
श्रीगणेशाय नमः॥ नमो नाथा गुरुवरा । भक्तावरी दया करा । ग्रंथ चालवी पुढारा । भक्तवरा गुरुराया ॥१॥ तुक्या नामाचा महिमा । आला आमच्या कामा । म्हणुनी घेत असे नामा । भवभ्रमा दूर सारी ॥२॥ हे चरित्र वाचे आवडी । कळे भक्तीची गोडी । बंधमुक्त होय तातडी । सुटती कोडी संसाराची ॥३॥ कथा नाथमहिमान । ऐकता तुटे बंधन । साधेसोपे हे विधान । आत्मनिवेदन भक्तीचे ॥४॥ रज-तम गुणमुक्त । सत्त्व गुणास प्रयुक्त । ज्ञानालागी होय संयुक्त । असे हे वृत्त साच की ॥५॥ आधिदैविक, आध्यात्मिक । तिसरा आधिभौतिक । तिन्ही असती दाहक । नसती जाचक गुरुपुत्रा ॥६॥ असो कितीही पोळला । गुरुपदी जो लोळला । तो मोक्षसुखासी खेळला । बोध फळला तयासी ॥७॥ कर्म, ज्ञान, योग, भक्ती । एका ईशाकडे नेती । मार्ग भिन्न जरी होती । तरी प्राप्ती सुखाची ॥८॥ हा मार्ग असे सुखाचा । परीक्षिता बोध शुकाचा । संवाद कृष्ण-उद्धवाचा । मानवास कल्याणकारी ॥९॥ करणे ते हेच करा । स्मरुनी त्या गुरुवरा । सत्यत्त्वाची कास धरा । अंगीकारा स्वधर्मासी ॥१०॥ नाथ माझा हेच सांगे । सांगे तसाच हा वागे । जुळती सुखाचे धागे । चला मार्गे त्याच जाऊ ॥११॥ पुरुषोत्तम सालफळे । अल्पशिक्षण स्थितिमुळे । शेतीत कधी काम मिळे । तो ही न जुळे योग कधी ॥१२॥ वडिलांचे छत्र गेले । कमावते भाऊ एकले । असे काही दिवस धकले । मुकले घरादारासी ॥१३॥ करावी मोलमजुरी । रहावे कुणाच्याही घरी । दाम नाहीत पदरी । पे्रम नाथांवरी अखंड ॥१४॥ ज्यासी काही आधार नाही । तो नाथांपासी सदा राही । मी स्वतः हे दृश्य पाही । इतरांची ग्वाही न लगे ॥१५॥ जगाने जया अव्हेरीले । त्यासी नाथ म्हणे अपुले । पाप, ताप, दैन्य गेले । झाले भले कित्येकांचे ॥१६॥ असे काही दिवस जाता । एक पत्र आले हाता । मग ते वाचून पाहता । निरोप होता नोकरीचा ॥१७॥ नोकरी पंधरा दिवस । आनंदात थोडा विरस । काही न सुचे समयास । जावयास मन धजेना ॥१८॥ घर सोडून दूर जाणे । पदरमोड करून खाणे । पंधरा दिवस राहणे । परत येणे गावासी ॥१९॥ मोठे अकोला शहर । लोकवस्ती भरपूर । जावे की द्यावा नकार । उठे काहूर विचारांचे ॥२०॥ मग गेला बाबांपासी । निवेदिले त्या पायासी । लगेच होकार त्यासी । जाण्यासी संमती देती बाबा ॥२१॥ जाय तू नोकरीवरी । परत येशील ना घरी । खूणगाठ बांध पदरी । सत्य वैखरी जाण ही ॥२२॥ ही नव्हे पंधरा दिवस । तेथेच जाईल आयुष्य । खरे मान हे भविष्य । शब्द पियुष वाटती हे ॥२३॥ नोकरी पंधरा दिवसांची । पण ठरली कायमची । कृपा नाथसमर्थांची । दशा जीवनाची बदलली ॥२४॥ जम बसला चांगला । शहरात झाला बंगला । असा उदययोग आला । परी बाबांना विसंबेना ॥२५॥ महाराज भाजीपाले । आज्ञांकित नाथ झाले । घरात त्यांची सत्ता चाले । पान न हाले इच्छेविना ॥२६॥ जगदीश मानसपुत्र । त्याचे हाती सारे सूत्र । कारभारी एकमात्र । नाथपुत्र आज्ञाधारी ॥२७॥ पहा त्या खामगावात । पाचलेगावकर मठात । तुकडोजी आशिष देत । अध्यात्मप्रगत होशील ॥२८॥ खरेच राहून बाबांपासी । हा झाला योग्याभ्यासी । आत्मसात करी योगासी । प्रत्ययासी आज येत ॥२९॥ प्रवचन चाले मंदिरी । क्रम हा दर रविवारी । भक्त करिती नित्य वारी । लाविती हजेरी अखंड ॥३०॥ नाथांच्या एकदा आले मना । मज म्हणती बैस आसना । करी थोडी प्रस्तावना । भक्तजना बोध करी ॥३१॥ बसविले आसनावर । गळ्यात टाकला हार । शब्द न निघे बाहेर । आला गहिवर दाटुनी ॥३२॥ मग दुसर्या रविवारी । बोललो मी कसातरी । नाथ बसले सामोरी । दुसरा करी प्रवचन ॥३३॥ मी आज्ञेचा पालक । करीत आलो प्रास्ताविक । वेळ न घेता आधक । मज भूक श्रवणाची ॥३४॥ मग काही दिवस जाता । बाबांना घरी नेले आता । काही थकले येता जाता । मीच पुरता राहिलो ॥३५॥ मी करी प्रवचन । ऐकणारे उरले तीन । मात्र खरे निष्ठावान । हजर राहून ऐकती ॥३६॥ गोविंदराव पोहरे । उरळहून येती त्वरे । एक रामदास ठाकरे । राहणारे मालवाडा ॥३७॥ बाबांचे निष्ठावान भक्त । भानुदास राऊत । कारंजा येथून येत । माझे ऐकत तीन हे ॥३८॥ मात्र काही दिवसांनी । प्रवचनकार येती दुरुनी । नाथभक्त नवे, जुने कोणी । हजर राहुनी सेवा देती ॥३९॥ अढाऊ महाराज श्रीकृष्ण । शीतकाल अथवा उष्ण । रिझविती श्रोत्याचे मन । हा प्रश्न असे श्रद्धेचा ॥४०॥ कीर्तन भागवतकार । मोरझाडीचे राहणार । नित्य येती मंदिरावर । प्रवचनकार झाले हे ॥४१॥ निंबोर्याचे महाराज । स्वये स्वीकारिले हे काज । प्रवचन सुगम सहज । टाळती न रोज रविवार ॥४२॥ हे बोडखे विश्वनाथ । सद्गुरूची लाभली साथ । इष्ट महादेवनाथ । वरदहात शिरावरी ॥४३॥ वांडे भाऊ नारायण । करिती गुरूचे गुणगान । नाथमाउलीची कृपा जाण । वक्तृत्व पूर्ण लाभदायी ॥४४॥ गोड गळ्याने गाती गीत । अर्थ सांगती सुसंगत । श्रोत्यांचे जाणुनी मनोगत । सेवा देत पे्रमभावे ॥४५॥ कारंजा रमजानपूर । येथून थोडेसे दूर । वैष्णव वसती भरपूर । पंढरपूर तीर्थ त्यांचे ॥४६॥ त्यात अनेक नाथभक्त । ज्ञानी, वैरागी, विरक्त । काही अनुतापयुक्त । अनासक्त काही थोडे ॥४७॥ येथील तायडे नारायण । आंग्लविद्येचे काही शिक्षण । नोकरी ही लागली जाण । अध्यापन कार्य त्यांचे ॥४८॥ घरी थोडीसी जमीन । काही मिळे उत्पन्न । वाटून घेती सुखसंपन्न । गरज आन दिसेना ॥४९॥ एकदा कारंज्याच्या बाया । आल्या नाथदर्शन घ्याया । त्यात होती यांची जाया । सीमा ना या रागाची ॥५०॥ ते यास नव्हते राजी । आवडे ना अशी बुवाबाजी । ही कीड आहे समाजी । आली नाराजी मनात ॥५१॥ देवधर्म सारे थोतांड । उगीच माजविती बंड । नादी लाविती उदंड । हे कर्मकांड खोटे सारे ॥५२॥ राग आला अनावर । दुणावला अहंकार । दंभ ही वाढला फार । आले सत्वर या ठाया ॥५३॥ पवित्र नाथांचे स्थान । येताच गळला आभमान । होता दृष्टादृष्ट मीलन । हरपले भान देहाचे ॥५४॥ द्रदिव्यत्वाची जेथ प्रचिती । तेथे कर माझे जुळती ।च्च् हे झाले ऐशारीती । पूर्वस्थिती पालटली ॥५५॥ मग झाले वारकरी । नित्य येती रविवारी । नाथकृपा झाल्यावरी । प्रवचन करी मंदिरात ॥५६॥ निघून गेला गर्वताठा । ज्ञानाचा जो होता साठा । नित्याची या परिपाठा । लाभ मोठा आम्हालागी ॥५७॥ आज शांतिमंदिरात । नित्य प्रवचन होत । श्रोते-वक्ते दोन्ही येत । मी पाहत नाथलीला ॥५८॥ नाथ नव्हते चमत्कारी । हे तो खरे साक्षात्कारी । कृती जर का पशुपरी । माणूस करी निजसंगे ॥५९॥ साधू करी चमत्कार । हा गारुडाचा प्रकार । नाथांचा यासी धिक्कार । मनुष्या आकार देती ते ॥६०॥ जे असती तपोनिधी । सहज त्यांची वाचासिद्धी । जपाने प्राप्त होतो निधी । पाहिजे आधी गुरुकृपा ॥६१॥ आपुल्या भक्ताचा महिमा । वाढावा वाटे पुरुषोत्तमा । प्राप्त होती लघिमा, गरिमा । भक्त न तमा बाळगती ॥६२॥ जो देहीच झाला विदेही । त्यासी हे न लगे काही । तो ज्या स्थितीत राही । द्रआनंदाचे डोहीच्च् तीच असे ॥६३॥ लिहितो एक प्रसंग । श्रद्धेचे हे अंतरंग । साह्य करी पांडुरंग । बिकट प्रसंग निवारितो ॥६४॥ डामरे तुळशीरामअण्णा । भार्या तयाची मनकर्णा । भाव नाथांच्याचरणा । दैवत जाणा हे त्यांचे ॥६५॥ रविवारची नित्य वारी । प्रवचने लिहिली सारी । पोस्टमास्तर पगारी । दूर सारी गृहकर्म ॥६६॥ नोकरीनिमित्त सोडी गांव । हिवरखेड रुपराव । तेथून नित्य नेमे यावं । दृढभाव निष्ठावंत ॥६७॥ हे नोकरीच्या गावाला । मुले शिकती अकोल्याला । भाड्याची खोली राहण्याला । प्रसंग घडला काय तेथे ॥६८॥ मुले राहत होती जेथे । नाथांची तसबीर तेथे । भक्तिभावाविन परते । साधन कोणते असेना ॥६९॥ साधीभोळी सहजभक्ती । लावूनिया उदबत्ती । हात दोन्ही जोडती । अभ्यास करिती नेमाने ॥७०॥ वापरता विजेचे उपकरण । नित्य असावे सावधान । जीवनाचे समीकरण । चुकता जाण संकट ॥७१॥ विजेची गरज कुणा नाही । विजेविन भागे ना काही । चुकल्यास क्षमा नाही । अनुभव पाही सर्वांना ॥७२॥ वीज न पाही मोठा-सान । वीज न पाही संत महान । त्यासाठी सदा सावधान । अवधान राखावे ॥७३॥ विद्यार्थ्यासी एक ध्यास । नित्य करावा अभ्यास । रात्र असो वा दिवस । सर्व समयास तेच करी ॥७४॥ विद्यार्थ्यांनो हेच करा । अभ्यासाची कास धरा । वेळ न जाऊ द्या जरा । घटिका दुबारा येईना ॥७५॥ एक मोठा, एक लहान । विजय आणि गजानन । शिकत होते दोघेजण । मन लावून अभ्यास ॥७६॥ दोघे बसले अभ्यासासी । दिवा होता त्यांच्यापासी । चुकून स्पर्श झाला त्यासी । गजाननासी घेरी आली ॥७७॥ विजयच्या येता ध्यानी । गजानना सोडवू पाहे त्यातुनी । विजेस चिपकले दोन्ही । वाचवाया कोणी असेना ॥७८॥ हे ज्या घरचे भाडेकरी । त्या घरची आली म्हातारी । पाहून झाली घाबरी । जमा शेजारी केले तिने ॥७९॥ वीजपुरवठा बंद केला । डॉक्टर तेथे बोलावला । म्हणे अवघा घात झाला । नाडी हाताला लागेना ॥८०॥ नाथांची तेथे तसबीर । लावली होती भिंतीवर । म्हातारी कापे थरथर । म्हणे गुरुवर नाथ तुम्ही ॥८१॥ डामरे करतो तुमची वारी । धाव घेतो शांतिमंदिरी । गाठी पुण्य असे जरी । तरी तारी या दोघांसी ॥८२॥ त्याची असेल खरी सेवा । मग मी मानील देवा । तुजवर भरोसा का ठेवा । उगीच कांगावा भक्तीचा ॥८३॥ निरोप हिवरखेडला । गेला डामरे कुटुंबाला । आईने आकांत केला । आले अकोल्याला धावत ॥८४॥ दोन्ही मुले सुखरूप । आईवडील येता समीप । मनास वाटे हुरूप । आनंद खूप जाहला ॥८५॥ घटना नव्हे चमत्कारिक । उपासनेचा परिपाक । भक्ता राखतसे निःशंक । संकटे अनेक निवारी ॥८६॥ येऊन बाबांच्या पायांपाशी । निवेदिली घटना अशी । काय बोलती पुण्यराशी । वाचणार्यासी कोण मारी ॥८७॥ सर्वांना तो देव तारी । आपण निमित्तमात्र सारी । भरोसा ठेवा त्याचेवरी । दुःख निवारी भक्तांचे ॥८८॥ डामरे हा गजानन । असे बहुभाग्यवान । येथे कार्य करील महान । सेवक बनून राहील ॥८९॥ बाबांमुखीचे जे बोल । शब्द खरे अनमोल । होणार नाहीत फोल । कळेल मोल भक्तांसी ॥९०॥ संताची कळाया महती । संतची लागे तयाप्रती । मी तो अज्ञ, मूढमती । मजप्रती काय कळे ॥९१॥ संतचरणांची धूळ । तेथे करुनी आंघोळ । तुम्हा भक्तांचे पाठबळ । केला लडिवाळ प्रयत्न ॥९२॥ भेद नव्हता बाबांपासी । समान चोर-संन्यासी । जे येती शांतिमंदिरासी । बोलणे तयांसी सारखे ॥९३॥ एक अट्टल गुन्हेगार । नाव सांगणे अनादर । तुरुंगची त्याचे घर । अवचित बाहेर राही तो ॥९४॥ कधी करी घरफोडी । घेउᆬन जाई बैलजोडी । माराने सोले चामडी । परी ही खोडी जाईना ॥९५॥ लोक टाळती संबंध । इथे नाही प्रतिबंध । बसून दिवस सबंध । ऐकी शब्द नाथांचे ॥९६॥ कधी एखादे राती । हा येई मंदिरावरती । परी न वारी तयाप्रती । बाबा बोलती तेव्हाही ॥९७॥ भाविकांनो विचार करा । हाडामांसाचा देह खरा । विसावा पाहिजे जरा । परी या चोरा काय ठावे ॥९८॥ वारकरी विठोबासी । झोपविती येऊन निशी । जागविती काकड्यासी । विचारा भक्तांसी जाऊनी ॥९९॥ नाथ माझा सदा जागी । भजनात सहभागी । एक जाय, दुजा त्याजागी । हा मध्यभागी बसलेला ॥१००॥ एकदा चालला विषय । ईश्वर वसे सर्वाठाय । वायूस रंग-रूप काय । परी वायुमय जग सारे ॥१०१॥ आपणास दिसत नाही । तो आपणासी सदा पाही । दृष्टीतून सुटेना काही । दृश्य सारेही भलेबुरे ॥१०२॥ चोराने करिता चोरी । पाहिले नाही कुणी जरी । परी साक्षीला श्रीहरी । शिक्षा करी न चुकता ॥१०३॥ शब्द कानी पडता चोर । पश्चात्ताप पावला थोर । पालटले त्याचे अंतर । पायांवर शिर ठेविले ॥१०४॥ म्हणे यापुढे आता । चोरी न करी मागुता । शरीर जीर्ण झाले आता । भीक मागता संपेन मी ॥१०५॥ फार थोड्या दिवसांनी । देहत्याग केला त्यांनी । बोध घेतला कित्येकांनी । नाथवाणी अमर ही ॥१०६॥ एक आला येथे वेडा । बोले काही वेडावाकडा । अंगावर मळकट कपडा ।फाटका, धडा नाही जरा ॥१०७॥ जाय कुणाच्याही घरी । दिल्यास खाई भाकरी । हिंडत राही दिवसभरी । कोणी मारी थापडीने ॥१०८॥ असाच एकदा फिरत । आला शांतिमंदिरात । बाबा त्यासी जवळ घेत । पे्रमाने पाहत त्याचेकडे ॥१०९॥ जगी ज्यास कोणी नाही । नाथ आदराने पाही । सहृदयतेची हीच ग्वाही। तोही राही समाधानी ॥११०॥ तो न सांगू शके नाव । अथवा राहण्याचे गाव । समजेना ठिकाणा-ठाव । घेई धाव नाथांपायी ॥१११॥ कोण कोठचा असेल । प्रश्न हा मोठा जटील । हे त्यास म्हणती विठ्ठल । पहा नवल केवढे ॥११२॥ जनी पाहे जनार्दन । तोची साधू असे महान । शास्त्रपुराणे केले पठण । हे तो लक्षण पंडिताचे ॥११३॥ केली काशी, मथुरा, गया । प्रयागी न्हाऊन आलिया । उपजे न पोटी दया । तीर्थ वाया गेले सारे॥११४॥ परी नाथ कनवाळू । अनाथाचा प्रतिपाळू । निराधारा लागे सांभाळू । प्रसंगे कळू येतसे ॥११५॥ येई तो भलत्यावेळी । सकाळी वा संध्याकाळी । द्यावी भाकर किंवा पोळी । सदा सांभाळी नाथ माझा ॥११६॥ कधी द्यावे अंथरूण । थंडीत घाली पांघरूण । नाथांचे ही वेडेपण । काही पाहून हासती ॥११७॥ प्रवचन चालू होता । निवांत होई हा श्रोता । भक्तगण जेवण करता । देती हाता पोळी-भाजी ॥११८॥ गेले असे दिवस काही । दुष्टांना हे खपले नाही । टवाळक्या करती पाही । परी तो साही त्यांचे सारे ॥११९॥ कोणी वरली बहाद्दर । त्याच्या हावभावांवर । खेळती मूढ जुगार । पैसे गेल्यावर मार देती ॥१२०॥ महात्मा, वली, फकीर । हीन मानती जुगार । अवघा खोटा व्यापार । सारे अखेर फसती ॥१२१॥ लबाड साधू काही खोटे । नेत्र फिरवी, वाकडी बोटे । जवळ लफंगे चेलेचपाटे । हिशोब नेटे करती हे ॥१२२॥ सज्जन हो यातून वाचा । संतसाहित्य काही वाचा । खरा धर्म मानवाचा । संपवा जाचा अपुल्या ॥१२३॥ काही लोकांनी या विठ्ठला । नेउᆬन सोडले अकोल्याला । मला तेथे सहज भेटला । जवळ आला हासत ॥१२४॥ लगेच दोन मिनिटात । दुसरीकडे जाय धावत । भलेबुरे काही सांप्रत । समान वाटत तयासी ॥१२५॥ वडगांवचा चिंचोलकार । मांजरी गावी येरझार । नित्य येई मंदिरावर । बसे समोर बाबांच्या ॥१२६॥ मिळावा आकडा वरली । चिरंजी हाती धरली । बाबांनी बाब हेरली। त्यास न दिली काहीही ॥१२७॥ तयालागी आला राग । ओकू लागला आग । बाबा सांगती त्यासी मग । द्रजुगारामागं लागू नयेच्च्॥१२८॥ रागाने निघून गेला । काही दिवसांनी आला । रडू कोसळे मग त्याला । पैसा गेला जवळचा ॥१२९॥ आहार, निद्रा, भय, मैथुन । गरज सर्वा समसमान । मानव प्राणी बुद्धिमान । सर्वांहून श्रेष्ठ असे ॥१३०॥ ईश्वराची व्हाया ओळख । नरदेह साधन प्रमुख । भल्याबुर्याची पारख । जगणे सुरेख हाच जाणे ॥१३१॥ याची कळाया महती । पाहिजे संत संगती । वेद-शास्त्र हेच सांगती । उर्ध्वगती व्हावयासी ॥१३२॥ ज्याने देह दिला दान । त्याचे करा रे भजन । हे तुकोबांचे वचन । संतवचन ध्यानी धरा ॥१३३॥ सारे सुखाचे सांगाती । अंतसमयी कामी न येती । कळू येई अनुभवा अंती । वेळ जाय ती निघुनी ॥१३४॥ पत्नीचा पुरवावा काम । वडिलांसी हवा आराम । पुत्रासी लागती दाम । बोळवण उत्तम मुलीची ॥१३५॥ यांना राखावया राजी । देह घालविला काजी । जरी न मिळे सहजी । अवघी नाराजी पदरात ॥१३६॥ म्हणूनी आवरा ही माया । शरण जा गुरुराया । उगीच वेळ जाय वाया । समर्पा काया सत्कार्यासी ॥१३७॥ हा ग्रंथ असे महान । लाभले नाथांचे वरदान । महादेवदास आत्मनिवेदन । करी लेखन गुरुकृपे ॥१३८॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ हा परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र तेविसावे संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु ॥
॥ श्री सद्गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
No comments:
Post a Comment