गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

अध्यायसत्र प्रथम


॥ श्री ॥

॥ मंगलाचरणम्‌ ॥
स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम्‌॥
वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्‌ ॥१॥
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देंवैः सदा वन्दिता ॥
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥२॥
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्‌ ॥
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्‌ ॥३॥
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्‌ ।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्‌ ॥४॥
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्‌ ॥
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्‌ ॥५॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्र्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥६॥

अधिक जेष्ठ शुद्ध ८, दुर्गाष्टमी गुरुवार दि़ २४-५-२००७

अध्यायसत्र प्रथम


ॐ नमोजी गणनायका । बुद्धिदाता मंगलदायका । गिरिजासुता विनायका । प्रथम तुज एका प्रार्थियले ॥१॥ तुझी झालिया कृपादृष्टी । सकलसंपदा सकलसृष्टी । मंगल प्रेम वर्षे वृष्टी । दुःखीकष्टी कोणी दिसेना ॥२॥ मंगलचरण लंबोदरा।गजवदना मनोहरा ।माथा मुकुट शोभतो बरा।कमलनयना कमलाकरा तुज नमो॥ ३॥ तव रूपाचे करिता ध्यान । मतिमंदास होय ज्ञान । तुझी कीर्ती गाती महान । हे सुजाण जाणती की ॥४॥ दास हा करी स्तवन । हृदयी वास असावा जाण । तव कृपेचे महिमान । ठावे अजाण बालकासी ॥५॥ प्रथम वंदिले गणेशा । गणाधिपती सर्वेशा । आत्मरुपा महाधीशा । ईशांच्याही ईशा मंगला ॥६॥ आता नमू देवी शारदा । मम हृदयी वास सदा । असावी आस सदा सर्वदा । तुझे पदाचीच माते ॥७॥ तुझी कृपा झालियावरी । पांगळा चढे गिरिशिखरी । मुका वेद वदे वैखरी । बहिर्‍याचे अंतरी बोध ठसे ॥८॥ परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी । तू नटलीस वागेश्वरी । ऐसा महिमा गाती सारी । नर नारी भाविकजन ॥९॥ पूर्वी होऊन गेले किती कवी।त्यांची गावी किती थोरवी।ज्यांनी चाखिली भक्तीची चवी । ऐसे अनुभवी संत ते ॥१०॥ त्या नावाचा अगाध महिमा। ज्यांनी वश केले पुरुषोत्तमा । विठ्ठल आणि रखुमा । त्यांच्या पे्रमा बंदिस्त ॥११॥ अग्रगणी महर्षी वेदव्यास । अखंड कृष्णभक्तीचा ध्यास । वेद, शास्त्र, पुराण, उपन्यास । मुखोद्गत ज्यास सर्वदा ॥१२॥ थोर कवी वाल्मीक । जे रामायणाचे जनक । महाभारताचे लेखक । पुण्य श्लोक जगद्गुरू ॥१३॥ श्री संत दाभोळकर । साईबाबांचे चरित्रकार । त्यांच्याच पे्ररणेचा प्रकार । तया नमस्कार माझा असो ॥१४॥ वारकर्‍यांचे ईश्वर । साक्षात विष्णूचे अवतार । स्वामी माझे ज्ञानेश्र्वर । तया वारंवार नमितसे ॥१५॥ वंद्य तुकयाची गाथा । वंदू भागवत एकनाथा । तैसे रामदास समर्था । केला जनहिता दासबोध ॥१६॥ ग्रंथ गुरू गजाननाचा । ठाव घेई भक्ती मनाचा । ऐकून उद्धार जनाचा । प्रभाव लेखनाचा हा असे ॥१७॥ ऐसे संत दासगणू । अर्पावी पायी त्यांच्या तनू । महिमा मी किती वाणू । बुद्धी ही जाणू शकेना ॥१८॥ माझे आई आणि बाप । मज भासती तीर्थस्वरूप । त्यांच्या पुण्याचा प्रताप । जाहला लोप अज्ञानाचा ॥१९॥ प्रथम वंदुनी ते चरण। करून त्यांचे पुण्यस्मरण । सांभाळून केले उदरभरण । पालनपोषण सर्वकाही ॥२०॥ माझी न घेता सेवा । वडील आवडले देवा । सोडून गेले आम्हा भावा । आई विधवा झाली असे ॥२१॥ आम्हा धरून पोटाशी । कधी जेवण, कधी उपाशी। त्या उपकारांच्या राशी । सांगा कैसी फेड करू ॥२२॥ बाप जाणुजी, आई भोनाबाई । नमन केले त्यांचे पायी । क्षणाक्षणाला आठव येई । अपूर्वाई त्या क्षणांची ॥२३॥ वंदू शेगावीच्या गजानना । शिरडीवासी साईराणा । नरसिंगा यावी करुणा । दास हा चरणा नमितसे ॥२४॥ आता प्रार्थितो यादवास । शांतीरूपी सागरास । पावन केले या नगरास । हातरूणास जन्मुनिया ॥२५॥ भूवरी प्रसिद्ध नवनाथ । मच्छिंद्रादी गोरखनाथ । तयांनाही माझा प्रणिपात । जगविख्यात जगद्गुरू ॥२६॥ आवडीचा पदार्थ खास । आवडे जो जेवणारास । ऐसा जो का गोड घास । काढी बाजूस क्षुधार्थी ॥२७॥ निवांत भोजन झाल्यावरी । चाखी त्या चवीची माधुरी । मी ही केले तैशापरी । सद्गुरू नंतरी वंदितसे ॥२८॥ नमन माझे गुरुदेवनाथा । मी लिहितो तुमची गाथा । पदकमळी ठेवून माथा । सद्गुरू समर्था आत्मरूपा ॥२९॥ महादेवा तुझे हे महात्म्य । कळावे भक्तांना अध्यात्म । सगुण, निर्गुण, गुढात्म । कैसे परमात्म रूप तुझे ॥३०॥ भाविक जनसमुदाय । नाथांचा पंथ संप्रदाय । मोक्षमार्गाचा सुलभ उपाय । घेऊन जाय शांतीकडे ॥३१॥ त्यात भक्तांच्या चार श्रेणी । बद्ध, मुमुक्षू असती कोणी । साधक, सिद्ध महाज्ञानी । जे मुगुटमणी विष्णूचे ॥३२॥ किती जन्माची होती पुण्याई । सापडली मज सद्गुरूआई ।कसा होऊ मी उतराई ।आता फक्त पायी मस्तक हे ॥३३॥ किती करावे गुरूचे स्तवन । सदा धावे तिकडे मन । पशुसी दिसता हिरवे रान । जाये धावून सदा तेथे ॥३४॥ जरी मिळाला नरदेह । ज्यांनी फेडिला संदेह । त्या नामध्यानाचा मोह । देही विदेह सौख्यप्राप्ती ॥३५॥ आता एकदा पुण्यस्मरण । ज्याने चुकविले जन्ममरण । त्या नाथांचे वंदुनी चरण । मी आणि मीपण संपवितो ॥३६॥ परी सलगीचे मागणे एक । हीन, दीन तुम्हापुढे रंक । हात पसरोनी मागतो भीक । कृपादृष्टीचा पाईक असू द्या ॥३७॥ परमार्थाची बाळगून आस । नाथा, हा महादेवदास । लाभावा संतसहवास । मागणे तुम्हास इतुकेची ॥३८॥ भूवरी किती झाले संत । पुढे होणार ही अनंत । कुणालाही न लागला अंत । ज्ञानी कृपावंत ऐसे बहू ॥३९॥ त्या संतांचा अगाध महिमा । भूल पडे विठ्ठल रखुमा । राधाकृष्ण, शिवउमा । भुलले पे्रमा ज्याचिया ॥४०॥ श्रोते म्हणती पुरे स्तुती । सांगा नाथांची महती । ऐकण्या आतुरले मन आत । मन -कानाची गती एक झाली ॥४१॥ भागवतांनो धीर धरा । प्रथम नाथांचे स्मरण करा । श्रद्धेविण व्यर्थ पसारा । विषय आवरा मनाचे ॥४२॥ लाज, भिती आणि शंका। दंभ, अहंकारा हाका । लोभ, मद आणि मदनिका । अखंड धोका भाविका ॥४३॥ असो आता ग्रंथ करू कथन । जेथे जन्म घेती ऋषीजन । ऐसा भारत देश महान । तोच हिंदुस्थान असे की ॥४४॥ इथे अवतार झाले दहा । भार्गव रामकृष्णादी पहा । भगवान बुद्ध ज्ञानी महा । अवतरले पहा येथेची ॥४५॥ त्यातही महाराष्ट्राची शान । कोंदणातील हिर्‍यासमान । पवित्रभूमी अशी आन । दिसे न जाण कोठेही ॥४६॥ अशा त्या महाराष्ट्रात । विदर्भ नावाचा एक प्रांत । अकोला जिल्हा विख्यात । हा स्मरणात सर्वांच्या ॥४७॥ त्यात एक बाळापूर शहर । मन नदीचे काठावर । पुरातन किल्ला, छत्री मनोहर । आहेत आजवर उभे तेथे ॥४८॥ ते तालुक्याचे ठिकाण । या परगण्यात हातरूण । झाले आज तीर्थस्थान । नाथांच्या पावन स्मृतीने ॥४९॥ हातरूणगावाची महती । महादेवनाथ स्वये लिहिती । तुम्ही स्वये जाणावी ती । गावाची माहिती सांगितली ॥५०॥ सिद्धपुरुषाचे ते बोल । आज तुम्हा आम्हा अनमोल । ज्यांचा अर्थ असे सखोल । भावनेची ओल आजही ॥५१॥ यादवनाथ योगलीलामृत । दोन अध्याय बाबालिखित । त्यातील उतारा सांप्रत । या ग्रंथात वर्णीयला ॥५२॥ द्रविदर्भदेशी अकोला जिल्ह्यात । परगणे बाळापूर तालुक्यात । हातरूणग्रामी जन्मले नाथ । गणपतनाथउदरी ॥५३॥ गावाच्या उत्तरेप्रत । मोर्णा गंगा वाहत । पावन तियेचा तटप्रांत । संत भक्तांच्या वस्तीने ॥५४॥ गावाच्या चार दिशांप्रती । विशेष देवतांची वस्ती । गावाच्या मध्य वस्ती । श्री मारोतीरायांची ॥५५॥ उत्तरेस जागेश्र्वर महादेव । तसे बनुबुवा भक्तराव । जयाचा अंधार्‍या मढीत ठाव । आर्त भक्ता सुखवाया ॥५६॥ श्री जागेश्र्वर मंदिराचे संस्थापक । रंभाजी निर्मळ भाविक । जयाने नगरभोजने अनेक । देऊनी देवा तोषविले ॥५७॥ उत्तरेस आसराआई जलदेवता । दक्षिणेस जगदंबा मरीमाता । नाथकुळीच्या सतीदेवता । दक्षिणेस वस्ती जयांची ॥५८॥ पश्चिमेस पीरसाहेबाचे ठाणे । रसुलशहा-जीवनशहा दोघेजणे । दर्शन लाभ घेणे । नित्य भाविकांनी त्याचा ॥५९॥ पूर्वेस आग्नेयकोनी । नाथांचे समाध्यांची बांधणी । सर्व भाविक भक्तांचे खर्चानी । केली असे वेळोवेळी ॥६०॥ मध्यवस्ती मृत्युंजय महादेव । कोळी पूर्णाजी भक्तराव । तयाने निर्मिला हा ठाव । अपुले कुलपरंपरेचा ॥६१॥ त्याची समाधी नदीचे उत्तरेस । ढेंगोजी महादेवाचे पायास । आपल्या गोत्रजास । सांगुनी करविली ॥६२॥ पूर्णाजी भक्ताचा नातू । जो श्रावण बाबुराव प्रख्यातु । ज्याने पूर्वजांचा हेतू । जीर्णोद्धारे तडीस नेलाच्च् ॥६३॥ बाबुराव बाबांचे भक्त । अखंड सेवा दिवसरात । जेथे बाबा तेथे जात । अशी आवरत सेवा ज्यांची ॥६४॥ या पुण्यनगरीचे वर्णन । नाथ लिहून गेले आपण । ते शब्दरूपी धन । करा जतन संग्रहासी ॥६५॥ हातरूण गावचे संतमूळ । निर्मळ पवित्र नाथ कुळ । ज्यांच्या चरणांची रजधूळ । लागता समुळ पाप नाशे ॥६६॥ या हातरूण गावामधी । गणपतनाथ व्यक्ती साधी । कळले ना कुणा आले कधी । जीवन उपाधीविरहित ॥६७॥ थोडी फार शेती घरी । धन-धान्य, दुकानदारी । सुखाचा संसार होता जरी । भूक अंतरी एक असे ॥६८॥ सर्व सुखी नाही कोणी । संताची ही अमोल वाणी । सुखासाठी धडपडे प्राणी । कर्मकहाणी संपेचना ॥६९॥ ज्ञान, भक्ती अन्‌ वैराग्य । यासी लागे सुकृतभाग्य । काळ वेळ आलिया योग्य । सौभाग्य प्राप्त होय ॥७०॥ भाग्ये लाभती सद्गुरू । भाग्ये होत वैभव आदरू । भाग्याने शिखर महामेरू । अंगीकारू सहजची ॥७१॥ संचित, कर्म, क्रियमान । सत्संग सत्कर्म महान । गुरू संतांचे आशीर्वचन । हेची भाग्याचे गुण जाण पा ॥७२॥ ग्रंथाचे अध्ययन सखोल । ऐकावे शहाण्यांचे बोल । गुणग्राह्यतेचे मोल। उगीच फोल मानू नये ॥७३॥ चौर्‍यांशी लक्ष योनी । फिरुनी आला असे प्राणी । नरजन्मासी बा येऊनी । करती करणी तीच की ॥७४॥ नराचा होय नारायण । हे थोर संताचे वचन । त्यांचे कळवळ्याचे शब्द जाण । माना प्रमाण भाविक हो ॥७५॥ आता आपली कथा मागे । सोडली पहा व्हा जागे । मी तुमचे अवधान मागे । विस्तार टाळणे स्थलाभावी ॥७६॥ वर्णिले गणपतीचे वैभव । तैसेच त्यामधील उणीव । सुखदुःखाची उठाठेव । पराधीन मानव दैववशे ॥७७॥ तुका सांगे प्रारब्धाचा भोग । हरिकृपेचा येता योग । संपती दुष्कृताचे लाग । पळती रोग दाहीदिशा ॥७८॥ झाला पुण्याचा उदय । पाप पळून दूर जाय । घरा आले सद्गुरुराय । वर्णिला न जाय सोहळा ॥७९॥ वाल्याचा वाल्मीकी झाला । ध्रुव अढळपदी बैसला । प्रल्हादासाठी जो आला । महिमा वर्णिला पुराणात ॥८०॥ इथे झाले तैशापरी । गुरू रामनाथ आले घरी । भाग्योदय झालियावरी । होत बोहरी तिन्ही तापा ॥८१॥ आता पाहू रामनाथ कोण । कोठे असे त्यांचे ठिकाण । सत्संगे पालटे जीवन । कसे ते आपण पाहू या ॥८२॥ लोखंड आणि परीस दोन । स्पर्शाने होय सुवर्ण । गुरू, संताचे होता दर्शन । पालटे मन दुर्जनाचे ॥८३॥ गणपतनाथ कारभारी । संपन्नता मान घरीदारी । नाना छंदफंद भारी । पैशाची सारी धूळधाण ॥८४॥ दैवाने मिळतो पैसा । खर्चू नये वाटेल तैसा । उपयोग करावा योग्य असा । नाही भरवसा लक्ष्मीचा ॥८५॥ लहान असता लग्न झाले । पुढे दोघेही वयात आले । संसार सगळा सुखाचा चाले । परी पाळणा न हाले घरात ॥८६॥ सगेसोयरे मिळती सर्वत्र । विचार करती येती एकत्र । एकतरी असावा पुत्र । कुळगोत्र सांगण्यासी ॥८७॥ गणपतनाथा छंद आगळा । सुरेल आवाज गोड गळा । ढोलकी, तुणतुण्याचा लळा । वेळ सगळा यात जाई ॥८८॥ आज जिथे आहे समाधी । कौलारू एक झोपडी साधी । तिथे नर्तक नाचले आधी । आज त्या जागेमधी देवत्व ॥८९॥ वाडेगावचे वाडेकर । पहिल्या पत्नीचे माहेर । श्यामाबाई स्वरूपसुंदर । अवघा संसार सांभाळी ॥९०॥ माउलीस साबरीविद्येचे ज्ञान । नाथपंथाचा आभमान । शैली-श्रृंगीधारण । मंत्राचे अध्ययन सदा चाले ॥९१॥ पतिव्रता होती नारी । सद्गुणखाणी सदाचारी । खंबीर मनाची सुविचारी । सत्य व्यवहारी माय ती ॥९२॥ पतीची करी नित्यसेवा । भुकेल्याशी म्हणे जेवा । केला न कुणाचा कधी हेवा । भोळ्या महादेवा जपतसे ॥९३॥ काही गावातील लोक । गणगोत हितचिंतक । म्हणती लग्न आवश्यक । आमचे ऐक गणपती ॥९४॥ सार्‍यांनी पूर्ण विचार केला । एका पारस गावी गेला । इंगळे यांना भेटून आला । दिवस ठरला लग्नाचा ॥९५॥ लग्न लागले ठरल्यावेळी । गोरज मुहूर्त सायंकाळी । लग्नातील मंडळी । सुखरूप आली घराकडे ॥९६॥ दोघी आल्या एका घरी । उणीव नव्हती कोण्यापरी । खाण्यापिण्याची बरोबरी । भेद अंतरी नव्हता की ॥९७॥ भाग्याचा होता उदय । अपाय तोही होय उपाय । स्मरण करता गुरूंचे पाय । दुःख जाय दिगंतरा ॥९८॥ येथे जवळची गायगाव । तेथील एक भक्तराव । सद्गुरू रामनाथ नाव । ज्ञानी महानुभाव संत ते ॥९९॥ हे पंढरपूरचे वारकरी । अखंड पायी असे वारी । विठ्ठलनामाचा गजर भारी । जाऊन गरूडपारी नाचती ॥१००॥ हातरूणला पायी येत । भक्तजनासी दर्शन देत । कधी कुणाला सोबत नेत । ठरवून बेत वारीचा ॥१०१॥ हातरूणला आले एकदा । गणपत प्रपंचात मस्त सदा । देवधर्माची चाड कदा । वाटे न धनमदामुळे ॥१०२॥ धनवाना चढते धुंदी । होऊन जातो लंदीफंदी । रेस जुगाराच्यानादी । आयुष्याची बरबादी करीतसे ॥१०३॥ ज्ञानसूर्याचा उदय झाला । गुरू रामनाथ घरा आला । अज्ञानाचा तम निरसला । प्रकाश दिसला ज्ञानाचा ॥१०४॥ ते म्हणाले गणपतनाथा । मजसवे चाल आता । पंढरपूरचे यात्रेकरिता । देव संताचे दर्शना ॥१०५॥ भूवैकुंठ विठ्ठलनगर । जमती भक्त थोर थोर । चाले नित्य नाम गजर । मिळे आधार आर्त जीवा ॥१०६॥ तिथे सर्व कामना पुरती । भवभयाचे डोंगर जळती । नवनवीन मिळे स्फूर्ती । विठ्ठलमूर्ती देखता ॥१०७॥ वरील ह्या ओव्या तीन । सद्गुरू नाथ दयाघन । ज्यांचे गुण गातो दीन । समर्पण त्यांच्यापायी ॥१०८॥ गुरुदेव रामनाथ पुण्यराशी । घेऊन गेले पंढरपुरासी । तीर्थमहिमा वर्णायासी । उपमा मजशी सापडेना ॥१०९॥ भव्य विठ्ठलाचे मंदिर । तैसाच तो गरूडपार । चंद्रभागा वाहे समोर । पुंडलिकाचे मंदिर पात्रामधे ॥११०॥ पंढरीची आभनव गोडी । गाठीशी होती पुण्याई थोडी । गेली गुरू-शिष्याची जोडी । हात जोडीत विठ्ठला ॥१११॥ गुरू म्हणाले गणपतनाथा । इथे संकल्प करी आता । साक्ष ठेवूनी पंढरीनाथा । चुकीच्या पंथा त्यागीन मी ॥११२॥ शुद्ध सात्त्विक करीन आहार । हरिनाम मुखी चारीप्रहर । न्यायनीतीचा खरा व्यवहार । कदा अपहार होऊ नेदी ॥११३॥ ऐसी भाक रे करुणा । दया येईल रुक्मिणीरमणा । कृपेचा सागर, भक्तराणा । जाऊ नेदी कुणा विन्मुख ॥११४॥ मागणे माग त्यांना एक । पोटी यावा एकतरी लेक । जो गुणगंभीर अलौकिक । पे्रम करती अनेक ज्यावरी ॥११५॥ ऐसा करविला नवस । विठ्ठले पुरविली हौस । कालांतरे गेले दिवस । उजवली कूस गुजाबाईची ॥११६॥ झाला सारा आनंदी आनंद । गणपतीचे सुटले छंद । ईशकृपे आनंदाचा कंद । लागला नाद भक्तीचा ॥११७॥ हा झाला कुंभार गोरा । संतांचा संग, दोन दारा । उदासवृत्ती लक्ष न संसारा । सारा पसारा शून्य वाटे ॥११८॥ जन्मा आला यादवबाळ । मोठी आई करी सांभाळ । देव, गुरू कृपेचे बळ । सरली तळमळ हृदयाची ॥११९॥ एका आषाढी सोहळ्याला । विठोबास आक्या वाहिला । नवस होता राहिलेला । पूर्ण केला गणनाथे ॥१२०॥ यादव रांगे खेळू लागे । धावे मुलांच्या पाठीमागे । आईस खेळणे कधी मागे । सुखाचे धागे विणलेले ॥१२१॥ परी गणपतनाथ उदास । माया-मोह, भ्रम निरास । सैल झाले भवपाश । लागली आस वेगळी ॥१२२॥ दोन बायांचा दादला । नियतीने प्रपंच लादला । गुरुकृपे होता साधला । दैवे लाभला परमार्थ ॥१२३॥ जीवनात आधी आणि व्याधी । तिसरी असे ती उपाधी । कुणास भोगावी लागेल कधी । मिळता संधी धावती त्या ॥१२४॥ आधी हा रोग मनाचा । व्याधी हा भोग शरीराचा । उपाधी योग निसर्गाचा । तिन्ही प्रयोगाचा हा साक्षी ॥१२५॥ जे गुरूचे निजभक्त । संयमी, ज्ञानी, विरक्त । अपरिग्रही, अनासक्त । जाणती फक्त ते एकची ॥१२६॥ योगाविषयी भ्रामक कल्पना । आसन लावून बैसती ध्याना । प्राणायाम करून जाणा । योगी म्हणून जना मिरविती ॥१२७॥ योग म्हणजे भोग नाही । चित्ताचा निरोध करणे पाही । आवरली इंद्रिये दाही । आधकार राही त्यास फक्त ॥१२८॥ कोणी योगी म्हणवून घेती । केली असेल धौती, नेती । शरीरशुद्धीची साधने ती । कित्येक करती नारीनर ॥१२९॥ असे नाही नाथांचे घराणे । आदिनाथांपासून जो जाणे । मच्छिंद्र सांगे गोरक्षाकारणे । परंपरा त्याने जोपासली ॥१३०॥ गणपतनाथांनी घेतला वसा । ध्यान-धारणेचा उमटला ठसा । सुखसमाधीचा अनुभव असा । नाथांच्या वारसा प्रत्ययासी ॥१३१॥ बोलावून दोघीही जाया । म्हणे सांभाळा यादवा या । मी सोडणार नश्र्वर काया । करू नका वाया शोक तुम्ही ॥१३२॥ हा आपल्या वंशाचा दिवा । ज्ञानाचा अखंड ठेवा । शांती देईल अनेक जीवा । जातो मी गावा आपुल्या ॥१३३॥ नाथांनी घेतली समाधी । संपून गेली आधी, व्याधी । राहील कशी उपाधी । हरपला निधी ज्ञानाचा ॥१३४॥ आता यादवाचे बालपण । सांभाळती आया दोन । लग्नसोहळ्याचे वर्णन । लीलामृतग्रंथी जाण केले असे ॥१३५॥ लिहिता होय पुनरुक्ती । विस्तारभयाची मनी भीती । म्हणून प्रार्थितो तुम्हाप्रती । लेखणीची गती आवरून ॥१३६॥ नाथांनी पाहिली सून । वय मात्र फार लहान । पळसोदचे नाथ भगवान । व्याही जाण होते त्यांचे ॥१३७॥ मुलगी त्यांची गंगूबाई । तीच महादेवनाथांची आई । यादव होता जावई । व्याही भगवाननाथांचा ॥१३८॥ यादवांचे वय अवघे पाच । गंगाआईचे फक्त अडीच । जणू बाहुला-बाहुलीच । लग्न पंच ठरविती ॥१३९॥ आज बालविवाहास मनाई । कालानुरूप बदल होई । पूर्वी उगीच करिती घाई । आज नवलाई वाटे आम्हा ॥१४०॥ वर घरी, वधू माहेरा । व्याहीविहिणीच्या येरझारा । सून आणती सणावारा । आता हा प्रकार सारा आढळेना ॥१४१॥ यादव शिकू लागला शाळा । दोन्ही आयांचा जिव्हाळा। विसरती कधी न बाळा । अखंड लळा प्रेमाचा ॥१४२॥ चार वर्ग झाला पास । पुढे पाठवावे शिकावयास । मामांचे गाव पारस । ठेविले त्यास दिवस काही ॥१४३॥ श्रीमंताचा लेक एकला । पुढे शाळा नाही शिकला। पाटीपुस्तकांसी मुकला । प्रेमा भुकेला आईच्या ॥१४४॥ काय त्या नाथांचे वैभव । दुकानदारी देवघेव । तिजोरीत रोकड ठेव । अंगणात पेव धान्याचे ॥१४५॥ जमीन कसदार भारी । काही होती सावकारी । भरीस भर दुकानदारी । एक कारभारी पाहतसे ॥१४६॥ यादवाचे बालपण । कैसे झाले शिक्षण । गणपतनाथांचे प्रयाण । केले वर्णन लीलामृती ॥१४७॥ वसंतराव मालपे एक। ज्ञानी मनमिळाउᆬ भाविक । उच्च माध्यमिक शाळाशिक्षक । पदव्या अनेक ज्यापासी ॥१४८॥ यादव-महादेव पिता-पुत्र । त्यांनी लिहिले जीवनचरित्र । ते गुरूसम मज पवित्र । त्यात तिळमात्र शंका नसे ॥१४९॥ गं्रथ हातरूणचे नंदादीप । एक मुलगा, एक बाप । दोघांच्या पुण्याचा प्रताप । अध्यात्माचे माप कळुनीया ॥१५०॥ लाविला अखंड ज्ञानदिवा । प्रकाश मिळे जीवाजीवा । जीव तोच भेटे शिवा । असे अनुभवा येतसे ॥१५१॥ नमस्कार माझा मालपे सरा । ज्ञान भक्तीचा निर्झर झरा । एकदा नंदादीप वाचा जरा । कळेल खरा नाथमहिमा ॥१५२॥ आणिक असाच एक ग्रंथ । यादवनाथ योगलीलामृत । कसे हे संत यादवनाथ । योगाचे महत्त्व वर्णीयले ॥१५३॥ श्रोत्यांना माझी नम्र विनंती । किती गाऊ यादवाची कीर्ती । संतचरित्रे वाचावी ती । बद्ध, मुमुक्षू साधकांनी ॥१५४॥ मुमुक्षू साधना करती । सिद्ध होती ऐशा रीती । भगवद्भक्त ज्ञानी किती । मिळते शांती आर्तजीवा ॥१५५॥ हा अध्याय संपवू येथ । जन्मा येतील महादेवनाथ । कृपा करील पंढरीनाथ । वर्णेन यथार्थ गुरुकृपे ॥१५६॥ संत अवतार घेती । गर्भवासाची नाही भीती । लागे मात्र हरीची संगती । तरती, तारिती बद्धजीवा ॥१५७॥ या ग्रंथाचे प्रयोजन । महादेवदास आत्मनिवेदन । केले असे हे कथन । तुमचे चरण वंदुनी ॥१५८॥ श्री महादेवनाथ चरित्र । ग्रंथ असे परमपवित्र । वाचो, ऐकोत जन सर्वत्र । अध्यायसत्र प्रथम संपूर्णः ॥ श्री हरिहरार्पणमस्तु॥
॥ श्री सद्‌गुरू महादेवनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP