
श्री गणेशाय नमः॥ श्री गुरुदेवाय नमः॥ श्री कुलदेवताय नमो नमः ॥ ॐ नमो सद्गुरुनाथा । योगीराजा समर्था । मी लिहितो तुझी गाथा । पूर्ण सर्वथा करी तू ॥१॥ मनी जाणून भरवसा । केले अपूर्व धाडसा । आधार तुमचा आहे दासा । असेच दिसा दृष्टीपुढे ॥२॥ अलभ्य असे हा योग । किती उद्धरले महाभाग । अनेका दावियला मार्ग । चालविला याग ज्ञानाचा ॥३॥ खेळ भवाचा खेळले । मोहमायेत लोळले । संसार तापे पोळले । भाग्य फळले संतसंगे ॥४॥ संताची कळाया महती । संतची लागे निश्चिती । मी बालक अल्पमती । ठावे तुम्हाप्रती सर्व हे ॥५॥ सूर्यास कुणी काडवाती । लावुनिया ओवाळती । ताटात दिव्याची ज्योती । कुणी पूजिती चंद्राशी ॥६॥ जसे महासागराशी । अर्घ्य अर्पावे तोयाशी । उपयोग नसे त्याशी । संबंध भावनेशी असे हा ॥७॥ तुझे घ्यावे तुला द्यावे । समर्पावे सर्वभावे । मनासी संतोष पावे । क्रिया स्वभावे कारण ॥८॥ पूर्वी खूप निरक्षर । आज बरेच झाले साक्षर । श्रद्धा-अश्रद्धेचा प्रकार । नारीनर अनभिज्ञ ॥९॥ काही पोटभरू ग्रामजोशी । फिरती भविष्य सांगायाशी । सावज लागता हाताशी । मग त्यासी फसविती ॥१०॥ अज्ञ-तज्ज्ञ असो कसाही । शिक्षणाचा संबंध नाही । हे फसविती सर्वासही । सांगती काही आनष्ट ॥११॥ बांधू लागती गंडा-दोरा । धोका सांगती सान-थोरा । कधी बापा, कधी पोरा । लटका होरा जोश्याचा ॥१२॥ गंड्याने कधी रोग न जाती । भूतबाधा दूर न होती । परी ढोंगी लुबाडिती । क्लृप्ती करिती नवनव्या ॥१३॥ रोगास लागे औषधी । भुकेल्या जेवण आधी । अंगारे-धुपारे केल्या कधी । जाई न व्याधी देहाची ॥१४॥ मरण कोणासी कळेना । वेळ आल्या टळेना । स्थिर चित्त तो चळेना । बाळगे ना भय मनी ॥१५॥ ही आहे वस्तुस्थिती । संत सांगती ऐशारीती । काही दुष्ट कुमती । भुलविती अज्ञजना ॥१६॥ मीनाक्षी मोहनराव । नागपूर जिचे गाव । प्राप्त विद्येचे वैभव । मात्र स्वभाव साधाभोळा ॥१७॥ एका जज्जाची कन्यका । कॉलेजला प्राध्यापिका । जोश्यास भेटली एका । ऐके धोका मरणाचा ॥१८॥ मनात मरणाची भीती । चिंता तिला दिवसराती । मरणार मी निश्चिती । सर्वांप्रती हेच सांगे ॥१९॥ अन्नाचा केलासे त्याग । जडला चिंतेचा रोग । महाविद्यालयी जाणे भाग । ग्लानी मग फार आली ॥२०॥ भाग्याचा उदय होता । बदल होई अवचिता । बुडत्यास तारू लागे हाता । वैद्य आयता रोग्याघरी ॥२१॥ तेल्हार्याचे शिक्षक जाण । गुरुजी डामरे सूर्यभान । नाथांचे भक्त महान । गेले चालून नागपूरा ॥२२॥ या डामरे गुरुजींचा । मुलगा अशोक नावाचा । विद्यार्थी या कॉलेजचा । आला भेटीचा योगायोग ॥२३॥ या बाईची झाली भेटी । पाहिले त्यांना दुःखीकष्टी । उपवासी अर्धपोटी । पोट खपाटी लागलेले ॥२४॥ बाईस बोलले सहज । सांगितले हितगुज । हातरूणला महाराज । जाऊ आज त्यांचेकडे ॥२५॥ हे माझे सद्गुरुनाथ । दुर्बलास देती साथ । चुकल्यास दाविती पथ । पाहती हात जोश्याचा ॥२६॥ तेथे यादवांची समाधी । दूर पळे आधी-व्याधी । भूतपिशाच्चही ना बाधी । जाऊ आधी स्थळासी या ॥२७॥ वैद्याचा वैद्यराज । महादेवनाथ महाराज । कळवू त्यांना हे राज । नाही गरज इतरांची ॥२८॥ धाक होता बाईचे मनी । साप येऊन मारेल फणी । वाचणार ना यातुनी । येईल घडोनी कधीही हे ॥२९॥ नाथ माझे सर्वसाक्षी । मंदिरी येता राव मीनाक्षी । म्हणे ज्यासी देव रक्षी । काय भक्षी काळ तया ॥३०॥ ऐकता बाबांचे बोल । सारेच झाले अबोल । अंतरात शिरले खोल । डोळ्यात ओल दिसू लागे ॥३१॥ डामरेंनी धरले पाय । रडू लागती धाय धाय । न सांगता बोलले काय । नाथराय आत्मज्ञानी ॥३२॥ बाईने घेतले दर्शन । प्रसन्न जाहले मन । भ्रांती गेली निघून । गुरुचरण लाभता ॥३३॥ नाही मृत्यू, नाही नाग । लाभला संत महाभाग । भक्त झाली बाई मग । दगदग दूर झाली ॥३४॥ नाथा तुमचे सामर्थ्य अचाट । डामरे म्हणे मी झालो भाट । अनेका दाविली ही वाट । उगवली पहाट जीवनाची ॥३५॥ बर्याच आहेत कथा । किती वाढवावे ग्रंथा । अनेक लागले या पंथा । घेऊन संथा ज्ञानाची ॥३६॥ नाथकीर्तीचे पवाडे । पसरू लागती चोहीकडे । परमार्थाचे देती धडे । उकलती कोडे जीवनाचे ॥३७॥ नाथ वेडा ना शहाणा । केवळ परब्रह्म जाणा । तुम्ही त्यासी काही म्हणा । अचळ ढळेना तिळभरी ॥३८॥ जिकडे तिकडे जाय वर्दी । मंदिरी वाढू लागे गर्दी । अध्यात्माचे खरे दर्दी । घेती तसदी येण्याची ॥३९॥ लोक येती आणि जाती । अखंड जागृत नाथमूर्ती । जाणे न कोणी देहस्थिती । नसे विश्रांती क्षणभरी ॥४०॥ असे काही दिवस जाता । थकवा खूप देहा येता । जडे शरीरासी व्यथा । लागली चिंता सर्वांना ॥४१॥ एक दिवस ग्लानी आली । देहाची शुद्ध हरपली । भक्तांची धांदल उडाली । गोळा झाली मंडळी ॥४२॥ गावात सिंघल डॉक्टर । एकाने गाठले घर । तेही आले लवकर । प्रसंग आनवार असा हा ॥४३॥ हे सिंघल हरिराम । नाथांवर करती पे्रम । मंदिरी यायचा नेम । नित्यक्रम असे त्यांचा॥४४॥ पंचक्रोशीस त्यांची सेवा । जावे शेजारील गावा । क्षणभर मंदिरी विसावा । बाबांस दवा द्यावी त्यांनी ॥४५॥ क्षणात वार्ता पसरली । हा हा म्हणता गर्दी झाली । बोलेना नाथमाउली । आसवे आली डोळ्यात ॥४६॥ डॉक्टर रोकडे तुलसीदास । कोणी कळविले तयास । तेही आले मंदिरास । पाठकास भेटले ॥४७॥ पाठकासवे डॉक्टर दोन्ही । बसले एके ठिकाणी । विचार केला तिघांनी । जाऊ घेऊनी अकोल्याला ॥४८॥ महात्मा गांधी विद्यालयाचे ।भाऊराव शिंदे नावाचे । मुख्याध्यापक होते साचे ।वार्ता तयांचे कानी गेली ॥४९॥ त्यांचेकडे जीप गाडी । ड्रायव्हर होता गडी । लगेच आणली तातडी । गर्दी थोडी दूर केली ॥५०॥ दोन्ही डॉक्टरांसोबत । आम्हीही बसलो लगत । घेऊन आलो अकोल्यात । दवाखान्यात ठेवियले ॥५१॥ बाबांचा मुलगा श्याम । दवाखान्यात करी काम । औषधीचे चुकवी दाम । वाटला आराम थोडासा ॥५२॥ दवाखान्याबाहेरी । दाटी झाली खूप सारी । मी बसलो असता दारी । हाक मारी नाथ माझा ॥५३॥ प्रथम शब्द उच्चारिला । महादेव म्हणून हाक मला । रजनी आली सांगायाला । बाबा तुम्हाला बोलाविती ॥५४॥ मग मी जवळ जाता । नाही बोलले मज पाहता । दृष्टादृष्ट माझी होता । धरून हाता बैसले ॥५५॥ जगदीश पाठक भाचे । जवळ सदा थांबायचे । व्यवस्था सारी पहायचे । लक्ष द्यायचे वेळोवेळी ॥५६॥ औषधाचा गुण आला । त्याने थोडा आराम झाला । आले पुन्हा हातरूणला । मंदिराला नाथ माझे ॥५७॥ काही दिवस सुखात गेले । भक्त सेवा करू लागले । शरीर झिजत चालले । तेज उरले डोळ्यांमध्ये ॥५८॥ हा निसर्गाचा नियम । तो करी आपले काम । रंक, भूपती सारे सम । थांबेना यम कोणासाठी ॥५९॥ पुन्हा काही दिवसांनी । शरीरास आली ग्लानी । सुचेना काय करावे मनी । आलो घेऊनी अकोल्याला ॥६०॥ मी, जगदीश पाठक । फनकटे पांडुरंग एक । दवाखान्यात येता देख । भक्त अनेक गोळा होती ॥६१॥ सत्यनारायण अग्रवाल जाणा । पूर्वीचा त्यांचा दवाखाना । तिथे ठेविले बाबांना । औषधी पुन्हा सुरू झाली ॥६२॥ हे डॉक्टर अग्रवाल । सत्यनारायण मदनलाल । करी उपचार, देखभाल । अनमोल सेवा त्यांची ॥६३॥ या डॉक्टरांची आई । नाव तिचे गिन्नीबाई । बाबांस म्हणती भाई । रोज येई भेटीसाठी ॥६४॥ हातरूण तिचे माहेर । मानी आम्हा सहोदर । शिकलो आम्ही बरोबर । भाग्य थोर भगिनीचे ॥६५॥ या डॉक्टर अग्रवालचा । पुतण्या प्रदीप नावाचा । भक्त झाला बाबांचा । मंदिरी यायचा श्याम संगे ॥६६॥ संतावरी श्रद्धा भारी । शेगावची पायी वारी । जो असा नियमधारी । कष्ट वारी प्रभू त्याचे ॥६७॥ असता या दवाखान्यात । एकदा काय घडली मात । दिव्यत्वाचा अनुभव येत । येई प्रचित महात्म्याची ॥६८॥ दवाखान्यातील प्रसंग । सोबत श्याम, पांडुरंग । रात्री बाबास आली जाग । काय मग बोलती ते ॥६९॥ पहा पाटील डिगांबर । आज इकडे येणार । आम्हा उत्सुकता फार । असा प्रकार मागे होय ॥७०॥ बाबांचे शब्द अमोल । होणार नाहीत फोल । पाटील खरेच येतील । गाव कळेल आल्यावरी ॥७१॥ दिवस उजाडल्यावर । मी आलो मोटारस्टॅंडवर । भेटले पाटील डिगांबर । नमस्कार केला त्यांना ॥७२॥ ते मजला विचारिती । बाबांची कशी आहे प्रकृती । भेटण्यास मी आतुर आत । गाडी कोणती दाखवा ॥७३॥ गेल्या रात्रीपासून । आली नाथांची आठवण । गोड ना लागे अन्नपान । आलो निघून तसाच मी ॥७४॥ पाटलांचे गाव लामकाणी । सुविचारी महाज्ञानी । नित्य मंदिरी येउᆬनी । मुक्काम त्यांनी करावा ॥७५॥ नियम, शिस्त कडक भारी । स्नान करावे रामपारी । पूजापाठ अवघे सारी । करिती वारी नित्यची ॥७६॥ बाबांवरी भारी पे्रम । चालला हा अखंड नेम । विचारावे कुशलक्षेम । उपक्रम नेहमीचा ॥७७॥ पाटलांची भेट होता। आनंद झाला माक्या चित्ता । कळली नाथांची महत्ता । जो धोशा होता रात्रीचा ॥७८॥ मी सांगितले त्यांना । अग्रवालचा दवाखाना । आहे तेथे भक्तराणा । आठव त्यांना तुमचाची ॥७९॥ पाटील दवाखान्यात आले । सद््गुरूंचे दर्शन झाले । दर्शने मन निवाले । चित्त रमले पायांपाशी ॥८०॥ हृदयाच्या जुळती तारा । शब्द नेई वाहून वारा । घडे तसा प्रकार सारा । भेटे प्यारा जिवलग ॥८१॥ देहास पडला आराम । सोडले आरोग्यधाम । घरी घेऊन गेला श्याम । केला मुक्काम त्याच्याघरी ॥८२॥ श्याम म्हणे इथे रहा । विचार सोयीचा असे हा । जवळ दवाखाना पहा । निदान दहा दिवस तरी ॥८३॥ ऐका काय वदती नाथ । मी न येथे थांबत । अनेक भक्त वाट पाहत । शांतिमंदिरात माक्या त्या ॥८४॥ कविता म्हणे बाबा । थोडे दिवस तरी थांबा । आम्हा वाटे हा अचंबा । म्हणावे काय बा पे्रमासी ॥८५॥ आज कितीतरी सुना । सासू, सासरे नको त्यांना । देवाशी पूजिती नाना । जाती स्नाना तीर्थावरी ॥८६॥ करिती सोळा सोमवार । एकादशी निराहार । शुक्रवार फुटाण्यावर । घालती फेर वडाशी ॥८७॥ ब्राह्मणास दान करी । पोथी वाचती नित्य घरी । सासरा वाटे जणू वैरी । देई न भाकरी सासूला ॥८८॥ बाहेर वैभव, स्नेह । घरात चाले कलह । उदासवाणे सारे गेह । हा संग्रह दुर्गुणांचा ॥८९॥ आनंद वसे ज्याघरी । तेथेच राहे श्रीहरी । भक्ती न आन दुसरी । लाभ पदरी सुखाचा ॥९०॥ एकदा म्हणे कविताबाई । बाबा मला मुलगा नाही । बाबा वदले लवलाही । नको बाई खंत करू ॥९१॥ या सविताबाईला । मुलींनंतर मुलगा झाला । हा हरिहर जन्मला । मुलगा ह्याला मान तू ॥९२॥ मुलगी जन्मा येता घरी । बाबांना प्रसन्नता भारी । भावी पिढीची माय खरी । वर्णिती थोरी आनंदाने ॥९३॥ जरी नसती अमुची माय । आभाळातून पडतो काय । दुसरा काही नाही उपाय । विनामाय जन्मण्याचा ॥९४॥ वेलीस दोडके-वाळके । तशी न झोंबती बालके । विज्ञानाच्याही कवतिके । अद्याप ना चुके मायकूस ॥९५॥ कन्या सृजनाची शक्ती । हीन न लेखावे तिजप्रती । शिवाची अव्यक्त पार्वती । प्रत्यक्ष मूर्ती ममतेची ॥९६॥ जा तू अपुल्या सासुपाशी । वत्सलामातेच्या समाधीशी । इच्छा सांग पायांपाशी । होईल खुशी शंका नको ॥९७॥ पुढे काही दिवसात । जन्मा आला कैवल्यनाथ । द्यद्यपुन्हा आले यादवनाथद्गद्ग । बाबा सांगत भक्तांलागी ॥९८॥ बाबांच्या मर्जीनुसार । मोटार आली दारावर । त्यामध्ये होउᆬनी स्वार । सोडले घर श्यामचे ॥९९॥ आलो गायगावापाशी । तव नाथ वदले आम्हांसी । लोक मानतील या स्थळासी । गणपतीशी पूजतील ॥१००॥ खरेच आज पाहतो । जो तो या मंदिरी जातो । श्रद्धा अपुली वाहतो । कुणी राहतो मुक्कामी ॥१०१॥ काही वर्षाअगोदर । वदती नाथ गुरुवर । हातरूणचा परिसर । वाढणार दक्षिणेला ॥१०२॥ आज भाकीत खरे झाले । सारे गाव इकडे आले । सद्गुरुनाथ जे जे बोले । अनुभवले भक्तांनी ॥१०३॥ आज जेथे निंबा फाटा । चहू दिशांनी चार वाटा । तेथील व्यवहारा न घाटा । बोल चोखटा नाथांचा ॥१०४॥ श्रीकृष्ण सावजी सोनार । म्हणे मी शेत घेणार । आहे निंबा फाट्यावर । सांगा व्यवहार करू का? ॥१०५॥ त्यास म्हणती हे नाथ । लाभ असे बहू त्यात । येईल मोल बहुत । होईल हित शंका नसे ॥१०६॥ आज चौरस्त्याचे वैभव । वाढला बहू व्यवसाव । अनेकांनी केला ठाव । आला भाव जमिनीला ॥१०७॥ नाथ खरा अंतर्ज्ञानी । मोक्ष लाभे ऐकल्या वाणी । दरबारी आला कोणी । आली न हानी व्यवहारा ॥१०८॥ भाग्याने लाभे सहवास । उणे न पडे काही त्यास । इह-पर दोन्ही सुखास । या भाग्यास पार नाही ॥१०९ ॥ माझी सार्या विनवणी । व्हा रे मोक्षसुखाचे धनी । संधी न दवडा कुणी । विकल्प मनी आणू नका ॥११०॥ न कळता घडे गुन्हा । तो न करावा कधी पुन्हा । ती माउली, भक्त तान्हा । पाजी पान्हा अमृताचा ॥१११॥ नाथांचे बोल ज्यांनी ऐकिले । त्यांचे त्यांचे भले झाले । येर ते वाया गेले । अपयश आले पदरात ॥११२॥ आता बाबा आले घरी । जालंदर त्यांची सेवा करी । होता सकाळ न्याहरी । देई नंतरी पानविडा ॥११३॥ सेवा करी सविताबाई । बाबा म्हणती तिला आई । काय पूर्वीची पुण्याई । दर्शन घेई नाथ तिचे ॥११४॥ कुणी घेतील येथे शंका । गुरुनाथांचा वाजे डंका । तो दर्शन घेईल का ।नोहे फुका लिहिले मी ॥११५॥ जे जे डोळ्यांनी पाहिले । ते ते अवघे लिहिले । नाथांच्या चरणी वाहिले । काही न घातले पदरीचे ॥११६॥ अकोल्याचे राजेंद्र खत्री । नाथांचे खरे कृपापात्री । नाथांची पटता खात्री । येती रात्री वा दिवसा ॥११७॥ नाथ असता नित्य घरी । निघून येती कधीतरी । हार, फुले, प्रसाद करी । भरवी न्याहारी हाताने ॥११८॥ बाबांच्या पायास जखम । बांधती पट्टी, लावी मलम । वेदनेस पडे आराम । असे प्रेम खत्रींचे ॥११९॥ रोज येती हे सकाळी । दर्शनास प्रातःकाळी । प्रथम नाथांच्या जवळी । परतल्या सांभाळी गृहकाज ॥१२०॥ जरी मोक्षसुखाची आवडी । तो गुरुसेवन करी तातडी । वाया जाऊ नेदी घडी । वाटे गोडी यातची ॥१२१॥ व्हाया शुद्ध अंतःकरण।नवविधादी भक्ती श्रवण।तव लाभती गुरुचरण । अनन्य शरण होय तो ॥१२२॥ अखंड गुरूचे स्मरण । निष्ठा पाहिजे परिपूर्ण । गुरुप्रसादाविन । व्यर्थ शीण अवघा ॥१२३॥ गुरू माता, गुरू पिता । मुक्ती देई सायुज्यता । मोक्षसुखाचा खरा दाता । दोही परता आगळा ॥१२४॥ आम्ही अनाडी, अपराधी । ओळखले ना तुज कधी । कृपा कर करुणानिधी । आम्ही साधी माणसे ॥१२५॥ तुजपाशी ज्ञानसाठा । आम्हा अहंकार ताठा । मनास वाटे मी मोठा । उगीच ओठा शब्द यावे ॥१२६॥ तुझे चरित्र गूढ आत । मी तर अज्ञ, मूढमती । तू लिहवून घे पुढती । द्यावी गती लेखणीसी ॥१२७॥ तीर्थ हातरूणग्रामी । धन्य झाली पुण्यभूमी । अवतरले नाथस्वामी । भेटे हमी उद्धाराची ॥१२८॥ बाबा घरी राहायचे । पाठक मंदिरी यायचे । व्यवस्थापन करायचे । सांभाळायचे सर्व काही ॥१२९॥ पाठक नित्य नेमधारी । साधना केल्या नानापरी । संतसंग आवडे भारी । जाती दूरवरी संतभेटी ॥१३०॥ जगदीश पाठकची आई । सद्गुरुनाथभगिनी पाही । नाथासन्निध सदा राही । अंगी येई संतपण ॥१३१॥ चैत्र वद्य अष्टमीस । सार्यांच्या मनी उल्हास । साजरे करण्या उत्सवास । करिती सायास गावकरी ॥१३२॥ नाथभगिनी अंजनाबाई । मनात कामाची घाई । बायांना बोलावू जाई । येती त्याही आनंदाने ॥१३३॥ शेजारचा परिसर । सरोदे, नागळे, भिलकर । सालफळे, जकाते, मानकर । जाधव परिवार, गायकवाड ॥१३४॥ अवघ्या घरच्या बाया । जाती धान्य निवडाया । कामे करिता गाणे गाया । आनंदा या पार नाही ॥१३५॥ पुरुष अवघे मंदिरावरती । भागा आली कामे करती । दोन दिवस, तीन राती । विसरती देह, गेह ॥१३६॥ अग्रवाल बनारसीलाला । किराणा दुकानवाला । चोर कितीदा घाली घाला । उणा न झाला प्रपंच ॥१३७॥ दुकानात झाली चोरी । शेठ आले मंदिरावरी । बाबांना येउᆬन विचारी । माझेच घरी का घडे ॥१३८॥ नाथांचे काय उत्तर । हाती लागतील चोर । मिटेल पुढे हा घोर । न येणार प्रसंग पुन्हा ॥१३९॥ टळण्यासाठी कुप्रसंग । नित्य करावा सत्संग । दुष्कृत्याचा होई भंग । लाभता संग साधूचा ॥१४०॥ लालास लागे आवडी । कथा श्रवणाची गोडी । मुलगा मंदिरी आणून सोडी । हाती पुडी प्रसादाची ॥१४१॥ मंदिरी चाले हरिकथा । नित्याची ही होती प्रथा । पोथीवाचक मी स्वतः । रोज होता नियम हा ॥१४२॥ पुढे त्यांच्या मुलांनी । मंदिर बांधले या स्थानी । स्थापियली दुर्गाभवानी । नाथचरणी समर्पिले ॥१४३॥ अष्टमीचा येता काल । सुभाषशेठ अग्रवाल । देती दुकानचा माल । मागाहून बिल जाई त्यांचे ॥१४४॥ काही स्वतःचे योगदान । तसेच करी श्रमदान । स्वतः हजर राहून । करी पूर्ण कार्य हे ॥१४५॥ सप्तमीस विण्याचा सूर । धरी खडके दामोदर । मोतीराम खरप बरोबर । पूर्वापार चालतसे ॥१४६॥ वानखडे मोतीराम । तसेच त्यांचा मुलगा श्याम । तेल्हारा ज्यांचे ग्राम । नित्य नेम स्वयंपाकी ॥१४७॥ राधेश्याम पाटील सतत । सहभागी या कार्यात । सोहळा चाले आवरत । सार्यांच्या मनात उत्साह ॥१४८॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । स्वानुभवे केले कथन । हे महिमान नाथांचे ॥१४९॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र अठ्ठाविसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु॥
No comments:
Post a Comment