अध्यायसत्र सातवे

श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेवताय नमः। मातृपितृदेवताय नमः। रक्षिताय नमो नमः ॥१॥ गुरू नव्हे देहधारी । गुरूने व्यापिली पृथ्वी सारी । स्थळ, जळ, काष्ठामाझारी । चराचरी गुरू दिसे ॥२॥ कश्यप, अत्री, गौतम । भारद्वाज, विश्र्वामित्र नाम । जमदग्नी श्रेष्ठोत्तम । घडविला राम, वसिष्ठ ते ॥३॥ सप्तऋषी अमर झाले । त्या नावे तारकापुंज चाले । आम्ही म्हणू बुढीचे खाटले । आकाशी दाटले ध्रुवासवे ॥४॥ नमन माझे ऋषीश्र्वरा । हेतू माझा पूर्ण करा । लेकरासी पायी धरा । चालो झरा अखंड ॥५॥ मी नाही पुराणिक । साधाभोळा प्रामाणिक । न जाणे उणेआधक । नतमस्तक तुम्हापायी॥६॥ मान्य करा विनवणी । भाव ठेवी तुम्हाचरणी । महाभाग महामुनी । आठव मनी होतसे ॥७॥ ज्ञानाच्या भूमिका सात । मज वाटे लिहाव्यात । स्मरुनी श्रीसद्गुरूनाथ । नित्य स्मरणात चिंतनी ॥८॥ शुभइच्छा, विचारणा । तनुमानसा तिसरी जाणा । सत्त्वापत्ति चवथी म्हणा । अंगी बाणा सुलीनता ॥९॥ संश्लिष्टता सहावी । संप्रज्ञाता सातवी । ज्ञानसंपदा राहावी । जिज्ञासू व्हावी वृत्ती ॥१०॥ सद्गुरूसारखा सखा । माझा असता पाठीराखा । इतरांचा न करणे लेखा । शब्द एका संताचे ॥११॥ एकोणीसशे बेचाळीस । आले क्रांतीचे दिवस । हाकून द्यावे इंग्रजास । भारतास वेध लागले ॥१२॥ गावागावात एक नारा । छोडो भारत देश हमारा । महादेव का राही न्यारा । गाव सारा एक झाला ॥१३॥ सत्तेचाळीस साली। भारतमाता स्वतंत्र झाली । परी विषाची वल्ली । होती पेरली गोर्‍यांनी ॥१४॥ समाजात आली तेढ । भांडणाची मुहूर्तमेढ । पाकिस्तानचे लागे वेड । झाला वितंडवाद सुरू ॥१५॥ भांडणास न यावा जोर । वाढू नये उगीच घोर । काही जमले थोर थोर । त्यात हे पोर नाथांचे ॥१६॥ बोलाचा राखून मान । शांत झाले मुसलमान । शब्दाचा झाला सन्मान । वाढे महिमान नाथांचे ॥१७॥ तंट्यास देत तिलांजली । गावात सर्व एकदिली । सार्‍यांना समज दिली । अशी झाली एकता ॥१८॥ ती आजही कायम आहे । उद्यम सार्‍यांचा आहे । शेती कुणी वाहे । व्यापार पाहे कुणी ॥१९॥ इस्लामधर्मी कितीतरी । येती शांतिमंदिरी । नाथ चढविती चादरी । कबरीवरी शहाच्या ॥२०॥ जनी पाहे जनार्दन । कसला त्यासी पंथाभिमान । हिंदु की मुसलमान । समसमान बौद्धही ॥२१॥ कुणी वाचती कुराण । कुणा आवडे पुराण । कुणी बुद्धास गेले शरण । अंतःकरण शुद्धीसाठी ॥२२॥ यादवाचा एकांत । महादेवापाठी आकांत । कधी पावेल श्रीकांत । मिटेल भ्रांत प्रपंचाची ॥२३॥ यादवांचे मित्र संपन्न । काही धनिक सज्जन । एक स्वामी श्रीकिसन । शेगावाहून येती कधी ॥२४॥ हातरूणला शेतीभाती । मंगळवारी बघण्या येती । महादेवास पैसे देती । मुठीत मावतील तेवढे ॥२५॥ त्या काळी चलनीनाणे । पै, पैसा, रुपया, आणे । रुपयात पैसा करून उणे । चिल्लर देणे गरजूंसी ॥२६॥ यास खुर्दा दुकान म्हणती । नोट दिसेना कोणती । सायंकाळी होय गणती । त्यातून आणती बाबा हे ॥२७॥ ही नव्हती भिक्षा । मित्राची खरी परीक्षा । काही नसता अपेक्षा । पुत्रापेक्षा प्रेम त्यांचे ॥२८॥ कुळकर्णी देशमुख । दोन्ही गावचे प्रमुख । पाटील पटवारी देख । हाती मेख गावकीची ॥२९॥ गरिबी येण्याचे कारण । बन्सीलाल गौड ब्राह्मण । नाथांची शेती दिली गहाण । मुलास लंडनला पाठविले ॥३०॥ त्यातच ती हर्रास झाली । नशिबी दैना आली । मजुरीवर कैसे चाली । परी सावली शेजार्‍याची ॥३१॥ एक बळीराम सालफळे । यादवाचे मित्र आगळे । नशिबी त्यांच्या दैन्य फळे । कोणा कळे दैवयोग ॥३२॥ दोहीकडे समानस्थिती । मदत करावी कैशारीती । दोघांची अखंड प्रीती । रोज भेटती एकमेका ॥३३॥ शिवरात्री की एकादशी । दोघी बहिणी उपवाशी । कोणी पुसावे कोणासी । गती दोघींची सारखी ।।३४॥ मान नसे धनावरी । मान मिळतो गुणांवरी । आचरण शुद्ध ठेवा जरी । मान करी गाव अख्खे ॥३५॥ पाहिली मी रोजनिशी । सहा सात सत्तेचाळीस दिवशी । घर सारे उपवासी । वार्ता कुणासी कळली ना ॥३६॥ एकास दगडफाडी विकली । सांज एक पुढे धकली । हाती नुरली टका-टिकली । पुढे कसली सोय आता ॥३७॥ अशी असता आबाळ । तांब्याचे घरी घंगाळ । गहाण ठेवले काही काळ । आणि वेळ भागवली ॥३८॥ अखेर मोडावे लागले । तीन दिवस भागले । मना पुढील वेध लागले । चवथ्याचे भले सज्जनहो ॥३९॥ गाव सोडू म्हणे आता । भिकाजीस कळली वार्ता । जो एक शेजारी होता । धीर देता जाहला ॥४०॥ पाकदुणे उपनाव । बाबांकडे येवजाव । शेजारधर्म या नाव । म्हणे गाव सोडू नका ॥४१॥ त्यांची छोटी दुकानदारी । यास म्हणती व्यापारी । माल देतो म्हणे उधारी । आपण घरी स्वस्थ रहा ॥४२॥ ठेवा देवावर भरवसा । तो देणार नाही मग कसा ।याच घरी निवांत बसा । समय असाच राहील का ॥४३॥ गावालगत मालवाडा । कालूजी ठाकरेचा तेथे वाडा । लोखंडी कोपळी-कुर्‍हाडा । विकल्या दाम थोडा घेउᆬनी ॥४४॥ मामास कळली कहाणी । त्यांनी जुंपली दमणी । गव्हाचे पोते, डाळ जुनी । आणी काही ज्वारीही ॥४५॥ लोणाग्रा येथील थोटे । शेती त्यांची गावच्या नेटे । हातरूणला मजूर भेटे। करिता एकटे आले हे ॥४६॥ बाईस मजुरी एक आणा । दीडपट मिळे माणसांना । करी मजुरी नाथराणा । फोड हातांना खुरप्याचे ॥४७॥ त्या काळी जुने नाणे । पै, पैसा, रुपये, आणे । असा रोज दीड आणे । पडला म्हणे निंदणाचा ॥४८॥ दीड आणा दहा पैसे । आज व्यवहारातून नाहीसे। चार आणे पंचवीस पैसे । दिसेनासे झाले तेही ॥४९॥ महागाईचा भस्मासूर । अनेकांना जेवण दूर । कुठे पैशाचा महापूर । निघतसे धूर सोन्याचा ॥५०॥ शेत फिरले तीन तीन । सायंकाळी आले थकून । वाटे नको असे जीवन । मिळेना जेवण वेळेवरी ॥५१॥ महादेव नावाचा सुतार । मनमिळाउᆬ असे फार । बाबांवर पे्रम अपार । शिवणकामावर पोटभरी ॥५२॥ हा जातीने सुतार-वाडी । पण लाकडे ना झोडी । बाबूराव एक कोळी । सवंगडी बरोबरीचे ॥५३॥ याचे उदार बहू मन । शिवणयंत्र होते दोन । काम करिती दोघे जण । देई शिक्षण मजुरीसह ॥५४॥ चालू झाली रोजी रोटी । पडू लागले अन्नपोटी । मदत मित्राची मोठी । सुटला शेवटी प्रश्र्न हा ॥५५॥ मित्रची झाला गुरू । प्रपंच दोघांचा सुरू । पोटही लागले भरू । ईश्र्वरा स्मरू लागले ॥५६॥ उत्तरेस शिवमंदिर । पावन मोर्णातीर । शिवभक्त दानी उदार । बांधली विहीर, शिवालय ॥५७॥ शेती दिली काही दान । असा दाता हा महान । हे रंभाजी निर्मळ जाण । व्यवस्थापन पंचांकडे ॥५८॥ दर्शना जाती सायंकाळी । तिकडे सूर्य मावळी । जातीभेद होता त्याकाळी । परी ही आगळी त्रिकुटी ॥५९॥ गुरू शिष्यास सांगे एकदा । घरी काम करी सदा । कामामुळे न आपदा । कपडा कदा चोरू नको ॥६०॥ जो मूळचाच त्यागी । तपस्वी महान योगी । सांगावे काय त्यालागी । स्वहिता जागी सर्वदा ॥६१॥ परी हा सहज विनोद । इथे घ्यावी याची नोंद । एकमेका देत आनंद । हा छंद आवडीचा ॥६२॥ तुज काम जमले बहुतेक । घे मशीन ह्यातील एक । तुम्हा वाटेल आतरेक । मी नाहक लिहिले ना ॥६३॥ मित्र असावा जिवलग । शांतवी तनाची तगमग । मदतीची करी लगबग । नाही अलग वागणे ॥६४॥ यादवांचे, महादेवाचे । दोस्त वर्णिले साचे । जे खरे जीवाभावाचे । नाव तयांचे लिहिले मी ॥६५॥ आणखी बहुमानाचे । अगदी श्रेष्ठ स्थानाचे । पाठ राजकारणाचे । ध्येयधोरणाचे बाबांच्या ॥६६॥ नाव ज्याचे तुळशीराम । सरोदे हे उपनाम । यादवदर्शनाचा नेम । सांभाळावे काम यांचे सदा ॥६७॥ बाबा मानती मानसपुत्र । महादेवाचे भाऊ मात्र । यांचे हाती घरसूत्र । पिता पुत्र मान देती ॥६८॥ लोककाजी ना उसंत । तोची मानावा खरा संत । लाभ हानीची नाही खंत । खरा महंत तोच जगी ॥६९॥ पोटासाठी केले सोंग । तेथे कैचा पांडुरंग । हा तुकयाचा अभंग । करती सत्संग पोटासाठी ॥७०॥ श्रम न करता जगणे । धिक धिक त्याचे वागणे । मी त्यास साधू न म्हणे । गाता गाणे संताचे ॥७१॥ तुका जाई शेतावर । पाखरे हाकी माळ्यावर । पहा नरहरी सोनार । अलंकार घडवितसे ॥७२॥ सावता वाही मोट । त्यावर भरी आपले पोट । कबीर शेला विणी पट । कमाल पेठ सांभाळी ॥७३॥ रविदास हा चांभार । कुणा नाही झाला भार । नामा शिंपी, गोरा कुंभार । सर्वाधार कुटुंबाचे ॥७४॥ कुणावर आपला भार नको । आरामाचा संसार नको । परधनावर मदार नको । असा व्यवहार नको साधुशी ॥७५॥ नाथ माझा झाला शिंपी । कापड कातरीने कापी । टेप लावी, सदरा मापी । माय लिंपी भिंती पडक्या ॥७६॥ या घराण्याचा वारसा । ज्योतिषाचा अंगी वसा । चालत आला हा असा । महादेव कसा सोडील ॥७७॥ कुणास भविष्य सांगे । कुंडली कुणाची मांडू लागे । लग्न काढून कोणी मागे । उत्तर देई वेगे प्रश्र्नाचे ॥७८॥ हा पोटाचा नाही धंदा । न मिळवी यातून चंदा । अडकले नाही या फंदा । फक्त आनंदासाठी हे ॥७९॥ दुःख असो की सुख । सदाच हसरे मुख । गावातील काही प्रमुख । देशमुख पाटील हे ॥८०॥ तेली-तांबोळी, चांभार । भोई, कोळी, कुंभार । कलाल, कुणबी, धनगर । पाथरकार, खाती, वाडी ॥८१॥ धोबी, मारवाडी येती । कुळकर्णी ब्राह्मण याती । कोणी येती कोणी जाती । काय गणती करावी ॥८२॥ चालू झाले शिलाईयंत्र । उद्योग झाला स्वतंत्र । लाभले सुखाचे तंत्र । फळला मंत्र गुरूचा ॥८३॥ ऊन असो किंवा सावली । वाढे, घटे पावलोपावली । सुखापाठी दुःखे आली । जाय माउली सामोरी ॥८४॥ बाबांचा चिरशांतीसूचक । सप्ताहात बुधवार एक । पहा कैसे झाले कौतुक । सूचना मूक असेल का ॥८५॥ वर्ष-सहामास आधी । प्रथम उद्भवली उपाधी । ऐसे नच घडले कधी । जे मनास बोधी नश्वरत्व ॥८६॥ उगवला बुधवार दिवस । खुंट्यावरची मेली म्हैस । दुसरे बुधवारी खास । वासरास तीच गती ॥८७॥ तिसरा बुधवार आला काय । गेली खुंट्यावरची गाय । निष्फळ झाले उपाय । आता वाटले हाय सर्वांना ॥८८॥ सारे झाले चिंतातुर । आता येईल बुधवार । याचाही परिणाम घोर । होईल अखेर वाटते ॥८९॥ शेवटी व्हायचे तेच झाले । होणार ते चुकेल कसले । व्यर्थ भ्रमात सारे फसले । अज्ञाने ग्रासले मतिमंद ॥९०॥ ही कथा चवथ्या बुधवारची । नात एक यादवांची । कन्या अंजनाबाईची । सोडी कायमची संगत ॥९१॥ ऐसे विपरीत घडले । आता घरातील सारे रडले। बुधवारच्या धास्तीत पडले । काय दडले काळापोटी ॥९२॥ आणखी एक होती आशा । तिनेही केली निराशा । जखडून काळपाशा । अखेर गाशा गुंडाळी ॥९३॥ डोळ्यात आणून पाणी । बाबास करिती विनवणी । काय हो ईश्वरीकरणी । कटू कहाणी सांगती ॥९४॥ अधिक घडले अघटित । अंत्रीचे नाथ अवधूत । साधला कैलासपंथ । बाबा ऐकत कानांनी ॥९५॥ बोलले ते अलौकिक । व्यर्थ का करता शोक । हा आहे मृत्युलोक । आले गेले कृष्णादिक रामराजे ॥९६॥ कितीतरी ऋषीमुनी । सांगा इथे राहिले कोणी । अहो त्यागिता वस्त्रे जुनी । खेद मनी का व्हावा ॥९७॥ चौर्‍यांशी लक्ष योनी । मानवासम श्रेष्ठ ना कोणी । परमार्थसुखाचा धनी । दुसरा कोणी असे ना ॥९८॥ नरजन्माचे सार्थक । हरिहरा भजावे एक। धरा धरा रे मनी विवेक । राहावे निःशंक सदाचि ॥९९॥ ज्ञान, योग, कर्म, भक्ती । ध्यान, वैराग्य, विरक्ती । आत्मबोध, अनासक्ती । समाधी निश्चिती याचठायी ॥१००॥ आता येईल अक्षयतृतीया । मी सोडीन नश्वर काया । जे दिसे ते जाईल विलया । शोक कासया करावा ॥१०१॥ बाबांचे निघता शब्द । वातावरण झाले स्तब्ध । आम्हाला सोडणार सिद्ध । लक्षणे शुद्ध दिसताती ॥१०२॥ सर्वांचा पाहून आर्तभाव । वदले काय गुरुराव । कुणास प्यारा नसतो जीव । व्यर्थ हाव जगण्याची ॥१०३॥ तुम्हाला वाटते खास । मी राहीन काही मास । पण देहास होतो त्रास । तरी सावकाश सांडावा ॥१०४॥ धन, मान, पुत्र, देह । सोडणे लागे वैभव, गेह । यांचा नको मुळी मोह । यात संदेह नाही हो ॥१०५॥ मी टाकीन जडदेहास । तरी चैतन्याचा वास । वरीवरी मायेचा भास । आम्हा अमरवास सर्वदा ॥१०६॥ एक सूचना प्रांजळ । अंतसमय येता जवळ । मुखी टाका तुळशीदळ । किंचित जळ घाला शुद्ध ॥१०७॥ शेवटी जी मंडळी राही । बोलती कोणी काहीबाही । एक सांगे घाला दही । आणि तेही जबरीने ॥१०८॥ हा अज्ञानीपणा सगळा । म्हणून सांगतो सकळा । तुम्हा जरी माझा लळा । नियम सांभाळा अखेरचे ॥१०९॥ जिवंतपणी सेवा करा । मेल्यापाठी श्राद्ध न करा । ज्याचा तोच करी उद्धारा । इतरां काय आधकार ॥११०॥ जिवंतपणी देईना रोटी । तेरवी केली खूप मोठी । म्हणे बापाच्या उद्धारासाठी । कर्म पाठी सोडीना ॥१११॥ मी जरी सोडीन देह । भक्ता भेटीन निःसंदेह । अखेर उरतो केवळ स्नेह । संपतो प्रवाह बोलाचा ॥११२॥ जवळ माक्या सर्व आप्त । सारे ऐका हे गुपित । माझी होणार जी गत । तीच तुम्हाप्रत एकदिनी ॥११३॥ पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन । झाले एक एकापासून । एक एकात होती विलीन । कार्य रात्रंदिन चाले हे ॥११४॥ देह पंचतत्त्वाचा उसना । घेतला आपण पोसणा। त्याचा त्याला लागे देणा । काही म्हणा पण सत्य हे ॥११५॥ रज, तम, सत्त्व गुण । अष्टधा प्रकृती जाण । सत्त्वाचे लावा वळण । करा बोळवण तमाची ॥११६॥ रज खाय कधी झोके । दोहीकडे मात्र झुके । मान लोभाचे झटके । मधे भटके न कळता ॥११७॥ देह जाणार जाणार । काळ खाणार खाणार । होणारे तेच होणार । यासी भिणार पळपुटा ॥११८॥ एकोणीसशे एकोणपन्नास । बुधवार होता दिवस । फेब्रुवारी तेवीस तारखेस । घेतला श्र्वास अखेरचा ॥११९॥ माघ वद्य एकादशी । संध्याकाळचे समयासी । मुलास बोलावून पासी । झाले स्वयंप्रकाशी नाथराय ॥१२०॥ पुढे संध्या समयी । घरी आल्या वासरेगाई । आसमंती वार्ता जाई । एकच होई आकांत ॥१२१॥ बातमी गेली चहुकडे । जो तो धावे बाबांकडे । नेत्रातून पाणी पडे । कोसळे रडे सर्वांना ॥१२२॥ खेड्यावरून येती लोक । आवरे ना त्यांना शोक । जाती धर्म जरी कित्येक । याठायी एक होती ॥१२३॥ पसरली शोक छाया । हरपली नानाची माया । पडू लागले येउᆬन पाया । दिसे न काया पुन्हा ही ॥१२४॥ रडू लागले भाविकजन । आम्हा दिसावा तू सगुण । कैसा भजावा निर्गुण । आम्हा खूण कळेना ॥१२५॥ गावातील प्रत्येक । आजुबाजूचे लोक । जागा नुरली काही एक । गर्दीत हाक एकची ॥१२६॥ गेला अमुचा नाथ । आम्ही झालो अनाथ । आम्हा होती सदा साथ । प्रसंगी हात पाठीशी ॥१२७॥ सुंदर केले सेवासन । नाथ त्यावर विराजमान । पुष्पमाला गळा घालून । नाथ गावातून चालले ॥१२८॥ समोर भजनीमेळा । नयनी पाणी, अंतरी लळा । दर्शनास वाव सकळा । महादेवा सांभाळा म्हणताती ॥१२९॥ गावाच्या जवळ एक शेत । वहिवाट परंपरागत । आज शांतिमंदिर आहे जेथ । आले महत्त्व त्यास्थळा ॥१३०॥ नाथास आणले त्या स्थळी । जागा पाहिली मोकळी । काही नव्हते त्या काळी । समाधी दिली नाथांना ॥१३१॥ महादेव घाली मीठ । समाधी केली नीट । आज बनले ज्ञानपीठ । एकनिष्ठ भक्तांचे ॥१३२॥ महादेव पितृभक्त । ज्ञानी, उदास, अनासक्त । पाच विटा ठेविल्या फक्त । दररोज येती दर्शना ॥१३३॥ हा समाधीसोहळा । पाहिला ज्यांनी डोळा । तो भाग्यवान पुतळा । असे विरळा एखादा ॥१३४॥ निंबवृक्ष त्या स्थानी । उगवला, लावला न कोणी । मात्र जोपासना करुनी । ती निशाणी राखिली ॥१३५॥ शेख गुलाब मुसलमान । करी झाडाचे जतन । बाजूस घालून आवरण । सांभाळिले जाण रोपट्यासी ॥१३६॥ या झाडाचा पाला प्रसाद । खाताना वाटतो स्वाद । दुःख, दारिद्र्य, प्रमाद । पळे दूर खेद भक्तांचा ॥१३७॥ लाख दुःखाची एक दवा । श्रद्धेने घडे लाभ जीवा । न संपणारा खास मेवा । आराम यावा अनेकांना ॥१३८॥ इथे संपले शोकपर्व । घरोघरी गेले सर्व । पुढे कथा चालवू अपूर्व । त्यागू गर्व अहंतेचा ॥१३९॥ फक्त स्मशानवैराग्य नको । वागणे बोलणे अयोग्य नको । उगीच वैफल्य वैताग नको । रोग नको चिंतेचा ॥१४०॥ वैराग्याच्या उगी गोष्टी । आकस राही सदा पोटी । धनासाठी होत कष्टी । लोभी दृष्टी बदलेना ॥१४१॥ निसर्गाचे नियम पाळा । जीवनाचा पहा ताळा । काही बाबी अवश्य टाळा । काही सांभाळा जवळ॥१४२॥ भूवरी या किती आले । आले तसे निघून गेले । इथे कोणी नाही उरले । श्र्वास सरले येथेची ॥१४३॥ मूर्ती जाई, कीर्ती राही । सदाच ज्यांची स्मृती राही । महात्मा असा होणे नाही । ही ग्वाही सज्जनांची ॥१४४॥ कीर्ती त्यांची अमर राहो । छबी तयांची समोर राहो । आपणापुढे भ्रमर राहो । त्यास पहा हो पुढे आता ॥१४५॥ असे हे चरित्र गहन । महादेवदास आत्मनिवेदन । तेच घेती लिहून । परमपावन ग्रंथ हा ॥१४६॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र सातवे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

Post a Comment