हे संभाषण । अध्यात्माची शिकवण । एकही शब्द नव्हता गौण । सांगते पुराण नीती ही ॥८५॥ असो आता वळू मागे । पकडू मागील धागे । अंजना सासरी कशी वागे । पे्रमाने की रागे पाहू या ॥८६॥ यादवकन्या अंजनाबाई।सुख शांती जिच्याठायी । प्रसन्न मुद्रा आनंददायी । पाहून होई समाधान ॥८७॥हे पाठक घराणे । सुविद्य तसे शहाणे । कोणी भविष्यही जाणे । प्रसंगी घेणे पुढाकार ॥८८॥ जिथे लेक नांदण्या जाई । भाग्याने मिळती जावई । किती एक व्यसनापायी । जीवन होई मातीमोल ॥८९॥ भाग्याने लाभे संपत्ती । भाग्याने लाभे संतती । भाग्याने लाभे संगती । भाग्याने अधोगती टळतसे ॥९०॥ मल्लूजीनाथांचे चिरंजीव । पंडित नाम महादेव । पाठक उपनाव । अखंड हाव विद्येची ॥९१॥ स्वातंत्र्यसंग्राम शिपाई । वैद्यकीचे व्यवसायी । हातास नेहमी यश येई । आराम होई रोग्यांना ॥९२॥ सुखात आणखी सुख । पाहिले पुत्रमुख । वाटू नये रुखरुख । योग सुरेख आलासे ॥९३॥ जगदीश नाव ठेविती त्याला । कालांतरे दुसरा योग आला । आणखी एक मुलगा झाला । म्हणती त्याला सुधाकर ॥९४॥ जगदीश शाळेत जाऊ लागे । सुधाकर पाठी लागे । वय नव्हते शिक्षणाजोगे । आई मागे आणी त्यासी ॥९५॥ हाती घेऊन दप्तर पाटी । पास होणे वर्षाकाठी । नाही कोणती आटाआटी । उल्हास पोटी शिकण्याचा ॥९६॥ संतांची साधुत्ववृत्ती । वसेल काय आमुच्या चित्ती । येईल काय अनासक्ती । संतसंगती विना कधी ॥९७॥ प्रथम लोभ पुत्रेष्णा । दुसरी जाण वित्तेष्णा । तिसरी मोहवी लोकेष्णा । ही तृष्णा बुजेल का ॥९८॥ मनात जरी असे शल्य । डोळ्यांपुढे सारथी कौशल्य । कामगिरी त्याची अतुल्य । त्याचे मूल्य पदरी त्याच्या ॥९९॥ एक कथा सांगतो आता । प्रसंग हा महाभारता । श्रीकृष्ण सारथी होता । अर्जुन रथावरी मागे ॥१००॥ ज्याचे सारथ्य देव करी । यश अर्जुनाचे पदरी । तैसा मी निश्चिंत लेखणी धरी । कार्य त्याचेवरी सोपुनिया ॥१०१॥ या उलट शल्य सारथी । होता भाविक हो ज्या रथी । महावीर कर्ण महारथी । अपयश माथी येत त्याच्या ॥१०२॥ सारथ्याहाती वाग्दोर । देऊन झालो निर्घोर । त्याची कृपा आहे तोवर । दोष न येणार मम माथा ॥१०३॥ त्याचेवर ठेवून भरवसा । लिहिण्याचा घेतला वसा । ज्याच्या नावाचा ठसा । करणार नाही कसा पूर्ण तो ॥१०४॥ हा दास महादेव । लिहितो नाथांचे अनुभव । धाडस केले आभनव । केली उठाठेव शब्दांची ॥१०५॥ करू एकवार नाथस्मरण । अध्याय करू हा पूर्ण । ज्याचे गातो मी गुण । त्याचे त्याला अर्पण करू या ॥१०६॥ हा ग्रंथ असे महान । लाभले नाथांचे वरदान । महादेवदास आत्मनिवेदन । करी लेखन गुरुकृपे ॥१०७॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र चवथे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
No comments:
Post a Comment